An amazing story of Manoj who does not drink alcohol books and stories free download online pdf in Marathi

दारू न पिणाऱ्या मनोजची अफलातून स्टोरी


"दारू न पिणाऱ्या मनोजची अफलातून स्टोरी "

लेखक - हेमंत सांबरे


आज तर दारू , बियर , वाईन इ इ पिणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा , मानसन्मान असण्याच्या काळात , " दारू न पिणाऱ्या मनोज " ची स्टोरी कुणी तरी वाचेल का ? अशी शंका येणे सहज आहे . माझ्याही मनात तीच शंका आली . म्हणून मी आपला ' शक्य नाहीच ', ' हे होणे नाही ' असे ठामपणे मनोजला सांगून मोकळा झालो होतो . पण मनोज माझ्या खूपच मागे लागला व यावर " तू लिहलेच पाहिजे ! " असा त्याने हट्टच केला .
' अर्थात आता हा मनोज कोण ? ' असे वाचकांच्या सहज मनात आले असेलच ! . सांगतो . मनोज हा माझा खूप जवळचा मित्र आहे . पण मनोजच्या ' दारू न पिण्याच्या ' मागे इतकी काही थरारक स्टोरी असेल असे मलाही माहीत नव्हते .

'एकच प्याला ' हे राम गणेश गडकरी यांनी लिहलेले नाटक ज्यांनी वाचले असेल , त्यांना माहीतच असेल की 'दारू पिणे 'या विषयावर रा ग गडकरी यांनी लिहायचे असे काहीही बाकी ठेवलेले नाही . त्यानंतरच्या काळात चित्रपट , नाटके , पुस्तके इ मध्ये दारू वर जितके काही जोक आले असतील ते सारे ' एकच प्याला ' तून घेतलेले असतात किंवा त्यावरून आधारित तरी असतात . त्यामुळे ' दारू पिणे ' या गोष्टीला विनोदाच्या अंगाने देखील खूप बघितले जाते . पण ' दारू न पिणे ' यावर कदाचितच कुणी विनोदी लिहले असावे .

पण ही स्टोरी म्हणजे ' व्यसनमुक्ती ' सांगणारी वगैरे असे काहीही नाही , हे वाचकांनी लक्षात घ्यावे .

आता मनोजकडे परत येतो . इथून पुढे मनोजने मला जे सांगितले ते जसेच्या तसे येथे सांगतो . शक्यतो कुणी माझी कथा सांगा असे जेव्हा म्हणतो , आणि विशेषतः ती बाब खासगी असेल तर ' नाव न सांगण्याच्या अटीवर ' असे म्हणून पुढे सांगा म्हटले जाते . पण येथे मनोजने 'माझे नाव सांगितले जावें 'हीच माझी अट आहे , असे मला स्पष्ट सांगितले .

मनोज मुळात शाळेत , कॉलेजात खूप हुशार कधीही नव्हता . शिवाय त्याचा स्वभाव खूपच लाजाळू असा असल्याने आयुष्यात तो काही विशेष करेल असे त्याच्या घरच्यांना कधीही वाटले नव्हते (त्याला स्वतःला ही वाटले नव्हते ) . नोकरी ची सुरुवात करताना तो स्वेच्छेने नव्हे तर नाईलाजाने मार्केटिंग मध्ये पडला . कारण तेव्हा नोकरीची गरज आहे , म्हणून जे मिळतंय ते सुरू करावे अशी परिस्थीती होती . इथे लाजाळू मनोजला जिथे कुणाच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे सुद्धा अवघड वाटायचे , अशावेळी मार्केटिंग करताना तो फेल होणे अगदी साहजिक होते . पण त्याच्या आयुष्यात त्याच्या ' दारू न पिण्याच्या ' सवयीमुळे त्याचे आयुष्य कसे बदलून गेले ,याचीच ही कथा आहे .

एकदा रविवारी रात्री त्यांच्या ऑफिसच्या लोकांची पार्टी होती . बॉसने सगळ्यांना बोलावले होते , मनोजही गेला . तिथे गेल्यावर सगळेच बियर प्यायला लागले . पण मनोज मात्र नुसताच बसून होता . त्याचा मित्र राकेश जवळ आला व त्याने त्याला त्याचा ग्लास भरून दिला . पण मनोज काही हात लावेंना.... सगळेच हसू लागले ...' अरे घे की मनोज !! थोडीशी घे , काही होत नाही " असे म्हणून सगळेच आग्रह करू लागले . मनोज तसाच बसून ... मग त्याचा बॉसच उठला व त्याने त्याला सांगितले ," सगळेच घेत आहे , तुलाही घेतली पाहिजे " तरीही मनोजने काही ऐकले नाही . राकेशने मनोजला उठवून थोडेसे बाजूला नेले व म्हटलं , " बघ मनोज , आपला बॉस फार इगो वाला आहे , तू बियर घेतली नाही तर त्याला राग येईल व कदाचित तुझी नोकरी ही जाईल " . राकेश हा बॉसच्या खूप जवळचा होता . त्यामुळे तो जर असे सांगत असेल तर ते खरेही होऊ शकते हे मनोजला कळत होते . सगळे पिऊन धुंद होऊ लागले , कुणालाही भान राहिले नाही . फक्त मनोजच शुध्दीवर राहिला . रात्रीचां एक वाजला , सगळे आपापल्या घरी जाऊ लागले .

दुसरा दिवस उजाडला . सकाळचे ११ वाजले ( सोमवार ) . एक एक करून सगळे ऑफिसला येऊ लागले . सगळ्यांमध्ये चर्चा सुरू की , " आज मनोज ची नोकरी नक्कीच जाणार " . मनोज ची खुर्ची रिकामी दिसत होती . बहुधा भीतीने पठ्याने आधीच पोबारा केला असावा . हळूच बॉसने एन्ट्री केली . बॉस कुणाशी ही एक शब्द न बोलता स्वतःच्या केबिन मध्ये गेला . मनोज त्या दिवशी आलाच नाही . सगळ्यांची निराशा झाली . राकेश ने विचार केला , ' मनोजचा पत्ता परस्पर कट झालेला दिसतोय '

दोन दिवसांनी मनोज ऑफिसमध्ये अगदी उशिरा आला .
तो अगदी चांगल्या मुड मध्ये दिसला . आरामात आपल्या खुर्चीवर बसून मोबाईल मध्ये काहीतरी टाईमपास करत बसला . थोड्या वेळाने बॉस आला . बाकीच्या सगळ्या स्टाफला आता आपल्याला खूप मज्जा बघायला मिळणार असे वाटून आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या . पण झाले भलतेच !. केबिन काचेचे असल्याने बाहेरच्यांना दिसत होते . मनोज केबिन मध्ये जाताच बॉसने त्याला मिठीच मारली , मनोजची तो पाठ थोपटू लागला . बाहेरचे सगळेच अचंबित , आ वासून बघू लागले . बॉसने त्याला बसायला खुर्ची पुढे केली . बॉस त्याच्याशी शांतपणे गप्पा मारू लागला . अर्थात केबिन मधले बाहेर दिसत असले तरी , काच ही sound proof असल्याने दोघे काय बोलत आहेत , हे काही बाहेर कळत नव्हते . बॉसने आजपर्यंत कुणालाही त्याच्या समोर बसायला खुर्ची ऑफर केली नव्हती , त्याच्या समोर बोलताना उभे राहूनच बोलावे लागायचे. इथे मात्र बॉस अगदी मित्राशी गप्पा माराव्या तशा प्रकारे चित्र दिसले. मधूनच तो मनोजच्या हातावर हात दाबत अगदी जवळचा मित्र असल्याप्रमाणे त्याला काही सांगत होता . एकदा तर चक्क बॉसने त्याला हात जोडून काही त्याला सांगत असावा असेही दिसले . ही तर height च झाली असे बाहेरच्यांना वाटले .
थोड्या वेळाने दोघेही जागेवरून उठले . बॉस ही अगदी केबिनच्या दारापर्यंत आला , मनोज बरोबर ! केबिन चे दार बॉसने स्वतःच उघडले .

मनोज थोडासा छाती वर काढतंच स्वतःच्या जागेवर जाऊन बसला . सगळे जसे त्या रात्री मनोज दारू पित नसल्याने त्याच्याकडे ज्या तुच्छ नजरेने बघत होते , त्यापेक्षा जास्त तुच्छ नजरेने मनोज सगळ्यांकडे बघू लागला . राकेश विचार करू लागला की , "आपण समजतो तितका हा प्राणी भोळा दिसत नाही , आपण सगळे निघून गेल्यावर या भामट्याने बॉस सोबत बसून बियर पिली असेल व बॉसला खुश केले असावे , कारण सगळ्यात शेवटी बॉस व मनोज असे दोघेच हॉटेलमधून निघाले होते , आमच्या समोर मात्र हा स्वतःला खूप सज्जन असे दाखवतोय " . त्या दिवशी मनोजने काहीही काम केले नाही व नुसताच मोबाईल मध्ये (हो ही काही फार जुनी कथा नाही ) डोके घालून बसला होता , बहुधा गेम खेळत बसला असावा .
मग मनोजने पुढची दीड वर्षे खूप ऐश केली . उशिरा येणे , लवकर जाणे , महत्वाच्या मीटिंग चुकवणे इ तो सर्रास करत राहिला . तरीही बॉस त्याला काही बोलतोय वगैरे असे काही दिसले नाही .
अशी दोन वर्षे उलटून गेली . मधल्या काळात मनोजने कंपनीही बदललेली होती .
त्याचा बॉस तर दोन महिने आधीच कंपनी सोडून गुरगावला निघून गेला .

मग काही दिवसांनी .....
एकदा मनोज असाच F C रोड वर चालत होता (हो ही आपल्या पुण्यातच घडलेली स्टोरी आहे ) , त्याला एकदम मागून कुणीतरी पाठीवर जोरात थाप मारली . मागे वळून पाहतो तर राकेश ! राकेशने त्याला म्हटले " चल मनोज , वैशाली हॉटेल मध्ये बसून कॉफी घेऊ , तसाही तू बियर तर पित नाहिसच! " असे म्हणत आपणच केलेल्या जोकवर राकेश स्वतःच खळखळून हसला. राकेश अजूनही त्याच कंपनीत काम करत होता , हे मनोजला माहीत होते . राकेश आपल्याला का कॉफी पाजतोय हे मनोजला लक्षात आले . दोघेही वैशालीत घुसले , राकेशने एक टेबल पकडुन मनोजला बसायला सांगितले .

कॉफी पिता पिता राकेशने गेले दोन वर्षे रहस्यमय राहिलेल्या गोष्टीला हात घातला . "त्या रात्री तू बॉसला नेमकी कोणती गोळी खाऊ घातली ते सांग", असे विचारले . मनोज ने मनात विचार केला , आता आपण तर कंपनी सोडलीच आहे, तर सांगायला हरकत काहीच नाही . मनोज मग सांगू लागला ,

- 'रात्रीचे दोन वाजले होते . बॉस थोडासा झोकांडे खातच हॉटेलच्या बाहेर आला . मनोज तिथे रिसेप्शन ला उभा होता . बॉसने ड्रायवरला फोन लावला , पण ड्रायव्हर काही फोन उचलेना . बॉस अगदी खूप वेळा ट्राय करून करून वैतागला होता . मनोज तिथेच उभे राहून ही गंमत बघत होता . दारू पिताना बॉस त्याला खूपच घालून पाडून बोलला होता, त्याचा अपमान ही केला होता व तशीही राकेशने सांगितल्या प्रमाणे आपली नोकरी जाणारच आहे, त्यामुळे आपण आता फक्त मज्जा बघू अशा विचारात मनोज होता . थोड्या वेळाने इकडे तिकडे बघताना बॉसला मनोज तिथे उभा दिसला. बराच वेळ झाल्याने बॉसचा नाईलाज झाला असावा , त्याने मनोजला विचारले , " तुला गाडी चालवता येते का"? मनोजने हो म्हणून मान डोलावली . बॉसने रिक्वेस्ट केली , " मला सोडतो का ? " . मनोजला वाटले , ही चांगली संधी आहे , निदान आपली नोकरी तरी जाणार नाही . म्हणून मनोजने बॉसकडे असलेली एक्स्ट्रा चावी घेतली व ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला . बॉस मागच्या सीटवर न बसता मनोजच्या शेजारी येऊन बसला . मनोज हळुवार पणे गाडी चालवत होता . बॉस जसा रस्ता सांगेल त्याप्रमाणे कोथरूडला डहाणूकर कॉलनीत गाडी चालवत गेला . मग तिथे एका बंगल्याच्या समोर गाडी उभी राहिली . इथे मनोजच्या मनात शंका आली . बॉस तर बावधन मध्ये राहतो असे सांगितले होते , मग याने गाडी इकडे डहाणूकर मध्ये का आणली ? गाडी बाहेर उभी केली व मनोज खाली उतरला . बॉसचे अजूनही झोकांडे जात असल्याने मनोजच त्याला आधार देत दरवाजापर्यंत घेऊन गेला . मनोजनेच बेल वाजवली , एका अतिशय सुंदर स्त्रीने दार उघडले . मनोजने , "नमस्कार , मॅडम " असे म्हणून बॉसला दरवाजात त्यांच्या कडे सोपवून तो मागे वळून निघू लागला . तो त्या सुंदर बाईने त्याला अतिशय गोड हसून thank you म्हटले व चहा घेण्याचा आग्रह केला . मनोज ही तसा या धावपळीने व रात्रीचे जागरण झाल्याने दमला होता . त्याने आत सोफ्यावर बसून त्या सुंदर स्त्रीने आणलेला चविष्ट चहा घेतला . तोपर्यंत त्या स्री ने बहुधा बॉसला आत बेडरूम मध्ये झोपवले असावे .
मनोज गाडीची चावी मॅडम कडे सोपवून तेथून निघाला व थेट चालतच आपल्या कर्वे रोड वरच्या घरी पोहोचला व त्याने झोपून घेतले .
दुसरा दिवस उजाडला . मनोज नेहमीप्रमाणे सकाळी त्याच्या नाश्त्याच्या हॉटेलात पोहोचला . तिथे बाहेर उभा राहून चहा घेतोय तर त्याला बॉसची गाडी दिसली .
तो चहा पिता पिता बघू लागला . मागच्या दरवाजातून एक स्री बाहेर पडली , त्याच वेळी पलीकडच्या दरवाज्यातून बॉस ही बाहेर आला . त्या स्री च्या हातात भाजीची बॅग होती व मनोजचा बॉस तिच्या मागोमाग चालत येऊ लागला . ते दोघेही मनोज जिथे उभा होता त्याच दिशेने येऊ लागले . मनोजला बघून बॉस चपापला व त्याच्या चेहऱ्यावरचे रंग बदलू लागले . मनोजने ही त्याला पुढे होत , " Good morning Sir " असे म्हणून त्याने , " good morning madam " असे बोलत मॅडमला ही नमस्कार केला . मॅडम भाजी घ्यायला जशा पुढे गेल्या , तसे बॉसने मनोजला एका बाजूला घेत , " ,तू इथे काय करतोय ?" असे विचारले . मनोज -" बॉस , ही माझ्या रोजच्या चहा घेण्याची जागा आहे " . मनोजने हळूच शंका विचारली , " बॉस , मग त्या रात्रीच्या मॅडम ?" 🤔 कोण ??" बॉसला आता लक्षात येऊ लागले की आपण आता चांगलेच फसले आहोत . मनोजला आपण जितके साधे समजत होतो तसा तो अगदी साधा नाही . तेव्हढ्यात मॅडम भाजी घेऊन परत आल्या . मनोजकडे पाहून म्हणाल्या , " परत इकडे आलात की घरी या चहा घ्यायला , आम्ही समोरच high bliss सोसायटी मध्ये राहतो , B Wing , Third Floor " असे बोलून मॅडम गाडीकडे जाऊ लागल्या . बॉस थोडासा तिथेच रेंगाळला . आता तो चांगलाच तावडीत सापडला होता . इति मनोज , " सर , या तुमच्या मिसेस, मग काल रात्री मी तुम्हाला जिथे सोडले त्या मॅडम कोण ? " . मनोज इतक्या सहजी आपल्याला सोडेल असे दिसत नाही असे बॉसला स्पष्ट कळून चुकले . बॉसने लगेच त्या चहाच्या टपरीचे मनोजचे चहाचे व नाश्त्याचे बिल चुकते केले , मनोजला दोन दिवसांची फुल्ल पगारी सुट्टी देऊन थेट दोन दिवसांनी ऑफिसला ये असे सांगितले ."
इथे मनोज बोलायचे थांबला .
राकेशच्या डोक्यात आता प्रकाश पडू लागला होता . एका ' दारू न पिणाऱ्या ' माणसाने ' दारू पिणाऱ्या ' लोकांवर कशी मात केली हे त्याला कळून चुकले होते .

पण या स्टोरीतील क्लायमॅक्स अजूनही बाकीच होता . एका रविवारी काही कामाच्या निमित्ताने राकेश डहाणूकर कॉलनीतून आपल्या बाईक वरून जात होता . त्यावेळी एका बंगल्याच्या गॅलरीत त्याला बनियान घातलेला व कमरेला टॉवेल गुंडाळून उभा असलेला मनोज दिसला . त्याच्या मागे एक अतिशय सुंदर स्त्री उभी होती व ती त्याच्या हातात चहा देत होती . चहा देऊन ती आत निघून गेली . राकेश अजूनही तिथेच उभा राहून आ वासून मनोजच्या दिशेने पाहत उभाच होता . तितक्यात मनोजचे लक्ष राकेश कडे गेले . मनोजने हसून त्याला हात हलवून ओळख दाखवली . राकेशला उगाचच असा भास झाला की मनोजने त्याला डोळा मारला .

राकेशच्या मनात असूनही मनोजने मात्र त्याला चहा प्यायला काही बोलावले नाही .

मनोजच्या बॉसने केलेली चूक रिपीट करायला मनोज थोडाच मूर्ख होता ? 😃😃