Getting married? books and stories free download online pdf in Marathi

विवाह करताय?

विवाह करताय ; चांगला विचार करा

अलिकडे न्यायालयात घटस्फोटाचे खटले दाखल होत आहेत. खटले वाढत असून निकालाच्या मानानं खटल्याची संख्या जास्त आहे. या खटल्यातील वादाचा विषय असते सासू. सासू मोठी खास्ट आहे असं कारण पुढं करीत न्यायालयात खटले दाखल होत असतात. तसं पाहता अलिकडील काळ बदललेला आहे व काही काही घरात सासवांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
पुर्वीचा काळ असा नव्हता. त्या काळात सासवा बदमाश असत असं आजच्या काळातील लोकांचं म्हणणं. परंतु त्या काळातीलही अपवादात्मक दोनचार जर सोडल्या तर काही सासवा खऱ्याच चांगल्या होत्या. मग सासवा खास्ट असतात. त्या चांगल्या नसतात असा सासवांचा इतिहास बदनाम करणारा का पुढे आला असावा? त्याचं कारण होतं बालविवाह.
आई......आपली आई आपल्याला प्रिय असते. कारण ती आपली आई असते. त्यातच तिनं आपल्याला कितीही त्रास दिला तरी तो त्रास आपल्याला त्रास दिल्यासारखा वाटत नाही. कारण ती आपली आई असते. एखाद्या वेळेस आपण आपल्या आईचं एखादं काम जर केलं नाही तरी आई रागावते व आपल्याला मारते. तेव्हा आपल्याला तिचा तात्पुरता राग येतो. मग काही वेळानं तो राग आपण विसरुन जातो. त्याचा राग आपण आपल्या मनात धरुन ठेवत नाही. परंतु त्याचवेळेस जर ती आपली आई नसेल, दुसरं कुणीही असेल आणि ती व्यक्ती आपल्यावर कितीही प्रेम करीत असेल तरी त्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो. तीच गोष्ट पुर्वी आपल्याला सासवाच्या बाबतीत घडून आलेली दिसते.
पुर्वी बालविवाह व्हायचे व ते बालवय असायचं आणि त्या बालवयात विवाह व्हायचे. तसं पाहता त्या बालवयात तसे बालविवाह झाल्यानंतर ते खेळण्या बागडण्याचं वय असतांना सासू तिला घरची कामं सांगायची नव्हे तर ती कामं करीत असतांना जर ती चुकलीच तर तिला ती समजावून सांगायची. त्यातच ती अशी कामं करीत असतांना ती सारखी चुकत असेल तर तिला रागवायची. तसं त्या सुनेचं वय,लहान असल्यानं तिला ते मारायचीही. जशी आजची आपली आई आपल्याला मारते तशी. तसं पाहता त्या सासुनं तसं मारताच तिला राग यायचा. जसा आजच्या काळात आपल्याला कोणी मारत असेल तर राग येतो तसा. याच रागावरुन व मारण्यावरुन सासू बदनाम झाली पुर्वीच्या काळी. काही दिवस जाताच हे मारणे जेव्हा ती समजदार होत असे. तेव्हा लक्षात येत असे व तेव्हा तीव्र राग मनात राहात असे.
आज काळ बदलला. या बदलत्या काळानुसार सासू सुनेच्या व्यवहारात बदल झाला. सासू सून झाली व सून सासू. आता सासूवर सून अत्याचार करती झाली. परंतु ज्या घरातील मुलगा आपल्या आईवर आपल्याच पत्नीकडून होणारा अत्याचार सहन करु शकला नाही. तेव्हा वाद झालेत व असे वाद झालेत की ज्याचं रुपांतरण चक्कं घटस्फोट व न्यायालयातील खटल्यात झालं. कारण कायद्याचं अलिकडील काळात पत्नीला अभय दिल्या गेलं आहे.
कायदे बनले हे अभ्यास करुनच. परंतु ते कायदे बनवितांना कदाचीत घराघरातील परिस्थिती लक्षात घेतलेली नसावी. वरवर परिस्थिती पाहून कायदे बनले असावेत. कारण प्रत्येक घरातील परिस्थिती सारखी नसते. काही घरात प्रेम असतं तर काही घरात प्रेम, जिव्हाळा याला थारा नसतो. उदाहरणार्थ एखादी सावत्र आई एखाद्या बाळाला स्वतःच्या मुलासारखी वागणूक देवू शकते. तर काही सावत्र आई काही काही बाळांना सावत्रपणाचीच वागणूक देत असतात. हे नाकारता येत नाही. तेच घडलं असेल कायदे बनवितांना. कायदे बनले देशातील विपरीत परिस्थिती पाहूनच. त्याचा सखोल अभ्यास केला त्यांनी. परंतु असा सखोल अभ्यास करीत असतांना प्रत्येक घरातील वातावरण वेगळं असते याची जाणीव न ठेवून कायदे बनल्यानं आज घराघरातील वातावरण तंग अशा स्वरुपाचं आहे व आज अशाच तंग वातावरणातून आलेल्या गैरसमजुतीतून न्यायालयात खटले दाखल होत आहेत व त्या खटल्यात वाढ होत आहे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की प्रत्येक सुनेनं आज आपल्या सासूला समजून घेण्याची गरज आहे. तिनं तिला आपली आईचं मानावं. तिला बदनाम करु नये. कारण आज तो काळ गेला की ज्या काळात बालविवाह होत व अगदी अल्पवयात घरी आलेल्या मुलीला सर्व करतब शिकविण्याचे काम सासू नावाची त्या काळातील आई शिकवीत असे. ती तिला सर्व गोष्टीत पारंगत करीत असे. जो साधारण आजच्या काळातील महिलांना अत्याचार वाटत असतो. आज त्याच महिलेनं समजून घ्यावं आपल्या सासूला. तसं पाहता आज काळ बदलला नाही. काळ तोच आहे. फरक एवढाच आहे की आजच्या काळात महिलांचे बालविवाह होत नाहीत व आजच्या काळात जे विवाह होतात. ते विवाह ती समजदार झाल्यावर होतात. त्यामुळं सासू जर एखादी चांगली गोष्ट सांगत असेल तर ती आपल्याला सहजासहजी स्विकारता येत नाही. स्विकारण्यात समस्या निर्माण होतात. म्हणूनच घटस्फोट, अत्याचार ह्या साऱ्या कटकटी वाटतात. कारण आजच्या काळात वय वाढलेले आहे विवाहाचे व या वाढत्या वयात आपलं काहीही चुकत असल्यास वा त्यावर कोणीही काही सुचना करीत असल्यास त्या सुचना आपल्याला आवडत नाहीत. त्या सुचना वारंवार केल्यास आपल्याला राग येतो व तशी आपल्याला आपल्याच हितासाठी कोणी अक्कल सुचविलेली आवडत नसल्यानं आपली भांडणं होत असतात.
नवीन सुन, मग ती कितीही वयाची का असेना, घरामध्ये नवीनच नांदायला येतांना तिला तसा फारसा अनुभव नसतोच. तो अनुभव सासूला नक्कीच असतो. शिवाय नवीन घर. नवनवीन व्यक्ती, नवीन परीसर, नवीन शेजारी, रोजच नवनवीन लोकांशी येणारा संपर्क हा नवीनच असतो व त्या लोकांशी जुळवून घेणे ह्या गोष्ट काही एकाच दिवशी शक्य होत नाहीत. त्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. परंतु आपला स्वभाव हा उतावीळ असतो. तो उतावीळ बनलेला असतो. कारण आपल्या मायबापानं आपले फारच लाड पुरविलेले असतात. शिवाय अशा उतावीळ स्वभावाने त्या नवीनच वातावरणात आपण स्वतःला दिडशहाणे समजत असल्यानं व आपल्या मायबापानं तसं आपल्याला सांगीतलं असल्यानं आपल्यासमोर नवीन लोकांनी काही सुचविलेलं आपल्याला खपत नाही व ती सुचना करणे म्हणजे आपल्याला अत्याचार वाटतो. त्यातूनच घटस्फोटासारखे प्रसंग निर्माण होत असतात.
विशेष सांगायचं म्हणजे आपले वय जरी वाढले असेल अन् वाढत्या वयात आपण समजदार जरी झालो असेल तरी आपण स्वतःला शहाणे समजू नये. तरच संसार टिकतो. आपण समजदार असल्यानं आपल्यावर कोणीही आजच्या काळात अत्याचार करु शकत नाहीत. काही जण सुचनाही करतात. त्या सुचना समजून घ्याव्या. त्याचा बाऊ करु नये. तरच संसार टिकेल. तसा तो टिकवावा. अन् ज्याला तसं वागायचं नसेल. संसार टिकवायचा नसेल, तर त्याचा त्यांनी आधीच विचार करावा. त्यानं विवाहही करु नये व संसारात पडू नये. व्यतिरिक्त संसारात पडून कुणाचं जीवन उध्वस्त करु नये म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०