love online books and stories free download online pdf in Marathi

ऑनलाईन प्रेम

"कायरे हा अक्की(आकाश) सारखा काय ऑनलाइन असतो,ऑफिस काम झालं तरी घरी जायची घाई नसते त्याला,लंच ब्रेक मध्ये सुद्धा लवकर येत नाही हा,काय भानगड काय आहे?",सुबोध स्वप्नील ला म्हणाला.

"अरे ऑनलाइन फेसबुक वर मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायच्या आणि मग चॅटिंग सुरू करायची आणि स्टेप बाय स्टेप पुढे जात प्रेमा पर्यंत गाडी न्यायची असं चाललेलं आहे त्याचं",स्वप्नील म्हणाला.

"अरे पण ऑनलाइन प्रेमात कितपत विश्वास ठेवणार समोरच्या माणसावर, त्याची खात्री कोण देणार? उगीच वेळ घालवतोय हा आकाश",सुबोध म्हणाला.

"बघ बघ तिकडे,आकाश नी पूर्ण परफ्युम ची बाटली स्वतः वर रिकामी केली,नुसता घमघमाट, आणि कशासाठी तर ऑनलाइन मीटिंग साठी. हा हा हा आता त्या फेसबुक वरच्या मुलीला वास येणार आहे का याने मारलेल्या परफ्युम चा,कठीण आहे",असं म्हणत स्वप्नील ने हात जोडले.

"झालं आता लंच ब्रेक मध्ये हा काही येणार नाही आपण आपलं जेवण आटपून घेऊ",सुबोध

संध्याकाळी ऑफिस अवर्स संपल्यावर सगळे घरी जायला निघाले. आकाश ही उठला,सुबोध-स्वप्नील ला आश्चर्य वाटलं.

"अरे आकाश आज लवकर आटोपलं तुझं ऑनलाइन बिनलाईन,का आज नाही का एखादी ऑनलाईन फ्रेंड मिळाली तुला?",स्वप्नील म्हणाला.

"अरे भेटली होती,पण तिला फक्त फ्रेंडशिप मध्ये इंटरेस्ट होता,प्रेमात बिमात तिला इंटरेस्ट नव्हता",आकाश पडलेल्या चेहऱ्याने म्हणाला.

"तुम्ही एकमेकांना तुमचे फोटो शेअर केले होते का?",सुबोध म्हणाला

"हो,फोटो शेअर करेपर्यंत सगळं ठीक चाललं होतं पण नंतर तिने चॅट आवरतं घेतलं, काय माहीत तिला काय झालं",आकाश

"अरे तेज,केवढं तुझं ते तेज तिला सहन झालं नसणार,फोटोतील तुझा तेजस्वी चेहरा बघून तिचे डोळे दिपले असतील बिचारीचे, जाऊदे, सामान्य होती ती, तुला एखादी असामान्य मुलगी मिळणार असेल,उद्या पुन्हा प्रयत्न कर.",असं स्वप्नील ने म्हणताच आकाश ला जरा हुरूप आला.

दुसऱ्या दिवशी आकाश फार खुशीत होता,ऑफिस चे काम सुद्धा आज तो मोठ्या उत्साहाने करत होता. "व्वा आकाश आज खुश दिसतोय तू ,काही विशेष कारण?",सुबोध ने आल्या आल्या विचारलं.

"अरे काल रात्री नवीन फ्रेंडशिप झाली माझी एका मुलीशी, फोटो पण शेअर केले, खूप सुरेख आहे मुलगी, मी पण खूप आवडलो तिला, नाव ही शोभेल असंच आहे तिचं,लावण्या",आकाश भराभर सांगत सुटला.

"अरे हो हो,जरा श्वास तर घे, आरामात सांग,फार छान वाटलं ऐकून, आता कुठे तुझे ऑनलाइन प्रेम बहरेल असं दिसतेय",सुबोध आकाश च्या पाठीवर थाप मारून म्हणाला.

तेवढ्यात स्वप्नील आला त्यालाही आकाश ने पुन्हा एकदा सगळं उत्साहाने सांगितले.

"छान झालं मित्रा पण ह्या भानगडीत ऑफिस च काम करायला विसरू नको बरं कारण आपण एका ग्रुप मध्ये आहोत आणि ग्रुप लीडर म्हणून मलाच बॉसला उत्तरं द्यावे लागतात, तुला जे मॉड्युल दिलंय ते डेड लाईन च्या आधी पूर्ण कर म्हणजे झालं",स्वप्नील म्हणाला.

"अरे हो काही काळजी करू नको, हे ऑनलाइन प्रेम मी ब्रेक मध्ये करतो, ऑफिस काम मध्ये नाही करत",आकाश ने त्याला आश्वस्त केलं.

"येतो का आकाश, लंच ब्रेक झाला", आकाश च्या बाजूच्या क्यूबिकल मधला विकास म्हणाला.

"अरे तो आता कसचा येतो, तो बिझी आहे, चला आपण जाऊ कॅन्टीन मध्ये",सुबोध म्हणाला.

थोड्यावेळातच आकाश कॅन्टीन मध्ये स्वप्नील जवळ आला आणि म्हणाला,
"स्वप्नील प्लिज जरा तुझा शर्ट देतो का"

"का रे बाबा, तुझा शर्ट तर मस्त आहे , मग माझा शर्ट का पाहिजे तुला?",स्वप्नील आश्चर्याने म्हणाला.

"अरे माझी जी ऑनलाइन प्रेयसी आहे न तिला पिंक कलर फार आवडतो, ती आत्ता म्हणाली की तिला माझा पिंक शर्टातला फोटो हवाय म्हणून.",आकाश

"अरे पण म्हणजे आत्ताच द्यायची काय गरज आहे,घरी गेल्यावर दे न फोटो, तुझ्याजवळ तर बरेच पिंक शेड्स चे शर्टस आहे, तुझाही फेवरेट कलर पिंकच आहे न",स्वप्नील

"अरे पण दे न पाच मिनिटाचाच तर प्रश्न आहे,का एवढा भाव खातो",आकाश

"चल बाबा, तू काही ऐकणार नाही, चल रेस्टरूम मध्ये चेंज करून घेऊ, आता माझ्या शर्टाला तुझा तो उग्र परफ्युम चा वास लागणार, आजच नवीन घडी मोडली होती मी शर्टाची",स्वप्नीलने कटकट करत शर्ट बदलून दिला.

"पाच काय दोन मिनिटांत च देतो तुझा शर्ट कटकट्या",असं म्हणून आकाश ने पिंक शर्टात सेल्फी काढला आणि स्वप्नील चा शर्ट परत केला.
अशा रीतीने तो दिवस तर संपला. दुसऱ्या दिवशी परत आकाश कामावर हजर झाला.

"अरे हे काय केलं रे, बारीक दाढी बरी दिसत होती तुला, हे काय हनुवटीवर माशी बसल्यासारखी छोटी दाढी ठेवलीय",सुबोध वाकडं तोंड करत म्हणाला.

"अरे लावण्याला आवडते अशी दाढि, दिल चाहता है मधल्या आमिर खान सारखी.",आकाश

"तिचा दिल काहीही चाहील म्हणून तू काहीही करशील, पक्का इडियट दिसतोय तू",स्वप्नील

"असू दे इडियट तर इडियट, तिला आवडलो म्हणजे झालं",आकाश ठसक्यात म्हणाला आणि स्वप्नील ठसका लागेपर्यंत हसला.

ऑफिस अवर्स संपल्यावर आकाश स्वप्नील ला म्हणाला, "यार एक काम होतं,नाही म्हणू नको, मित्रासाठी एवढं करच"

"काय करायचंय, सांगशील तरी, मैत्रीची आण देऊन काम करायला सांगतोय, काय करायला लावतो काय माहीत?",स्वप्नील

"अरे बॉस ला सांगून माझी उद्याची हाफ डे सुट्टी मंजूर करून घे न",आकाश

"कुठे जाणार हाफ डे घेऊन ",स्वप्नील

"अरे त्याच्या ऑनलाइन प्रेमाने बोलावलं असेल, हो की नाही आकाश,ती आकाश म्हणते तुला की अक्की म्हणते रे",सुबोध

"अरे सुबोध, अगं तुग काय करतो आपल्या होणाऱ्या वहिणी आहेत त्या लावण्या वहिणी हो की नाही आकाश",स्वप्नील

"हो",आकाश लाजत म्हणाला.

"ठीक आहे उद्या तुझी हाफ डे सुट्टी पक्की,कधी भेटणार आहेत वहिनी?",स्वप्नील

"रात्री आठ वाजता",आकाश

"मग रे कशाला पाहिजे तुला हाफ डे",सुबोध

"अरे पहिल्यांदाच भेटतोय आम्ही, मला तयारी करायला नको का , काय बोलू कसं बोलू ,सगळी तयारी करावी लागेल न म्हणून हाफ डे सुट्टी हवी.",आकाश

दुसऱ्या दिवशी आकाश वेगळ्याच दुनियेत वावरत होता,हवेत उडत होता. हवेत उडत उडत त्याने कसंबसं घड्याळाकडे बघत बघत ऑफिस काम केलं आणि हाफ डे घेऊन तो घरी निघून गेला.

"फारच उत्साहात दिसतोय हा नाही",सुबोध स्वप्नीलकडे बघत म्हणाला.

"हो, उत्साहा वर पाणी नाही फिरलं म्हणजे झालं",स्वप्नील

"अरे असं काय, असं का म्हणतो,त्याचं हे ऑनलाइन।प्रेम कदाचित यशस्वी होईलही",सुबोध

"एक काम कर, बरोबर आठ वाजता ‘पक्वान्न रेस्टॉरंट’ मध्ये ये, मी पण येतो तेव्हा,आकाश त्याच्या प्रेयसीला त्याच हॉटेल मध्ये भेटणार आहे त्याने सांगितलं मला",स्वप्नील सुबोधला म्हणाला.

आकाश पक्वान्न रेस्टॉरंट मध्ये साडे सात पासूनच येऊन बसला, आणि सारखा घड्याळ बघत लावंण्याची वाट बघू लागला. आणि एकदाचे आठ वाजले. आकाशच्या मोबाइलवर मेसेज आला,मेसेज लावंण्याचा होता, त्यात लिहिलं होतं ,

‘मी तुमच्या मागचे दोन टेबल सोडून तिसऱ्या टेबलवर तुमची वाट बघतेय’

आकाश ने बघितलं, एक पिंक ड्रेस घातलेली मुलगी त्याच्या कडे बघून हात दाखवतेय, तिने गॉगल घातला होता आणि डोक्यावर हॅट होती,आकाश च्या पोटात आनंदाने फुलपाखरं उडू लागले. तो हळूहळू त्या मुलीच्या दिशेने जाऊ लागला आणि तो लावण्याजवळ पोचला,लाजल्यामुळे त्याला तिच्याकडे बघण्याचं धैर्य ही होत नव्हतं.

"तुम्ही काय घेणार म्हणजे काय ऑर्डर करू?",लावण्या

"काहीही तुम्हाला जे आवडेल ते ",आकाश लाजून दुसरीकडे बघत म्हणाला.
वेटर ने दोन ग्लासात मँगो ज्युस आणून ठेवले.

"घ्या न तुम्ही खूप लाजाळू दिसता",परत लावण्याचा नाजूक आवाज किणकिणला.
आकाश ने मँगो ज्युस घेतला, एकेक घोट घेत तो लावण्याशी बोलण्यासाठी हिम्मत जुटवू लागला.

त्याला वाटलं बरं झालं हिने गॉगल लावला नाहीतर मी एकदम हिच्या डोळ्यात बघून बोलूच शकलो नसतो. ज्युस पिऊन झाल्यावर त्याने तिचा हात हातात घेतला,

अरे हे काय, हा असा रखरखीत हात लावण्याचा? आणि हे घड्याळ हे तर ओळखीचं आहे असा विचार करून आकाश ने चमकून वर बघितलं तर लावण्या हॅट आणि गॉगल काढून हसत होती, नाही हसत होता,हो हसत होता ‘स्वप्नील’.

आकाश ताडकन उठून उभा राहिला.
"ही काय मस्करी आहे, लावण्या कुठे आहे?",आकाश रागाने म्हणाला.

"अरे मीच तुझी लावण्या आहे अक्की",स्वप्नील बारीक आवाजात म्हणाला.

"खरं सांग लावण्या कुठाय? फालतू गिरी करू नको",आकाश

तेवढ्यात सुबोध रेस्टॉरंट मध्ये शिरला.

"काय झालं, आकाश तू का एवढा चिडला आहे?",असं म्हणून सुबोध ने लावण्या वहिनी कडे बघितलं आणि त्याचं तोंड आश्चर्याने उघडं ते उघडच राहिलं.

"म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून प्लॅन करून माझा पोपट केला असंच न",आकाश रागाने आळी पाळीने सुबोध स्वप्नील कडे बघत म्हणाला.

"अरे मला यातलं काहीच माहीत नाही,स्वप्नील म्हणाला ये म्हणून मी आलो",सुबोध

"हो आकाश,त्याला काहीच माहीत नाही,हा प्लॅन माझा एकट्याचाच आहे.

सुरुवातीपासूनच लावण्या म्हणून मीच तुझ्याशी चॅट करत होतो.",स्वप्नील

"पण गरजच काय होती असा पाणचट पणा करायची?",आकाश

"तू ऑनलाइन प्रेमाच्या मागे लागला होता त्यामुळे तुझ्या ऑफिस कामावर त्याचा परिणाम होत होता,मी कितीवेळा तुला बॉस समोर सांभाळू शकलो असतो,जेव्हा तुझ्या कामात चुका वाढू लागल्या आणि जेव्हा तुझ्या नोकरीवर गदा येण्याची वेळ आली तेव्हा मी हा प्लॅन करायचा निर्णय घेतला.

तुला तर माहितीच आहे मागच्याच वर्षी आपल्या कंपनीत काम करणारी एक कलीग सीमा ह्या ऑनलाइन प्रेमामध्ये धोका खाऊन तिच्या डोक्यावर परिणाम झाला, तिची नोकरी गेली तिच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे. आणि अकाउंट डिपार्टमेंट मधला तो आणखी एक कलीग सुधीर! तो तर पूर्ण कफल्लक झाला ह्या ऑनलाइन प्रेमा पायी, प्रेमाच्या जाळ्यात फासून त्याला गंडवलं त्याच्या ऑनलाइन प्रेयसीने त्याने तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण वेळीच त्याला दवाखान्यात नेल्यामुळे तो वाचला.

हे सगळं माहीत असूनही तू तीच चूक करत होतास म्हणून मी हे सगळं केलं. प्रत्येक वेळेस दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते ही म्हण तू विसरला. आणि ह्या ऑनलाईन जगात तर दिसते ते मुळीच नसते हे नेहमी लक्षातच ठेवायला पाहिजे.",स्वप्नील

इतकावेळ डोकं धरून बसलेला आकाश उठला आणि स्वप्नील ला मिठी मारून म्हणाला,

"धन्यवाद मित्रा, आज तुझ्यामुळे वाचलो."
इतका वेळ शांत असलेला सुबोध म्हणाला," बापरे काय घाबरलो होतो मी, मला वाटलं एवढ्या वर्षांच्या आपल्या मैत्रीत फूट पडते की काय , पण तसं झालं नाही, देव पावला"

"आता आधी काका काकूंना सांगून आकाश च्या ऑफलाईन लग्नाचं मनावर घ्या असं सांगावं लागेल",स्वप्नील

"ती जबाबदारी आता तूच घे मित्रा, माझं तेज सहन होणारी असामान्य मुलगी तूच शोधुन आण माझ्यासाठी",आकाश ने असं म्हणताच आकाश ,सुबोध आणि स्वप्नील तिघेही हसू लागले.

"आणि ते पिंक शर्ट काय,दाढी काय,काय काय करायला लावलं लावण्याच्या नावावर, चांगलाच नाटक्या आहे रे तू",आकाश स्वप्नील ला म्हणाला.

"अरे ती एक ट्रायल होती, असं करूनच समोरचा माणूस अंदाज घेतो की हा कितपत फसलाय म्हणून",स्वप्नील

"आणि इतक्या सुंदर मुलीचा फोटो तू आणला कुठून?",आकाश

"अरे दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री आहे ती. आपण साऊथ फिल्म्स बघत नसल्यामुळे तू ओळखलं नाही तिला",स्वप्नील

"तरीच मी म्हंटल! चांगलाच वर्क झाला तुझा प्लॅन",आकाश हसत म्हणाला.
चला मँगो ज्युस घेऊन ह्या प्लॅन ची सांगता करू असं म्हणून आकाश ने तीन मँगो ज्युस मागवले.
"आता उद्यापासून नियमित लक्ष देऊन ऑफिस काम सुरू" असं म्हणून सगळे आपापल्या घरी निघून गेले. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆