Dishabhool books and stories free download online pdf in Marathi

दिशाभूल

अर्जुन कवठेकर आपला मित्र गौरेश निमकरसोबत लिंबू सरबत पीत बसला होता, इतक्यात त्याचे बाबा संदेश कवठेकर तिथे आले व म्हणाले, “अर्जुन, घरी चल.” अर्जुन आपल्या बाबांसोबत आपल्या घरी गेला तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. अर्जुनची आई ईशा कॉलेजातून घरी आली व दमून सोफ्यावर बसली. अर्जुनला त्याच्या आईला नवीन सायकल घेऊन देण्याविषयी विचारायचे होते. अर्जुन पंधरा वर्षाचा मुलगा होता. नुकतीच त्याची नववीची परीक्षा झाली होती. अर्जुनने आईला विचारले, “आई, ह्यावर्षी तू मला नवीन सायकल घेऊन देशील का? आई म्हणाली, “तुझ्या जुन्या सायकलचे काय झाले?”. अर्जुन म्हणाला, “त्या सायकलची चेन तुटली आहे गं.” अर्जुनची आई यावर काहीच बोलली नाही व स्वयंपाकघरात निघून गेली. बाबांनी अर्जुनला जवळ घेतले व म्हणाले, “बाळा, आपण नवीन सायकल घेण्यापेक्षा ना जुनी सायकलच दुरुस्त करूया”. अर्जुनने होकार दिला व आपला अभ्यास पूर्ण करायला गेला.

दुसऱ्या दिवशी अर्जुन लवकर उठला व न्याहारीला खाली आला. अर्जुनचे आईबाबा गप्पा मारत बसले होते. अर्जुनने इडली-सांबार खाल्ले व गौरेशकडे खेळायला गेला. अर्जुनने गौरेशच्या घराचे दार वाजवले पण दार कोणीच उघडले नाही. अर्जुनला आश्चर्य वाटले. त्याने गौरेशला फोन केला पण गौरेशने फोन उचललाच नाही. अर्जुनने विचार केला कि काल तर गौरेशने त्याला उद्या तो बाहेर जाणार असल्याचे सांगितले नव्हते. मग गौरेश अचानक कसा बाहेर गेला? अर्जुनने गौरेशच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे चौकशी केली, पण कोणीच गौरेश आणि त्याच्या आई-वडिलांना बाहेर जाताना पाहिले नव्हते. अर्जुनला भीती वाटायला लागली की गौरेश आणि त्याचे आई बाबा गेले कुठे?

अर्जुन धावत आपल्या घरी आला व आईला म्हणाला, “आई, गौरेशच्या घरात कुणीच नाहीये. त्यांच्या शेजाऱ्यांनाही ते कुठे गेले माहित नाहीये. त्याच्या आईने उत्तर दिले,” गेले असतील कुठेतरी फिरायला, येतील परत काही दिवसांनी. तू नको काळजी करूस.” अर्जुन आणि त्याची आई जेवायला बसले. अर्जुनने पटकन जेवण उरकले व आईला म्हणाला, “आई मी पोलीस स्टेशनला जातोय”. आईने अर्जुनला अडवले व म्हणाली,  अरे, तुला तिथे जायची काही गरज नाही, गौरेश आणि त्याचे आई-बाबा येतील परत. थोड्या वेळाने अर्जुन सहज फिरायला जातो असे आईला सांगून बाहेर पडला.  त्याला गौरेशच्या घराच्या दाराखाली एक चिठ्ठी दिसली.त्या चिठ्ठीत लिहिले होते,  “आम्ही जीवनाला कंटाळलो आहोत म्हणून दरीत जीव देत आहो ….. निमकर कुटुंबीय”. वाचून त्याला धक्काच बसला.  अर्जुन आपल्या घरी आला आणि आईला म्हणाला, “आई, पटकन बाबांना फोन कर. बाबा आले की आपण पोलीस स्टेशनला जाऊया.” आई म्हणाली, “पण का?” अर्जुनने पॅन्टच्या खिशातून ती चिठ्ठी काढली व आईला दाखवली. आईने चिठ्ठी वाचली, लगेच बाबांना फोन केला. आईने बाबांना सर्व हकीकत सांगितली व लगेच घरी येण्यास सांगितले. अर्ध्या तासाने बाबा घरी आले व त्यांनी अर्जुनला विचारले,” काय? गौरेश व त्याच्या आई-बाबांनी दरीत जीव दिला? आपण हे सर्व पोलिसांना सांगूया.” अर्जुन व त्याचे आई-बाबा स्कूटरने पोलीस स्टेशनला गेले. अर्जुनने पोलिसांना सर्व सांगितले.

इन्स्पेक्टर शार्दुल वऱ्हाडकरने अर्जुनला विचारले, “गौरेशकडे तू नेहमी खेळायला जातोस. तेव्हा तुला गौरेशच्या वागण्यात काही बदल जाणवला होता का? “अर्जुन म्हणाला,” नाही, गौरेश तर काल नेहमीसारखाच वागत होता.” इन्स्पेक्टरने अर्जुनच्या बाबांना विचारले, “गौरेशच्या आई-बाबांना व गौरेशला जीव द्यायला काय कारण असेल असे तुम्हाला वाटते?” अर्जुनचे बाबा म्हणाले, “गौरेशचे बाबा डॉक्टर आहेत, त्यांच्या दवाखान्यात अशी एखादी घटना घडली असेल की ज्यामुळे त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने जीव दिला असेल.” इन्स्पेक्टर म्हणाले,” कशावरून त्यांनी जीव दिला असेल? पण समजा, जर त्यांनी जीव दिलाच नसेल तर? “.त्यानंतर इन्स्पेक्टर वऱ्हाडकर चार हवालदारांना घेऊन गौरेश व त्याच्या आई-बाबांचे मृतदेह शोधायला गेले. अर्जुन आणि त्याचे आई-बाबा आपल्या घरी गेले.

 संध्याकाळी इन्स्पेक्टरचा फोन आला की आम्ही डोंगरावर सगळीकडे बघितले पण गौरेश व त्याच्या आई-बाबांचे मृतदेह कुठेही दिसले नाहीत. अर्जुनला शंका आली कि गौरेश व त्याच्या आई-बाबांना कोणी पकडले तर नसेल ना? तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आईने दार उघडले तर बाहेर एक माणूस उभा होता. त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली व म्हणाला, एका साहेबांनी ही तुम्हाला द्यायला सांगितलीय. अर्जुनच्या बाबांनी विचारले, ही चिठ्ठी तुम्हाला देणारा माणूस दिसायला कसा होता? तो माणूस म्हणाला, तो फार उंच होता, त्याने आपला चेहरा झाकलेला होता. तो माणूस निघून गेला. अर्जुनच्या बाबांनी ती चिठ्ठी वाचली. ‘जर तुम्हाला गौरेश व त्याचे आई-बाबा जिवंत हवे असतील तर जेलरोडवरच्या ‘हरिहंत’ नावाच्या घरात ३० लाख रुपये ठेवा. जर उद्यापर्यंत तुम्ही पैसे ठेवले नाहीत तर आम्ही गौरेश व त्याच्या आई-बाबांना मारून टाकू.’ अर्जुनचे बाबा म्हणाले, मी इन्स्पेक्टरना फोन करतो, त्यांना सांगतो की निमकर कुटुंबीय जिवंत आहेत. अर्जुनच्या बाबांनी इन्स्पेक्टरला फोन करून सर्व सांगितले. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर वऱ्हाडकर तिथे आले व म्हणाले, “ही चिठ्ठी देणारा माणूस जास्त दूर गेला नसेल, आम्ही त्याला पकडतो. “

संध्याकाळचे साडेसात वाजले होते, अर्जुन टीव्ही बघत बसला होता. थोड्यावेळाने इन्स्पेक्टरचा फोन आला की चिठ्ठी देणारा माणूस सापडला. त्या माणसाने सांगितले की रघुपति नावाच्या माणसाने त्याला ही चिठ्ठी दिली. रघुपती जेलरोडला ‘मंदाश्याम’ घरात राहतो. अर्जुनच्या बाबांनी फोन ठेवला. तिकडे इन्स्पेक्टर शार्दुल वऱ्हाडकर काही हवालदारांना घेऊन जेलरोडला गेले, त्यांनी मंदाश्याम’ घर शोधले पण तिथे ‘मंदाश्याम’ नावाचे कोणतेच घर नव्हते. एक ‘राधाकृष्ण’ नावाचे घर मात्र त्यांना दिसले. इन्स्पेक्टर शार्दुल निराश होऊन म्हणाले, त्या माणसाने आपल्याला फसवलेले दिसते पण जर ‘राधाकृष्ण’ नावाच्या घरात रघुपती राहत असेल तर…..   तेवढ्यात फोन वाजला, अर्जुनच्या बाबाने फोन उचलला. समोरून आवाज आला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ‘हरिहंत’ घरात तीस लाख रुपये ठेवायला का सांगितले? मी ‘मंदाश्याम’ घरात राहतो असे तुम्हाला भासवले पण ‘मंदाश्याम’ नावाचे जेलरोडवर कोणतेच घर नाही. ठरल्याप्रमाणे मुकाट्याने ‘हरिहंत’ मध्ये 30 लाख रुपये ठेवा. अर्जुनचे बाबा म्हणाले, “पण तुम्ही आहात कोण?” समोरून आवाज आला, “तुमचा शुभचिंतक”. त्या माणसाने फोन ठेवला, अर्जुनचे बाबा फोन ठेवून म्हणाले, आपण पटकन जेलरोडवर जाऊया 30 लाख रुपये घेऊन जाऊ. इन्स्पेक्टर शार्दुल वऱ्हाडकर म्हणाले, “पण नोटा मात्र खोट्या घेऊन जा”. आम्ही मागून येतो, कारण त्या माणसाला तुम्ही पोलिसांना घेऊन आलाय हे कळायला नको. अर्जुन व त्याचे बाबा तीस लाखांच्या खोट्या नोटा एका बॅगेत भरून स्कूटरने पुढे गेले तर इन्स्पेक्टर शार्दुल काही हवालदारांना घेऊन त्यांच्या मागे गेले. अर्जुन व त्याचे बाबा जेलरोडवर पोहोचले. अर्जुनने एका घराकडे बोट दाखवले व बाबांना म्हणाला, ते पहा ‘हरिहंत’.इन्स्पेक्टर शार्दुलही हवालदारांसोबत जेलरोडवर पोहोचले व त्यांनी चारही बाजूंनी घराला वेढा घातला. त्या घरातून बराच वेळ झाला तरी कोणीही बाहेर आले नाही. शेवटी सर्वजण आत गेले, तर तिथे कोणीच नव्हते. समोरच एक चिठ्ठी पडली होती. चिठ्ठीवर लिहिले होते, ‘….हा….. हा…. हा. गौरेश व त्याचे आई-बाबा मनालीला गेले आहेत.  मी तुम्हाला खोटे सांगितले की त्यांना मी पकडले आहे. आम्ही जीव देतोय, ही चिठ्ठीही मीच लिहिली होती. जेणेकरून गौरेश व त्याचे आई बाबा मेले असे तुम्हाला वाटावे. खरेतर मी तुमची दिशाभूल केली. ……. तुमचा शुभचिंतक.’