Farmers should also be respected books and stories free download online pdf in Marathi

शेतकऱ्यांचाही सन्मान व्हावा

*शेतकऱ्यांचाही सन्मान होण्याची गरज?*
*अलिकडील काळात शेतकरी वर्गाला सन्मान मिळत नाही. त्यांची सतत हेळसांड केली जाते. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. जरी तो उत्पादनकर्ता असला तरी. समजा त्यानं जर माल उत्पादीतच केला नाही तर सबंध जगच उपाशी राहिल वा उपासमारीनं तडपून मरेल यात शंका नाही.*
शेतकरी जीवन. अतिशय दुःखाचं असतं शेतकरी जीवन. हे जीवन जो जगतो, त्यालाच कळत असतं. म्हणूनच आजचे शेतकरी आत्महत्या करु लागले आहेत. कारण अलिकडील काळात शेती ही परवडत नाही. त्याचं कारण आहे. शेतीत होत असलेलं नुकसान. शेतीत एवढं अतोनात नुकसान होत असतं की कोणीही शेती करायला पुढं येत नाही.
शेतीत नुकसान होतं. कोणतं नुकसान होतं? तसं पाहता सगळेच जण म्हणतात की शेती परवडत नाही. मग काही भागात शेतकरी मालामाल का असतात बरे?
खरे शेतकरी मुळात मालामाल नसतात. कारण त्यांना शेती करतांना बऱ्याचशा गोष्टीला समोर जावं लागतं. जसे रात्रीला शेताला पाणी देणे. त्यातच रात्रीला विंचू, साप चावण्याची भीती असते. कधी कोरडा दुष्काळ पडतो तर कधी ओला दुष्काळ पडतो. कधी वीज पडते तर कधी गारा. या सर्व गोष्टीनं शेतकरी मरण पावतो. शिवाय कधी कधी शेतातील उभं पीक करपतं. त्यामुळंही शेतीचं अतोनात नुकसान होत असतं. कधीकधी शेतात अनेक तृणभक्षक खाणारे प्राणी येत असतात. ते खाणं कमी व नुकसानच जास्त करुन जात असतात. कधी कधी माल निघत असतांना अवकाळी पाऊस येतो व कधी गारा येतात व संबंध मालाचं नुकसान होतं. एवढा निसर्गाचा कोप होवूनही जेव्हा शेतीतील माल हातात येतो. तेव्हा मात्र भाव पडलेले असतात. त्या शेतमालाला पाहिजे त्याप्रमाणात भाव मिळत नाही. लावलेला खर्चही निघत नाही व अवकळा येते. त्यातच ज्यावेळेस शेतकरी शेतात पीक लावतो. तेव्हा भाव तणलेले असतात. लागत म्हणून लागणारा माल अर्थात बियाणे हे डबल तिब्बल किमतीचे असतात. त्याला लागणारं रासायनिक खत, किटकनाशक हेही जास्त महाग असतात. कधी कधी हा खर्च विकलेल्या मालातूनही निघत नाही. यातूनच शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येते.
शेतकरी हा हवालदील असतो. साऱ्याच समस्या त्याच्यासमोर आ वासून उभ्या राहतात. परंतु तो स्वतःच त्या समस्यांचा निपटारा करतो. कुणालाही मदतीसाठी हाक देत नाही. स्वतःच कुढत कुढत जीवन जगत असतो. ना त्याला मदत करायला परीजन धाव घेत. ना त्याला मदत करायला सरकार कामात येत.
महत्वाची बाब ही की आपल्या या शेतकऱ्यांच्या समस्या पाहिल्या तर त्या कितीतरी प्रमाणात जास्त आहेत. त्यामानानं दुःखही शेतकऱ्यांसाठीच निर्माण झालं की काय, असंच वाटायला लागतं. तरीही तो कोणत्याच समस्येबाबत ना कुरकूर करत, ना कोणत्याच समस्येबाबत तक्रार करत. तो सदैव आनंदात असतो. आनंदात जगतो. जगणे शिकवतो. मग आपण कोण आहोत की जे त्यांना त्रास देतो. त्यांच्या निर्माण केलेल्या मालात उणीवा काढतो. त्यांच्या मालाला व्यवस्थीत भाव देत नाही. त्यांना हिन लेखतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनात हिनतेची भावना ठेवतो. एकंदरीत सांगायचं झाल्यास आपणही शेतकऱ्यांबाबत सहानुभूती बाळगावी. सहानुभूतीपूर्वक व्यवहार ठेवावा. त्यांचीही काळजी घ्यावी. आपल्या मनात त्यांच्याबद्दल हिनतेची भावना ठेवू नये. व्यक्त तर अजिबातच करु नये. त्यांनाही सन्मान द्यावा. सन्मानपूर्वक व्यवहार ठेवावा. कारण ते आहेत, म्हणून सगळे लोकं आहेत. सगळे लोक जीवंत आहेत. जर त्यांनी कोणताच माल उत्पादीत केला नाही वा उत्पादीत करण्याचा प्रयत्न केला नाही तर कोणताच मनुष्यजीव आज जीवंत दिसणार नाही हे तेवढंच खरं आहे. कारण उत्पादनकर्त्याशिवाय कोणताच माल उत्पादीत होत नाही आणि मानवाला खायला लागणारा सर्व माल हा शेतकरीच निर्माण करतो. दुसरा कोणी नाही. म्हणूनच शेतकऱ्यांचीही इज्जत व्हावी. त्यांचाही सन्मान व्हावा. त्यांचाही आज सन्मान होण्याची गरज आहे. यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०