एक कप चहा... ☕💭
कातर वेळ आली की, ती पुन्हा समोर येते,
मनात खोल दडलेली अनामिका माझ्याशी बोलू लागते.
जुन्या आठवणींची सावली हळूहळू पसरते,
आणि राहून गेलेल्या गोष्टींचं भान पुन्हा करून देते.
कॉलेजमधले दिवस डोळ्यासमोर उभे राहतात,
काळ्या फळ्यावरची अक्षरं मोत्यासारखी भासतात.
गणिताची ती सूत्रं मनात पुन्हा नाचू लागतात,
अल्फा, बीटा, गामा... तुझीच आठवण करून देतात.
बायोलॉजीचं ते जर्नल पुन्हा देशील का?
तुझ्या सुंदर अक्षरांत माझं नाव लिहशील का?
कॉलेजजवळच्या त्या रस्त्यावर पुन्हा येशील का?
आणि एकदाच... मागे वळून पाहशील का?
कधीतरी चुकून परत भेटलोच आपण तर,
राहिलेला तो एक कप चहा माझ्यासोबत घेशील का?
चहासोबत जुन्या आठवणींमध्ये रमशील का?
आणि माझ्यासाठी एक क्षण काढशील का?
तुझ्यासोबत त्या चहाची गोडी कशातच नाही,
कारण त्याची सर कोणत्याही मेजवानीत नाही.
ती एक इच्छा... कधी पूर्ण होईल का?
काहीच नाही झालं तरी,
एक चांगली मैत्रीण म्हणून पुन्हा आयुष्यात येशील का...?