vairan serial number-I in Marathi Fiction Stories by Subhash Mandale books and stories PDF | वैरण भाग-I

Featured Books
  • خواہش

    محبت کی چادر جوان کلیاں محبت کی چادر میں لپٹی ہوئی نکلی ہیں۔...

  • Akhir Kun

                  Hello dear readers please follow me on Instagr...

  • وقت

    وقت برف کا گھنا بادل جلد ہی منتشر ہو جائے گا۔ سورج یہاں نہیں...

  • افسوس باب 1

    افسوسپیش لفظ:زندگی کے سفر میں بعض لمحے ایسے آتے ہیں جو ایک پ...

  • کیا آپ جھانک رہے ہیں؟

    مجھے نہیں معلوم کیوں   پتہ نہیں ان دنوں حکومت کیوں پریش...

Categories
Share

वैरण भाग-I


"तानाजी उठ,वैरण आणायला जायचे आहे",

असा आवाज कानावर पडताच तानाजी खडबडून जागा झाला आणि दावं,गोणपाट कुठे आहे विचारायला लागला.हे बघून तिलोत्तमा खळखळून हसायला लागली.
"रात्री उशिरा घरी आला आहे.", तानाजीची आई तिलोत्तमाला बोलली.
तिलोत्तमा तानाजीकडे बघून,
"होय रे,इतकं काम असतं का तुला?", 
असे चिडवण्याच्या सुरात बोलली.
"तुला काय माहित, कंपनीत किती काम असतंय,प्रोडक्शन ऑर्डर काढायची असते आणि प्रॉडक्शन प्लॅन कम्प्लीट करायचे असते त्याशिवाय घरी जायचं नसतं,त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करत होतो.रात्री एक वाजता घरी आलोय आणि तू माझी चेष्टा करते काय"
"इतकी कंपनीची काळजी असती तर कंपनीचे नाव घेतल्यानंतर उठला असतास.'वैरण' नाव घेतल्यानंतर लगेच कसं काय उठला?"
"ते जाऊ दे,तू आज इकडे कशी काय?"तानाजी आंथरूणाच्या घड्या घालत बोलला.
"तानाजी मी तुझी मानलेली बहीण नंतर आहे. अगोदर ऑफिसमधील साहेबांची सेक्रेटरी आहे  त्यांनी सकाळी दहा वेळा फोन लावला तुला पण तू एकदाही उचलला नाही.आईने उचलला, पण सांगितले की 'झोपला आहे अजून' मग साहेबांनी सांगितलं की 'घरी जाऊन तानाजी ला घेऊन या'. त्यामुळे मी कंपनीची फोर व्हीलर घेऊन तुला न्यायला आले आहे.चल आटप लवकर.
"हो आलोच मी", असे म्हणून तो वाॅशरूममध्ये गेला.
"बस पोरी, खूप दिवसांनी घरी आली आहेस, चहा बनवते."अशी म्हणून आई आतल्या खोलीत जाणार इतक्यात तिलोत्तमा बोलली,"खरंच नको आई, नंतर कधी जेवण करायलाच येईन,या बसा"
तो आटोपून येई पर्यंत त्याच्या आईशी गप्पा मारायला सुरुवात केली.
"आई, तानाजीला इतक्या वेळापासून मी उठवत होती तरी तो उठला नाही,तुम्ही मला सांगितले की,'वैरण आणायला जायचे आहे' असे म्हण म्हणजे तो उठेल.मला वाटतंय काही तरी घनिष्ठ संबंध आहे तानाजी आणि वैरण यांचा."
"होय पोरी", असे म्हणून आईने कहाणी सांगायला सुरुवात केली.
"तानाजी हुशार होता त्याने शिक्षण पूर्ण केले. वाटलं होतं,की तो आता चांगल्या पगाराची नोकरी करेल,त्यासाठी पुण्यामुंबईला जाईल पण तसं काही नाही झालं. तो मित्रांच्या बरोबर तालुक्याच्या ठिकाणी पशुपालनाची कार्यशाळा होती.ती कार्यशाळा बघून आल्यापासून त्याच्या डोक्यात एकच खुळ होते 'आपण म्हशी पाळणार आणि आपल्याबरोबर इतरांनाही म्हशी पळायला लावणार आणि गावचा विकास होणार.
एकदा तो घरी आला आणि म्हणाला,"आई आपण म्हशी पाळू."
"आपली परिस्थिती म्हशी घेण्याइतकी नाही.वाडा आहे ते पण पुर्वजांची कमाई.तेही इतिहास कालीन असल्यामुळे सरकारचा त्याच्यावर मालकी हक्क आहे.तो वाडा आपल्याला राहायला आणि संभाळायला दिलेला आहे,त्यामुळे त्याच्यावर आपण कर्ज घेऊ शकत नाही.शेती अर्धा एकर,त्याच्यावर कर्ज घेता येत नाही.तुझे बाबा दुसऱ्याची मोलमजूरी करून कसेबसे कर सांभाळत आहेत,मग म्हशी आणायला पैसे येणार कुठून?"
"आई आपण अर्धलिन(एखाद्याच्या म्हशी मोफत सांभाळायला घ्यायच्या आणि त्या बदल्यात पहिलं पिल्लू आपण घ्यायचं आणि म्हशीला होणारं दुसरं पिल्लू आणि म्हैस मालकाला दयायची, दुसरं पिल्लू होईपर्यंत म्हैस आपली) घेऊ तसं मी आबाकाकांना बोललो आहे,"चल येतो मी"असे म्हणून तो आबाकाकाच्या घरी गेला आणि आबाकाकांना घेऊन सरळ त्यांच्या तबेल्याकडे गेला.तिथे पोहचल्यावर ते म्हणाले,"तानाजी,तुला जितक्या म्हशी पाहिजेत तितक्या घे."
त्यावर तानाजी म्हणाला,"
मला फक्त दोन म्हशी पाहिजेत,त्यानंतर मी घेऊन जाईन,वाढवत जाईन."
असे म्हणून त्याने तेथीलच एक दावं घेतलं आणि म्हशींना घेऊन येऊ लागला.

दिवसभर माळरानावर म्हशी फिरवल्यानंतर सायंकाळी सहा वाजता घरी म्हणजे वाड्यावर घेऊन आला.वाडा चारही बाजूंनी शिमेंट न वापरता बांधलेल्या जाडजूड मजबूत भिंती,एक भव्य दरवाजा, एका माणसाला सहज उघडणार नाही असा,बाहेर आसपास झाडे, समोर एक आड, शेजारीच एक दत्तमंदिर,आत पुर्वजांनी घोडे बांधायला केलेली जागा होती,तेथेच तानाजीने म्हशी बांधायला दावण केली आणि म्हशी बांधल्या.
आज त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. 
तो सकाळी उठायचा,दिवसभर म्हशी रानात चरायला घेऊन जायचा,दिवसभर म्हशी फिरवल्यानंतर,सायंकाळी येताना शेतात मका केली होती,मक्याची ताटं भारा बांधून तो म्हशींच्या सोबत अंधार पडेपर्यंत घरी घेऊन यायचा.असा त्याचा नित्यक्रम चालू झाला.

पण हा त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. निसर्गाने त्याची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. पावसाने तोंड फिरवले.उन्हाळा सुरू झाला.रानात गवत दिसेनासे झाले होते, त्यामुळे म्हशींना चरायला घेऊन जाऊ शकत नव्हता.शेतातील मकाही संपली होती.आता त्याच्यापुढे वैरणचा प्रश्र्न आ वासून उभा राहिला.विचार चक्र चालू होते.काय करावं काय सुचत नव्हते.डोकं सुन्न होऊन डोक्याला हात लावून बसला होता.
तानाजी रात्री उशिरा झोपला.खूप उशिरा झोपल्यामुळे सकाळी लवकर उठला नाही.दहा वाजता उठल्यानंतर त्याला मी सांगितले."म्हशींना वैरण लागते, इतक्या उशिरा झोपला तर त्यांना चारा कुठून येणार?म्हशींची काहीतरी व्यवस्था कर.मग तो पटकन उठला आणि आडातून दोन बादल्या पाणी काढले, म्हशींना पाणी पाजले नंतर तो गावातील पांडुरंग पाटलाच्या ऊसाला तोड होती तिकडे गेला.पाटलांना विचारून ऊसाच्या वाड्याच्या दोन पेंड्या घेतल्या आणि घरी घेऊन आला.दिवसाची वैरणची व्यवस्था केली होती,पण रात्रीसाठी काय? तो पुन्हा विचार करत म्हशींच्या दावणीत वैरण टाकू लागला.इतक्यात खालच्या आळीचा गणपा आवाज देत तानाजीच्या जवळ आला आणि म्हणाला,"चल वैरण आणायला."
"कुठे?"तनाजी आशेने उत्साही होऊन बोलला.
"पांडूरंग पाटील यांच्या उसाला तोड चालू आहे, थोडं ऊसाचं वाडं आणू." 
"अरे,मी दुपारी घेऊन आलो आहे, आता कसं मागायचं?"
"चल रे, मी आहे ना,तू फक्त माझ्यासोबत चल, मी असताना पाटील नाही म्हणणार नाहीत."
गणपा तानाजीला धीर देत होता.
खरं तर गणपानेही सकाळी वाड्याचा एक भारा पांडुरंग पाटील यांच्या ऊसातून आणला होता.पाटील गणपाला पुन्हा येऊ देणार नाहीत, आणि तानाजीला ते सहज नाही म्हणणार नाहीत म्हणून तो तानाजीला घेऊन निघाला होता. 
पाटील गणपाला ओळखून होते.जनावरांच्या वैरणसाठी तो वसासलेला आहे, कितीही वैरण घेऊन गेला तरी तो शांत बसणार नाही.तो पुन्हा येणार,वैरणीसाठी गळ घालणार.हे ठाऊक होते.

गणपा आणि तानाजी दावं , गोणपाट घेऊन पाटलांच्या ऊसाच्या शेताकडे निघाले.दोघे ऊसाच्या बांधावर पोहोचले.गणपाने पांडुरंग पाटील यांना आपल्याकडे येताना पाहिले आणि तो मागे झाला.पाटील जवळ आले तानाजीच्या खांद्यावर हात ठेवून बोलले,
"हे बघ तानाजी,तु माझ्या मित्राचा पोरगा आहेस.पण आमच्याकडेही जनावरं आहेत.त्याना वैरण लागेल.यंदा पाऊस पडला नाही.तुमचं ठिक आहे.तुम्हीकुठूनही आणाल वैरण.आम्ही कुठे जायचे.आता तुम्ही आलात,पण मोकळे हाती पाठवू शकत नाही.पण फक्त आजचा दिवसच घेऊन जावा,नंतर येऊ नका."
असे म्हटल्यानंतर लगेच पाटलांचा विचार बदलायच्या आत गणपा,"ठीक आहे"असे म्हणाला.
दोघांनी ऊसाचं वाडं जमा करून घ्यायला सुरुवात केली.गणपा एक-दोन नव्हे तर तब्बल सहा सात पेंड्या जमा केल्या आणि त्या बांधून तानाजीकडून उचलून घेतले आणि घराची वाट चालू लागला.तानाजीने प्रामाणिकपणे फक्त दोनच पेंड्या घेतल्या.
पाटील म्हणाले,"अजून दोन पेंड्या घे."
पाटील प्रेमाने म्हणत आहेत की रागाने हे तानाजीच्या लक्षात येत नव्हते.दोन पेंड्या डोक्यावर घेऊन जात असताना पाटलांनी बळं बळं अजून एक पेंडी त्याच्या डोक्यावर दिली.तानाजीला लाज वाटू लागली.आतापर्यंत कधी इतकं लाचार व्हावं लागलं नव्हतं.तो तीन पेंड्या घेऊन घरी आला.

तानाजीने वैरण भिंती कडेला ठेवली आणि पुन्हा विचार करू लागला,'उद्यासाठी काय करायचे?.त्याच्या डोक्यात विचार आला गणपा अडाणी असला तरी त्याला वैरणीचे गणित पक्क माहित होतं म्हणून तो गणपाच्या घराकडे गेला.घरी गेल्यानंतर त्याला विचारले,
"आजचं ठीक आहे,पण उद्या काय करायचे?उद्या वैरण कुठून आणायची?"
त्यावर गणपा म्हणाला,
"उद्या सकाळी चार वाजता उठ.आपण पलीकडच्या गावाच्या शेताच्या बांधाला गवत आहे ते पहाटे सूर्य उगवायच्या आत कापून आणू.
त्यावर तानाजी म्हणाला,
"गवताची चोरी करायची?कसं शक्य आहे?"
गणपा म्हणाला,
"मग करायचं काय?"
तानाजी थोडावेळ शांत बसून,
"ठीक आहे तू म्हणशील तसं करू."
गणपाबरोबरची चर्चा संपल्यावर तो घरी आला. त्याला वैरणीचा प्रश्न सतावत होता.सायंकाळी म्हशींना वैरण घालून तो झोपी गेला.पहाटे चारच्या सुमारास त्याच्या कानावर आवाज पडला,
"तानाजी उठ, वैरण आणायला जायचे आहे."

तानाजी पटकन उठला आणि दावं गोणपाट घेऊन गणपाच्या मागे मागे चालू लागला.गणपासोबत अजून तीन जण होते तेही गवत चोरी करायला येत होते.शेजारील गावचे शेत दोन किलोमीटर अंतरावर होते.तिथे पोचल्यानंतर बाकीच्यांनी विळ्याने गवत कापायला सुरुवात केली.गवत कापताना सगळे इकडं तिकडं बघून गवत कापत होते.कोण येतंय का पहात होते.
त्या गावच्या शेतकऱ्यांना अंदाज लागला होता, की रोज कोणीतरी आपल्या शेताच्या बांधाच्या गवताची चोरी करत आहे.नेमकं त्यादिवशीच पहाटे एक शेतकरी शेतात फेरफटका मारायला आला होता.चालत चालत शेतकरी अगदी जवळ आला.तो इतक्या जवळ आला की गणपाने आणि त्याने एकाच वेळी एकमेकांना बघितले तसा गणपा ओरडला,"चला पळा, शेतकरी आलाय."
बाकिच्यांनी हातात जेवढं येईल तेवढं गवत घेऊन पळायला सुरुवात केली.शेतकरी शिव्या देत,दगड हातात घेऊन मागं लागला.थोडं अंतर गेल्यावर तो थांबला.दगड टाकून दिले आणि मोठ्यानं बोलला."पुन्हा आलात तर तंगडं मोडून ठेवीन."
गणपासह बाकीच्यांनी थोडं थोडं गवत कापून घेतले होते.पण तानाजीकडे गवत काहीच नव्हते.हा अनुभव त्याला पहिल्यांदाच आला होता.तो रिकाम्या हाताने घरी परत आला होता.हात रिकामे होते पण डोकं विचारांनी भरलेले होते.पुन्हा तोच प्रश्न,'वैरण आणायची कुठून?. 
 (वैरणीमुळे तानाजीच्या जीवनात किती अडचणी येतात यासाठी,
वैरण भाग-II?)