Kay kutr Paltay in Marathi Moral Stories by suresh kulkarni books and stories PDF | काय कुत्र पळताय?

Featured Books
  • The Omniverse - Part 6

    அடோனாயின் கடந்த காலம்அடோனா திரும்பி தனது தோற்றத்தின் ஒரு மறை...

  • The Omniverse - Part 5

    (Destruction Cube) அழித்த பிறகு,ஆதியன் (Aethion) பேய்கள் மற்...

  • The Omniverse - Part 4

    தீமையின் எழுச்சி – படையெடுப்பு தொடங்குகிறதுதற்போது, டீமன்களு...

  • அக்னியை ஆளும் மலரவள் - 12

     மலரியின் அக்கா, ஸ்வேதா வருவதைப் பார்த்து, “நீயே வந்துட்ட, எ...

  • அக்னியை ஆளும் மலரவள் - 11

    “நீ கோபப்படுற அளவுக்கு இந்த ஃபைலில் அப்படி என்ன இருக்கு?” என...

Categories
Share

काय कुत्र पळताय?

" काय कुत्र पाळताय?"
शेजारच्या, भुक्कड गोपाळरावांनी विचारल. सत्तरीच ह्डूक, म्हणून सारी कॉलनी 'राव' लावते. एकदम कंडम माणूस! कोणाचही बर न बघवणारा. सकाळी उठून याच तोंड बघितल कि दिवस खराब जातो. तोंड कशाला? परवा सकाळी मी, याला पाठमोरा पहिला, त्या दिवशी साहेबांनी उगाच झापल! तोड पाहिलं असत तर, पुण्याचा साहेब आला असता! असा नग शोधून सापडत नाही, पण मला न मागता शेजारी मिळाला.
'आम्ही कुत्र नाहीतर गाढव पाळू, तुम्हाला काय करायचय?' हे वाक्य मनात म्हणून टाकल.
"हो,का? "
" अहो, नका पाळू, फार त्रासदायक असत!" गोप्या काकुळती येवून म्हणाला. त्याच क्षणी कुत्र पाळायच हा निर्णय घेऊन टाकला!, खर तर बायकोनी आधीच ठरवले होते.
"आमच आम्ही बघू !" म्हणून त्याला कटवला. तो खांदे पाडून निघून गेला.

०००

कुत्र! त्याच काय झाल कि, काल रात्री ऑफिस मधून आलो, तर बुटाच्या कोपऱ्यात, माझे पांढरे कॅनवासचे बूट, दोन एवजी तीन दिसू लागले! डोळे बारीक करून पहिल, तर मधला बूट हलत होता! ते एक पांढरशुभ्र कुत्र्याच पिल्लू होत, बुटाच्या बंदाबरोबर खेळत होत!
"अग SS … " मी ओरडलो.
" ओरडू नका, बाळान आणलाय पिल्लू! चांगलंय! असू देत!" बायकोने माहिती कम निर्णय सांगितला. सर्व संपल! मी काय बोलणार बापुडा!
त्याच संगोपन सुरु झाले. जुन्या बादलीत पोते, त्यावर चादर टाकून बेड झाली. पाण्या साठी बशी. खोलगट डिश दुधासाठी. लवकरच ते पिल्लू घरात चांगल रुळल. लुटू -लुटू, मागे - मागे फिरणे, चमकदार डोळ्यांनी मान तिरकी करून पाहण, आम्हाला आनंददाई होत. सुरवातीला पोर त्याच्या गळ्यात दोरी बांधून फिरवत. मी हौसेने सुरेख पट्टा आणला. पण 'दुनियाकी कोई ऐसी जेल नही बनी, जिसकी दिवारे हमे रोक सके!' या धर्तीवर तो स्वतःस मुक्त करून घेऊ लागला! मग आम्ही नाद सोडला. दिसा मासान ते वाढू लागल. ऐटबाज दिसू लागल. बायकोला तर, पोटच्या पोरापेक्षा 'टॉमी 'चेच कौतुक फार! त्याच बारस कधी झाल माहित नाही, माहित असते तर त्याच नाव मी 'बोकील' ठेवले असते! ( हे आमच्या साहेबाचे नाव,फार छळाय हो मला ! ) घरचे त्याला याच नावाने हाक मारत, त्याला तो हि प्रतिसाद देई. मी त्याला डॉक्टर कडे नेवून त्याचे 'लसी करण ' करून आणले. त्याच्या साठी डॉग फूड आणले. जोमाने वाढी लागले.

'कुठाय ते माकड?' मी त्याला कधीच त्याचा नावाने हाक मारली नाही! कारण त्याला अन मला त्याची कधीच गरज पडली नाही! माकड, गाढव, डुक्कर, बेकुफ, काहीही म्हणा. पळत झेपा घेत, असेल तेथून यायचं! चारी पायावर उडी मारायचं, माझ्या खांद्या इतकी उंच! नॉन स्टोप शेपूट हलवत! मग मी मुद्दाम त्याच्या साठी आणलेली दोन अंडी, त्याच्या डिश मध्ये टाकली कि, टरपला सकट खाऊन गडी खुश! हो 'गडी'च. चांगल कमरेइतक उंच झाल होत. डोळ्या जवळचा काळा ठिपका, संपूर्ण डोळ्या भोवती पसरला होता. त्यामुळे ते, डोळ्यावर काळा फ्लाप लावलेल्या, समुद्री चाच्या सारख दिसू लागल होत धूड. त्याच्या खोड्या वाढल्या होत्या, आणि शेजाऱ्याच्या तक्रारी पण!

"एस आर, तुझ कुत्र अवर रे!, काल बाईकला किक मारताना, त्याने बाईक वर उडी मारली. मी अन बाईक दोघे हि पडलो! साल तुमचे षोक होतात पण आम्हाला ताप!"
मग दिवसा कसेबसे बांधून ठेवण्याचा अपयेशी प्रयत्न केले. रात्री तर दहा नंतर गल्लीत कर्रफ्यु !
एका लग्नात गेलो होतो. एक दूरचे मेव्हणे मला टाळताय असे वाटले. नीट बोलेनात.
"काय झालाय भावजी? का? मला टाळताय?" शेवटी मी त्यांना गाठले.
" मग, काय करू? तुम्हाला पै -पाहुणा नकोसा झालाय.!"
"का? काय झाल?"
" ऐत्वारी परभणीस आल्तो. "
"घरी का नाही आलात?"
"घरीच आल्तो!"
" कधी? रविवारी आम्ही घरीच होतो. किती वजता आला होतात? "
"रातीचे अकरा वाजले असत्याल. गाडी चुकली औरंगाबादेची, म्हनुन मुक्कामी आल्तो! "
" दार का नाही वाजवल मग?"
" कस वजावणारं? दार लांब ऱ्हायल ,काम्पौंडच्या गेटच्या पन जवळ यु दिना तुझ कुत्र!"
बापरे! आमच्या डुकरान यांना गेट बाहेरच अडवलं कि काय?
"मग हाका मारायच्या. "
"मारल्या! तुमी भैरे! "
" अहो, टी.व्हि. मुळे …. "
"ते झाल तुमच, मग मी एक खडा तुमच्या दारावर मारायला उचलला, मनल तुमाला काळाव कि, बाहीर कोन तर आहे! पन खडा हाती घेउस्तोर तर, तुमच ते धूड चीत्यागत उडी मारून, मागच लागल! पळालो झाल! ठेसनात बाकड्यावर उपाशी पोटी निजलो!" त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,पण जमले नाही.
कोपऱ्यावरल्या चाम्भाराने मला एकदा हात करून थांबवले.
" काय पाहिजे?" मी
" काय नाय! लुकसानी केलीया तुमच्या कुत्र्यान!"
" काय केली?"
" अवो, शिवाया आलेल्या चपला, म्या पाण्यात भिजू घातल्या व्हत्या! डोळा चुकवून तेन पळिवल्या! दोन रोज निक्क समुर गुमान, साधू बाबा गत समोर बसून असायचं!"
पाच -दहा रुपये देवून कशी बशी सुटका करून घेतली. घरी आलो तर,
" तुमारे कोंबड्या कि काळजी तुमीच लेना!----" असे काहीतरी म्हणत, बायको, मागच्या गल्लीतल्या खालाशी भांडत होती.
"काय झाल?"मी विचारले.
"अहो, हि बया, आपल्या कोंबड्या निट सांभाळत नाही, अन आता म्हणतीय कि टोम्याने एक मारून खाल्ली!"
"कुठाय ते गधड! चांभाराच्या चपला पण पळवल्या, तो पण …"
" पैले हमारी कोंबडी भरके देव!"
" कितने पैसे?" मी डोके शांत ठेवत विचारले
"पैसे का माज किसको दिखाते?,मेकू कोंबडी के बदले कोंबडी होना!" खाला पेटली होती .
असले तंटे सुरु झाले कि हमखास टॉम्या गायब असायचा! पण सवइने मला कळले होते, तो माझ्याच पलंगा खाली लपून बसायचा! तुम्ही म्हणाल इतक कुठही तोंड घालणार कुत्र, तुमच्या स्वयपाक घरात … no way! बायकोने 'मुडद्या ' म्हणून हात उगारला, कि स्वारी पलंगाखाली! तो पण तिच्या धाकात होता!

एक दिवस रीतसर दाराची बेल वाजून ४२० वश्या आत आला, त्याच्या मागे शेपटी हलवत आमच गाढव ! ४२० वश्या, म्हणजे आमचे 'मावेखोर' मित्र! ३००+१२०चा ताम्बकुचा, सध्याच्या बाजारात मिळणाऱ्या राजगिर्याच्या लाडू एवढा गोळा, तोंडात कोंबून फिरणारा सुगंधी माणूस! या वश्याला, दोनदा बाईक सकट टोम्याने पडलय, तीनदा प्यांट फाडली आहे, अन आज शेपूट हलवत सोबत कस!?
"वश्या तू अन, हे माकड सोबत कसे?"
"आता आम्ही फ्रेंड आहोत! काय टॉमकेश?" शेपूट हलवत टॉम्या गोल-गोल फिरला!
साधारण तास -दीड तास आम्ही यथेच गप्पा म्हणजे, बोकील साहेबांच्या कुचाळया केल्या. वश्या निघाला तसे मी त्याला पुन्हा विचारले " या भुताला कस वश केलस?"
" काय नाही, चार -दोनदा त्याला पण माव्याचा लाडू दिला! आता त्याला चटक लागलीय!"
म्हणजे मघाशी जे गोल-गोल फिरलं ते तम्बाकु मुळे! आता मात्र कहर झाला! हे कुत्र व्यसनी होत कि काय ?

सारे ठीक वाटत असताना माझी बदली झाली. घरासोबत टॉम्या पण शिफ्ट झाला. नव्या जागेत नाही रुळला. तसा फिरायचा पण घरात ज्यास्त असायचा. एका रात्री नेहमी प्रमाणे बाहेर फिरत होता, चोरांचा सुळसुळाट होता. सकाळी आला तो डोक्यावर जखम घेऊन! कोणीतरी जबर मारले होते. जखमेत हळद भरली, पण उपयोग झाला नाही, जखम चिघळलि, लाळ गळू लागली, नजरेतील ओळख मंद झाली, सुळे दाखून गुरगुरू लागला! कोणी तरी मुनिसिपालटीत तक्रार केली! दिवसभर पालिकेचे कर्मचारी, त्याचा 'खाऊ' घेऊन फिरत होते. मी रात्री आलो.
"साहेब, तो जवळ येत नाही आणि येऊ पण देत नाही, आता तुम्हीच प्रयत्न करा." असे म्हणत त्यांनी ती 'खाऊ' ची पुडी मला दिली. त्यात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती. मी पुडी उघडली,
"टॉमी!" मी त्याला पहिल्यांदा आणि शेवटची टॉमी म्हणून हाक मारली. थकलेला टॉमी पलंगा खालून सावकाश बाहेर आला, पुडीतले विषारी दोन पेढे त्याने मुकाट पणे खाल्ले, किंचित मान वळून एकदा माझ्या कडे पाहिले आणि घरा बाहेर पडला, कधीच न परतण्या साठी! त्याच लाडान मांडीवर झोपण, उंच उडी मारून आनंदान नाचण, भिऊन पलंगा खाली लपण, चिखलात लोळून घरभर हुंदडणं, क्षणात डोळ्या समोरून सरकलं! ज्या हाताने दुध पोळी खाऊ घातली त्याच हाताने आज ….
मी हताश पणे त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पहात राहिलो!


---आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच .