Maitri ki Prem - 1 in Marathi Love Stories by Gumshuda Shayar books and stories PDF | मैत्री कि प्रेम ? ( भाग १ )

Featured Books
Categories
Share

मैत्री कि प्रेम ? ( भाग १ )

आज माझा म्हणजेच अकरावीच्या सर्व मुलांचा सहामाही परीक्षेचा पहिला दिवस होता, सर्वजण परीक्षेच्या टेन्शन मध्ये होते. तसा माझा अभ्यास पूर्ण झाला होता, पण परीक्षा म्हटलं कि टेन्शन येणारच ना. आज आमचा अकाऊंटिंग या विषयाचा पेपर होता त्या बद्द्दल मी व माझे काही मित्र चर्चा करतच होतो, कि तेवढ्यात पेपरसाठी बेल वाजली व आम्ही सर्वजण चर्चा तिथेच थांबवून आपआपल्या हॉल मध्ये गेलो.माझ्या मागे,पुढे व तसेच उजव्या बाजूला देखील मुलगी होती,आणि प्रथमच अशी परिस्थिती माझ्यावरती आली होती म्हणून मला थोड वेगळ वाटत होत.पण मी काही करू शकत नव्हतो. मी पेपरबद्दल विचार करतच होतो तेवढ्यात एक सर आमच्या वर्गात आले, आधी त्यांनी काही सूचना दिल्या व नंतर प्रश्नपत्रिका दिली. माझा अभ्यास झाला होता म्हणून मला प्रश्न सोपे वाटत होते,म्हणून मी थोडं खुश झालो तेव्हा ते माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या मुलीने पहिले.खरतरं तिची आणि माझी ओळख नव्हती पण वर्गात मी तिला पाहिलं होत. सरांनी प्रश्नपत्रिका दिल्यानंतर ती थोडी टेन्शन मध्ये होती हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होत, कदाचीत काही कारणांमुळे तिचा अभ्यास झाला नव्हता,कारण वर्गात ती हुशार होती आणि दररोज कॉलेजलाही दिसायची. हे सर्व चालू असताना सरांनी उत्तरपत्रिका दिली उत्तरपत्रिका हातात येताच मी लिहायला सुरुवात केली.मी एकदा बाजूला बघितले तिनेही सुरुवात केली होती पण काही प्रश्न तिला येत नव्हते. पण मला मात्र सर्व प्रश्न सोपे वाटत होते. पेपरसाठी दोन तास वेळ होता पहिल्या एका तासात माझा बराचसा पेपर पूर्ण झाला होता, हे तिने पहिले तिला काही प्रश्न येत नव्हते. ति काही वेळ थांबली कदाचित याला मी कसं विचारू हे तिला वाटत असेल, पण नंतर न राहता तिने मला दोन तीन प्रश्नांची उत्तरे विचारली. सरांचे लक्ष बाहेर होते म्हणून सरांनाही आम्ही बोलत असल्याचं समजलं नाही. मी सरांकडून एक पुरवणी मागितली व माझा पूर्ण पेपर जवळपास अर्धा तास तिला दिला.तिने तेवढ्या वेळात जे प्रश्न तिला येत नव्हते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून काढली व मला एक गोड स्मितहास्य करून माझा पेपर परत दिला व हळू आवाजात 'THANK YOU' म्हणाली.शेवटचा अर्धा तास राहिला होता, तोही कसा संपला कळलंच नाही. पेपर सुटल्याची बेल झाली. आम्ही सर्वजण हॉल मधून बाहेर पडलो. मी बाहेर पडल्यानंतर ती माझ्या मागे मागे आली व अजून एकदा 'THANK YOU' बोलली व इथूनच आमची ओळख झाली. आम्ही कॉलेज मधून बाहेर पडत असतानाच तिने मला माझे नाव, गाव व इतर काही गोष्टी विचारल्या. मी पहिल्यांदाच कुठल्या मुलीशी एवढ बोलत होतो, कारण दहावीपर्यंत मी कधी कोणत्याही मुलीशी बोललो नव्हतो, म्हणून मला थोडंस वेगळ वाटत होत.तिला माझ नाव अवी, मी करमाळा येथे राहतो, पण सध्या मी शिक्षणासाठी (पुणे जिल्यातील इंदापूर) येथे माझ्या काही मित्रांसोबत रूमवरती राहतो, असा काहीसा माझा परिचय दिला. तिनेहि तीच नाव सांगितलं व ती इथेच राहते(इंदापूर) असं सांगून व पुन्हा भेटू अस म्हणत तिथून निघून गेली व इथूनच आमच्या मैत्रीला सुरुवात झाली.

काही दिवसात पेपर संपले,मात्र आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. वर्गात भेटल्यानंतर बोलणे,एकमेकांना पाहिल्यावर हसणे, वही मागण्याचे कारण काढून तिच्याशी बोलणे, अशा गोष्टी होऊ लागल्या. हळूहळू आमची मैत्री वाढू लागली, आणि अगदी काही दिवसांतच आमची खूप चांगली मैत्री झाली. कधी ती कॉलेजला नाही आली, तर माझे मन उदास राहायचे.कधी मी कॉलेजला गेलो नाही तर दुसऱ्या दिवशी ती मला का आला नव्हतास,काही झाल होत का,अस विचारत होती. कॉलेजला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा माझे मन कशातही लागत नव्हते. मी सतत तिचा विचार करू लागलो होतो. हे काय आहे? अस का होत आहे? असे विचार माझ्या मनात येऊ लागले. पण ती माझी चांगली मैत्रीण आहे असा विचार करून मी यावरती जास्त लक्ष न देता माझा अभ्यास करू लागलो. काही दिवस असेच गेले. अकरावी झाली नंतर बारावीचीही परीक्षा आली, अभ्यासासाठी आम्ही बऱ्याचदा सुट्टी मध्ये भेटायचो. बघत बघत दिवस कसे गेले समजलेच नाही, व परीक्षेचा दिवस आला, परीक्षा असल्यामुळे आम्ही जास्त वेळ भेटत नसायचो, पण पेपर कसा गेला वगैरे विचारत होतो. परीक्षा संपली आज शेवटचा दिवस, मी उद्या घरी जाणार होतो व तेथून पुण्याला जाणार आहे,अस मी तिला सांगितलं. तिने विचारले नंतर कधी भेटणार, माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते, पण तरीही लवकरच भेटू असं सांगितलं. माझी जाण्याची वेळ झाली होती ,पण मन मात्र तेथेच अडकले होते. एका क्षणासाठी तिला मनातील भावना सांगाव्या अस वाटल, पण तेव्हा माझी हिम्मत झाली नाही. मनात ते ओझे घेऊन, डोळ्यात अश्रू घेऊन, जड पायाने मी तेथून निघालो. पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलो. पण मन मात्र लागत नव्हते, सतत तिच्याबद्दल विचार यायचे. तिला भेटू शकत नाही ? तिची आठवण येतेय ? तिलाही माझी आठवण येत असेल का ? या आणि अशा अनेक विचारांनी मन भरून यायचे. आणि एकच विचार मनामध्ये यायचा तो म्हणजे हि फक्त मैत्री आहे कि प्रेम ?