Revolver - 15 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 15

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 15


प्रकरण १५
दुसऱ्या दिवसासाठी खांडेकरांनी आपला खास राखून ठेवलेला साक्षीदार तपासणीसाठी बोलावला

“ कार्तिक कामत च्या कुमारला, कुमार कामतला बोलवा.” ते म्हणाले.

कुमार कामत हजर झाला.त्याचा चेहेरा गंभीर, कणखर आणि निश्चयी होता. त्याने शपथ घेतली आणि आपला परिचय दिला.

“ मी तुला आधीच एक महत्वाची सूचना देतोय की तुला विचारले जाणारे प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक ऐक आणि नंतरच उत्तर दे.कोणतीही जास्तीची माहिती स्वत:हून देऊ नको.” खांडेकर म्हणाले.साक्षीदाराने मान डोलावली.

“ तुझ्या बाबांनी अगदी एक सारख्या दिसणाऱ्या आणि एकाच प्रकारच्या तीन रिव्हॉल्व्हर खरीदल्या होत्या हे आता समोर आलंच आहे.ओळखण्यासाठी आपण त्याचं वर्णन असं करू, जी त्यांनी तुला दिली त्याला रिव्हॉल्व्हर क्र. १- कुमारची रिव्हॉल्व्हर म्हणू. जी बाबा त्यांच्या तिजोरीत ठेवत त्याला आपण रिव्हॉल्व्हर क्र.२- तिजोरीतली रिव्हॉल्व्हर म्हणूया आणि जे रिव्हॉल्व्हर बाबा सतत स्वतःबरोबर बगलेतल्या कप्प्यात ठेवायचे, आणि सात ऑक्टोबर ला त्यांच्या बगलेतल्या कप्प्यात ठेवली होती, त्याला आपण रिव्हॉल्व्हर क्र.३ कप्पा रिव्हॉल्व्हर असं म्हणूया. ” खांडेकर म्हणाले आणि साक्षीदाराने समजल्याप्रमाणे मान डोलावली.

“ तर मग आता हे लक्षात घे की सात ऑक्टोबरला तुझ्या बाबांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर क्र.३ कप्पा रिव्हॉल्व्हर आरोपी ऋता रिसवडकर ला दिली.आणि नंतर ते आपल्या तिजोरीपाशी गेले आणि त्यातून रिव्हॉल्व्हर क्र.२- तिजोरीतली रिव्हॉल्व्हर बाहेर काढली आणि आपल्या बगलेतल्या कप्प्यात ठेवली.” खांडेकर म्हणाले आणि साक्षीदाराने पुन्हा समजल्याप्रमाणे मान डोलावली.

“ या तीन पैकी एक रिव्हॉल्व्हर म्हणजे खुनी हत्यार आहे आणि ते कोर्टात पुरावा क्रमांक ३० म्हणून दाखल केली गेली आहे.ही वस्तुस्थिती तुझ्या लक्षात येते आहे?”

“ होय सर.” कुमार कामत म्हणाला.

“ आता तुला मी जे प्रश्न विचारणार आहे ते तुझ्या रिव्हॉल्व्हर बद्दल आहेत, म्हणजे ज्याचा उल्लेख आपण रिव्हॉल्व्हर क्र. १- कुमारची रिव्हॉल्व्हर असा करतोय आणि विचारतो की आठ ऑक्टोबरला हेच रिव्हॉल्व्हर तू पाणिनी पटवर्धन ला दिलंस का? ”

“ हो.”

“ आणि पाणिनी पटवर्धनने ते हाताळलं? ” –खांडेकर.

“ हो सर.”

“ नेमकं काय केलं पटवर्धनने ? ”

“ संदर्भहीन आणि काहीही महत्व नसलेला हा प्रश्न आहे.” पाणिनी हरकत घेत म्हणाला.

“ मी संदर्भ जोडून दाखवतो नंतर.” खांडेकर म्हणाले.

“ सरकारी वकिलांच्या या आश्वासनाखेरीज आणखी काही आवश्यक आहे ” न्यायाधीश म्हणाल्या.

“ जर कोर्टाची परवानगी असेल तर मी एवढ्याच विषयाशी संबंधित काही प्रश्न साक्षीदाराला विचारू इच्छितो.” पाणिनी म्हणाला.

“ विचारा.” न्या. बहुव्रीही म्हणाल्या.

“ मला सांग कुमार, ज्या रिव्हॉल्व्हर चा उल्लेख आपण कुमारची रिव्हॉल्व्हर असा करतोय, म्हणजे तू मला दिलेली रिव्हॉल्व्हर, आणि कोर्टात पुरावा क्रमांक ३० म्हणून दखल झालेलं रिव्हॉल्व्हर, एकच आहे?” पाणिनीने विचारलं

साक्षीदार कामत ने ते रिव्हॉल्व्हर हातात घेऊन तपासलं आणि म्हणाला, “ दोन्ही अगदीच सारखी आहेत पण ते माझं नाही. म्हणजे तुम्ही म्हणता ते ‘कुमारचे रिव्हॉल्व्हर’ नाही. ”

“ तसं असेल तर हा साक्षीदार या रिव्हॉल्व्हर बद्दल जे काही सांगेल किंवा त्याने सांगितले असेल ते आरोपीवर बंधनकारक नाही.” पाणिनी म्हणाला.

“ मला वाटतं पटवर्धन यांचा मुद्दा बरोबर आहे.पटवर्धन यांचं ऑब्जेक्शन मान्य करते आहे मी. ”-बहुव्रीही

खांडेकरांचा नाईलाज झाला ते भडकले.

“ मी वेगळ्या मार्गाने माझ्या मुद्यावर येतो. ” ते म्हणाले, “ तू पुरावा क्र.३० म्हणून सादर झालेली रिव्हॉल्व्हर अत्ता पाहिलीस?”

“ हो ”

“ हे रिव्हॉल्व्हर तू या आधी बघितलं होतंस?”

“ होय.”

“ कधी?”—खांडेकर

“ पाणिनी पटवर्धन यांनी मला ते दिलं होतं.”

“ कधी?”

“ आठ ऑक्टोबरला.”

“ तू काय केलंस त्याचं पुढे?”—खांडेकर

“ गैरलागू, संदर्भहीन प्रश्न.” पाणिनी कडाडला. “ या रिव्हॉल्व्हरचं त्याने काहीही केलं असलं तरी त्याचा आरोपीशी संबंध नाही.”

“ कोर्ट ही हरकत मान्य करण्याच्या मनस्थितीत नाही.माझं मत आहे की साक्षीदाराने पुरावा -३० म्हणून दाखल केलेले रिव्हॉल्व्हर ठामपणे ओळखलंय. ”-न्यायाधीश उत्तरल्या.

“ या रिव्हॉल्व्हर चं काय केलंस तू पुढे?”

“ आरोपी ऋताच्या घरी ते घेऊन गेलो.” कुमार कामत म्हणाला.

“ पुढे?” खांडेकरांनी त्याला आणखी बोलतं करायला विचारलं.

“ पुढे मी स्वत: फारसं काही केलं नाही. मी उभाच होतो तिच्या घरात, पाणिनी पटवर्धन यांनी तिला सांगितलं की तिला धोका आहे आणि तिच्या संरक्षणासाठी मी तिला रिव्हॉल्व्हर देतोय. ”

“ तू मगाशी म्हणालास की पाणिनी पटवर्धन ने तुला रिव्हॉल्व्हर दिलं?”

“ हो.”

“ कधी? आणि कुठे?”

“ ८ ऑक्टोबर ला माझ्या ऑफिसात.”

“ आणि त्यापूर्वी तू पाणिनी पटवर्धन ना रिव्हॉल्व्हर दिलं होतंस?”

“ हो.”

“ कुठलं रिव्हॉल्व्हर होतं ते?” –खांडेकर.

“ ज्याला आपण ‘कुमारचं रिव्हॉल्व्हर’ असं म्हणतोय. जे अत्ता माझ्या हातात असलेल्या आणि खुनाचे हत्यार म्हणून दाखवण्यात आलेल्या पुरावा क्रमांक ३० या रिव्हॉल्व्हर शी अगदी हुबेहूब मिळतं-जुळतं आहे.”

“ तर तू तुझ्याकडील ‘ कुमारचं रिव्हॉल्व्हर ’ पाणिनी पटवर्धन ला दिलंस. ” खांडेकर म्हणाले.

“ हो सर ”

“ ते दिल्यावर पटवर्धन यांनी काय केलं?”

“ त्यातून त्यांनी गोळी झाडली. जी माझ्या टेबलाला लागली.” कुमार कामत म्हणाला.

“ मी तुला एक फोटो दाखवतो, तो कशाचा आहे मला सांग. तुला ओळखता येत असेल तर.” खांडेकरांनी एक फोटो दाखवला.तो साक्षीदाराने ओळखला.

“ ऑफिसातल्या माझ्या टेबलाचा फोटो आहे हा. पटवर्धन यांनी झाडलेली गोळी टेबलाला लागल्यानंतरचा.” कुमार कामत म्हणाला.

“ नंतर काय केलं पटवर्धनने?” खांडेकरांनी विचारलं.

“ गोळीबारामुळे एकच गोंधळ उडाला. सर्वांचंच लक्ष विचलित झालं, तेवढ्यात अत्ता माझ्या हातात असलेलं खुनी रिव्हॉल्व्हर, जे पुरावा -३० म्हणून दाखल आहे, ते आणि मी पटवर्धन न दिलेलं रिव्हॉल्व्हर, म्हणजे ‘कुमारचं रिव्हॉल्व्हर.’ या दोघांची आदला बदल पाणिनी पटवर्धन यांनी केली. म्हणजे स्वत: कडील खुनी हत्यार माझ्या हातात परत दिलं, एवढ्या सफाईदारपणे, की जणूकाही मी त्यांना दिलेलं ‘कुमारचं रिव्हॉल्व्हर’च ते मला परत करत आहेत असं मला वाटलं. ”

“ ते तू तुझ्या हातात घेतलंस?”

“ हो.”

“ पुढे?”

“ त्याने सुचवलं की ऋता ला गरज असल्याने मी ते रिव्हॉल्व्हर तिला नेऊन द्यावं.”

“ म्हणजे प्रत्यक्षात तुझ्या कडील ‘कुमारचं रिव्हॉल्व्हर’ ऋता कडे जाण्या ऐवजी खुनी हत्यार ऋता पर्यंत पोचेल? आणि त्यातून आणखी दोन गोष्टी साध्य होतील, एक म्हणजे खुनी हत्यार हे खून झाल्यापासून तुझ्याच ताब्यात होतं असं दाखवता येईल आणि दुसरी बाब म्हणजे खुनी हत्यारामध्ये ज्या प्रमाणे एक रिकामं काडतूस होतं तसंच एक रिकामं काडतूस तुझ्याही रिव्हॉल्व्हर मधे तयार करून गोंधळ घालता येईल की नेमकं खुनी हत्यार कुठलं. बरोबर आहे की नाही? ”-खांडेकरांनी विचारलं.

“ हा साक्षीदाराचा अंदाज आहे. आरोपीला आणि मला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न या मुद्यावर माझा आक्षेप आहे. ” पाणिनी म्हणाला

“ मान्य आहे पाणिनी पटवर्धन यांचं ऑब्जेक्शन.”—बहुव्रीही म्हणाल्या. “ खांडेकर असे प्रश्न टाळा इथून पुढे.”

“ मला प्रश्नच विचारायचे नाहीयेत आता. घ्या उलट तपासणी.”-खांडेकर म्हणाले.

“ तू साक्ष देतांना सांगितलंस की मी दोन रिव्हॉल्व्हरची म्हणजे पुरावा क्रमांक ३० जे खुनी हत्यार आहे आणि तू मला दिलेल्या तथाकथित ‘ कुमारची रिव्हॉल्व्हर ’ असं ज्याला आपण म्हणतोय अशा दोन रिव्हॉल्व्हर ची अदलाबदल केली म्हणून.” पाणिनी म्हणाला.

“ होय. ”

“ तू प्रत्यक्ष मी तसं करतांना पाहिलंस?”

“ पाहिलं नाही अर्थातच,पण तू गोळी झाडल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात तू ते केलं असणार.”-कुमार कामत म्हणाला.

“ तू जर मला ते करताना प्रत्यक्ष पाहिलं नाहीस तर मी केलंय ते असं कशावरून म्हणतोस तू?”

“ जशा घटना घडत गेल्या त्यावरून.”

“ याचा अर्थ तू तसा अर्थ काढतो आहेस त्यातून.”

“ होय.”

“ म्हणजेच तुझी ही साक्ष तुला काय माहित आहे यावर आधारित नाहीये तर काय घडलं असावं या बाबतच्या तुझ्या अंदाजावर आधारित आहे.”

“ अत्यंत अचुक अंदाज.जणूकाही मी समक्ष पाहिल्याप्रमाणे.” साक्षीदार ठामपणे म्हणाला.

“ पण शेवटी अंदाजच. वस्तुस्थिती नाही.” पाणिनी त्याला म्हणाला आणि नंतर न्यायाधीशांकडे वळून म्हणाला, 

“या साक्षीदाराने रिव्हॉल्व्हर च्या अदलाबदली बाबत सादर केलेला पुरावा रेकॉर्ड मधून काढून टाकावा अशी कोर्टाला विनंती करतो कारण तो साक्षीदाराचा निष्कर्ष आहे, त्याने पाहिलेल्या हकीगतीवर आधारित नाही. ”

“ विनंती मान्य करण्यात येते आहे. पटवर्धन यांनी अदलाबदल केल्या बाबतचा भाग साक्षीमधून वगळावा. सरकारी वकिलांनी पण असे तांत्रिक बारकावे अभ्यासावेत.साक्षीदाराचा निष्कर्ष हा पुरावा म्हणून मान्य होतं नसतो हे तुमच्यासारख्या वरिष्ठ आणि अनुभवी सरकारी वकिलांनी ओळखायला हवं होतं.” न्या.बहुव्रीहीनी शेरा मारला.

“ मला वाटतं की कोर्ट विनाकारण सरकारी वकिलांवर आगपाखड करतंय.तुमची परवानगी असेल तर या साक्षीदाराला पुन्हा तपासून मी वस्तुस्थिती दर्शक पुरावा सादर करतो.”

“ ठीक आहे विचारा.”

“ कामत, तू म्हणालास की तू पाणिनी पटवर्धन यांना रिव्हॉल्व्हर दिलंस?”

“ हो सर.”

“ तू असंही म्हणालास की तू पटवर्धनना दिलेलं रिव्हॉल्व्हर हे ‘कुमारचं’ रिव्हॉल्व्हर होतं, खुनी हत्यार नव्हतं, जे क्रमांक ३० चा पुरावा आहे.”-खांडेकर

“ बरोबर.”

“ तू पटवर्धनना दिलेलं ‘ कुमारचं रिव्हॉल्व्हर ’ होतं, ते खुनी हत्यार नव्हतं हे तुला कसं माहित होतं?”

“ कारण अत्ता या क्षणी माझ्या हातात असलेलं रिव्हॉल्व्हर हे पुरावा -३० म्हणजे खुनात वापरलेलं रिव्हॉल्व्हर आहे असा पुरावा दाखवतोय. पटवर्धनला मी माझ्याकडचं दिलेलं ‘ कुमारचं रिव्हॉल्व्हर ’ हे खुनात वापरलेलं असूच शकत नाही. ” कुमार कामत ओरडून आणि वैतागून म्हणाला.

“ का असू शकत नाही?”-खांडेकर.

“ ऑब्जेक्शन युअर ऑनर.” पाणिनी ओरडला. “ स्वत:च्याच साक्षीदाराची उलट तपासणी घेण्याचा हा प्रयत्न. कामतने मला दिलेलं रिव्हॉल्व्हर हे खुनी हत्यार असूच शकत नाही हे कामत चं विधान म्हणजे साक्षीदाराचा निष्कर्ष आहे.विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तरं नाही त्यामुळे मी हा उत्तराचा भाग खोडून टाकावा, विचारत घेऊ नये. ”

“ मंजूर.” न्यायाधीशांनी टायपिस्ट ला तसा बदल करायची सूचना दिली.

“ पण युअर ऑनर, मी सिद्ध करत होतो की........” खांडेकरांनी आपलं म्हणणं पटवण्याचा प्रयत्न केला.

“ तुम्ही वस्तुस्थिती सिद्ध करा अंदाज नाही.”- न्या.बहुव्रीही

“ ठीक आहे, तर कामत, तू पटवर्धनना रिव्हॉल्व्हर दिलंस?” खांडेकरांनी विचारलं.

“ हो , माझ्याकडे असणारं, ‘कुमारचं’ रिव्हॉल्व्हर दिलं ”

“ ते तू कुठून दिलंस?”

“ माझ्या ड्रॉवर मधून ”

“ ते ड्रॉवर मधे मुळात आलं कुठून?”

“ माझ्या बाबांनी मला दिलं ते.”

“ कधी?”

“ दिवाळीत, गेल्या वर्षी.”

“ या सात ऑक्टोबर ला ते तुझ्याकडे होतं?”

“ हो.”

“ त्या कालावधीत पूर्णत: ? ”

“ हो.”

“ तेच तू पाणिनी पटवर्धनला दिलंस आणि त्याने त्यातून गोळी झाडली?”

“ हो सर.”

“ नंतर काय झालं?”-खांडेकर

“ नंतर पाणिनी पटवर्धनने मला रिव्हॉल्व्हर दिलं आणि सुचवलं की मी ते ऋताला द्यावं.”

“ तू जे रिव्हॉल्व्हर पटवर्धनना दिलंस तेच त्यांनी तुला परत केलं आणि ऋता ला दे असं सुचवलं?”

“ नाही.” कामत म्हणाला.

“ तेच रिव्हॉल्व्हर परत दिलं नाही हा तुझा अंदाज आहे. बरोबर? ” न्यायाधीशांनी मधेच विचारलं.

“ होय.” –कामतम्हणाला.

“ साक्षीतून हा भाग वगळला जाईल. तुला जे माहिती आहे ते सांग.” न्यायाधीश म्हणाल्या.

“ ठीक आहे. माझ्याकडचं रिव्हॉल्व्हर मी पटवर्धनना दिलं. त्यांनी त्यातून गोळी झाडली.त्यांनी मला रिव्हॉल्व्हर परत केलं आणि मी ते ऋताला द्यावं असं सुचवलं.मी तसं केलं.” साक्षीदार त्रोटकपणे म्हणाला.

“ ऋताने काय केलं त्य रिव्हॉल्व्हरचं?”

“ तिच्या घरातल्या हॉल मधील टेबलवर ठेवलं.”

“ मग तू काय केलंस?”—खांडेकर

“ मी आणि पटवर्धन तिच्या घरातून बाहेर पडलो.”

“ पुढे काय झालं?”

“ आम्ही बाहेर पडत असतांनाच दोन पोलीस अधिकारी इमारतीत शिरताना दिसले.”

“ ते कोण आहेत ते माहीत होतं तुला?”

“ आता माहीत झालंय.त्यावेळी नव्हतं”

“ काय नाव होती त्यांची?”

“ इन्स्पे.तारकर आणि होळकर.”

“ क्रॉस ” पाणिनीला उद्देशून खांडेकर म्हणाले.

उलट तपासणी घेण्यासाठी पाणिनी पटवर्धन कुठून उभा राहिला 

“तू म्हणतो आहेस की तू मला जी बंदूक दिलीस ती ७ ऑक्टोबर हा संपूर्ण दिवस, पूर्णपणे तुझ्या ताब्यात होती?”

“हो सर” 

“तू दुपारी जेवायला बाहेर पडला होतास?” 

“होय” 

“जेवायला जाताना तू तुझ्याबरोबर बंदूक घेतली होतीस?” 

“नाही” 

“कुठे होती मग त्यावेळेला ती?” 

“माझ्या टेबलाच्या ड्रॉवरमध्येच” 

“ड्रॉवर लॉक केलं होतंस?” पाणिनीने विचारलं 

“नाही सर”

“तुला असं वाटतंय की ती तुझ्या ताब्यात होती त्यावेळी” 

“हो सर” 

“त्यादिवशी संध्याकाळी तू कुठे होतास?” 

“एका कस्टमर बरोबर कारचा व्यवहार करत होतो.” 

“हातात बंदूक घेऊन व्यवहार करतोस तू?” 

“नाही हो! हातात बंदूक घेऊन कसा व्यवहार करीन मी ?प्रेमाने बोलावं लागतं कस्टमरशी” 

“म्हणजे तेव्हा बंदूक तुझ्याकडे नव्हती?” 

“नाही टेबलाच्या ड्रॉवर मध्ये होती” 

“ड्रॉवर मधून बाहेर कधी काढलीस?” 

“कस्टमर बरोबरची मीटिंग संपल्यानंतर. मी माझ्या ऑफिसला परत आलो.बंदूक घेतली. तिजोरी मधून काही रोख रक्कम बाहेर काढली माझ्या खिशात टाकली आणि घरी आलो.” 

“किती वाजता घरी आलास?” 

“माझ्या अंदाजाप्रमाणे साडेनऊ ते दहा च्या सुमारास रात्री.” 

“आणि झोपायला कधी गेलास?” 

“घरी आल्यानंतर तासा दीड तासात” 

“बंदुकीचं काय केलस?” 

“माझ्या कपड्यांच्या कपाटात ठेवली.” 

“७ ऑक्टोबर ला संध्याकाळी तू बाहेर पडल्यानंतर, तुझं ऑफिस लॉक केल होतं?”

“हो.” 

“ऑफिसची किल्ली कोणाकडे असते?” 

“माझ्याकडे असते, बाबांकडे असते, माझ्या सेक्रेटरीकडे असते आणि लिफ्टमन कडे असते.” 

“तुझ्या बायकोकडे असते किल्ली?” 

साक्षीदार थोडा अडखळला. घुटमळला पण नंतर ठाम आवाजात म्हणाला, “हो. बायकोकडे पण एक असते” 

“दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर काय केलंस तू?” 

“काही नाही. मी माझं आवरलं, कपडे केले, नाष्टा केला मग ऑफिसला गेलो” 

“ऑफिसला जाताना तुझी बंदूक तो बरोबर घेतली होतीस?” 

साक्षीदार काहीतरी बोलायला गेला पण पुन्हा बोलायचं थांबला. थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, 

“खरं सांगायचं...तर.. मी नव्हती घेतली बरोबर” 

“हे सगळं मी आपण ज्याला ‘कुमारची’ बंदूक असं समजतो आहे, त्याच्याबद्दलच बोलतो आहोत याची जाणीव आहे ना तुला?” 

“हो सर” 

“नंतर काय केलंस? बंदूक तुझ्या बरोबर नाही असं लक्षात आल्यावर?” 

“मी बायकोला फोन केला आणि बंदूक पाठवून द्यायला सांगितलं” 

“म्हणजे तू गृहीत धरतो आहेस की तू मला ८ ऑक्टोबरला जी बंदूक दिलीस, ती बंदूक म्हणजे ७ ऑक्टोबरला तू तुझ्या घरी घेऊन गेलेलीच बंदूक होती.बरोबर आहे की नाही मी म्हणतो ते?” पाणिनीने विचारलं 

“तिथे एकच बंदूक होती. मी फोन केल्यानंतर माझ्या बायकोने ती कपाटातून बाहेर काढली आणि मला दिली.”- कुमार कामत म्हणाला. 

“तुला काय माहिती की तिने कपाटातूनच बाहेर काढली?” 

“कसं माहिती म्हणजे? मी ती कपाटातच ठेवली होती माझ्या बेडरूम मधल्या” 

“पण तू घरी कुठे होतास बघायला की तिने ती कपाटातूनच बाहेर काढली की नाही?” 

“म्हणजे?... म्हणजे...” 

“म्हणजे असं की बायकोने तुला पाठवलेली बंदूक म्हणजे आपण ज्याला ‘कुमारची’ बंदूक म्हणतो आहोत ती नसून खुनी हत्यारच पाठवलं असू शकतं आणि ते तू मला दिलेलं असू शकतं आठ तारखेला.” पाणिनी म्हणाला. 

“धादांत खोटं आहे ते ! मला अजिबात आवडलेले नाही असा निष्कर्ष तुम्ही काढलेला”. आपल्या स्टुलावरून उडी मारत उभं राहत साक्षीदार ओरडला. 

“शांत हो. परत स्टुलावर बस.” न्यायाधीश म्हणाल्या. 

“कोर्ट माझं म्हणणं जरा ऐकून घेईल का?” शांतपणाचा आव आणत खांडेकरांनी विचारलं. 

“हा शेवटचा विचारलेला प्रश्न योग्य नाही. अपमानास्पद आणि आरोप करणारा आहे. आमच्या साक्षीदाराला असा प्रश्न विचारला जाणं मला अजिबात पसंत नाही.” 

“ तुमचा आक्षेप आहे हा की तुम्ही तुमचं म्हणणं तुम्ही मांडताय?”-न्या.बहुव्रीही

“या साक्षीदाराचा विचार करता त्याला तो प्रश्न आवडला नसण्याची शक्यता आहे, पण इथे कोर्टामध्ये एखादा प्रश्न साक्षीदाराला आवडतो आहे किंवा नाही हे महत्त्वाचं नाही. अॅडव्होकेट पटवर्धन हे त्यांच्या अशीलाचा खुनाच्या प्रकरणात बचाव करतायत. त्याना योग्य ते प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुमचा आक्षेप अमान्य करते आहे मी.” -न्या.बहुव्रीही

“मी आता कोर्टाला विनंती करतो की आता या साक्षीदाराला उलट तपासणीत मी जे प्रश्न विचारले त्यावरून हे सिद्ध होतंय की त्याने आठ ऑक्टोबरला माझ्या हातात दिलेली बंदूक ही ‘कुमारची’ बंदूक होती की खुनी हत्यार होतं हे साक्षीदार सिद्ध करू शकलेला नाही. साक्षीदार जे काही सांगतो आहेत तो केवळ त्याचा अंदाज आहे. स्वतः घटना पाहिल्यानुसार तो हे ठामपणे सांगू शकलेला नाही त्यामुळे त्याच्या साक्षीतला बंदुकीच्या ओळखी बाबतचा संपूर्ण मजकूर काढून टाकण्यात यावा.” पाणिनी म्हणाला.

“थांबा... थांबा... मी ते जोडून दाखवतो संदर्भ.”-खांडेकर 

“कसं करणार तुम्ही?” न्यायाधीशांनी विचारलं. 

“मी त्याच्या पत्नीला साक्षीदार म्हणून बोलवतो आणि तिच्याकडून कबूल करून घेतो.” 

“असा संदर्भ जोडलेला या कोर्टाला चालणार नाही. विषय असा आहे की या साक्षीदाराच्या साक्षीतून हे सिद्ध झालं आहे का, की त्यानं पटवर्धन यांना दिलेली बंदूक ही ‘,कुमारची’ बंदूक होती की खुनी हत्यार होतं तर त्याचं उत्तर नाही असंच येतं.” न्यायाधीश बहुब्रही यांनी ठणकावून सांगितलं 

“मी एक तुम्हाला सुचवू का?” न्यायाधीशांनी अचानक स्वत:हून विचारलं. “अॅडव्होकेट पटवर्धन यांच्या हातात जी बंदूक या साक्षीदाराने दिली होती, त्या बंदुकीतून पटवर्धन यांनी जी गोळी झाडली, ही गोळी काही हवेत विरून गेली नाही. ती कुठेतरी सापडली असेलच पोलिसांना. तुमच्या बंदुकीच्या तज्ज्ञाने म्हणजे बॅलेस्टिक एक्सपर्ट ने पुरावा क्रमांक ३० मधून झाडलेली गोळी म्हणजे टेस्ट बुलेट, आणि पटवर्धन यांनी त्यांच्या हातातल्या बंदुकीतून झाडलेली गोळी याची तुलना केली तर त्यातून हे सिद्ध करता येईल की त्या दोन्ही गोळ्या वर उमटलेल्या खुणा सारख्या आहेत का.जर खुणा सारख्या असतील तर पटवर्धन यांच्या हातात असलेली बंदूक हे खुनी हुत्यार होतं हे सिद्ध होईल आणि खुणा सारख्या नसतील तर त्यांच्या हातात असलेलं हत्यार हे खुनी हत्यार नव्हतं हे सिद्ध होईल.” 

“दुर्दैवानं आम्ही ते सिद्ध करू शकत नाही.” खांडेकर म्हणाले 

“ का बरं ?”

“कारण कोणीतरी ती गोळी तिथून काढून घेतली.” 

“कुणीतरी म्हणजे? पोलिसांना नाही मिळाली ती?” न्यायाधीशांनी आश्चर्याने विचारलं. 

“नाही मिळाली. सॉरी.” खांडेकर म्हणाले 

“मग पोलिसांच्या या कृतीचा विपरीत परिणाम मी आरोपीवर होऊ देणार नाही. मी दिलेला निर्णय अंतिम आहे. साक्षीदाराचा च्या साक्षीतील बंदूक ओळखण्याबाबतचा संपूर्ण तपशील काढून टाकण्यात येत आहे. कारण तो साक्षीदाराने आपल्या अंदाजाने वर्तवला आहे. कायद्याने तो गृहीत धरता येणार नाही.”

“माझे आणखीन काही प्रश्न नाहीत” पाणिनी पटवर्धन म्हणाला. 

“साक्षीदार जाऊ शकतात.” न्यायाधीश म्हणाल्या. 

साक्षीदार कुमार कामत पिंजऱ्यातून बाहेर पडताना पाणिनी पटवर्धन जवळून गेला.

“तुला ठार करीन मी या अशा पद्धतीने उलट तपासणी घेतल्याबद्दल.” तो पुटपुटला. 

“एक मिनिट... एक मिनिट... मला एकच प्रश्न या साक्षीदाराला उलट तपासणीत पुन्हा विचारायचा आहे. पुन्हा जरा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाशील का?” पाणिनीने विचारलं

न्यायाधीशांनी तसा आदेश दिल्यावर कुमार कामत पुन्हा पिंजऱ्यात आला.

( प्रकरण १५ समाप्त)