Revolver - 17 - Last Part in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 17 (शेवटचे प्रकरण)

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 17 (शेवटचे प्रकरण)


प्रकरण १७
कोर्टाने जेवणाची सुट्टी जाहीर केली त्यावेळेला कनक ओजस , सौम्या सोहोनी आणि पाणिनी कोर्टाजवळच्या एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले. त्यांचे जेवण चालू असतानाच त्यांच्या ऑफिस मधील रिसेप्शनिस्ट गती तिथे पळत पळत आली आणि त्यांच्या टेबलावर येऊन तिने एक मोठा गौप्य स्फोट केला. तिने सांगितलं की कोर्टाची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर मी कोर्टातून आपल्या ऑफिसमध्ये गेले होते तर तिथे मृण्मयी भगली म्हणजे कामतची पूर्वीची सेक्रेटरी, जी आता पुन्हा कामत कडे कामाला लागली होती, ती आपलं काम करत असताना तिला एका जुन्या फायलीची आवश्यकता लागली म्हणून रॅक मधील एक वरच्या बाजूची फाईल काढत असताना तिला रक्ताचे डाग पडलेला एक टॉवेल तिथे सापडला. तिच्या दृष्टीने या खुनाच्या खटल्यात तो फार महत्त्वाचा होता. तिच्या दृष्टीने तो कदाचित महत्त्वाचा पुरावा होता पण त्याचं पुढे काय करायचं हे तिला जाणून घ्यायचं होतं, म्हणून तिने तातडीने पाणिनीच्या ऑफिसमध्ये फोन केला होता. 

“पटवर्धन साहेब मी आता मुद्दाम तुम्हाला घाईघाईत एवढ्यासाठीच सांगायला आले की हा टॉवेल तिथे सापडल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की कार्तिक कामत ने खरंच चांडकला मारलं असावं आणि ऋताला ते माहीत असावं. तिला तो आवडतो म्हणूनच त्याच्याविरुद्ध साक्ष द्यायला लागू नये म्हणूनच ती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नसावी.”

पाणिनीच्या डोळ्यात एकदम चमक आली. त्याला एक नवीन कल्पना सुचल्याचं सौंम्याच्या लक्षात आलं. 

“थांब.. थांब.. सौम्या ! कधी कधी आपल्या गतीला एकदम गतिदायक कल्पना सुचतात. त्याचा मी आता फायदा घेऊ शकतो. सरकारी वकील खांडेकरांना एकदम आश्चर्याचा धक्का देता येईल.” 

“काय मनात आहे तुमच्या सर?” 

“मी ऋताला बचावाचा साक्षीदार म्हणून बोलवीन. साहजिकच ती त्याला नकार देईल. मी यावर तिच्याशी बरीच बाचाबाची करीन. एक मोठा माहोल कोर्टात निर्माण करीन. तरीही ती साक्ष दायला नकार देईल. मग त्याच क्षणी बचाव पक्ष हा खटला थांबवतो आहे असे जाहीर करीन. मी कुमार कामतच्या ऑफिस मध्ये झालेली गोळी त्यांना सापडलेलीच नाही. मी त्या ऐवजी रक्ताचे डाग असलेले हे टॉवेल कसे महत्त्वाचे आहेत हे दाखवून देईन. 

मी कोर्टाच्या असं निदर्शनाला आणून देईन की कुमार कामत याने,ज्याला आपण ‘कुमारची’ बंदूक म्हणतो तीच बंदूक ऋता रिसवडकरच्या घरी माझ्या सांगण्यावरून आणली होती. आणि तिला दिल्यानंतर तिने ती टेबलावर ठेवली होती. तिच्या लक्षात आलं की आपण ज्याला ‘कप्पा’ बंदूक असं म्हणतो, म्हणजे कार्तिकच्या खांद्याला जी नेहमी असायची, ती बंदूक कार्तिक याने ऋता च्या संरक्षणासाठी आदल्या दिवशीच दिलेली होती आणि त्यातून एक गोळी आधीच झाडलेली होती. त्यामुळे ऋताच्या हे लक्षात आलं होतं की कार्तिकनेच चांडकला मारलं आहे. कार्तिकला वाचवण्यासाठी म्हणून तिने टेबलावर ठेवलेली ‘कुमारची’ बंदूक उचलली. ती तिच्या घरात कुठेतरी लपवली आणि त्या जागी कार्तिक ने दिलेली ‘कप्पा’ बंदूक तिथे ठेवली. अगदी बरोबर त्याच स्थितीत ठेवली ज्या स्थितीत तिने कुमारने दिलेली ‘कुमार’ची बंदूक ठेवली होती. आणि आत्ता तुझ्याशी बोलताना मला जाणवतंय सौंम्या, की माझा हा केवळ अंदाज नाही तर खरंच तिने तसं केलं असणार.” पाणिनी म्हणाला.

“ शेवटी असं बघ सौम्या, आपल्याला एका बंदुकीचा हिशोब लागत नाहीये. कार्तिकने ऋताला एक बंदूक दिली. खुनाच्याच रात्री. त्याला आपण ‘कप्पा’ बंदूक म्हणतोय. कुमारने माझ्या सूचनेनुसार त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडील बंदूक दिली. त्याला आपण ‘कुमार’ची बंदूक म्हणतो. पोलिसांनी जेव्हा तिच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना एकच बंदूक मिळाली. टेबलावर ठेवलेली. ती बंदूक मिळताच त्यांनी त्यांचा शोध थांबवला. ऋता तयार नसली तरी मी कोर्टाला विनंती करीन की त्यांनी ऋताला बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून हजर राहण्याचा आदेश द्यावा.

आता बघ मी कोर्टात केवढा माहोल निर्माण करतो ते ! हिशोब न लागणाऱ्या एका बंदुकीच्या आधारावर!”

“मी इन्स्पेक्टर होळकर ला परत साक्षीला बोलवेन. मी हे कोर्टाच्या निदर्शनाला आणून देईन की जेव्हा त्याला ऋताच्या घरात एक बंदूक मिळाली तेव्हा लगेचच त्याने बंदुकीच्या तज्ज्ञाकडे म्हणजे बॅलेस्टिक एक्स्पर्टकडे धाव घेतली आणि जेव्हा त्याला आढळलं की हीच बंदूक खुनामध्ये वापरण्यात आलेली आहे, तेव्हा तो एवढा खुष झाला की तिच्या घरात आणखीन एखादी बंदूक असू शकते, आणि ती आपल्याला शोधणे आवश्यक आहे, हा मुद्दा सुद्धा त्याला सुचला नाही. तुझ्या लक्षात येतंय सौम्या, ऋताने काय केलं असेल? ज्या क्षणी मी आणि कुमार कामत तिला बंदूक देऊन निघून गेलो तेव्हा तिने आमच्या समोरच टेबलवर ठेवलेली कुमारने दिलेली बंदूक म्हणजे ज्याला आपण ‘कुमार’ची बंदूक म्हणतो आहोत, ती उचलली दुसरीकडे लपवली. आणि त्या जागी कार्तिक कामतने दिलेलं खुनी हत्यार म्हणजे ‘कप्पा’ बंदूक टेबलवर ठेवली. पोलीस दुसऱ्या वेळेला म्हणजे ९ तारखेला तिच्या घराची झडती घ्यायला येई पर्यंत कुमार’’ची बंदूक आपल्या घरात लपवण्यासाठी तिला भरपूर वेळ मिळाला होता.” पाणिनी म्हणाला.

“म्हणजे सर तिला वाटत होतं की कार्तिक नेच चांडकला मारलं, म्हणून तिने रिव्हॉल्व्हरची अदलाबदल केली?” सौम्यानं विचारलं. 

“बरोबर. आणि हा खुलासा अत्यंत तर्कात बसणार आहे. मला माहित्ये की कार्तिक कामतने सव्वा आठ वाजता चांडक ची भेट घेतली होती. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यानं चांडकला गोळी घातली असणार. त्यानंतर जेव्हा ऋता रात्री साडेआठ वाजता चांडकला भेटायला गेली, त्यावेळेला तो तिला मेलेला दिसला. रक्ताच्या थारोळ्यात तिचा पाय पडला ती मागच्या बाजूने बाहेर पडली. तिला कार्तिक त्या इमारतीच्या बाहेर गाडीतून बाहेर पडताना दिसला. तिला माहिती होतं की तो चांडकला भेटला आहे.. पोलिसांनी या सगळ्याचा शोध घेताना गोंधळ घातला. खऱ्या अर्थाने बंदुकीची अदलाबदल करणारी ऋतानच होती.” 

“मला हे आधी कसं सुचलं नाही. हिशोब लागत नसलेल्या आणि पोलिसांना न सापडलेल्या बंदुकीवरच हे सगळं रहस्य गुंतलं होतं.”

“आता मी सांगतो ते ही थोडं ऐक, पाणिनी ” कनक म्हणाला. “अक्मे कंपनीच्या नावाने जी बिले छापली होती, त्याचा शोध घेण्यासाठी मी मोठीच शोध मोहीम हाती घेतली होती देवनार मध्ये मला एक प्रिंटिंग प्रेस सापडली ज्याने ही बिलं छापली होती. एका माणसासाठी त्यांनी हे काम केलं होतं, आणि त्याची रक्कम त्यांना रोखच मिळाली होती. पण ते काम देणाऱ्या माणसाचं वर्णन ते मला देऊ शकले नाहीत. जवळजवळ वर्षांपूर्वी त्यांनी काम केलं होतं त्यामुळे त्यांना आता चेहरा वगैरे आठवण शक्य नाही.” कनक म्हणाला 

“ठीक आहे कनक. आता मी जरा वेगळ्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतोय. गती मला सांग आपली मृण्मयी कुठे आहे आत्ता?” 

“आपल्या ऑफिसमध्येच आहे.” गती म्हणाली. 

“तिला सापडलेले टॉवेल तिने आणलेत आपल्याबरोबर?” पाणिनीने विचारलं

“हो सर”  

“तिला म्हणावं ते टॉवेल इकडे कोर्टात घेऊन ये. ती तिथे पोहोचेपर्यंत मी कोर्टात काहीतरी वेळ-काढू पणा करतो. मृण्मयी कोर्टात आली की तिला म्हणावं सरळ माझ्या कडे ये आणि त्या टॉवेल्सचं पुडकं माझ्याकडे दे.” 

“पण ती येईपर्यंत तुम्ही वेळ काढू पणा करणार म्हणजे नक्की काय करणार?” सौम्यान विचारलं. 

“मी कुठल्यातरी साक्षीदाराला पुन्हा उलट तपासणीला बोलवीन. करीन मी काहीतरी !” पाणिनी म्हणाला. आणि गती पटकन आपल्या ऑफिसला पळाली.

“मी आद्रिका अभिषेकीला पुन्हा बोलवेन उलट तपासणीला. तिच्या व्यतिरिक्त मी इतर कोणाला साक्षीसाठी बोलावलं तर असं दिसेल की मी वेळ काढू पणा करतो आहे. ती आली की तिच्यावर मी अक्मे कंपनीच्या त्या बिलांबद्दल प्रश्नांची सरबत्ती करून हल्लाबोल करीन.” पाणिनी म्हणाला.

“पण ही योग्य उलट तपासणी ठरेल का?” सौम्यानं विचारलं. 

“फारशी योग्य ठरणार नाही.” पाणिनीने मान्य केलं. “ पण माझे प्रश्न बघून न्यायाधीशांना वेड लागायची वेळ येईल. खांडेकर चांगलेच उचकतील. माझ्या प्रश्नावर भरपूर आक्षेप घेतील. त्यातील काही मान्य होतील काही नाकारले जातील.पण या सगळ्यांमध्ये मृण्मयीला कोर्टात यायला पुरेसा वेळ मिळेल. रक्ताचे डाग असलेले टॉवेल घेऊन मृण्मयी आली की मी तिला साक्षीसाठी उभे करीन. तू बघशीलच, कोर्टात मोठाच तमाशा करीन मी.” पाणिनी म्हणाला.

“ सर, खांडेकर त्यांच्या भाषणात या सर्व मुद्द्यांची उत्तरं देतील?”-सौंम्या

“ त्यांचा स्वत:चाच पुरावा दाखवतोय की दोन रिव्हॉल्व्हर होत्या.त्यांना दुसरी रिव्हॉल्व्हर सापडलीच नाही शेवट पर्यंत आणि त्यामुळे आपल्या प्रिय माणसाल , कार्तिक ला वाचवण्यासाठी, स्वत:वर आरोप यावा म्हणून तिने बंदुकांची अदलाबदल केली.या माझ्या म्हणण्याचे खंडन खांडेकर करू शकणार नाहीत. ”

“ तिने नक्कीच ते केलंय ” –सौंम्या.

“ म्हणून तर ती बचावाची साक्षीदार व्हायला तयार नाहीये.” पाणिनी म्हणाला.

( प्रकरण १९ समाप्त.)

प्रकरण २०

दुपार नंतर न्यायाधीश स्थानापन्न झाले.

“ सुट्टीच्या काळात काही अशा गोष्टी घडल्या आहेत की सरकार पक्षाच्या एका साक्षीदारांची उलट तपासणी घेणे आवश्यक झालंय.” पाणिनी म्हणाला.

“ नाही, नाही, बिलकुल नाही.आमची सरकार पक्षाची बाजू मांडून पूर्ण झाल्ये. पुरावा सादर करायचे कामही पूर्ण झालंय.” खांडेकर ओरडून म्हणाले.

“ सरकार पक्षाचं ऑब्जेक्शन मान्य करते मी.”-न्यायाधीश.

“ ठीक आहे. सरकार पक्षाची बाजू मांडून पूर्ण झाल्ये पण बचाव पक्षाने अजून आपली बाजू पूर्ण केलेली नाही.उलट तपासणी साठी आम्हाला हवा तो साक्षीदार तपासायला परवानगी मिळत नसेल तर आमचा साक्षीदार म्हणून त्याच व्यक्तीला मी बोलावतो.” पाणिनी म्हणाला.

“ कुठला साक्षीदार?” न्या.बहुव्रीही यांनी विचारलं.

“ आद्रिका अभिषेकी.” पाणिनी म्हणाला.

न्यायाधीशांनी पाणिनीच्या कल्पकतेला हसून दाद दिली आणि आद्रिका अभिषेकी ला पुढे यायला सांगितलं. काही झालं तरी पाणिनी तिला बोलायला लावणारच होता त्यामुळे न्यायाधीशांनी आपला निर्णय बदलला.

“ तुम्ही तिची साक्ष घेण्या ऐवजी उलट तपासणी घेऊ शकता. मान्य केलेलं ऑब्जेक्शन मी अमान्य करते.” न्यायाधीश म्हणाल्या. ती येई पर्यंत पाणिनीने आपल्या घड्याळात पाहून मनातल्या मनात पटकन वेळेचं गणित केलं आणि तपासणीला सुरुवात केली.

“ कार्तिक कामत यांच्याकडे सेक्रेटरी म्हणून नोकरीला लागण्यापूर्वी तुला त्या कामाचा अनुभव होता?”

“ऑब्जेक्शन ! अवाजवी, गैरलागू प्रश्न.सर तपासणीत समाविष्ट न केलेल्या विषयावर उलट तपासणीत विचारता येणार नाही. ” खांडेकर म्हणाले.

“ मान्य.”

“ सेक्रेटरी म्हणून विविध खर्चाच्या बिलांचे पैसे देतांना त्याची व्हाउचर्स बनवणे हा तुझ्या कामाचा भाग होता?” पाणिनीने विचारलं

“ हो.”

“ आणि त्याचे चेक लिहायचे काम तू करायचीस?”

“ हो.”

“आणि सवयीने त्या चेक्स वर कामत सही करायचा?” पाणिनीने विचारलं

“हो.”

“ ज्या बिलांपोटी ते चेक्स काढायचीस तू, त्या बिलांची कशा पद्धतीने तू तपासणी करायचीस? ”

“ ऑब्जेक्शन.”

“ मान्य.”

“ तू सही करण्यासाठी जेव्हा कार्तिक कामत समोर चेक्स ठेवायचीस तेव्हा ज्या बिलांपोटी ते चेक्स काढले आहेत ती बिले सुद्धा त्याला जोडायचीस? ” पाणिनीने विचारलं

“ नाही. म्हणजे मी नवीन असताना सुरुवातीला बिले जोडायचे. ”—आद्रिका म्हणाली.

“चेक्स ठेवल्यावर त्यावर सही करण्यासाठी कामत तुला किती वेळानंतर बोलावत असे? ”

“ कधी कधी लगेचच सह्या करून द्यायचे, तर कधी कधी नंतर ये म्हणून सांगायचे.”

“ तुझ्यावर अविश्वास का होता त्यांचा?”

“ कोण म्हणत असं? उलट कित्येकदा माझ्यावर विसंबून बिले न बघता सुद्धा चेक्स वर सह्या करायचे.” आद्रिका खवळून म्हणाली.

“ अक्मे इलेक्ट्रिक आणि युरेका रीनोव्हेटर्स या दोन वेगळ्या कंपन्या आहेत ? ”

“ हो.”

“ त्यांचे मालक एकच आहेत की वेगळे?”

“ माहित नाही.”

“ दोन्ही कंपन्यांचे पत्ते त्यांच्या बिलावर छापलेले एकच आहेत?” पाणिनीने विचारलं

“ लक्षात नाही.”

“ या दोन कंपन्यांना कोणतेही काम दिलेले नसतांना, आणि त्या कंपन्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसताना या कंपन्यांचे नावाने लाखो रुपयांचे चेक्स वेळोवेळी तू काढले होतेस आणि त्यावर कार्तिककामतच्या सह्या घेतल्या होत्यास ही वस्तुस्थिती आहे की नाही?” पाणिनी कडाडला.

“ थांबा...थांबा...” खांडेकर ओरडले. “ कुठल्या कुठे भरकटत चालल्ये ही उलट तपासणी.ज्याचा या खटल्याशी काहीही संबंध नाही असे प्रश्न विचारले जात आहेत.”

न्यायाधीश सक्षमा बहुव्रीही जरा विचारात पडल्या. “ तुम्ही याचा संदर्भ खटल्याशी संबंधित बाबींशी जोडून दाखवू शकता का?” त्यांनी पाणिनीला विचारलं.

“ माझा पुढचा प्रश्न ते स्पष्ट करेल. या साक्षीदाराची मानसिकता स्पष्ट करेल.” पाणिनी म्हणाला.

“ ठीक आहे विचारा प्रश्न. मी माझा निर्णय नंतर देते.”-बहुव्रीही म्हणाल्या.

“ जो माणूस ही खोटी बिलं तुझ्याकडे पाठवत होता त्या माणसानं आणि तू मिळून तुझ्या मालकाविरुद्ध संगनमत करून त्याला लुटायचा डाव टाकला होतात आणि हा फ्रॉड मालकाच्या हे लक्षात येईल अशी भीती तुला वाटत होती अशी वस्तुस्थिती आहे की नाही?”

खांडेकर बोलायला उठले पण बहुव्रीहींनी ते बोलायच्या आधीच जाहीर केलं, “ माझी परवानगी आहे या प्रश्नाला.” खांडेकर खाली बसले. “ केस शी संबंधित नसलेला पुरावा पटवर्धन रेकॉर्डवर आणू इच्छिताहेत.त्यांची पद्धत वेगळी आहे नाट्यमय आहे पण त्यापेक्षा महत्वाचं हे आहे की हा प्रश्न विचारल्यावर साक्षीदार आद्रिका अभिषेकी यांचा चेहेरा काय सांगतो.... तिच्या चेहेरा पाहूनच स्पष्ट होतंय की तिला.... ”

“ नाही.. नाही...” आद्रिका ओरडली. “ यातला एक पैसाही मी घेतलेला नाही, देवा शप्पथ.. चांडकने मला फक्त हमी दिली की...” ती एकदम थांबली.

“ बोलणं चालू ठेव.” न्यायाधीशांनी फटकारलं.

“ मला नाही वाटत युअर ऑनर. तिला बोलायला परवानगी द्यावी.” खांडेकर उठून म्हणाले.

“ तुम्ही ऐकलंय ना, तिच्या तोंडून कुणाचं नाव बाहेर पडलंय ते? मयताने तिला पैसे दिलेले नाहीत पण काहीतरी वचन दिलंय असं तिच्या तोंडून बाहेर पडलंय. म्हणजे ज्याचा खून झालाय तो चांडक आणि हिच्यात काहीतरी संबंध होता.” सक्षमा बहुव्रीही खांडेकरांना म्हणाल्या. “ तू बोल आद्रिका.”

आद्रिकाला रडू कोसळलं. “ त्याने मला एका ठिकाणी मॉडेल म्हणून मोठ्या पगारावर काम मिळवून द्यायचं मान्य केलं होतं.”

कोर्टाचं दार उघडलं गेलं आणि मृण्मयी भगली आत आली.तिच्या हातात एक पुडकं होतं.शांतपणे चालत ती पाणिनी पटवर्धन उभा होता तिथे आली आणि त्याच्या हातात तिने ते टॉवेल चे पाकीट ठेवलं.पाणिनीने ते उघडून आतला टॉवेल काढून आद्रिकाला दाखवत प्रश्न विचारला, “ आद्रिका, चांडकला मारल्या नंतर तू या टॉवेलला रक्त पुसलंस आणि तो आपल्या पर्स मधे टाकलास.नंतर तो कामतच्या ऑफिसात आल्यावर फायालिग च्या रॅक मागे घुसडून दडवलास.चांडकला मारण्यासाठी तू रिव्हॉल्व्हर क्रमांक २ म्हणजे ज्याला आपण ‘तिजोरीतील’ रिव्हॉल्व्हर म्हणतोय, ती वापरली होतीस. ती आणि कप्पा रिव्हॉल्व्हर यांची तू अदलाबदल केलीस.म्हणजे जेव्हा कामत देवनार मधून ऑफिसला आला आणि अंघोळीला गेला तेव्हा त्याने काढून ठेवलेली ‘कप्पा’रिव्हॉल्व्हर तू तिजोरीत ठेवलीस.आणि खून करताना वापरलेली ‘तिजोरीतली’ रिव्हॉल्व्हर जी तुझ्याकडे होती, ती त्याच्या खांद्याच्या कप्प्यात ठेवलीस. असंच घडलंय की नाही?” पाणिनी कडाडला.

 आद्रिका अभिषेकी उठून उभी राहण्याच्या पावित्र्यात होती पण तिच्या पायातलं अवसान गळालं आणि ती खाली कोसळली.

 “ मी स्वत:ला वाचवायला हे केलं. मला जेव्हा लक्षात आलं की त्याने मला फसवलंय....” ती हुंदके देत उत्तरली.

“ एक मिनिट, ... एक मिनिट... हा सगळा पाणिनी पटवर्धन यांनी जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या नाटकाचा भाग आहे. ही आद्रिका त्यांना सामील आहे. अत्यंत घोटवून , तालीम करून तिच्या कडून हा अभिनय करून घेतला गेलाय.” मोठ्याने गुरगुरत खांडेकर म्हणाले.

पाणिनी शांतपणे आपल्या खुर्चीवर येऊन बसला आणि खांडेकरांकडे बघून हसला.

“सरकार पक्षातर्फे आमचं हेच आणि एवढंच सादरीकरण होतं.आम्ही थांबतोय. असे शब्द तुम्ही थोड्या वेळापूर्वी उच्चारले होते ना?” पाणिनीने विचारलं “ हिंमत असेल तर खरंच अत्ताच्या या परिस्थितीत थांबून दाखवा. आम्ही बचाव पक्ष थांबतोय.” पाणिनी म्हणाला.

“ या साक्षीदाराला काहीही विचारायचं नाहीये तुम्हाला आणखी?” न्यायाधीश अविश्वासाने म्हणाल्या.

“ नाही.युअर ऑनर” पाणिनी म्हणाला.

खांडेकर अस्वस्थ झाले, काय बोलायचं ते न सुचून , काय निर्णय घ्यायचा ते ठरवता न आल्यामुळे हवालदिल होवून त्यांनी कोर्टाला विचारलं, “ अर्धा तासाची सुट्टी कोर्ट जाहीर करेल का? असं होवू शकतं दरम्यानच्या काळात, की बचाव पक्षाला ....”

न्यायाधीशांनी त्याचं म्हणणं अर्धवट तोडत पाणिनी पटवर्धनला विचारलं, “ तुमची या विनंतीला हरकत किंवा विरोध आहे?”

“ ठाम विरोध आहे आमचा.आम्हाला आणखी काहीही पुरावा सादर करायचा नाही किंवा साक्षीदारही तपासायचा नाही.आम्हाला आता अर्ग्युमेंट सुरु करायचं आहे.” पाणिनी म्हणाला.

“ छान.सरकार पक्षाने त्याचं म्हणणं मांडावं.” न्यायाधीश म्हणाल्या.

“ आम्ही आमची बाजू मांडून संपवली आहे.” खांडेकर म्हणाले.

“ आम्हालाही काही पुरावे द्यायचे नाहीत.”

न्यायाधीशांनी आद्रिका अभिषेकी कडे पाहिलं. “ अनियमित असंच घडलंय इथे. म्हणजे कोर्टाच्या प्रथेला, अनुलक्षून असं नाही. मला सांग तू, तू खरंच मारलंस चांडकला?” न्यायाधीशांनी विचारलं. आद्रिका काहीतरी बोलायला गेली. तेवढ्यात न्या.बहुव्रीही तिला थांबवत म्हणाल्या, “ तू प्रथम शपथ घे आणि मग विधान कर. ” तिला शपथ दिली गेली.

“ हो.मीच मारलं.मी कार्तिक कामत सरांच्या तिजोरीतून रिव्हॉल्व्हर काढलं आणि ते खरंतर त्याला धमकवायला हातात धरलं.पण माझा गळा दाबून त्याने मला गुदमरून टाकलं डोळ्यासमोर अंधारी आली आणि ...आणि एकदम मोठा आवाज झाला, त्याची माझ्या मानेवरची पकड सुटली.माझा श्वास मोकळा झाला.” आद्रिका म्हणाली.

“ कुठल्या रिव्हॉल्व्हर ने त्याला घाबरवलंस?”-न्यायाधीश.

“ कार्तिक सरांच्या तिजोरीतून जी मी आदल्या दिवशी दुपारी काढून घेतली होती.”

“ त्या नंतर काय केलंस त्या रिव्हॉल्व्हरचं?”

“ कार्तिक सरांनी अंघोळीला जातांना आपला कोट काढला तेव्हा खांद्याला लावायचा पट्टाही काढून ठेवला होता.ते अंघोळीला गेले ती संधी साधून मी चांडक साठी वापरलेली रिव्हॉल्व्हर कार्तिक सरांच्या खांद्याच्या कप्प्यात ठेवली आणि खांद्याच्या कप्प्यात असलेली तिजोरीत ठेवली. ”

“ पण मुळात तुला तिजोरी उघडता कशी आली?” न्यायाधीशांनी विचारलं.

“ त्या तिजोरीला किल्या नव्हत्या.फक्त आकड्यांचे आणि चक्राचे कॉम्बिनेशन होते. मागे एक-दोनदा सरांनी तिजोरी उघडली होती तेव्हा मी ते लक्षात ठेवलं होतं. ” तिने उत्तरं दिलं.

“ म्हणजे थोडक्यात खुनी हत्यार म्हणजे मुळातली तिजोरीतील रिव्हॉल्व्हर होती जी तू नंतर कार्तिकच्या खांद्याच्या कप्प्यात ठेवलीस आणि त्यामुळे कार्तिक ने ते ऋता ला दिले आणि ऋता ने ते कुमार कामतच्या रिव्हॉल्व्हर चे जागी बरोब्बर त्याच टेबलवर ठेवले.” पाणिनी म्हणाला.

“ कोर्ट एक तासाची सुट्टी जाहीर करत आहे.हा साक्षीदार सरकार पक्षाचा असल्याने त्याची साक्ष सरकार पक्षावर बंधनकारक असेल.” बहुव्रीही म्हणाल्या.

“ आम्ही जो पर्यंत या अचानक घडलेल्या घडामोडींचा पर्दा फार्स करत नाही तो पर्यंत तिची साक्ष सरकार पक्षावर बंधनकारक असणार नाही. आम्हाला शोधून काढायचंय की अचानक ही बया जी आमची साक्षीदार होती ती आरोपीच्या बाजूने कसं काय बोलायला लागली, तिला काही फायदा करून देण्यात आला आहे का?हा टॉवेल अचानक कुठून उपटला मधेच? ” खांडेकर न्यायाधीशांच्या आदेशावर असहमती दर्शवत म्हणाले.

“ हे सगळ शोधून काढण्यात आता काही अर्थ उरलेला नाही.आद्रिका अभिषेकी ने शपथ पूर्वक गुन्ह्याची कबुली दिली आहे. निर्णयाची लेखी प्रत तुम्हाला एका तासात मिळेल. तासासाठी कोर्टाचे कामकाज तहकूब करण्यात येत आहे.” न्यायाधीश एवढं बोलून खुर्चीतून उठल्या आणि आपल्या चेंबर मधे गेल्या. जातांना निर्णय टाइप करण्यासाठी टायपिस्टला आपल्या चेंबर मधे येण्याची खूण करायला त्या विसरल्या नाहीत.

( प्रकरण २० समाप्त.)

प्रकरण २१

पाणिनी, सौंम्या. कनक, कार्तिक कामत, ऋता रिसवडकर असे सगळे पाणिनी च्या केबिन मधे जमले.

“ ऋता, तू मला आधी सांगायला हवं होतंस.” पाणिनी म्हणाला.

“ मी कुणालाही सांगणार नव्हते.कार्तिक सर मला चांडकच्या इमारतीतून गाडी घेऊन बाहेर पडताना दिसले.त्यांनी मला पाहिलं नाही. नंतर त्यांनी मला जेव्हा रिव्हॉल्व्हर दिली तेव्हा त्यातून एक गोळी आधीच झाडण्यात आल्याचं मला लक्षात आलं.आणि त्यांनीच चांडकला मारलं असा अंदाज मी केला.नंतर तुम्ही कुमार कामत मार्फत मला त्याची ‘ कुमारची’ रिव्हॉल्व्हर देऊ केलीत. तुमचा हेतू होता की पोलिसांनी माझ्याकडून कामतने दिलेली रिव्हॉल्व्हर मागितली तर मी कार्तिक ऐवजी कुमार कामतने दिलेली रिव्हॉल्व्हर त्यांना द्यावी. पण त्यामुळे मला कार्तिक सरांना वाचवता आलं नसतं, त्यासाठी मी कुमारने मला दिलेली रिव्हॉल्व्हर स्वयंपाकघरात एका पिठाच्या डब्यात लपवली आणि त्याच्या जागी कार्तिकसरांनी मला दिलेली रिव्हॉल्व्हर ठेवली.जे माझ्या मता प्रमाणे खुनी हत्यार होतं.”

“ अजूनही ते रिव्हॉल्व्हर तुझ्याच घरात आहे?” कनक ने विचारलं.

“ नाही. लगेचच मी ते शेजारी बांधकाम चालू असलेल्या इमारतीत पाया भरण्याचं काम चालू आहे त्यातल्या ओल्या सिमेंट मधे खुपसून दडवलं. ” ऋता म्हणाली.

“ अग पण त्यामुळे तू खुनी म्हणून पकडली गेलीस ना? का केलंस एवढं?” कार्तिक म्हणाला.

“ काही गोष्टी बोलायच्या नसतात.” लाजेने खाली बघत ती म्हणाली.

“ तू मला चांडकच्या इमारतीतून बाहेर पडताना पाहिलंस याची मला कल्पना नव्हती.मी चांडकला भेटलो आणि त्याला सांगितलं की मला सगळ्याच प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे आणि अत्ताच.तो म्हणाला त्याला अजिबात वेल नाही कारण दहा मिनिटात त्याला भेटायला एक व्यक्ती येणार आहे.आद्रिका अभिषेकीच त्याला भेटणार होती हे नंतर कळलं आपल्याला. मी म्हणालो की अकरा वाजता मी पुन्हा येणार आहे. आणि तिथून बाहेर पडलो.”

पाणिनी म्हणाला, “ मी चांडकला भेटलो तेव्हा त्याला एक फोन आला तो आद्रिकाचाच असणार. ती त्याला म्हणाली असणार की ती लगेचच येत्ये कशावरून तर हा फोन आल्यावर चांडकमला म्हणाला की दोन तीन मिनिट थांब. याचा अर्थ ती जवळूनच बोलत असणार.मी बाहेर पडलो आणि इमारतीच्या पुढच्या दारापाशी थांबलो.पण बराच वेळ झाला तरी कोणीच आलं नाही. तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं की जी व्यक्ती येणार होती ती मागच्या जिन्याने आलेली असू शकते. ” पाणिनी म्हणाला.

“ बरोबर आहे तुझं पाणिनी,” कार्तिक म्हणाला. “ ती मागच्याच दाराने गेली. तिला चांडकने काही टीव्ही चॅनेल वर सिरिअल्स मधे भूमिका द्यायचं कबूल केलं होतं. इतरही अनेक ठिकाणी संधी देतो सांगून तिच्या कडून पैसे उकळत होता तो. पण त्याने फक्त पैसेच उकळले तिला संधी कुठलीच दिली नाही.म्हणूनच तिने त्याला मारायचं ठरवलं. शेवटचा जाब विचारायला ती तिथे आली. त्यांच्यात भांडणं झाली आणि तिने त्याला संपवलं. ” कार्तिक म्हणाला.

 ऋता म्हणाली, “ मी चांडक च्या फ़्लॅट मधे गेले तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, माझा पाय रक्तात पडला, हातालाही रक्त लागलं, मी खूप वेळ हात धूतच बसले. शेवटी मागच्या दाराने बाहेर पडले.मला खात्री होती ही कार्तिक सरांनीच त्याला ठार केलंय, माझ्या वडलांना त्याने मारलं म्हणून. ”

कार्तिक कामतम्हणाला, “ आणि मला वाचवण्यासाठी तू कुमारने दिलेल्या रिव्हॉल्व्हर च्या जागी मी तुला दिलेली रिव्हॉल्व्हर ठेऊन स्वत:वर आळ येईल असं कृत्य केलंस? केवढा धोका पत्कारलास तू ! ”

“ आणि तुम्ही तरी वेगळ काय केलंत सर? ” ऋता म्हणाली. “ तुम्हाला वाटलं मी त्याला मारलंय म्हणून माझ्यावर आळ येऊ नये म्हणून तुम्ही तुमचे बूट रक्तात बुडवून माझ्या बुटाच्या ठशावर उमटवलेत !”

कामत ने उठून ऋताला प्रेमभराने जवळ घेतलं. तिची पाठ थोपटली.

“ पटवर्धन, तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस ते पैशाच्या पलीकडचं आहे. पण शेवटी हे तुझं प्रोफेशन आहे.” कामत म्हणाला आणि त्याने सही केलेला , रक्कम न टाकता कोरा चेक पाणिनीच्या हातात दिला.

प्रकरण १७ आणि संपूर्ण कादंबरी समाप्त