मातृ दिना निमित्त तुमच्या आईच्या आवडीचा कोणता पदार्थ होता..असे विचारल्या वर डोळ्यात पाणी दाटून आले😥खरेतर मुलांच्या आवडीतच तिची आवड असायची ❤️तशी तिची आठवण नाहीं असा दिवसच नसतो म्हणा.. मला आई आठवते ती कायम कामात असलेलीशाळेची नोकरीघरचे शिवणकामस्वतः चे ब्लाऊज माझे सर्व कपडे शिवणारी चटणी ,कोशिंबीर, भाजी, आमटी, पोळी भात यासह पुर्ण स्वयंपाक रोज न कंटाळता करणारी(कारण वडिलांना रोज साग्र संगीत जेवण हवे असे 🙂)सुटी दिवशी वेगवेगळे पदार्थ सतत करणारी अशी अन्नपुर्णा म्हणून आठवते ती माझी आईजीने घरच्या सर्वांना त्यांच्या आवडीचे अनेक चविष्ट पदार्थ करून घातलेले होते 😋तिच्या हाताखाली मी मुळ स्वयंपाकाचे धडे घेतले असे नाही कदाचित म्हणता येणार ...कारण तिने माहेरी असताना कोणतेच स्वयंपाकाचे काम मला सांगितले नाही...उलट ती म्हणायची सासरी गेले की तुला काम लागणारच आहे.. आत्ता काही नको करुस पण ती जे पदार्थ जसे करीत होती ते माझ्या मनात टिपले जात होते 🙂तिच्यासारखी स्वयंपाकाची आवड ही जोपासली जात होती ❤️तिच्या हातची कांदा भजी, थालिपीठ,मसालेभात खायला घरचे बाहेरचे सर्वच इच्छुक असत.अगदी ऐन वेळा येऊन तिला कोणी कांदा भजी मागितली तरी ती झटपट करून घालत असे.तिला सगळे "सुगरण" म्हणत..तसे ती कोणताच पदार्थ कधीं प्रमाण घेऊन करीत नसेतरीही पदार्थ "चविष्ट* असेकित्येकदा वेळेअभावी किंवा गडबडीत केलेला एखादा पदार्थ फसत असेतरीहि तो चवीला सरसच असे किंबहुना त्याला "सरस" करायचं कसब तिच्याकडे होते 😊वडलांना रोज वेगळ्या प्रकारची आमटी लागे..तिच्यासारखी चविष्ट आमटी तीच करू जाणे ...😋तिला भरतकाम विणकाम याचीही आवड होतीवेळ मिळेल तेव्हा ती क्रोशाचे ,विणकामाचे अनेक प्रकार करीत असेतिने उरलेल्या लोकरीत विणलेला एक रुमाल माझ्या संग्रही आहे असे अनेक प्रकारचे क्रोशाचे रुमाल ती करीत असे आईने तिच्या लग्नाच्या आधी करायला घेतलेला तिच्या हातचा क्रोशाचा पडदा..💗अजूनही संग्रही आहे आईला तिच्या स्वयंपाक घराच्या संपूर्ण दरवाजाला हा पडदा करायचा होतापण नोकरी...स्वयंपाक...घरचे शिवण....आला गेला पाहुणा..अशा अनेक व्यापात तो तसाच अर्धा राहिला होतातिच्या मृत्यू नंतरमी तो घरी आणला होता तिची आठवण म्हणून काही वर्ष आम्हीं तो पडदा टीव्ही वर टाकत होतो.आता मात्र हा पडदा गणपती च्या सजावटी साठी एक मैत्रीण घेऊन गेली 😊आईच्या इतक्या छान कलाकारी लागणपतीच्या पायाशी जागा मिळालीयाचे खुप समाधान वाटले 💗तसेच तिने वेलदोड्याच्या सालीपासून फांदीवर बसलेली चिमणीची जोडी केली होती .खाली स्वतचे नाव सौ निर्मला ल.(वडिलांचे नांव लक्ष्मीकांत होते) देव असे अभिमानाने लिहिले होते 😊अनेक वर्षे तिला त्यासाठी साधी फ्रेम करायला ही जमले नव्हते. नंतर मात्र मीच ती अडगळीच्या कपाटातून बाहेर काढली आणि फ्रेम करून आईच्या घरी बाहेरच्या खोलीत लावली .तेव्हा तिला खूप आनंद झाला होता . आईला खरेच कोणता पदार्थ नक्की आवडत होता हे कधी त्या वेळी नाही समजले पण नंतर समजल तोंडाने बोलून नाही दाखवले तरी तिला गुलाबजाम आवडायचे, उडीद वडा सांबार चवीने खायची , मसालेभात गुळाची पोळी आवडायची आईच्या काळात इडली ,डोसे, उडीद वडे असे प्रकार फार प्रचलित नव्हतेलग्नाच्या आधी धाकट्या भावाला आवडतात आणि मला हौस म्हणुन मी हे पदार्थ घरी करीत असे तेंव्हा घरी मिक्सर नव्हता मी डाळ तांदुळ पाट्यावर वाटून हे पदार्थ करीत असे..याचे तिला भारी कौतुक असे ❤️लग्नानंतर मी अनेक नाविन्यपूर्ण पंजाबी चायनीज अथवा साऊथ इंडीयन पदार्थ करीत होतेते ती आवडीने खात असे..तुझे सगळेच पदार्थ अगदी छान असतात ग.. असेही म्हणे 😀एखादा वेगळा पदार्थ खाल्ला की लगेच तो कसा करायचा हे विचारुन घेई..अशा वेळी त्या त्या पदार्थातले बारकावे विचारताना ती जणु"माझी मुलगी "होऊन जाई...❤️आणि ते पदार्थ तसेच स्वतः करून मला खायला घाली"किती मस्त झालेय ग हे...". असे म्हणले की....पण तुझ्यासारखा नाही जमला ग असे म्हणे...😀अर्थात यात प्रेमाचा भाग अधिक होता ❤️यानंतर माझ्या दुसऱ्या आईचा म्हणजे सासूबाईंचा उल्लेख नाही केला तर पोस्ट अपुरी राहीलया माहेरपणाच्या पर्वानंतर माझ्या आयुष्यात आगमन झाले माझ्या सासुबाईंचे ..मुलीसारखं प्रेमाने वागवणाऱ्या मला समजून घेणाऱ्या आणि अतीशय प्रेमळ अशा या आईचे ऋण फिटणार नाहित..त्यांना तीन सुना होत्या सगळ्यात धाकटी मी...तरी माझ्याशी त्यांची खास "गट्टी" होती ❤️त्या जुन्या काळच्या..निगुतीने सावकाश स्वयंपाक करणाऱ्या...मी नोकरी वाली.. पटपट आवरून निघणारीया गोष्टीचे त्यांना नेहमी अप्रूप वाटे...🙂तुझे प्रत्येक काम फास्ट असते असे कायम कौतुकाने बोलून दाखवत 🙂त्यांच्याकडून मला आणखी स्वयंपाकातील कर्तब ,स्वयंपाकातील छोट्या छोट्या क्लुप्ती शिकायला मिळाल्या पारंपरिक पदार्थ खायला आणि शिकायला मिळाले माझ्या सासुबाई सुद्धा खूप सुगरण होत्या😊 सासरच्या त्या मोठ्या कुटुंबात अनेक बायकांच्या गोतावळ्यात त्या "एक नंबर सुगरण "म्हणून नावाजल्या जात😊 त्यांच्या हातचा प्रत्येक पदार्थ दिसायला आणि चवीला सुबक असे .त्यांचे करणे सुद्धा अगदी निगुतीने असे शांतपणे ,व्यवस्थित तयारी करून ,कुठेही गडबड गोंधळ नाही योग्य ती चव आणि पोत त्या त्या पदार्थाला आलाच पाहीजे असा "कटाक्ष" त्यांच्या स्वयंपाकात असे.त्यांच्या हातच्या लुसलुशीत पुरणपोळ्या ,अत्यंत पातळ गुळपोळ्या , मऊसुत सांज्याच्या पोळ्या ..घडीव देखणे चविष्ट मोदक,विविध प्रकारचे लाडू याला तर तोडच नसायची अनेक प्रकारची लोणची त्या अप्रतिम करीत असत 😊ती सुद्धा भल्या मोठ्या बरण्या भरून ..सासुबाई ची लोणची थोडी फार शिकलेतरी त्यांचें कसब त्यांच्याकडेच राहीले 😊त्यांनाही आईसारखेच मी केलेले नवीन नवीन पदार्थ खुप आवडत .ते खाल्ले की लगेच कौतुकाचे शब्द ही त्यांच्या तोंडून येत ❤️अशा दोन आईंच्या सहवासात माझे जीवन समृद्ध झाले आहे .❤️आता त्या दोघींना या जगातून जाऊन कित्येक वर्षे झालीत 😥तुम्हीं छान करता सगळे पदार्थ असे अनेक जण जेव्हा मला म्हणतात 😊तेव्हां आई आणि सासूबाईंचे थोडे फार तरी आपल्यात आले आहे असे उगाचच वाटते..पण कितीही छान पदार्थ कितीही निगुतीने केले तरी त्यांच्या नखाची सुद्धा सर आपल्याला येणार नाही हे मात्र खरे..अनेक लोकांना प्रेमाने चविष्ट पदार्थ खाऊ घालणाऱ्या.. या दोन्हीं अन्नपूर्णा मातांना मातृ दिना दिवशी माझे नमन 🙏