आठवणीतले घर .. सकाळी गावापासून दुर फिरायला जाताना रस्त्यात लागणारे ते घर मला नेहेमीच भुरळ घालते सकाळची माझी फिरण्याची वेळ म्हणजे नुकतेच उजाडू लागलेले असते ताजी ताजी हवा ,,नुकतेच झुंजू मुंजु होवू लागल्याने थोडा अंधुक प्रकाश पड्लेला असतो सभोवताली आणी आजूबाजूला संपूर्ण फळा फुलांनी भरलेली शेती ..शांतता इतकी की जिथे फक्त पक्षीच बोलतात ..आणी मग परतीच्या वाटेवर मला “ते घर “मला स्पष्ट दिसू लागते ..तसे पाहायला गेले तर ते घर दिसायला अगदी साधेच असते बर का त्या घराच्या मुख्य अशा चार च खोल्या सलग बांधलेल्या असतात एक स्वयपाक खोली .एक झोपायची खोली.. एक अवजारांची खोली व एक बैठकीची ..इतकेच आणी यातील सर्व खोल्या अलग अलग ..शहरी प्रायवसी कोणत्याच खोलीला नाही !!घरा समोर च एक तुळशी वृंदावन ..बहुधा देव पूजे साठीच लावली जाणारी तगरी ..कर्दळ तुळस सदाफुली स्वस्तिक अशी चार पाच झाडे डावीकडे कडब्या साठी एक मोठी गंजी ..झाकून ठेवलेली ..उजवीकडे जनावरांसाठी असणारी पशुखाद्ये खाण्या साठी ठेवलेले मोठे चार पाच हौद शेजारीच एक पाण्याचा मोठा हौद ..पलीकडे एक मोठे चुलाणे बहुधा पाणी तापवण्या साठी किंवा सणाचा स्वयपाक रांधण्या साठी असावे घरात तीन पिढ्या नांदत असाव्यात ..बाहेरच एका बाजल्या वर आजी बसलेल्या असत ..ज्यांना सारे आत्ती म्हणत असत त्यांची दोन मुले दोन सुना होत्या घरात ..शिवाय तीन नातू एक नात असा मोठा प्रपंच होता बाजूलाच त्यांची भली मोठी शेती होती .दोन्ही मुले शेती पाहत तिन्ही नातु शेतीला लागणारी सारी मदत करीत असत नात मात्र कोलेजला शिकत असावी बहुधा त्यामुळे सकाळीच ती पुस्तके घेवुन बाहेर पडत असे जसा घरचा परिवार तीन पिढ्याचा तसाच बाहेर असणारा प्राणी परिवार पण दोन पिढ्याचा तरी नक्कीच होता त्यांच्या घरातले प्राणी पाहिले की हेवा वाटत असे ..कीती प्राणी “धन “ होते त्यांच्या घरात ..दारातच घरा बाहेर कोंबडा कोंबडी .त्यांची डझन भर पिल्ले दारात बसलेला तिखट कानाचा आणी अतिशय “तेज” कुत्रा स्वयपाक खोलीच्या दारात बसलेली मनी मांजर तसे तर ते दोघे कट्टर शत्रू म्हणतात पण इथे दोघांचे अगदी “गळ्यात गळे”असत .बाजूला दोन शेळ्या आणी त्यांची चार पाच बछडी कडेला एक म्हैस रेडा ,..आणी नुकतेच जन्मलेले एक काळेभोर रेडकू त्याच्या शेजारीच बांधलेली एक गाय आणी तीचे पांढरे शुभ्र वासरू रेडकू आणी वासरू बहुधा एकाच वयाची असावीत .सकाळी उजाडले की आत्ती बाहेर येवून बाजल्या वर बसत असत घरातील प्रत्येक जण आपली ठरलेली कामे आटोपत असत सुना पैकी एखादी त्यांना स्टीलच्या भांड्यात चाय देत असे आणी कुत्र्याला दुध भाकरी घालत असे मनी पण अशा वेळी तिच्या पायात पायात येवून दुधाची मागणी करीत असे दुसरी सुन त्याच वेळेला तुळशीला उदबत्ती लावून स्वय्पाकाच्या तयारीला लागत असे नात बाहेरची झाड लोट करून घेत असे व आईला थोडी मदत करीत कॉलेजच्या तयारीला लागत असे मुले दोन्ही बहुधा शहर गावात काही शेतीची वा इतर खरेदीला जात असावीत नातु तिन्ही वेगवेगळ्या कामात गर्क होत असत एक नातू कडब्याच्या गंजीतुन कडबा घेवून गाई म्हशीना घालण्याचे काम करीत असे त्याच वेळी दुसरा जवळच्या शेताला पाणी देणे औषध फवारणे वगैरे करीत असे आता तिसरा वासराला आणी रेडका ला त्यांच्या आया पाशी दुध प्यायला नेत असे तेव्हा दिसणारे दृश्य इतके सुंदर वाटत असे वासरू आणी रेडकू आईला ढुशा देत दुध पीत असत आणी त्यांच्या आया प्रेमाने त्यांना चाटत असत यानंतर त्या गुरांना सोडून एकजण त्यांना मोकळ्या जागी फिरवायला नेत असे गुरे वासरे पण एकदा कासरा सोडला की वारा प्यायल्या प्रमाणे धावत सुटत असत आणी या वेळी मग कुत्र्याची खरी ड्यूटी सुरु होत असे गुरांना योग्य ठिकाणी नेणे हे त्याचे खरे काम असे मग जरा जरी इकडे तिकडे झाले तरी तो गुरा वर भुंकून भुंकून त्यांना अक्षरश लाईनी वर आणीत असे थोड्या वेळा पुर्वी मनी जवळ आळसावून झोपलेला तो कुत्रा हाच का ..असा प्रश्न पडावा सणा दिवशी मात्र हे घर सकाळ पासून च गजबजून जात असे मग आजीच्या बाजल्या वर बहुधा त्यांच्या लेकी त्यांच्या पायाशी बसलेल्या दिसत असत आजींचा चेहेरा आनंदाने ओतप्रोत भरलेला असे त्या पण प्रेमाने लेकीच्या केसावरून हात फिरवत असत सर्वांच्या त्यावेळी प्रेमळ गप्पा चालत असत आणी आजीची आणखी नातवंडे त्यांच्या भोवती बागडत असत ..त्या दिवशी मात्र कोपऱ्यातले चुलाणे चांगलेच धड धडत असते शेजारीच आणखी एक पण ग्यासची शेगडी टाकलेली असे आणखी मग सणाच्या स्वयपाका साठी खास आंलेले लोक हा स्वयपाक करीत असत जवळ जवळ पन्नास भर माणसांचा राबता त्या वेळी घरात आणी आसपास असे घर त्या दिवशी नुसते गजबजून गेलेले असे .नव्या नव्या वासरांची रेड्काची..अगदी कोंबडीच्या पिल्लांची पण चौकशी केली जात असे प्राणी पण माणसांच्या सहवासात सुखावत असत .असे “ते घर “माझा खुप आवडीचा विषय होता त्या घराचे रोजचे दर्शन जणु एक महत्वाची घटना असे माझ्या दृष्टीने खरे तर त्या घरातला रोजचा “दिनक्रम “हाच असे पण मला मात्र रोज तो नव्याने पाहत आहे असे वाटत असे जणु माझे आणी त्या घराचे काही जुने “ऋणानुबंध “असावेत ...