🎋भजी म्हणजे अग🎋दी सर्वांचा आवडता पदार्थ...!.
भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!
एकवेळ आंबा न आवडणारा भेटेल पण भज्याला नाही म्हणणारा कोणीच नसणार ..😃
🎋पावसाळी हवामानात भजी खाणे म्हणजे भन्नाट अनुभव!!!!
जो प्रत्येक जण घरी किंवा बाहेर घेतोच 😋
🎋नाव वेगळे असेल पण भारतभर मिळणारा प्रकार आहे हा. !!!
साउथला बोंडा म्हणतील, नॉर्थला पकोडे म्हणतील पण भजी असतीलच.
🎋भज्याचे पीठ म्हणजे भज्याची जान
जान सलामत तर भजी पचास..😀 असे म्हणायला हरकत नाहीं
कधी पातळसर कालवलेले पीठ,तर कधी घट्ट ,तर कधी मध्यम ..
कधी बेसन तर कधी भाजणी.कधी मिक्स... असंख्य चवीचे असते हे भज्यांचे पीठ ...
कधी कोणी या पीठात ओवा घालतील तर
कधी कोणी झणझणीत लाल तिखट डबल घालतील नाहीतर भरड कुटलेली मिरी घालतील
पीठ आणि मसाला प्रमाण योग्य जमायला हवे बास..
पीठ मात्र नीट भिजवायचे इतकीच अट.!
मग मात्र काय झकास चव येते खरपूस तळलेल्या भज्यांना!
🎋मात्र प्रत्येक प्रकारची भजी करताना पिठ भिजवायची वेगळी पद्धत असते
🎋मिरची भजी करताना त्यात थोडा सोडा घातला जातो म्हणजे छान फुगीर बनतात
आणि लुसलुशीत पण होतात ..
बटाटा भजी करताना बटाटा थोडा पातळ काप करणे जरूर असते
शिवाय पीठ पण थोडे पातळ आणि तेलाचे कडक मोहन घालून भिजवायचे
म्हणजे ही भजी छान कुरकुरीत होतात आणि टम्म फुगतात
मग नुसत्या मिरची अथवा टोमाटो सॉस सोबत पण मज्जा येते
🎋पीठ भिजवुन झाले की एकदा तळहातावर दोन थेंब घेवून चव मात्र बघायची आणि मग सुरू घाणा टाकणं..
🎋भज्यांसाठी सर्वात अधिक पसंती असते कांदा भजीला
कांदा भजी म्हणजे भज्यांचा राजा.
कधी कांद्याची चकती चकती तळायची ,तर कधी पाकळ्या वेगवेगळ्या करून खेकडा भजी करायची.
तर कधी कांद्याचे तुकडे करून ...
सोबत हिरवी तळलेली मिरची मात्र हवीच ...!!
🎋त्या खालोखाल पसंतीची असतात बटाटा भजी
बटाटा जरा जाडसर चकत्या करून त्याची भजी तळली तर
बेसनाच्या आवरणातील तेलाच्या खरपुस आंचेवर तळलेल्या या बटाट्याची
किंचित गोडसर चव एकदम छान लागते 😋
🎋 फ्लॉवरची भजी करायची असतील तर हातानीच इंच दीड इंच जाडीची फुले फुले वेगळी करून घ्यायची.
मग भजी करायची
🎋भजी स्वरूपातील फ्लॉवर चा देठही मस्त लागतो.
दिल्ली साईडला फ्लॉवर च्या दांड्याची खास भजी असतात जी
लग्नकार्यात आवर्जून ती करतात .
🎋माझा मित्र एकदा सांगत होता..
दिल्लीला एक पेशावरी हॉटेल मध्ये त्याने चिकन पकोडा त्याने खाल्ला होता
चिकन पकोडा विथ पुदिना चटणी लई भारी कॉम्बिनेशन होते म्हणे 🙂
🎋जाडी मोठी मिरची असेल तर फार काहीच करावे लागत नाही!
मध्ये एक चीर देऊन direct पिठात!
🎋पानांची भजी हा सुद्धा एक "स्पेशल" भजी प्रकार आहे.
पूर्ण पानांची भजी खावी तर मायाळूची.
केनीच्या पानांची भजी एकदम फुलतात आणि कुरकुरीत होतात.
हद्ग्याच्या फुलांची भजी पण छान कुरकुरीत होतात
ओव्याच्या पानांची भजी खुसखुशीत होतात
या भज्यांसाठी भिजवलेल्या पिठात थोडे जिरे हातावर चुरून घातले की फारच छान चव येते.
अळूच्या पानांची सुध्दा बारीक चिरुन अळू वडी सारखाच मसाला घालून भजी मस्त होतात..
🎋पालक भजी चिरून करतात आणि हाताएवढ्या अख्या पानांची सुद्धा करतात .
कांदा, बटाटा, मिश्र डाळी काहीही पालक भजीत मिक्स करू शकतो
🎋माझ्याकडे खाऊच्या म्हणजे विड्याच्या पानाचा वेल आहे.. त्याची भजी अप्रतिम होतात
🎋 कलकत्याला एकदा मुगभजी खाल्लेली मला अजून आठवतात.
रस्त्यावरचा एक विक्रेता
मुगाच्या पिठाचे बोराएव्हढे गोळे ओल्या फडक्यावर थापून तळत होता
काही वेगळीच पण मस्त चव होती 😋
खुप गर्दी होती त्याच्याकडे.
🎋 भज्यासोबत कधी पुदिना चटणी असेल
तर कधी चिंचेची चटणी असेल तर कधी टॉमॅटो सॉस, खोबऱ्याची किंवा दाण्याची चटणी..
पण भज्यांची खरी दोस्ती जमते ती लसणाच्या चटणीसोबत 😋
एक तर बेसनावर आणि तळणीवर उतारा म्हणून लसूण उपयुक्त तर आहेच
पण त्याशिवाय भज्यांची चव सावरून आणि सुधारून देण्यासाठी लसूण चटणीला पर्यायाच नाही
🎋छान ओलसर गारवा आहे.
बैठकीच्या खोलीत एका बाजूला मंद स्वरात जुनी अतिशय आवडती अशी . मदमस्त गाणी
आशा ,रफी ,किशोर सुरेल आवाजात गात आहेत..❤️
गप्पांची मैफिल जमली आहे.
समोर गरमा गरम भजी येत आहेत, आणि त्यासोबत कोरडी लसूण चटणीही!
नंतर मसाला चहा!😋
और क्या चाहिये! हेच तर सुख म्हणायचे ..❤️
🎋आमची आजी साधी भजी सुध्दा खूप छान करायची.
तिची पद्धत बघून
जरा मोठी झाल्यावर मीही तशी भजी करण्याचा प्रयत्न करीत असे
पण पीठ जास्त झाले म्हणून पाणी घाल ..😀पाणी जास्त झाले म्हणून पीठ घाल😀 अशा प्रयत्नात तशी भजी करायचे प्रयोग मात्र फसायचे
शिवाय आईच्या अपरोक्ष हे प्रकार केले असल्याने..आई बाहेरून यायच्या आत आवरा आवर करावी लागायची .
आम्हा भावंडांचे स्वयपाक घरातले प्रयोग होते ते ..😃😃
पण तरीही आईला समजायचेच .. आणि आईचा लटका राग झेलायला लागायचा
शेवटी राहिलेल्या पिठाचेआईला पिठले करायला लागायचे.😀
🎋कांद्याचे बारीक चौकोनी तुकडे करून आमची आई खुप मस्त भजी करीत असे
तेव्हा ती त्यात काय घालत असे वगैरे काही आम्हाला समजत नसे
पण घरी येणाऱ्या प्रत्येकाची फर्माईश असे ..
“आईच्या हातची भजी हवी ...अशी ..😋
🎋साध्या नुसत्या गव्हाच्या पिठाची पण ती तिखट मीठ ओवा घालून भजी मस्त करत असे .
🎋 आणखी एक भजी प्रकार माझी मावशी करीत असे कदाचित तिखट नसल्याने त्याला भजी नाही म्हणता येणार
ती रव्यामध्ये दही दुध गुळ आणि सोडा घालून भजी करे .
त्याला ती बोंडे म्हणत असे
हि लुसलुशीत खमंग गोड बोंडे मस्त असत ही बोंडे तळताना त्याचा घरभर खमंग वास सुटत असे
जो येणाऱ्या जाणाऱ्याला बेचैन करून सोडत असे 😀
🎋पंजाब-हिमाचल मधलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे "पनीर पकोडा"...!
पनीरच्या इंचभर रुंच पट्ट्या कापून त्यांचे अर्धा सेंमी जाड तुकडे करायचे...
अशा दोन तुकड्यांमधे
हिरवी मिरची, मीठ, जिरेपूड, किंचित पुदीना, थोडंसं आमचूर यांची पेस्ट लावून
ते आपसात चिकटवायचे..... आणि बेसनात भिजवून कुरकुरीत पकोडे तळायचे.....
कुरकुरीतपणासाठी बेसनात थोडं मैद्याचं पीठ घालायचं
आत लुसलुशीत पनीर आणि वरून बेसनाचं कुरकुरीत आवरण...
अप्रतिम चव लागते 😋
🎋राजस्थानला मोठ्या जाड मिरच्या मध्ये फोडून आत लालभडक तिखट घातलेले बटाट्याचे सारण भरून भरपुर तिखट घातलेल्या अशा बेसन पिठात केलेली भजी
अप्रतिम असतात
अगदी रस्त्यावर सुध्दा अशी भजी मिळतात .
खाताना ..हाय... हाय ....होते
नाका तोंडातून पाण्याच्या धारा लागतात
कानातून वाफा निघतात ..अक्षरश ब्रम्हांड आठवते
पण तीही एक अनुभव घ्यायची गोष्ट आहे ....!!❤️
🎋कांदा भजीची खास कोल्हापुरी पद्धत म्हणजे
भरपूर कांदा ,बारीक चिरलेली कोथिंबीर व मिरची पावडर नाममात्र हळद , मीठ,भरडधने व डाळीचे पिठ
यात कोणताही मसाला न वापरता
सोडा सुध्दा न टाकता.m
थोडासा पाण्याचा हबका मारून भजी पिठ तयार करतात.
सोबत गवती चहाची पाने घातेलेला चहा ..
जबरदस्त. कॉम्बो असते हे...,😋
🎋 कोल्हापूरला पन्हाळ्याला “खेकडा भजी” मिळतात
नवल वाटल न नाव ऐकून .
यासाठी मोठा कांदा घेतला जातो
कांदा सोलुन दोन तुकडे करतात व वरचा पांढरा घट्ट भाग काढून टाकतात.
व उभा बारीक पण उभाच चिरतात
.त्यात बिना मसाल्याचे तिखट मीठ व भरड डाळीचे पिठ (विकतचे बेसन नाही.)
त्या कांदा वर टाकतात
हाताने कालवून झाकूनठेवतात
पाच दहा मिनिटांत त्याला पाणी सुटते .
हातात घेऊन हलक्या हाताने तेलात भजी सोडतात
लांब लांब कांदा चिरल्याने आकार थोडासा खेकड्या सारखा वाटतो.
ही भजी अतीशय कुरकुरीत व चवदार होतात 😋
🎋भज्याचे जाडसर तिखट पीठ पावाच्या स्लाईस वर थापून तळुन केलेली भजी म्हणजे "ब्रेड पकोडे"
कोल्हापुरात प्रत्येक चहाच्या गाडी वर अशी भजी मिळतात .
त्यांचा घाणा काढला की लगेच
अगदी “फडशा “पडतो या भज्यांचा ..😋
🎋कोकणात एकदा तर मी चक्क हापूस आंब्याच्या फोडी ची भजी खाल्ली होती .
वरून मिरची वाटण लावलेले पीठ ..
आणि आत गोड स्वादिष्ट आंब्याच्या फोडी ,..
अहाहा ..हा प्रकार पुन्हा नाही खाल्ला .
🎋 ब्रेडची मध्ये बटाटा भाजीचे सारणभरुन सँडविच भजी पण केली जातात .
लहान मुलाना ब्रेड खुप आवडतो ..
दोन ब्रेडच्या लुसलुशीत तुकड्या मध्ये बटाटा सारण लावून
डाळीच्या आणि मैद्याच्या पिठात तळली की बच्चे कंपनी एकदम खुश ..!!!
🎋 मला आठवत कॉलेज मध्ये असताना माझ्या एका मैत्रिणीची आई भज्याची आमटी करीत असे
दुपारी कॉलेज सुटले की आम्ही आवर्जून पावसाळी दिवसात तिच्या घरी जेवायला जात असू .
त्या दुपारच्या जेवणाच्या तिच्या वेळी आईने खमंग आमटी फोडणीला टाकलेली असे .
आणि कांदा बारीक चिरून त्याची केलेली भजी ती शेवटी त्या आमटी मध्ये सोडून
पातेले खाली उतरवत असे .
मग ती भज्याची आमटी आणि ताजी गरम ज्वारीची भाकरी खात खात आमचे डोळे पेंगायला लागत
मग दुपारची झोप तिच्या कडे काढून मगच आम्ही घरी परतत असु,,
अशी ही खमंग भज्यांची “खमंग “कहाणी !!