सगळं ऐकल्यावर साधिकाच्या डोक्यात वेगात विचारचक्र फिरायला लागतात. अर्जुनला कसं सोडवायचं याचा विचार करता करता तिचा डोळा लागतो. रेणुका आणि साधिका झोपल्याची खात्री होताच आजोबा आणि दिगंबर एका खोलीत जातात आणि त्या खोलीत असलेल्या दत्तांच्या तसबिरीपुढे डोळे मिटून बसतात.
—-----------------------------------------------------
सकाळी उठल्यावर काहीतरी विपरीत घडेल या जाणिवेने अभिमन्यूला अस्वस्थ वाटू लागते. तो आज येणार नसल्याचे त्याच्या महाविद्यालयात कळवतो आणि एकदा श्रेयाला फोन करतो. मात्र तिने फोन न उचलल्याने तो साधिकाला भेटायचे ठरवतो आणि आवरायला घेतो.
आरती : काय हो, अभि अजून कसा खाली आला नाही…अजून झोपूनच आहे की काय?
अजित : तू नाश्ता वाढायला घे…मी त्याला बघून येतो…
तेवढ्यात अभिमन्यू खाली येतो आणि देवघरात जातो. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून आरती आणि अजितही अस्वस्थ होतात.
आरती : काय हो काय झालं असेल? त्याचा चेहरा इतका का उतरला आहे?
अजित : आरू, त्याच्याशी बोलू आपण..जा तू नाश्ता आण…
आरती : हो आणते…
आरती आत गेल्यावर अभिमन्यू नाश्त्याच्या टेबलावर बसतो. त्याने शून्यात लावलेली नजर पाहून अजितच्या काळजात चर्र होतं…
अजित : अभि, बाळा काय झालं आहे…तू असा अस्वस्थ का वाटतो आहेस?
अभिमन्यू : ते बाबा, कसं सांगू तुम्हाला काही कळत नाहीये..
आरती : बाळ, हा नाश्ता कर… आधी…मग शांतपणे बोलू…
अभिमन्यू : आई, तुला मी श्रेयाबद्दल बोललो होतो ते आठवतंय का ग?
आरती : हो…आणि काल साधिका पण काहीतरी बोलली ना…मला नीट काही समजलं नाही रे….पण तू सांग ना काय झालंय ते…
अभिमन्यू : अग आई, त्या विनिताने तिलाही त्रास दिला आहे…तिच्यामुळे श्रेया संकटात अडकली होती…साधिकाने तिला त्यातून सोडवलं खरं पण अजूनही विनिता तिला त्रास द्यायचा विचार करते आहे… काल मी आणि आशय राऊंड मारत होतो तेव्हा ती विनिता अचानक समोर आली…कुठून आली ? कशी आली? हे कळलच नाही ग…मी जर तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही तर ती श्रेयाला त्रास देईल…हाल हाल करेल तिचे…अशी धमकी तिने मला दिली आहे…आई मला ती विनिता कधीच आवडली नाही ग…ती मुलगी चांगली नाहीच…
आरती : आणि श्रेयाबाबत तुझं काय मत आहे?
अभिमन्यू : आई, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिला आई-वडील नाहीत ग…ती तिच्या आजीसोबत राहते…म्हणून मला तिची काळजी वाटते आणि ती अभ्यासात पण हुशार आहे…
अजित : अभि, आईच्या बोलण्याचा रोख तुला समजला नाही बहुतेक…आईला हे विचारायचं आहे की तुला ती आवडते का ?
अभिमन्यू : मला काही कळत नाही…आशय बोलतो की मी तिच्या प्रेमात पडलो आहे…
आरती : मलाही असंच वाटतं आहे…
अभिमन्यू : आई, अग ती माझी विद्यार्थिनी आहे…मी कसं काय तिच्यावर प्रेम करू शकतो…
अजित : बाळ, प्रेम असं सांगून आणि ठरवून करता येत नाही…जे आहे ते त्याचा स्वीकार कर…
अभिमन्यू : पण बाबा,
आरती : अभि, बाबा बरोबर बोलत आहेत….राजा…
अभिमन्यू : आई, श्रेया फोन पण उचलत नाहीये ग…काय करू तेच कळत नाही…
आरती : तुला घर माहिती आहे का तिचं.. आपण तिच्या घरी जाऊ…
अभिमन्यू : आई मला जाता येणार नाही ग…
आरती : का ?
अभिमन्यू : आई-बाबा, मला असं वाटतंय की विनिता माझ्यावर लक्ष ठेवून आहे…कदाचित आपण जे बोलतोय ते तिला कळत असेल…
आरती : आपल्या घरातल्या कोणत्याही गोष्टी घराच्या उंबरठ्याबाहेर जाणार नाही…अभि….
अभिमन्यू : का ते?
आरती : काल साधिका काहीतरी करून गेली ना…
अभिमन्यू : हो…मी विसरलो होतोच…एक काम करतो मी तिला भेटायला घरीच बोलवतो आणि तिलाच यातून बाहेर पडायचा मार्ग विचारतो…
अजित : हो कर… मलाही तिला भेटायचं आहे… आणि आईला श्रेयाचा पत्ता आणि फोन नंबर दे… ती जाऊन येईल तिच्याकडे ….
अभिमन्यू : खरंच आई तू जाशील का तिच्या घरी…
आरती : हो…जाईन ना…राजा…चला सगळ्यांनी पटापट खाऊन घ्या…म्हणजे मी आवरून श्रेयाकडे जाईन…
आई श्रेयाला भेटायला जाते आहे यानेच अभिमन्यू सुखावतो आणि मनोमन स्वामींचे आभार मानतो.
स्वयंपाक आणि इतर काम आवरून झाल्यावर आरती एका डब्यात लाडू वीसएक लाडू भरते. तेव्हाच स्वयंपाकघरात अजित येतो.
आरती : तुम्ही आहात होय….मला वाटलं अभि आला की काय?
अजित : तो झोपला आहे…त्याला मानसिक ताण आला आहे बहुतेक… तू साधिकालाही बोलावून घे…
आरती : हो…तिला श्रेयाकडे जायच्या आधी फोन करते…
अजित : तू नीट सावकाश जा…आजूबाजूला नजर ठेव आणि मुख्य म्हणजे सावध रहा…
आरती : हो पण तुम्ही अभिची काळजी घ्या…आणि गरज पडलीच तर मी तुम्हाला सांगितलं आहे ते करा…
अजितला अनेक सूचना देऊन आरती श्रेयाकडे जायला निघते.
—------------------------------------------------------
आंजनेयला भेटून घरी आलेली रेणुका देवघरात पूजा करते आणि सत्येशला सावध करायचं असेल तर त्याच्याशी स्पष्ट बोलणे गरजेचं आहे असं ती ठरवते.
रेणुका : वैशाली…
वैशाली : हा आई,
रेणुका : सत्तू कामावर कधी गेला? मी कुठे आहे वैगरे काही विचारलं का?
वैशाली : तो आहे त्याच्या खोलीत…लॅपटॉपवर काम करतोय…आई अगं मी त्याला खाली येऊच दिलं नाही…सगळं वर नेऊन दिलं मुद्दाम…आणि आज मीच त्याला बोलले की काही दिवस घरातूनच काम कर म्हणून…
रेणुका : बर…जेवण तयार झालं आहे ना?
वैशाली : हो…घेऊ का वाढायला…
रेणुका : मी वाढायला घेते…तू त्याला बोलावून आण…
वैशाली : बर… ठीके…
थोडावेळाने जेवण वैगरे उरकून रेणुका सत्येशला तिच्या खोलीत येण्यास सांगते.
सत्येश : आजी तू बोलावलंस?
रेणुका : हो… ये इथे बस…
सत्येश : हो…
रेणुका : हा जो रुद्राक्ष मी तुझ्या गळ्यात घालते आहे ना तो… तुझ्या आजोबांचा आहे…
सत्येश : आजी, तू माझ्या जेवणात काही मिसळलं होतंस का?
रेणुका : हो…आता ते काय होतं हे विचारू नकोस…आधी मी काय सांगते ऐक… तूझ्या वडिलांना माझ्या मुलाला तुझी बळी द्यायची आहे…कुठल्यातरी शक्तीचा हव्यास आहे त्याला….आणि त्यासाठी अनेक वर्ष तो प्रयत्न करतो आहे…आणि तुझी साधक बनायची तयारी आहे ना?
सत्येश : हो… अगदी मनापासून…
रेणुका : मग त्याच्या तयारीला लाग…उद्यापासून लवकर उठ…काही गोष्टी तुला मी शिकवेन…मग पुढचं पुढे ठरवू…
सत्येश : आजी बाबांना माझी बळी का द्यायची आहे ?
रेणुका : त्याला हव्यास आहे काही गोष्टींचा म्हणून…त्याला वाटतं की सैतान हा देवापेक्षाही मोठा आहे…तुला मी सगळं समजावून सांगेन…जा आता ऑफिसचं काम आवरून घे…
तो खोलीतून गेल्यावर उरलेल्या दोन मुलांचाही शोध घ्यायला हवाय…तेवढीच आंजनेयला मदत होईल असा विचार ती करते.
—-----------------------------------------------------
श्रेयाच्या घरी आलेल्या आरतीला पाहून आजी विचारात पडते. ही बाई कोण आहे? हिच्या चेहऱ्यावर पण तेच तेज आहे जे साधिकाच्या चेहऱ्यावर होतं. आजी लागलीच तिला घरात यायला सांगते.
आजी : माफ करा…पण मी तुम्हाला ओळखलं नाही…
आरती : अहो, काकी तुम्ही मला कसं ओळखणार? आज आपण पहिल्यांदाच भेटतो आहे ना… मग?
आजी : हो…मला वाटलं तुम्ही माझ्या सुनेच्या ओळखीतल्या आहात की काय? म्हणून विचारलं हो…बसा तुम्ही मी पाणी आणते…
आरती : अहो काकी, राहू द्या पाणी…मला श्रेयाला भेटायचं आहे…मी तिच्या सरांची म्हणजेच अभिमन्यूची आई आहे…कुठे आहे ती…
आजी : अच्छा…ती ना खोलीत आहे तिच्या…आपणच वर जाऊया का ?
आरती : चालेल ना? आपण वर जाऊनच बोलू…
आजीशी बोलता बोलता आरती हळूच हातात रुद्राक्षाची माळ काढते. श्रेयाच्या खोलीत जाताच तिला प्रसन्न वाटते. पण बेडवर शून्यात नजर लावून बसलेल्या श्रेयाला पाहून तिच्या काळजाचं पाणी पाणी होतं आणि लागलीच ती तिच्याकडे जाते.
आरती : बाळ, काय झालं? अशी का अवस्था करून घेतली आहेस?
श्रेया : कोण तुम्ही ? आजी…कोण आहेत या?
आरती : बाळ घाबरु नकोस, मी अभिमन्यूची आई आहे…त्याला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी आले तुला भेटायला….आम्हाला तुझ्यासोबत काय झालं ते समजलं आहे…
आरती अभिमन्यूची आई आहे हे कळताच श्रेया तिला बिलगून रडू लागते. आरतीही तिला मनमोकळेपणाने रडू देते. आरतीचा पाठीवर मायेने हात फिरताच श्रेया शांत होते.
आरती : बाळा, आधी तू हा लाडू खा…काकी तुम्ही ते दार लावून घेता का? मला बोलायचय…तुमच्याशी…आजी तुमचे इथे कोणी नातेवाईक आहेत का? जिथे तुम्ही राहू शकता ?
आजी : हो आहेत ना… आणि मी हिला घेऊन गावीच जायचं ठरवलं आहे…
आरती : मग मी काय सांगते ते ऐका… श्रेयाला मी माझ्याकडे घेऊन जाते… माझं घर सोडल्यास ती कुठेच सुरक्षित नाहीयेय…पण हे तिच्या वर्गमैत्रिणींना कळता कामा नये…
आजी : अहो पण तुम्ही का घेऊन जाताय? माझ्या मुलाची एकुलती एक निशाणी आहे ती…मी कशी राहू तिच्याशिवाय ?
आरती : काकी थोडेच दिवस…तिच्यावरच हे संकट टळलं ना की सगळं नीट होईल…माझ्यावर विश्वास नसेल तर साधिकाला फोन लावा. तिने आणि मी मिळूनच हे ठरवलं आहे…
आजी : असं म्हणतेस…ठीके मग मी तयार आहे…मी तिचं सामान देते भरून…
आरती : काकी, तिला फक्त मोजके दोनच जोड द्या कपड्यांचे…मी तिला सगळं घेईन…आणि या घराला मागचं दार आहे का?
आजी : हो आहे ना…
आरती : ठीके…बाळ तू तयारी करायला घे बघू…आणि काकी मी काय सांगते ते ऐका…
आरती सगळी योजना आजीला समजावून सांगते. त्यानुसार आजी तयारीला लागते.
—------------------------------------------------------
- प्रणाली प्रदीप