*जातीतच विवाह केलेला बरा?* *सध्या आंतरजातीय विवाह लोकं राजरोषपणे करु लागले आहेत. त्याचं कारण आहे जातविवाहात येणारा अती खर्च, हुंडापद्धती व पाश्चात्यीकरण. ज्यातून जातविवाहातील प्रथा, परंपरा व त्यातून निर्माण होणारे संस्कार याला तिलांजली देण्याचे प्रयत्न होत आहेत. जातविवाह न होणे म्हणजेच समाजात कुसंस्काराचे वृद्धीकरण होणे होय. असे सर्वसामान्य लोकांना वाटत आहे. ते आपल्या भावनेने असल्या प्रकारांना रोखू पाहात आहेत. परंतु ते शक्य नाही. प्रेमविवाह लोकांना मान्य नाही. त्याचं कारण आहे ते मूल आणि त्याचा परीवार. ते मूल कसं आहे. त्याचा परीवार कसा आहे. हे माहित नसतं. शिवाय तो परीवार कसा निघेल वा ते मूल कसं निघेल. याचाही थांगपत्ता नसतोच. परंतु जातविवाहात परीवारातील मूल कसं निघेल याची माहिती हमखास असतेच आणि तो वात्रटही निघाला तर त्याचेवर सामाजिक दबाब आणून त्याला सुधरविण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे जातविवाहाला जास्त पसंती निर्माण झाली आहे. हे जरी खरं असलं तरी आजही बऱ्याच ठिकाणी जातीचेही व नात्यातीलही विवाह टिकत नाहीत. त्यांच्यावरही घटस्फोटाची पाळी येते. शिवाय जातविवाहाला येणारा खर्च, हुंडापद्धती, बडेजावपणा, गर्विष्ठपणाही जातविवाहात जास्तच असतो. या सर्व कारणामुळे आज आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हे जात पाळणाऱ्या लोकांसाठी चिंताजनक आहे. कदाचीत यातून असं दिसून येत आहे की पुढं ज्या स्वार्थासाठी जात निर्माण झाली. ती जातच मुळात नष्ट होवून जाईल काय? परंतु असं वाटत जरी असलं तरी सध्या घाबरण्याची गरज नाही. जातीचेही विवाह होत आहेत. ज्यात परंपरा जोपासल्या जातात. ज्यातून संस्कार टिकवले जातात. जात जर नष्ट झाली तर हेच संस्कार लयास जातील असे जात बाळगणाऱ्या लोकांना वाटते आणि ते खरंही आहे. कारण आंतरजातीय विवाह करतांना जात विवाहात ज्या परंपरा व प्रथा पाळल्या जातात. त्या प्रथा आंतरजातीय विवाहात पाळल्या जात नाहीत. कालांतरानं जातीचे विवाह नष्ट झाले व आंतरजातीय विवाह होत गेले तर जात विवाहात पाळल्या जाणाऱ्या प्रथा, परंपरा आपल्याला दिसणार नाहीत. ज्यातून त्या प्रथा, परंपरा साहजीकच नष्ट होतील व संस्कारही आपोआपच तुटतील यात शंका नाही. महत्वपूर्ण बाब ही की जात नष्ट होवू नये. जातीवर आधारीत विवाहही नष्ट होवू नये. प्रथा, परंपराही तुटू नये. कारण तेच विवाह संस्कार टिकविण्याला पर्याय आहेत. ते जर विवाह नष्ट झाले तर साहजीकच परंपरा, प्रथा तुटल्यानं व संस्कार नेस्तनाबूत झाल्यानं विवाहाला कराराचे स्वरुप प्राप्त होईल. ज्यातून माणूसकी राहणार नाही. ती लयास जाईल. बलात्काराचे प्रमाण वाढतील आणि पुन्हा एकदा न्यायदेवता अंध होईल हे तेवढंच खरं.* विवाह..... विवाहाचे अनेक प्रकार जरी असले तरी सध्याच्या काळात विवाहाचे मुख्यतः तीन प्रकार अस्तित्वात असलेले दिसतात. पहिला प्रकार जात विवाह, दुसरा प्रकार आंतरजातीय विवाह व तिसरा प्रकार आंतरधर्मीय विवाह. याशिवाय आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय, आंतरभाषीय, गांधर्व इत्यादी अनेक प्रकार आहेत. वरीलपैकी लोकं जास्तीत जास्त जात विवाह करतात. कारण असा विवाह केल्यानंतर या विवाहात विवाह करणाऱ्या लोकांना आयुष्यभर सन्मान मिळत असतो. म्हणूनच अशा विवाहाला खर्च जरी जास्त येत असला तरी लोकं असा विवाह करीत असतात. या विवाहात प्रेमविवाहाला थारा नाही. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आजही जातीचेच विवाह होतात व जी मंडळी असा जातविवाह करीत नाहीत, त्यांना समाज दुषणे देतो. त्यांना वाळीतही टाकत असतो. अलिकडील काळात महागाई वाढली आहे व आजच्या काळात जातीचे विवाह परवडत नाहीत. कारण आजच्या काळात जातीत विवाह केल्यास साऱ्याच जुनाट असलेल्या प्रथा, परंपरा पाळाव्याच लागतात. जसे हळद लावणे, देवीला कोंबडा, बकरा बळी देणे, अईग म्हणून मातीचे भांडे घेणे, परडे घेणे, टोपल्या घेणे, बँड ठरवणे, गजरे घेणे, साड्या घेणे, आपल्यालाच नाही तर नवरदेवासह सर्व नातेवाईकांना कपडे घेणे, त्यातच जेवन व सभागृह करणे या साऱ्या गोष्टी. पंडीत करणे, त्याचेजवळ गुण जुळवणे, लग्नपत्रिका बनवणे व प्रत्यक्षात विवाहावेळी पंडीत ठेवणे. तोच पंडीत कथेतही असतोच. हा पंडीत विवाहाच्या सर्व विधीचा खर्च हा वीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत घेतो. यात येणारा अवाढव्य खर्च, त्यातच रितीरिवाजानुसार हुंडा पद्धती. हुंडा पद्धती कायद्यानं बंद असली तरी काही समाजात अजुनही सुरुच आहे. वधूपक्षांकडून हुंडा मागण्याची पद्धत आहे. खर्च इथंच संपत नाही तर विवाहानंतर गोड जेवन, खारे जेवन, रस प्रक्रिया, शिवाय पहिली आषाढी, पहिली दिवाळी या साऱ्याच गोष्टी सुरु असतात. अन् यावरही खर्च थांबत नाही तर कुंटूबात जे काही विवाह सोहळे होतात. त्या सर्व विवाह सोहळ्यात उपस्थित राहावं लागतं. त्यांना आंदन व अहेर घ्यावाच लागतो. याव्यतिरिक्त विवाह झाल्यानंतर एकमेकांचे पाहुणे लागू होतात. ते सतत येत असतात. त्यांना पाहुणचार करावाच लागतो. म्हणजेच एकंदरीत सांगायचं झाल्यास कमाई कमी आणि खर्च जास्त अशी प्रक्रिया जातमान्य विवाहात होवून जाते. कधी व केव्हा एखादा पाहुणा टपकेल व त्याला पाहुणचार करावा लागेल याचा नेम नसतो. असे जातीच्याच विवाहात पाहायला मिळत असते आणि असा विवाह तुटलाच तर दुपटीनं आणखी पैसे मोजून द्यावे लागतात. जेव्हा विवाह झाल्यानंतर पती पत्नींचं पटत नाही, अन् न्यायालयात जेव्हा खटला जातो. तेव्हा वकील पक्ष व जाण्यायेण्याचा खर्च फारच असतो. शिवाय एक दिवसाचं काम जात असतं आणि वेळही जात असतं. तेव्हा विचार येतो की कदाचीत आपण विवाह केला नसता तर अगदी बरं झालं असतं. परंतु सदासर्वकाळ कोणी कुमार राहू इच्छीत नाही. तो विवाह करतोच. अशीच विवाहाची इच्छा ठेवणारे व्यक्ती विवाह झाल्यानंतर जर तो विवाह तुटत असेल तर विचार करतात की आपण प्रेमविवाह केला असता तर बरे झाले असते. पुर्वीही विवाह करतांना मांगवाड्यात जावून मांगांकडून बँड ठरवले जात. कुंभारवाड्यात जावून कुंभाराकडून आवर्जून मातीचे भांडे विवाहात वापरले जात. भटजींकडून विवाह विधी काढला जायचा. चांभाराकडून चप्पल, जोडा बनवला जायचा. बुरडांकडून सुपं, परडे घेतली जात. भाट जेवनाचे आमंत्रण पोहोचवत असे. माली केसं कापून द्यायचा. वाढई पायाखालचे पाटं बनवून द्यायचा. माळ्याःकडून माळवा आणला जायचा. तेल तेली द्यायचा तर कुणबी अन्नधान्य पुरवायचा. तसेच शिंप्यांकडून कपडे शिवलेच जायचे. याचं कारण होतं, गावात प्रत्येकाला काम मिळणं व त्या कामातून त्या त्या जातींचा उदरनिर्वाह चालणं. हे जातविवाहातच घडत असे व आजही जातविवाहात हेच घडतांना दिसत आहे. जातमान्य विवाहाच्या उलट आंतरजातीय विवाह आहे. या विवाह प्रकारात जास्त खर्च येत नाही. फक्त चार साक्षीदार हवे असतात व एक विवाह लावून देणारा भटजी हवा असतो. दुसरा साक्षीदार देवाची एखादी मुर्ती व दोन प्रत्यक्ष जीवंत देहाचे मानव साक्षीदार म्हणून हवे असतात. अलिकडील विवाह सोहळ्यातही चारच साक्षीदार हवे असतात. जे न्यायालयातून होतात. त्यात पहिला साक्षीदार म्हणजे न्यायाधीश, ज्याला आपण आपल्या भाषेत भटजी म्हणतो. दुसरा साक्षीदार म्हणजे न्यायदेवतेचा फोटो अर्थात न्यायदेवता व दोन प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजेच जीवंत असलेले व्यक्ती. या पद्धतीत आणखी पुढे जावून एक, एक पावाचा पेढ्याचा डब्बा व दोन पुष्पहार हवे असतात. एकंदरीत सांगायचं झाल्यास असा आंतरजातीय विवाह करतांना पेढे व पुष्पहार पकडून जास्तीत जास्त पाचशे रुपये खर्च येतो. त्यापेक्षा जास्त नाही. शिवाय असा विवाह न्यायालयामार्फत झाल्यास दोघांना संसारोपयोगी अनुदानरुपात पैसेही मिळतात व काही संसारोपयोगी सामानही मिळत असते. आंतरधर्मीय विवाहातही आंतरजातीय विवाहासारखीच परिस्थिती असते. या विवाहातही दोन साक्षीदार, देवाची मुर्ती व भटजी आणि तोच विवाह न्यायालयामार्फत होत असेल तर दोन साक्षीदार, न्यायदेवतेचा फोटो व प्रत्यक्ष न्यायाधीश लागतो. हीच स्थिती आंतरभाषीय, आंतरराष्ट्रीय व आंतराज्यीय विवाहात आहे. मात्र गांधर्वविवाहातील स्थिती थोडी वेगळी आहे. या विवाहात दोन साक्षीदार असायलाच हवेत असे बंधन नाही. हा विवाह स्री आणि पुरुष यांच्या सहमतीनं होतो व यात साक्षीदार म्हणून फक्त प्रत्यक्ष देवाची मुर्तीच लागते. दुसरा कोणताच व्यक्ती या विवाहात साक्षीदार म्हणून लागत नाही. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात भटजी साक्षीदार म्हणून लागत असतो. पुर्वी गांधर्व विवाह भरपूर व्हायचे. परंतु अलिकडील काळातील बदललेल्या विपरीत परिस्थितीमुळं व एकमेकांवरील विश्वास कमी झाल्यामुळं गांधर्व विवाह कमीच झालेले आहेत, अर्थात बंद झालेले आहेत. त्याजागी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानं जागा घेतलेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय, आंतरभाषीय व आंतरराज्यीय विवाह होत असले तरी त्याचा समावेश आंतरजातीय, जात विवाह, आंतरधर्मीय विवाहात होतो. त्यामुळंच अशा विवाह प्रकारांना विशेष असा वेगळा दर्जा नाही. पुर्वी विवाह व्हायचे. जात विवाहच नाही तर आंतरजातीय विवाहही व्हायचे. दोन्ही विवाह लोकांना प्रियच असायचे व आवडायचेही. आंतरजातीय विवाहात मुलगी आपल्या स्वतःचा स्वयंवर ठेवायची. मग स्पर्धा लागायची. जो त्या स्पर्धेत जिंकेल, त्याच्या गळ्यात ती स्री वरमाला घालायची. मग तो कोणत्याही जातीतील का असेना. तोही विवाह लोकांना प्रिय असायचाच. त्यानंतर काळ बदलला. जातीला विशेष असं स्थान मिळालं व जात वर आली. त्यानंतर प्रथा, परंपरांना जास्त प्रमाणात स्थान मिळाले व जातीचेच विवाह पुढे आले. आंतरजातीय विवाह कालांतरानं मागे पडले. पैशाच्याही बाबतीत सांगायचं झाल्यास पुर्वी जो आंतरजातीय विवाह सोहळा साजरा केल्या जायचा. त्या विवाह सोहळ्यात जात विवाह सोहळ्यापेक्षा जास्त खर्च यायचा. कारण स्वयंवर जाहिर करणारी स्री स्पर्धाही जाहिर करायची. ज्यात देशोदेशीचे राजकुमार येत. त्यातच त्या सर्वांच्याच राहण्याची व खानपानाची व्यवस्था करावी लागायची. अशातच काही ठिकाणी प्रचंड युद्ध होत. त्यात शस्राचा वापर केल्या जायचा. तोही खर्च अमापच असायचा. कालांतरानं तो प्रकार मागे पडला. पुर्वी जात विवाह व आंतरजातीय स्वयंवर विवाह यात अती प्रमाणात खर्च येत असे. तशीच सर्वांची मर्जी प्राप्त करावी लागत असे. म्हणूनच गांधर्व विवाह पुर्वीच्या काळात प्रचलीत झाले. ज्याला जास्त खर्च येत नसे. परंतु असे विवाह हे करार पद्धतीने चालत. करार संपला की पतीपत्नी एकमेकांपासून विभक्त होत असत. आता वर्तमान काळात त्याच गांधर्व विवाहाची जागा आंतरजातीय विवाहाने घेतलेली आहे. आज जातविवाह होतात, प्रेमविवाह तेवढे होत नाहीत. कारण प्रेमविवाह हा समाजातील कोणत्याही वयोवृद्ध लोकांना अजीबात आवडत नाही. त्याचं कारण आहे, समाजानं त्या परिवाराला वाळीत टाकणं. समजा एखाद्या घरात प्रेमविवाह झाला असेल, तर आजुबाजूची मंडळी त्यांना नावबोटं ठेवतात. दुषणे देत असतात. वाळीतही टाकत असतात. त्यांच्याशी जास्त प्रमाणात व्यवहार करीत नाहीत. जरी त्यांचा स्वभाव चांगला असला तरी. एकमेकांशी चर्चा सुरु असेल तर त्यांचं नाव काढून अपशब्द सुरुच असतात. याचाच अर्थ असा की प्रेमविवाह लोकांना मान्य नाही. त्यातच प्रेमविवाहावर जातीचा पारंपारीक बडगा आहे. कारण आज लोकांना वाटते की अशा विवाहातून संस्कार तुटतात. माणूसकी गहाण पडते. अन् हे खरंही आहे. कारण प्रेमविवाह करणारी बरीचशी मंडळी संस्कार पाळतीलच असे नाही. ते प्रथा, परंपरा पाळतीलच असे नाही. अन् ते आपल्या बाळावर जात अंतर्गत असलेले व शिकवले जाणारे संस्कार करतीलच असे नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी आजही बऱ्याच ठिकाणी जात विवाह होतात. प्रथा, परंपरा पाळल्या जातात व संस्कारही टिकवले जातात. यात शंका नाही. जातविवाह व्हावेत असे लोकांना वाटते. जरी त्यात अवाढव्य खर्च लागत असला तरी. ते टिकावेत, यासाठीच लोकं जातविवाहात अवाढव्य पैसा खर्च करतात. कारण जातविवाहात आदर्श संस्काराचे प्रतिबिंब आहे असे लोकांना वाटते. मग त्यात हुंडाप्रकार असला, घटस्फोट व फारकत होत असली तरी प्रत्येक व्यक्ती जातविवाह टिकविण्याचा मार्ग अनुसरतो. कारण जात जर नसेल तर उद्या आपल्यातही माणुसकी नसेल व आपली गणती साहजीकच पशुंमध्ये होईल असे लोकांना वाटते. म्हणूनच ते जातविवाहात पैसा खर्च करतात. जातविवाहाचा खर्चही सहन करतात. परंतु जातविवाहच करतात. आंतरजातीय विवाह करीत नाही आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना दंडीत करतात, वाळीत टाकतात. विशेष सांगायचं झाल्यास जातविवाहात खर्च जरी असला तरी लोकांचे म्हणजे याबाबत रास्त वाटते. कारण आंतरजातीय विवाह केल्यास त्याची शिक्षा आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आयुष्यभर भोगावीच लागते. समाज त्यांना जवळ करीत नाही व त्याची अवस्था एखाद्या कळपातील भाकड गाईसारखी होते. जी भाकडगाय कोणाच्याच कामात येत नाही. शेवटी कसाई घेवून जातो व तिचा दोष नसतांना तिचा विनाकारण बळी घेतो. म्हणूनच आंतरजातीय विवाह कितीही चांगले असले तरी ते करु नयेत व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या शोषू नये. संस्कार जर टिकवायचे असतील तर जातविवाहच केलेला बरा. यात शंका नाही. कारण जातविवाहातून जे बळ व आत्मशांती मनाला लाभते, ते बळ व आत्मशांती आंतरजातीय विवाह करण्यातून लाभत नाही. आंतरधर्मीय विवाहातून तर नाहीच नाही. हे तेवढंच खरं. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०