कपाटात सापडलेला नवरा.
(एक साधीशी घटना, पण मनात घर करणारी गोष्ट.)
सकाळी ८ वाजले होते.
अर्जुनच्या ऑफिसची वेळ निघून जात होती. घाई, गडबड, मोबाईल चार्जिंगला लावायचा राहिला, टिफिन तो पण हातात हवा , आणि सगळ्यात महत्त्वाचं — आज मीटिंग आहे, त्यामुळे नीटस निळा शर्ट हवा होता.
त्याने कपाट उघडलं आणि शर्ट शोधू लागला.
शर्ट कुठे दिसेना.
तो कपाट खणखणून पाहतोय, एकेक हॅंगेर्स बाजूला सारतोय, आणि मग बायकोला आवाज देतो —
"कविता… माझा निळा शर्ट कुठं आहे?"
स्वयंपाकघरातून तांदूळ धुण्याचा आवाज ती थांबवते आणि एक शांत, पण धार असलेला आवाज येतो —स्वयंपाक खोलीच्या बाहेर..
"तुला तुझा शर्ट सापडत नाही, पण माझ्या चुका लगेच सापडतात!"
"मी जर रोज तुझ्यासारखं विसरत गेले, तर घर कुठे चालेल?"
त्या एका वाक्याने क्षणात सगळं स्तब्ध झालं.
पंख्याचा घरघराट, गॅसवरचा प्रेशर कुकरचा शिट्टीचा आवाज, आणि त्याचं मन — सगळं एका सेकंदासाठी थांबलं.
अर्जुन गप्प झाला.
काहीच बोलला नाही. कारण तिने नेमकं काय बोललं होतं, त्याला आता उमगायला लागलं होतं.
थोड्या वेळाने त्याचं लक्ष कपाटाकडे गेलं.
एका बाजूला, इस्त्री करून ठेवलेला निळा शर्ट अगदी नीट लटकवलेला होता.
शर्ट तिथेच होता. त्याने पाहिलंच नव्हतं.
मनातली सैर
शर्ट सापडला, पण आता अर्जुनच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली होती.
"ती म्हणाली ते खरंच आहे का?"
"मी खरंच तिच्या चुका लगेच पकडतो का?"
"तिने काल पोळ्या करायला उशीर केला होता, तर मी लगेच विचारलं – अजून जेवण तयार नाही?"
"पण मी कधी तिला विचारलं का, की ती सगळं कसं हाताळते? सकाळी उठून चहा, डबा, पोळ्या, मुलाच्या अभ्यास त्याचं सगळ कस व्यवस्थित करते , शाळेचं टिफिन, सासूबाईंच्या औषधाच्या गोळ्या… सगळं काही?"
कपाटापुढे उभा असलेला अर्जुन आता आरशात पाहत होता, पण तिथे त्याला स्वतःचा चेहरा नव्हे, तर आपल्या वागणुकीचा आरसा दिसत होता.
फ्लॅशबॅक
कविता फारशी बोलकी नव्हती, पण तिच्या डोळ्यांतून खूप काही बोलायचं.
लग्नाला ७ वर्षं झाली होती. सुरुवातीला अर्जुन तिचं खूप कौतुक करायचा. अगदी साजूक पोळी झाल्यावर "क्या बात है, शाळेत शिकवायला पाहिजे तुला!" असंही म्हणायचा.
पण जसजसं संसार स्थिर व्हायला लागला, तसतसं संवाद थोडा औपचारिक झाला.
"टॉवेल कुठं आहे?"
"गरम पाणी आलं का?"
"मीट जरा तिखट झालंय आज!"
"हे काम तुला जमलं पाहिजे होतं ना!"
या छोट्या छोट्या वाक्यांमधून, कविता हळूहळू गप्प व्हायला लागली.
ती चूक करत नव्हती, पण तिच्या प्रत्येक कृतीत ‘दोष’ शोधला जाऊ लागला होता.
आजचं भान
आज मात्र एका साध्या प्रश्नाने – "शर्ट कुठं आहे?" – कविताने त्या सगळ्या आठवणी त्याच्या चेहऱ्यावर फेकून दिल्या.
ती काहीच बोलली नाही, पण तिच्या त्या एका वाक्यात गारवा, उपहास, वेदना आणि शांतता – सगळं एकत्र होतं.
आता त्याला आठवलं –
काल संध्याकाळी कविता म्हणाली होती, “उद्या निळा शर्ट इस्त्री करून ठेवते, मीटिंग आहे ना तुझी.”
... आणि तरीही त्याने कपाटात ते नजरेखालून न पाहता चिडचिड केली.
एक लहानसा गुलाब
संध्याकाळी अर्जुन लवकर घरी आला.
घरच्या सोफ्यावर शांत बसलेली कविता त्याला दिसली. हातात घरातल काही तरी काम करत होती.
"कविता..." तो थोडासा संकोचून म्हणाला.
"मी शर्टासाठी चिडलो नव्हतो ग. मला खरंच दिसला नाही."
ती काहीच बोलली नाही. नजरच नाही उचलली.
तो तिच्या बाजूला बसला. थोडा वेळ शांत. मग हळूच एक लहान गुलाब तिच्या हातात दिला.
"आज मला शर्ट सापडला ग... पण त्याच्याबरोबर मी स्वतःलाही सापडलो."
"तुझं एक वाक्य – खूप मोठं शिकवून गेलं."
कविता हसली नाही, बोललीही नाही. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या हातातल्या कांद्याच्या तिखटपणामुळे नाही .भावनांनी भरलेल्या, आतल्या हळव्या क्षणांनी आलेले अश्रू होते.तिला अर्जुनचं बोलणं आतून स्पर्शून गेलं, पण ती बोलून काहीही व्यक्त करत नाही;
डोळ्यांतलं पाणीच तिचं उत्तर होतं.
कपाट तेच पण आता नवीन कपाट – नव्या नजरेनं..
त्या दिवसानंतर अर्जुनने एक सवय लावली –
एखादी गोष्ट हरवली की आधी स्वतः शोधायचं.
आणि मग जर चुकून तिची चूक दिसली, तर स्वतःची आधी दुरुस्ती करायची.
कारण बायकोचा दोष सांगणं सोपं असतं, पण तिच्या परिश्रमांचं कौतुक करणं – हेच खरं नातं वाढवणारं असतं."दोष शोधणं तर सोपं आहे, पण बायकोच्या अनदेख्या कष्टांना ओळखणं आणि तिच्या मेहनतीला मनापासून मान देणं हेच खरं नातं जपणारं असतं. प्रत्येक लहान मोठा प्रयत्न, तिचं प्रेम आणि समर्पण हे नात्याचं गाभा असतं, ज्यामुळे नातं फुलतं आणि एकमेकांच्या जवळीक वाढते."
कपाटात निळा शर्ट सापडतोच... पण बायकोच्या एका वाक्याने जर नवरा स्वतःला शोधू लागला, तर तो संसार असतो, संवाद असतो – आणि प्रेमाचं खरंखुरं वस्त्र असतं.
"कपाटात शर्ट शोधणं सोपं असतं,
पण एकमेकांचं मन शोधणं – तेच खरं घर बनवतं!"
सौ तृप्ती देव