Old is gold in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | जुनं ते सोनं

Featured Books
Categories
Share

जुनं ते सोनं

जुनं ते सोनं?      

   *जुनं ते सोनं. असं आपण नेहमी म्हणतो. परंतु जुनं ते सोनं, ही संकल्पना व्यवहारात वापरत नाही. त्यामुळं ती संकल्पना काही दिवसानं कालबाह्य होते. उदा. कंचे खेळणं. काल कंचे खेळत असतांना दिवस दिवसभर कंचे खेळणारी पिढी घराच्या बाहेर असायची. त्यांची तहानभूक हरवून जायची. तेच इतरही खेळाबाबत घडायचं. ज्यातून फायदाच व्हायचा. नुकसान व्हायचं नाही. परंतु आज तसं नाही. कारण आज मोबाइल काळ आलाय. आजही तहानभूक हरवते. परंतु ती तहानभूक मोबाइलवर खेळ खेळतांना हरवते. जे खेळ आपले सर्वतोपरी नुकसानच करीत असतात.*           आधुनिक काळ आला व पुरातन काळातील सर्वच गोष्टी कालबाह्य ठरायला लागल्या. ज्यात खेळाचाही समावेश आहे. खेळात पुर्वीचा भातुकलीचा खेळ आता कालबाह्य झालाय. त्यातच चक्करबिल्ला, कंचे, विटीदांडू आता दिसत नाहीत. शिवाय पावसाळ्याच्या सुरुवातीला होणारा बाहुलाबाहूलीच्या विवाहाचा खेळ व पावसाळ्यातच सुरु होणारा सब्बल खुपसणी खेळ म्हणजे काय? हे आता कळायला मार्गच नाही. तसेच उन्हाळ्यात सुरु होणारा डाफ नावाचा खेळ हा तर समजायला जागाच नाही. असे जुने पारंपारिक खेळ आज कालबाह्य झालेले असून त्यातील काही खेळ इतिहास जमाही झालेले आहेत. त्यातच कबड्डी, लंगडी, खोखो नावाचे देशी खेळही कालबाह्य होतील की काय? अशी शंका येते. तसेच आज त्याच खेळाची जागा क्रिकेटनं जरी घेतली असली तरी क्रिकेट हा खेळही शेवटपर्यंत टिकेल की काय? ही देखील शंका आहे. कारण काल गल्लीबोळात क्रिकेट खेळणारी अगदी लहान लहान मुलं देखील आज गल्लीबोळात क्रिकेट खेळतांना दिसत नाहीत. ते घरातच मोबाईलवर ऑनलाइन खेळ खेळत असतात.           बदल...... बदल हा केवळ खेळातच झाला असे नाही. जुन्या काळात जात्यावर गाणी म्हणणारी बहिणाबाई आज दिसत नाही. कारण आज जातच नाही. तसेच काल लग्नसराईची हळद वा मिरची मसाले कांडणारे मुसळ, खलबत्ते आज दिसत नाहीत. त्यातच रोजची चटणी वाटून भाजीला खमंग चव आणणारा पाटा वरवंटा आज कालबाह्य झालाय. त्या जागेवर आज रेडीमेड मसाले आले, जे चक्की सारख्या कुत्रीम यंत्रावर दळले जातात. काल जात्यावर भरड दळणारे धान्य आज दिसत नाही. त्या जागेवर अगदी बारीक दळणारी व जीवनसत्व नष्ट करणारी यंत्र आलीत. शिवाय या यंत्रासोबतच काल जाते, पाटे व मुसळाद्वारे होणारा स्रीजातीचा व्यायाम आज होत नाही आणि तसा व्यायाम होत नसल्यानं आज महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. तेच घडत आहे लहान मुलांतही. कालची लहान मुलं जे खेळ खेळायची, ते खेळ आज खेळले जात नसल्यानं व केवळ मोबाईलवर एकाच जागेवर बसून व्हिडिओ खेळ खेळले जात असल्यानं कालच्यासारखा आजच्या मुलांचाही व्यायाम होत नाही. मग आजार बळावेल नाहीतर काय? आजची मुलं ही वेळोवेळी आजारी पडतात व त्यांना वेळोवेळी रुग्णालयात दाखल करावं लागतं. राहिलं पुरुषांचं. पुरुषांचाही आजच्या काळात व्यायाम बंदच झालाय. कालच्या काळात अंगमेहनतीचं काम करुन कामावर शरीराचा व्यायाम करुन घेणारे पुरुष आजच्या काळात मशिनीद्वारे काम करतात. ज्यातून त्यांना थोडासाही त्रास होत नाही. व्यायामही जास्त होत नाही. ज्यातून असंख्य रोग पाचवीला पुजलेले असतात. आजच्या काळात खुर्चीला चिकटून केवळ संगणंकांवर काम करणारे लोकं भरपूर वाढलेले असून त्यांच्या बोटाला व मेंदूला जास्त त्रास शोषावा लागत नाही. ज्यातून मेंदूचे आजार, डोकेदुखी निर्माण होते. एवढंच नाही तर आजच्या काळात खाण्याच्या वस्तूतही बदल झालाय. काल चुलीवर बनवलं जाणारं अन्न आज मिळत नाही. काल चुलीवर बनवली जाणारी ज्वारी, बाजरीची भाकर व मिरचीची चटणी आज कोणीच खातांना दिसत नाही. त्याजागी पिज्जा, बर्गर आणि इतर वस्तू खाल्ल्या जातात. ज्यातून कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार बळावत चालले आहेत.          बदल...... आजच्या काळात बदल हा पोशाखातही झाला. कालचा धोतर बंगाली, सदरा गेला, ज्यातून शरीरात हवा खेळती राहायची. त्याजागी झगमगाट दाखवणारा जीन्स टी शर्ट आणि जीन्स पँट आला. जे शरीराला जखडल्यासारखं बांधून ठेवल्यागत परीधान करावं लागतं. ज्यातून हवादेखील शरीरात खेळती राहात नाही. तसाच पोशाखात डदल हा केवळ पुरुषांच्याच बाबतीत झाला नाही तर स्रियांच्याही बाबतीत झाला. स्रियांचे काठपदराचे लुगडे गेले. ती चोळी गेली. जी सुती कापडानं बनवलेली असायची. ज्यातून हवा शरीरात जायची. ती आता दिसत नसून त्याजागी आजच्या काळात घट्ट  टी शर्ट आणि पँटी आली आहे.           बदल....... बदल हा आजच्या काळात आजारातही झालेला आहे. जे मानवी शरीर आहे, त्या शरीराला सर्वात जास्त गरज असते ऑक्सिजनची. हे ऑक्सिजन शरीराला केवळ श्वासाद्वारेच मिळत नाही तर हे ऑक्सिजन मिळतं शरीरातील प्रत्येक अवयवांकडून. ते मिळत असतं त्वचेकडून. परंतु आजच्या लोकांचा जो वापरण्याचा पोशाख आहे. तो अतिशय घट्ट असल्यानं शुद्ध ऑक्सिजन शरीरातून त्वचेद्वारे मिळत नाही. तो फक्त नाकाद्वारेच मिळतो आणि नाकाद्वारेही मिळणारा ऑक्सिजन हा कमी प्रमाणात मिळत असतो. ज्यातून शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते व आजार होतात. असे ऑक्सीजन अभावी आजार होतात की जे बरे होत नाहीत. ज्याला असाध्य आजार म्हणतात.         आज मानवी शरीरातील आजाराची श्रृंखला वाढलेली आहे व या श्रृंखलेत जे आजार असतात. त्याला नाव देणेही शक्य होत नाही. एवढे आजार आज वाढलेले आहेत. कालचे पुरातन असलेले आजार आज कालबाह्य झालेले आहेत व त्याजागी नवनवीन आजार आलेले आहेत.          महत्वपुर्ण बाब ही की बदल हा अतिशय आवश्यक असतो आणि तो व्हायलाच हवा. परंतु याचा अर्थ असा नाही की या बदलानं मानवी शरीरचनाच बदलावी? ज्या बदलत्या शरीररचनेतून आजार बळावावेत. सुख नष्ट व्हावं व त्याजागी दुःख यावं.          बदल हा हवा. परंतु जुनं तेही सोनंच असतं हे कोणीही विसरु नये. कालची परिस्थिती, रहनसहन, बदलाव हा देखील महत्वपुर्ण असून आजची परिस्थिती त्याची सर करु शकत नाही. तेव्हा काल दिवसभर खेळले जाणारे कंचे, ज्यातून हुशारी वाढीस लागत असे. काल खेळला जाणारा विटीदांडू, ज्यातून लक्षभेदीपणा  (चित्त आणि अचूक टिपण्याची क्षमता) वाढीस लागत असे. त्यातून चांगले गुणही वाढीस लागत असत. ते गुण आजच्या मोबाईलवर ऑनलाइन रुपानं खेळल्या जाणाऱ्या खेळापेक्षा कितीतरी जास्त असायचे. जे गुण आज लोकांमध्ये दिसत नाहीत.           लोकांनी बदल करावा. तो आवश्यकच आहे. परंतु त्याचबरोबर जुनंही सोडून देवू नये. जुनं जर सोडून दिलं व नवीन धरलं तर जुन्या गोष्टी नक्कीच कालबाह्य होतील. ज्यातून सुख हरवेल व सुखाच्या मागे धावता धावताच दुःख येईल. त्यानंतर तेच दुःख कसं आलं हे कळणारही नाही वा कळायचा मार्गही गवसणार नाही. जेणेकरुन आवश्यकता भासल्यास आपण परत जावू शकू.            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०