Krutant - 4 in Marathi Fiction Stories by Balkrishna Rane books and stories PDF | कृतांत - भाग 4

Featured Books
Categories
Share

कृतांत - भाग 4

कृतांत   त्या रात्री राजकन्या गौरीला झोप येईना.सतत डोळ्यासमोर आयुषचा चेहरा...त्याच निर्भीड बोलणे...त्याच धाडस व राज्याप्रती असलेले प्रेम येत होते.त्याच बरोबर आजपर्यंत आपण मस्तीत वागलो.प्रजेला कस्पटासमान मानले याचीही तिला जाणीव झाली होती.पण  सध्या राज्य संकटात आहे.सारे शाक्त उठाव करून राज्य ताब्यात घेऊ शकतात आणि त्यांना साथ खुद्द महाराणी व आपल्या मामाची आहे हे एकूण तिला धक्का बसला होता. स्वतःच्या वडिलांना सावध करावे तर ते अघोऱ्यांच्या मायाजालात पुरते फसले होते. आपण नेमके काय करावे ते तिला समजत नव्हते.आयुष जे काही करु इच्छित होता त्यात त्याला साथ देणे गरजेचे वाटत होते.दुष्टांच्या हाती राज्य जाण्यापेक्षा ते योग्य माणसाकडे गेले तर प्रजेचे कल्याण होणार होते. ती या कुशी वरून त्या कुशीवर वळत होती. बाहेर शिपायांच्या पावलांचा आवाज येत होता.      एवढ्यात पश्चिमेकडच्या सज्ज्याचा पडदा उघडला.चमकून तिने तलवार हाती घेतली . कुणीतरी आत उडी घेतली. समईच्या मंद प्रकाशात एक तरुण उभा असलेला तिला दिसला.तो आयुष होता." तू ! यावेळी? हे धाडस कशासाठी?"आयुष हसला.त्याने कमरेला खोवलेला खंजीर काढला.तो रत्नजडीत व राजमुद्रा असलेला खंजीर त्याने तिच्या हाती दिला." आपण हा खंजीर विसरला होता. आणि धाडसच म्हणाल तर ते आमच्या कामाचा भागच आहे."दोघंही काही क्षण गप्प उभे राहिले." बाबा अग्निधर  कसलातरी विधी करणार होते त्याच काय?"तिने विचारले." होय, राजधानीच्या दक्षिणेला असलेल्या जंगलात हा विधी पार पडणार आहे.तो जर पूर्ण झाला तर राज्यात प्रचंड गोंधळ माजेल.अघोरी अधिक बलवान होतील. कोणत्याही परिस्थित त्यांना थांबवलच पाहिजे. आताच मी आमचे गुरू रघुवीर यांच्या आश्रमातून आलोय.ते महादेवाचं परम भक्त आहेत.त्यांनी काही ताईत दिलेत.तसेच एक तलवार दिलीय त्यावर काही मंत्र कोरलेले आहेत. ज्यामुळे अघोरींचे तंत्र व मंत्र निष्प्रभ होतील.काही झालं तरी आम्ही मैत्रेय  ; बाबा अग्निधराचा हेतू सफल होऊ देणार नाही. आमचा आमच्या मनगटावर पूर्ण भरवसा आहे ."" मी तुमच्या सोबत येऊ का?"" नको,आपण आधीच जखमी आहात.पण कदाचित त्याच रात्री  इथं अघोरी हल्ला करू शकतात.तसेच राजवाड्यातूनही उठाव होऊ शकतो.आपण अतिशय सावध रहा.गरज पडली तर महेश्वर टेकडीचा आसरा घ्या तिथे रघुवीर गुरुजी व मैत्रेय तयारीत आहेत .आम्ही आमचे काम आटोपून त्वरित  राजधानीत.येऊ." आयुष म्हणाला." स्वतःची काळजी घे. " गौरी मंदपणे बोलली.आयुष मंद हसला. ती हळूच पुढे आली व हलकेच त्याला बिलगली.त्यावेळी त्याला तिच्या दंडावरची पिंपळपाणाची खूण दिसली. तिच्या अश्या बिलगण्यामुळे तो अस्वस्थ झाला होता.त्याने मोठ्या कष्टाने तिचे हात हलकेच दूर केले.दोघांच्याही मनात प्रितिच्या कोमल भावना जाग्या झाल्या होता.तेवढ्यात बाहेर पहारेकऱ्यांच्या पावलांचा आवाज ऐकू आला.दोघंही क्षणभर स्तब्ध झाले.पावलांचा आवाज दूर गेला तसं तिनेविचारले..." तू इथून जाणार कसा?"आयुष हसला. " तुम्ही तुमच्या निष्ठावंत सरदारांना गुप्तपणे एकत्र करून येणार्या संकटाची माहिती द्या. मध्ये दोन दिवस आहेत तयारी करा.कोणत्याही परिस्थितीतीत हे बंड मोडून काढले पाहिजे."आयुष म्हणाला." हो, मी ते करते. पण सावधपणा बाळगावा लागेल.आमच्या मातोश्री स्वतः या बंडात सामील आहेत त्यामुळे कोण आपला व कोण फितूर हे कळणे अवघड आहे. पण माझी स्वतःची सैन्याची तुकडी आहे.ती फितूर होते शक्य नाही.मलाही माझं युध्द कौशल्य दाखवायला आवडेल."आयुष ने मान हलवली.सज्ज्यातून बाहेर डोकावत त्याने अंदाज घेतला व सज्जात उभं राहतं त्याने झेप घेतली ती सरळ खालच्या सज्ज्याच्या चोकटीवर .राजकन्या गौरी धडधडत्या अंतःकरणाने हे पाहत होती.आयुषने पुन्हा एक झेप घेतली ती सरळ खालच्या बगीच्यात व तो काळोखात मिसळून गेला.-----*------*----*------*-------*-------*-----*------*--------*------*---राज वाचताना थोडा थांबला." खूपच थरारक इतिहास आहे या नगरीचा." मौर्ये म्हणाले.तेवढ्यात बाहेर मोठी गडबड ऐकू आली. शर्मा व मौर्ये चटकन बाहेर गेले. गौरी उठली व राज जवळ आली." माझ्या दंडावर पिंपळपाणाची खूण आहे हे कधी व  कसे पाहिलेस ? स्रीयांकडे असं चोरून पाहताना लाज वाटत नाही? आणि हे जे तू वाचत आहेस ते रचून सांगतोस आहे ना?" तिने विचारले." बाईसाहेब, मला तुमच्याकडे चोरून बघायची काय गरज आहे.मी तर आल्यापासून माझ्या राहुटितच आहे.पण तुमच्या दंडावर पिंपळपान आहे हा अजब योगायोग आहे.नाही का?"गौरी विचारात पडली  तो माझ्या दंडावर ची खुणा बघणे शक्यच नाही.मग हा सांगतो ते खरोखरच चडलेले आहे का? ती विचार करू लागली." आणि मी जे वाचतोय ते इथे जे लिहिलंय तेच वाचतोय पाहिजे तर कुणी दुसरा माणूस शोधा मी चाललो."" गप्प बस.म्हणे मी चाललो.काम अर्धवट टाकून जाता येणार नाही. मी विचार करतेय की त्या राजकन्येच नाव गौरी आहे तिच्या दंडावर पिंपळपाणाची खूण आहे.माझही नाव गौरी आहे व माझ्याही दंडावर तशीच खूण आहे म्हणून मी विचारात पडले होते.हा मोठा योगायोग आहे पण यावर विश्वास कसा ठेवायचा? "" होय,हे खरंच आहे.पण नजिकच्या काळात काहितरी भयानक घडणार आहे. आपल्याला वेळ चालवून चालणार नाही."राज म्हणाला.तेवढ्यात शर्मा सर व मौर्ये सर आले.दोघेही घामाघूम झाले होते." काय झालं सर?" गौरीने विचारले." इथे काहितरी अजब घडतंय. आपण जे खोदकाम केलय तिथे एक भलामोठा नाग आला होता.पिवळाजर्द आठ एक फूट लांब... खूपच जाड व रूंद फणा आहे त्याचा! तोअत्यंत तेजस्वी दिसत  होता.कामगारांनी पहिल्यांदा बघितला त्याला भितीने त्यांची गाळण उडाली आहे. मी हात जोडून त्याला म्हणालो ' जा बाबा आम्हाला आमचं काम करू दे.' आश्चर्य म्हणजे तो तिथून जंगलाच्या दिशेने गेला सुध्दा."" हो , घाबरण्याची गरज नाही.तो राजघराण्याचा परंपरागत रखवालदार असणार. अश्या एक नागाचे वर्णन या माहितीत आहे." राज म्हणाला." त्या काळी पुढे काय घडलं ते लवकर वाच."मी आता थोडक्यात सांगतो कारण हे लवकर संपणार नाही. वेळ वाया जाईल."" मैत्रयांनी बाबा अग्निधराचा वध केला. अर्धवट जीवंत झालेल्या कृतांताच्या उरात त्याने तलवार खूपसून ठेवली .त्या तलवारीवर असलेल्या मंत्रांमुळे ते सगळे सांगाडे व बाबा अग्निधरार जो एका घुबडाच्या शरीरात घुसला होता तो काहीच करु शकत नव्हता.पण ती तलवार सांगाड्यातून बाहेर येताच बाबा अग्निधर जो काही शतके घुबडांच्या शरीरात प्रवेश करून संधीची वाट बघत होता त्याला संधी मिळाली.आता या क्षणी सगळे कुणाच्या तरी शरीरात घुसून उत्पात माजवण्याच्या तयारीत आहेत."" अरे बापरे ! पण कृतांत कोण होता?" मौर्येंनी विचारले." इथे लिहिलेल्या माहितीनुसार तो एक अचाट ताकदीचा क्रूरकर्मा होता. दोरोडे घालणे...बलात्कार.... सामूहिक हत्याकांड करणे...अशी अनेक कामे तो करायचा....त्यांची दहशत संपूर्ण राज्यभर होती. पण अचानकपणे त्याच्या वाड्यात तो मृतावस्थेत आढळला.बाबा अग्निधराने त्वरित तो मृतदेह पळवला व आपल्या  अघोरी विद्या वापरून त्याची ताकद कित्येक पटीने वाढवली आहे. त्याला आता  नियंत्रणात आणणे खूप कठीण आहे."" बरं, गौरी व आयुषच पुढे काय झालं?" गौरीने व्यंगात्मक आवाजात विचारले." ज्या रात्री मैत्रयांनी त्या नऊ अघोरी व कृतांताचा नाश केला त्याच्या दुसर्या दिवशी पहाटे हजारो अघोरी राजवाड्यावर चाल करून आले.तर राजवाड्यातून राणी व तिचा भाऊ यांनी उठाव केला.पण राजकन्या गौरी तयार होती तिने कौशल्याने परिस्थिती सांभाळली.घनघोर युध्द झाले.गौरीने शेकडो अघोरींना कंठस्नान घातले.तो पर्यंत मैत्रयांची सेना गौरीच्या मदतीला आली.खुध्द आयुष पण लढाईत सामील झाला. या धामधुमीत राजा वर्मन व सेनापती मारले गेले.प्रधान कुठे पळून गेले त्यांचा पत्ता लागला नाही. राणी व तिचा भाऊ या दोघांना कैद केले गेले.   राजकन्या गौरीचा राज्याभिषेक खुद्द स्वामी रघुवीर यांनी केला.गौरीने आयुषशी लग्न केले व सुमारे पन्नास वर्षे राज्य करून दोघं आपल्या पुत्राला चित्रांगदालि सिंहासनावर बसवून वनात गेले.पण जेव्हा बाबा अग्निधर परत येईल तेव्हा आपणही  पुन्हा जन्म घेऊन त्यांचा निःपात करु असे त्यांनी सांगितल्याचे इथे लिहिले आहे. पण एक महत्त्वाची माहिती इथे नोंद आहे ती म्हणजे स्वामी रघुवीर यांनी दिलेले रक्षाकवच असणारे ताईत राजवाड्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या हनुमंत मंदिरात गाभार्याखाली ठेवल्याचा उल्लेख आहे.आपल्याला ते मिळवावे लागतील त्याचा उपयोग होईल. आणि हो तुम्ही माना अथवा न माना पण आपलं इथे एकत्र येणे हे नियतीने घडवून आणले आहे."राजने थोडक्यात सारी हकीकत सांगितली." आपण उद्याच ते ताईत शोधण्याचा प्रयत्न करु." डॉ.शर्मा म्हणाले.सगळे तिथून जाण्यासाठी उठले. जाताना गौरीने राजकडे  एक गंभीर कटाक्ष टाकला.ती विचार करत होती. जर तिच्या दंडावर राजकन्या गौरीसारख पिंपळपान आहे तर ती पूर्वजन्मी....छे...छेते कसं शक्य आहे? मग राजची भूमिका त्यात काय आहे? शर्मा व मौर्ये हे नेमके कोण आहेत. कोणत्या हेतूने अथवा कामासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत? असे प्रश्न तिला पडले होते.--------*******-------******-------------*********-------------बाळकृष्ण सखाराम राणे