(खास विद्यार्थ्यांसाठी संस्कारमोती या सदरखाली लेखमाला)
1.आई – बाबा
विद्यार्थी मित्रांनो ! तुमच्यापैकी किती जण आपल्या आई - बाबांना त्रास देतात ? हा प्रश्न मी मुद्दामच विचारला. तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनालाच हा प्रश्न विचारून पहा. तुम्ही तुमच्या आई - बाबांना त्रास देता का ?
तुम्ही त्रास देत असाल आणि देत नसाल तरीही पुढे जे लिहिले आहे ते काळजीपूर्वक वाचा. तुमचे आई - बाबा हे स्वत:साठी नाही तर फक्त तुमचं चांगलं व्हावं यासाठी कष्ट घेत असतात. तुम्हाला त्रास होवू नये म्हणून स्वत: त्रास सहन करत असतात. जे सतत तुमच्या भल्याचा विचार करतात त्यांनाच त्रास देणं कितपत योग्य आहे ? याचा तुम्ही विचार केला पाहिजे.
आई दररोज सकाळी लवकर उठते. तुम्हाला शाळेत जाण्यासाठी तयार करते. तुमच्यासाठी जेवण बनवते. तुमचे कपडे स्वच्छ धुते. ती आजारी असली तरीही ती तुमच्यासाठी काम करत राहते. तुमचे बाबा तुमचा शाळेचा व इतर सर्व खर्च उचलतात. आपल्या मुलांनी चांगले शिकावे. त्यांनी शिकून आपल्या पायावर उभे राहावे. यासाठी ते खूप मेहनत घेत असतात. काही घरांमध्ये आईही बाहेरचं काम करत घरची सर्व कामे करते.
आई व बाबा दोघेही तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. ते स्वत:आधी तुमचा विचार करतात. त्यांच्यासाठी तुम्हीच त्यांचे जग आहात. तुम्ही आजारी पडता त्यावेळी तुमचे आई – बाबा काळजीत पडतात. तेच तुम्हाला दवाखान्यात नेतात. ते तुमच्यासाठी खूप कष्ट सोसतात. पण तुम्हाला काही कमी पडू देत नाहीत. तुमच्या प्राथमिक गरजा भागवतात.
तुम्ही एखादेवेळी एखाद्या वस्तूसाठी त्यांच्याजवळ हट्ट धरता. पण काही कारणास्तव ते ती वस्तू तुम्हाला देवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं. त्यामुळे विनाकारण एखाद्या गोष्टीचा हट्ट त्यांच्याजवळ धरून त्यांचे मन दुखावू नका. त्यांना नेहमी तुम्ही आनंदी राहावं असं वाटतं.त्यामुळे तुमचंही त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचं कर्तव्य आहे. ते नेहमी तुमच्या भल्याचा विचार करत असतात. कोणती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे. कोणती गोष्ट तुमच्यासाठी वाईट आहे. हे तुमच्यापेक्षा जास्त त्यांना कळतं. त्यामुळे विनाकारण त्यांच्याजवळ हट्ट धरु नका. फक्त एवढं लक्षात ठेवा ते जे काही करत आहेत. ते फक्त तुमच्या भल्यासाठीच करत आहेत. कोणतेही आई - बाबा आपल्या मुलांचं कधी वाईट पाहत नसतात. त्यांना काम करताना किंवा पैसे कमवताना बाहेर कितीही त्रास झाला तरी ते तुम्हाला आनंदात पाहून सर्व कष्ट, झालेला त्रास विसरून नव्या दमानं कामाला लागत असतात. त्यामुळे नेहमी आनंदी राहायला शिका आणि आपल्या आई - बाबांना आनंदी ठेवा. कारण तुमच्या आनंदातच त्यांचा आनंद सामावलाय.
आपल्यामुळे आपल्या आई - बाबांचे नाव खराब होईल. तसेच आपल्या एखाद्या वाईट कृत्यामुळे त्यांना त्रास होईल असे कधीही वागू नका. आपण बाहेर चुकीचे वागत असलो तरी लोक आपल्या आई - बाबांना नावे ठेवतात. त्यांनीच तुमच्यावर संस्कार चांगले केले नाहीत. असे लोक बोलतात. आपल्या आई - बाबांना लोकांनी नावे ठेवली तर तुम्हाला आवडेल का ? त्याचं उत्तर आहे नाही. कारण कोणत्याच मुलांना आपल्या आई - बाबांना कोणी वाईट म्हटलेलं आवडणार नाही.
आपले आई - वडील आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे असतात. आपल्यापेक्षा त्यांना अनुभव व समज जास्त असते. त्यामुळे नेहमी त्यांचे ऐका. ते तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सांगतात. त्यामध्ये त्यांचा स्वार्थ नसतो. तुम्ही कर्तत्ववान बनावं. तुम्हाला नोकरी लागावी. तुम्ही मोठे उद्योगपती व्हावे हा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. ते कधी रागावले तरी त्यांचे वाईट वाटून घेवू नका. कारण ते कधीच तुम्हाला वाईट सांगत नसतात. ते नेहमी तुमच्या भल्याचाच विचार करत असतात. त्यांचा नेहमी आदर करा. त्यांना कधीही परत बोलू नका. ते आहेत म्हणून तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. तुमचे आई - बाबा काही दिवस बाहेर गेले तर तुम्हाला किती त्रास होतो ? ते आहेत म्हणून तुम्ही आहात हे कधीही विसरू नका.
तुमचे बाबा पैसे कमावण्यासाठी कामावर जातात. कामावरून आल्यानंतर ते थकलेले असतात. त्यांना आरामाची गरज असते. आईही दिवसभर काम करुन थकते. त्यावेळी त्यांना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच नवचैतन्य देत असतो. आपले आई - बाबा आपल्यासाठीच जगत असतात. त्यामुळे कधीही त्यांना त्रास देवू नका. त्यांच्याशी नेहमी प्रेमाने वागा. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच त्यांच्यासाठी खूप मोठा असतो. ते तुमच्या सुखासाठीच झटत असतात. त्यांच्यामुळे आपल्या सर्व गरजा भागतात. त्यांच्यामुळेच आपण सुखात राहतो. त्यामुळे त्यांना कधीही दुखावू नका. नेहमी लक्षात ठेवा. जो आपल्या आई – बाबांचे मन दुखावतो तो कधीही सुखी होत नाही. त्यामुळे नेहमी त्यांच्याशी प्रेमाने वागा. तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. ते तुम्हाला जीवापाड जपतात तसे तुम्हीही त्यांना जपायला शिका.