* गर्व हरण *
तसं अनंतपूर हजार दीड हजार वस्ती असलेलं गाव विविध वृक्ष-वल्लीनी वेढलेलं. गावालगतच दाट वनराईने, हिरव्या गर्द वनश्रीने नाटलेलं जंगल होतं. या छोटेखानी जंगलात जुन्या काळातील एका तपस्व्याचा आश्रम आहे. आजही ऋषीं-मुनी, साधू-संन्याशी त्या आश्रमात थांबतात अन पुढील तीर्थाटणाला निघून जातात.
विसाव्या शतकात अनंतपूरी नामांकित व नावाजलेल्या नाना कला निपुण व्यक्ती होऊन गेल्या व आहेत. आजही गावकऱ्यांच्या त्यांच्या जीवन-कथा स्मरणात आहेत.. त्या ऐकीव माहिती-कथा आपणास ते ऐकवतात.
बऱ्याच गावी गेलो तेव्हा धर्मा कुंभाराचा पोरगा रामा राऊत याची भेट झाली. चहा-पाणी झालं. ख्याली-खुशाली विचारून झाली. रामा बापाचाच व्यवसाय करून परिवार चालवीत होता. पोळ्याच्या सणाला रेखीव बैल, दिवाळ-सणाला बोळकी-पणत्या, संक्रात सणाला वाणाचे गडवे, मडकी-गाडगी बनविण्यात त्याचा हातखंडा होता. नव्वदीच्या जवळ पास पोहचलेला बाप धर्मा जवळच घरात खाटेवर बसलेला होता. म्हातारा बिडीचे झुरका मारत मधूनच आपल्या झुबकेदार, पांढऱ्या-फेक आकडेबाज मिश्या हाताने गोंजारत होता. बोलण्याच्या ओघात मी विचारले "रामा तु देवाच्या मूर्ती का बनवत नाहीस? मुर्त्यांना चांगली मागणी असते." त्यावर रामा गप्प होता. पण धर्मानेच खुलासा करीत म्हणाला "आमच्या घराण्यात पूर्वजानी मूर्ती बनविण्यास मनाई घालून ठेवलेली आहे." मी ओतप्रोत उत्सुकतेपोटी न राहवून विचारले "पण का ss?" अन मग मात्र मनाई मागचं रहस्य प्रकट करीत धर्मा सांगू लागला...
पूर्वीच्या काळी आमच्या अगोदरच्या पिढीत नारायण नावाचा मूर्तिकार होऊन गेला. तो देवा-दिकांच्या इतक्या सुंदर व अप्रतिम मूर्ती बनवायचा की त्याची बरोबरी कोणीच करू शकत नव्हता. जणू काही विधात्यानेच त्याला ही अप्रतिम कला-गुण बहाल केला होता.आसपासच्या परिसरात त्याचे नाव पसरले होते. त्यानें बनविलेल्या मूर्ती इतक्या सुंदर व हुबेहूब असायच्या की बघणाऱ्याला वाटावे की ' या मूर्ती बोलून उठतात की काय?' इतक्या त्या अनुरूप असायच्या. आजूबाजूचे धार्मिक वृत्तीचे लोक त्याच्याकडून मूर्ती नेऊ लागले. देवघरात ठेवून पूजाअर्चा करू लागले. समाजसुधारक, समाजसेवक आदी महापुरुषांचे पुतळे बनवून घेऊ लागले. अशाप्रकारे दिवसेंदिवस नारायण "नामांकित मूर्तिकार"म्हणून नावारूपाला आला. एके दिवशी सकाळची वेळ होती. सूर्यदेव नुकताच पूर्वदिशेला आकाशात विराजमान झाला होता. सगळीकडे सूर्याची कोवळी पिवळीधमक किरणे पसरली होती. लोकांची नित्यकर्मे आटोपून व्यवहार सुरु झालें होते. अशावेळी जंगलाच्या दिशेकडून एक ऋषीं गावात प्रवेशले. तपस्येचे अप्रतिम तेज त्यांचे मुखकमलावर झळकत होते. समोरच नारायणचे घराचे ओट्यावर "भगवान श्रीकृष्णाची" नयनमनोहर मूर्ती दिसली. अगोदरच त्या साधूच्या कानावर मूर्तिकाराची कीर्ती आलेली होती. मुनीवर मूर्तिजवळ आले अन एकटक नजरेने पाहू लागले. इतकी हुबेहूब व विलोभनीय नयनमानोहर मूर्ती पाहून प्रत्यक्ष कृष्णदर्शन झाल्याचा आनंद साधूच्या मुद्रेवर विलसत होता. त्यांच्या तोंडून हर्षउदगार निघाला "ही मूर्ती बनविणारा नक्कीच कोणीतरी"अवलिया"असला पाहिजे."साधूंचा उदगार कानी पडताच नारायण साधूसमोर हात जोडून उभा राहिला. साधू बोलू लागला "ही मूर्ती नाही प्रत्यक्ष श्रीकृष्णच आहेत. मी प्रसन्न झालो बोल बेटा तूला काय हवे?" गर्वाने बाधित नारायणला कल्याणदायी वरदान मागण्याचे कसे सुचेल? विचार न करताच उत्तर दिले "महाराज मला काही नको, फक्त मी कधी मरणार? हें मला अगोदर कळावं. बस इतकच." त्यावर साधूंनी "तथास्तु" म्हणून आशीर्वाद दिला व जंगलाच्या दिशेने निघून गेले.
दिवसामागून दिवस निघून गेले. अन एक दिवस अचानक अनंतपुरात वार्ता पसरली की ' नारायणाने बनवून दिलेला कार्यकर्त्याचा सार्वजनिक जागी बसविलेल्या पुतळ्याची कुठल्यातरी गावी विटम्बना होऊन दंगल उसळून बरेच लोक मृत्यूमुखी पडले. अप्रत्यक्षपणे नारायणच्या मनात अपराधीपनाची भावना निर्माण झाली.'नजीकच्या काळात आपणही मरणार' हें त्याला समजले.
मग त्यानें त्याच्या अंगी असलेल्या कलागुणामुळे स्वतःचे अनुरूप सात मूर्ती बनवून ठेवील्या. मूर्ती इतक्या हुबेहूब होत्या की जणू काही प्रत्यक्ष साक्षात नारायणच उभा आहे.नारायणची मृत्यूघटिका यमधर्म आला तसा पटकन नारायण मूर्तिच्या रांगेत मूर्ती बनून उभा राहिला. तीळमात्रही फरक नसलेल्या त्या मूर्ती पाहून यमधर्म संभ्रमात पडला की यापैकी "खरा नारायण" कोणता? प्रयत्न करूनही यमधर्माला समजेना. नाईलाजाने यमधर्म रिक्तहस्ते परत जायला निघाला. हें पाहून नारायणला स्वतःच्या कलेचा व मृत्यू चुकविल्याचा अभिमान झाला. अन कर्माने साथ दिली पण प्रारब्ध आड आले. कर्मधर्म संयोगाने मार्गात यमधर्म-नारदमुनी भेट झाली. रिकाम्या हस्ते परत येणाऱ्या यमधर्माला त्यांनी विचारणा केली तेव्हा यमधर्माने घडलेली हकीकत कथन केली. त्यावर नारद व यमधर्म मुर्त्याजवळ आले. नारदानी मूर्तिना बारकाईने न्याहाळले. त्यांनाही खरं काय ते समजेना. बिरबली युक्तिवाद करीत यमधर्माला मुर्तिकडे अंगुली निर्देश करून म्हणाले "मुर्तीकाराने या मूर्तित ही चूक का केली?" हें ऐकून रांगेत मूर्तिसमान उभा असलेला गर्वबाधित नारायण उद्गारला "मूर्तित चूक असूच शकत नाही" अन नारदानी यमधर्माला सांगितले "हें तुमचे आजचे गिऱ्हाईक" हें ऐकताच नारायणाचा गर्वहरण झाला, अभिमान गळून पडला.
****************************
मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.
मो. नं. 8830068030.