do you know what is happiness? in Marathi Philosophy by Pratik books and stories PDF | नेमकं सुख म्हणजे काय हो?

The Author
Featured Books
Categories
Share

नेमकं सुख म्हणजे काय हो?


.................
वाचक हो तुमच्या मते सुख म्हणजे काय ? अहो तेच की आनंद, मज्जा, मस्ती, समाधान हे सगळे सुखाचे समानार्थी शब्द ना..!

             नेमकं मला विचारायचं काय आहे, तर तुमच्या मते आनंद म्हणजे काय?
             
             तर चला सुरू करूया आपली चर्चा..
             उन्हाळा म्हटलं की अंगाला झन्नाट चटके देणार ऊन आठवते. त्यात मी आणि माझे मित्रमंडळी नेमकं अशा भागात सापडलो आहोत, ज्या भागावर सूर्य देवाची काही जास्तच कृपा आहे.
             
             जाम ऊन तपते राव इथे, अगदी अंगाला भाजणार दुपारी एक वाजता आपापले काम आटपून मी आणि माझे मित्रमंडळी लोको शेड मध्ये एका लांब लोखंडी बार वरती बसलेलो. त्यात आमची काही मित्र समोर लावलेल्या वॉटर कुलर मधून थंड पाण्याने भरलेल्या बाटल्या घेऊन आलेत.
             
              पाण्याच्या बाटल्या हातात घेताच आम्ही गटागटा पाणी प्यायला सुरुवात केली. आणि कुठेतरी अंतकरणात मन शांत झाल्यासारखं वाटलं. त्यावेळी कोणालाही स्पष्ट डोळ्यांनी ओळखता यावा असा आनंद आणि सुख आमच्या चेहऱ्यावर झळकत होत.
                        त्यावेळी काही क्षणासाठी आमच्या मनात स्वभाव होता त्याला सुख म्हणता येईल..!

..............

आणि उन्हाळ्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे लग्न. अहो.. आपल्या महाराष्ट्रात लग्नाचा शुभ मुहूर्त उन्हाळ्यातच ठरतो ना..यावेळी उन्हाळ्यामध्ये आमच्या दादाचं पण लग्न ठरलं.
आता आमचे दादा 'अहो' चे मानकरी होणार म्हणून त्यांचा आनंद सातव्या ढगात.
      
           आणि दादांच्या लग्नात मस्ती आणि धमाल होईल, याच विचारात आम्ही सगळी भावंड पण आनंदाच्या झोक्यात झोके घेऊ लागलो.सगळी मंडळी लग्नाच्या तयारीत मग्न आणि आम्ही भावंड लग्नात नेमकी कोणती कपडे घालायचे यात व्यस्त.
           
           बोलता बोलता दिवस पालटले आणि आली हळदीची रात्र. खरं सांगायचं तर जसा मनात विचार केला ना त्यातलं काहीच झालं नाही.तब्बल आठ वाजता लग्न घरी पोहोचलो तिथे धावपळ सुरूच होती.
           मनीष दादा आणि दोन-तीन महिला मिळून पाहुणेमंडळी यांना जीवन देण्यात व्यस्त होते.मनीष दादा एकटा जेवण वाढतोय हे पाहून मी पण उतरलो रणांगणात, पोळीच ताट घेऊन सुरुवातीला सर्व काही सामान्य होत.
           महिला मंडळी जेवायला बसलेली. मी जेवण देत असताना माझ्यासमोर बसलेल्या मामींची थोडीफार जास्तच खातेदारी केली असेल. 
           तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या. मामी म्हणतात : जरा जास्तच खातिरदारी सुरू आहे मामी साहेबांची.
           
           मी पण मस्करी मध्ये बोललो :करावी तर लागेल ना होणाऱ्या सासू आहेत माझ्या शेवटी त्याच त्यांची मुलगी देतील.मग आधीच नको का मन जिंकून घ्यायला. 
           
           आमचा हा संवाद वातावरणात हास्य पसरवण्यात सक्षम राहिला.आणि हळूहळू काही सुखाचे क्षण अनुभवायला भेटले.


आता पुरुष मंडळी जेवायला बसली.आमचे मामा, मावसा, काका, आणि काही धाकडी भावंड,आणि त्यांचे संवाद हे हास्य स्फोट म्हटले तरी चालेल. प्रत्येक संवाद इथे सांगता येणार नाही.

त्यातलाच एक संवाद...
मामा म्हणतात:
'आता सागरला आमच्या मुलीचं मन जिंकता आलं पाहिजे तर आपला सागर मनाचा मोठा आहे, पण हे कार्य जमेल ना त्याला'.
तेच मामाच्या मस्करीला प्रत्युत्तर देत.
गौरव दादा बोलले:जर आमचा दादा चातुर्याने कोर्टात केस जिंकू शकते तर,आपल्या निर्मळ मनाने तो वहिनींच मन ही जिंकेल याची खात्री आहे आम्हाला,काय मनीष दादा!

मनीष दादा बोलले: 'होय अगदी बरोबर'..

रात्री दहा वाजता बोटच्या स्पीकरवर फुल वोल्युम मध्ये गाणी सुरू झाली.आणि रात्रीच्या दोन ते अडीच वाजेपर्यंत काही थांबली नाही.यावेळेस सगळी मंडळी दिलखुलास नाचली.


आणि मग काय. 'अरे.. उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत सगळं आटपून निघायचं आहे लग्न घरी, नाहीतर उशीर होईल.चला आता झोपा बर'... असं म्हणत आमच्या वरिष्ठ मंडळींनी आम्हाला आदेश दिले
आणि आम्ही त्यांचं तंतोतंत पालन पण केलं बरं का.

लग्नाचा दिवस उजाडला आणि तीच धावपळ सुरू झाली.आता ही धावपळ नेमकी कशी असते? याची पुरेपूर कल्पना आपल्याला आहेच.साडेदहा अकरा वाजले आणि धावपळ थोडी जास्तच वाढली.  ' 

नवरदेव आणि महिला मंडळीची गाडी निघाली ना,आपली काही पुरुष मंडळी बाकी आहे असो, मी गाडीची व्यवस्था करतो.' असं म्हणत बापूंनी फोन काढला आणि कुणाला तरी फोन केला.
  
     मामा बोलले: 'मी आधीच बोललो होतो की गाड्या जास्तच ठेव.'
     
     तेच मावसा बोलले: अशोकराव लग्नामध्ये तंतोतंत नियोजन होत नाही. थोडं फार कमी जास्त चालतच राहते. जाऊ द्या गाडी येत आहे तुम्ही बसून घ्या.
     
     आता करता करता नवरदेव चे पूर्ण वराड लग्न मंडपाकडे रवाना झाल.उरली फक्त एक स्विफ्ट कार, ज्यामध्ये बाप्पू आणि मावसा बसलेले.नेमकी माझीच वाट पाहत होते की.
     
     तोच माझा फोन वाजला बापूंचा कॉल होता. तुला वेळेआधी यायला काही हरकत आहे का? बापू बोलले.

"सॉरी बाप्पू, बरं पोहोचलोच मी बाजाराबाहेर उभा आहे." मी बोललो.

बाप्पू (बाजाराबाहेर नजर फिरवताना) दिसलास, मला हात दाखवत) इकडे बघ.

मी: हा, (त्यांना हात दाखवत म्हणालो) दोन मिनिट आलोच बापू.
मी जाऊन गाडीत बसलो आणि आम्ही निघालो
..........


नवरीच्या गावामध्ये पोहोचल्यावर तब्बल दोन तास पूर्ण वराळ अगदी मस्ती मध्ये नाचलं.याची आठवण म्हणून आम्ही भावांना व्हिडिओज आणि फोटो सुद्धा घेतले.शिवाय लग्नप्रसंगी व्हिडिओग्राफर बुक केलेले असतात.

आता वेळ आली लग्नाची, आता दादाला लग्नाचे कपडे घालायचे होते.म्हणून सागर दादा गौरव दादा विशाल दादा सगळेच नवरीच्या घराकडे निघालेआणि बाकी काही राहिलेले सामान घेऊन मी सुद्धा त्यांच्या मागे निघालो.लक्षात असू द्या हे लग्न गावामध्ये अगदी पारंपारिक पद्धतीने होत आहे.

 आणि तिथे घरात आमच्या वहिनीसाहेब बसलेल्या, त्यांचा देखावा आणि पेहराव अगदी नववधूला साजे सा आणि सुंदर होता. त्यांना पाहिल्यावर कदाचित त्यांना कुणाची नजर न लागावी म्हणून नकळतच मी माझ्या हाताने त्यांची नजर काढली. अगदी आपली आजी करते ना तसंच काहीतरी.
 
 आणि तेच माझ्या तोंडातून उद्गार निघाले:'तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.'
 
 तेच त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं आणि माझ्याकडे पाहत त्यांनी विचारलं:"तुम्ही कोण आहात ?"
अर्थातच आम्ही दोघे एकमेकांना प्रथमच भेटत होतो.

मी बोललो: मी सागर दादांचा लहान भाऊ आहे.

वहिनी बोलल्या: म्हणजे माझे लहाने देर ना तुम्ही.!

मी: अगदी बरोबर.
हे आणि असे कित्येक आनंदाचे क्षण मी सागर दादा च्या लग्नात अनुभवले.

यालाच सुख म्हणतात.मग नेमकं सुखाची परिभाषा काय ? तर, आपल्याला हवी ती गोष्ट हवी त्यावेळी भेटली म्हणजे सुख. आपल्या मनासारखं झालं म्हणजे सुख.
पाहिजे तेवढा पैसा मिळाला म्हणजे सुख.. जी व्यक्ती आपल्याला खूप आवडते ती नेहमीसाठी आपली होणं म्हणजे सुख,हेच ना..!

......

हाच विचार येतो ना मनात, पण असं असतं का ?
कटू आहे पण सत्य आहे की असं काही नाही.सुखाची ही परिभाषा आपल्याला सुख देते..

समजा उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तुम्ही घराच्या समोर पायऱ्यावर बसलेले आहात,आणि अचानक तुमचे बाबा तुमच्यासमोर थंडगार आईस्क्रीम घेऊन आले.भेटला ना आनंद, झालं ना मन खुश.

आपल्या आजीबाई आपल्याला आपल्या बाबा काका आणि आत्यांची लहानपणचे किस्से सांगतात, तेव्हा आपल्याला नवलही तेवढेच वाटतं आणि मन पण खूप रमत ते सगळे किस्से ऐकताना.

चार-पाच वर्षांनी सगळे मित्र भेटले आणि आपल्या गप्पा गोष्टी रंगल्या.प्रत्येक जण आपले बरे वाईट आगळे वेगळे अनुभव सांगत आहे.काही क्षणासाठी आपण आपल्या सगळ्या अडचणी आणि काम विसरून आनंदाची महफिल भरवलेली असते.

वरती सांगितलेल्या प्रसंगा पैकी एखादा प्रसंग तरी आपण कधी अनुभवला असेलच ना ! तो क्षण तो प्रसंग आपल्यासाठी आनंदाचा होता सुखाचा होता. या आणि अशाच कितीतरी गोष्टी आहेत ज्यामध्ये आपलं मन रमत.तुमचा उत्साह वाढते आनंद वाढते.
आता जरी तुम्ही वही पेन घेऊन बसले तरी किमान दहा गोष्टी अशा तुम्ही लिहाल ज्या केल्याने तुम्हाला आनंद मिळतो.

आता नक्कीच आपल्याला हे तरी समजलंच की सुखाची परिभाषा काय आणि सुख नेमकं कशा पद्धतीने आपल्या आयुष्यात फेरफटका मारते.

आता प्रश्न असा की जेव्हा आपल्याला हे कळतं की सुख कशात आहे तर मग आपण सुखी का नाही ?

मला विचाराल तर माझं एक मत अस आहे की,मी आतापर्यंत जेवढी पण सुखाशी संबंधित उदाहरणं दिली जर त्यांच्या विरोधात काही घडलं तर आपल्या पदरी काय येईल? अर्थातच दुख निराशा आणि अशाच काही नकारात्मक भावना.

जेवढे पण नकारात्मक शब्द आहेत. ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुखाशी संबंधित आहेत सुख आणि दुख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.

एखादी कृती करताना ती जर यशस्वी न होता अपयशाकडे गेली तर यश आणि आनंदाची जागा अपयश आणि निराशा घेईलच.

यापासून स्वतःचा बचाव करता येतो का? 100% सुखी राहण्याची कोणती पद्धत अस्तित्वात आहे का?
तर हे शक्य नाही 100% सुखी राहण्याची अशी कोणती पद्धत नाही.

कारण आपलं आयुष्य हे अस चित्र आहे ज्यामध्ये अनेक भावनांचे रंग मिसळून एक सुंदर अस चित्र बनते.
यात सगळं काही आहे यश, अपयश, निराशा, प्रसन्नता, द्वेष, करुणा, दया, स्वाभिमान अभिमान सगळं काही.

पण खरी मजा ही आहे की यातील एकही गोष्ट नेहमीसाठी नाही.जरा आज तुम्ही आनंदात आहात तर ती गोष्ट नेहमीसाठी नाही.आणि दादा जर का तुम्ही अडचणी मध्ये असाल एखाद्या समस्यांनी ग्रासलेले असाल तर दादा ही वेळ सुद्धा निघून जाईल.थोडा वेळ लागू शकतो पण ही वेळ सुद्धा निघून जाईल.

आता थोड्याफार प्रमाणात आनंद काय ? आनंद नेमका मिळतो कसा ? याची साधारण कल्पना आपल्याला आली असं समजू.

या विषयावर खोलवर जाऊन संशोधन करायला आपण यातील तज्ञ व्यक्ती नाही. आणि तज्ञ व्यक्ती हा आनंदी आहे हे पण काही सत्य नाही.

आता तुम्ही म्हणाल की पैशाने सुद्धा लोक आनंदी नाही असं मी म्हणतोय. एखादा बुद्धिजीवी आणि तज्ञ व्यक्ती पण आनंदी नाही. 
मग नेमकं तुझं म्हणणं तरी काय ? किती कोडे सोडवायचे आम्ही.!


सरळ साधं बोलायचं झालं तर आपले वडीलधारी बुद्धिजीवी आणि समजदार लोकांचा आणि थोडाफार काय तो माझा अनुभव सांगतो की,"वर्तमानात जगा" पुन्हा बोलतो "वर्तमानात जगा."

   हे काय मस्करी आहे. 2025 आहे आणि आपल्यातील प्रत्येक जण 2025 मध्ये जगतोय. आपल्यातील कोणीही 1980 किंवा 2080 मध्ये थोडी जगत आहे.
   
   हो.. हो... हे अगदी योग्य पण माझा बोलण्याचा हा अर्थ नाही.शरीराने जरी आज आपण 2025 च्या आजच्या दिवसात जगत असलो तरी, आपल्या विचाराने मनाने आपण वर्तमानात आहोत का?
   
   खूप मेहनत घेऊन काही दिवसांपूर्वी आपण एक प्रेझेंटेशन तयार केलं पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.
   
   परीक्षेसाठी चांगलीच मेहनत घेतली पण निकाल पाहिजे तसा आला नाही.
   
   आपण जिथे काम करतो तिथे आपल्या एका सह कर्मचारीला आपण गैरसमजामुळे नको ते बोलून गेलो.
   
   आणि आज या गोष्टीचा पश्चाताप होतोय,एवढी मेहनत तर घेतली पण काही चेष्टा ना की पाहिजे ते फळच पदरी पडलं नाही.
 
आणि या विचारांमध्ये तुम्ही हे विसरलास की आज रविवार आहे घरामध्ये आई-वडील काका काकू आत्या मामा मामा मावशी आणि आपली काही भावंडे यांचे छोटासा गेट-टुगेदर सोहळा भरलेला आहे.यात चांगलीच गंमत जंमत मज्जा मस्ती सुरू आहे आणि आपण तिथे आहोत,पण मात्र शरीराने.!
   
   मन कुठे बाहेरच आहे भूतकाळातील घटनांना घेऊन चिंता करण्यात व्यस्त.!
   
काही अर्थ आहे का या सगळ्या प्रकाराला ? भूतकाळात जे होऊन गेलं त्याला पुन्हा बदलणे शक्य नाही.आणि भविष्यात काय होईल याचा तंतोतंत अंदाज लावणे ही फारसी काही शक्य नाही.

असो.. माझं म्हणणं एवढंच की वर्तमानामध्ये जगण्याला प्राधान्य द्या.वर्तमानात जगा हे म्हणायला जेवढं सोपं तेवढेच करायला पण सोपं जाईल असं मुळीच नाही.

आपण दिवसांमध्ये कितीतरी विचार करतो, त्याला काही खास नियंत्रण नाही.आणि आपले हे प्रत्येक विचार भावना यांचे सरळ धागे जोडलेले आहेत आपल्या मनासोबत.
आणि आपलं मन हे स्थिर तर नाहीच. मनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की,

  "जीवनाचे रंग बदलते, प्रसंगाचे सारांश बदलते.
  मन हे अगदी वाऱ्यासारखे, कधी दिशा कधी वेग बदलते."


आणि वाऱ्यासारखी ही मन नियंत्रणामध्ये ठेवणार आहे तर थोडं अवघडच.! 
 पण अशक्य तर नाही ना.
 थोडा वेळ लागेल पण आपण आपल्या मनाला आपला चांगला मित्र बनवण्यामध्ये यशस्वी नक्की होणार.
 शेवटी आहे तर आपलंच मन ना.!
 आता तुम्ही म्हणाल की तुझं बोलणं बऱ्यापैकी लक्षात आलं बघ.
 
आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात काही आनंदाचे क्षण भेटतातच त्यांना जगा.आनंद हा त्या क्षणात आहे, क्षणिक आहे, तेव्हा त्या वेळेत भरपूर जगून घ्या.

भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या जाळ्यामध्ये अटकून चिंताग्रस्त झाल्यापेक्षा,वर्तमान स्वतंत्रपणे जगलेल लाख मोलाच.

हे सगळं बर्‍यापैकी लक्षात तर आलं पण आत्मसात करायला सोपी जाईल का?

आपण जे काही आतापर्यंत चर्चा केली,त्याला आत्मसात करण्यासाठी मानसिक कसरत ही करावीच लागणार.

मानवी भावना ह्या वाहत्या पाण्यासारख्या समजा,नदीच्या वाहत्या पाण्याप्रमाणे वेळेनुसार या सकारात्मक बदल येत जातील.आणि दोष रुपी कचरा किनाऱ्यावर सोडला जाईल.
   पण तेच जर काही पाणी एखाद्या खड्ड्यात साचलं तर वेळेनुसार दूषित होत जाईल.
   
   मी मानवी भावना बद्दल का बोलतोय तर तर जीवनाच्या प्रत्येक पावलावर भावना ह्या प्रमुख भूमिका पार पाडतात.
   
परत काही सांगायचे का तुला? तर हा..
मला ना एका इंग्लिश चित्रपटातील एक डायलॉग आठवते.
Take a break from worry about what you can't control live a little.

ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाही त्यांची काळजी करण्यापासून जरा (ब्रेक) रजा घ्या.
ही चिंता फक्त आपल्याला त्रासच देईल मग घेणार आहे ना ब्रेक दादा.!
.....

आणि हा.. हे सगळं करत असताना स्वतःला विसरू नका. स्वतःला वेळ द्या, स्वतःवर सुद्धा प्रेम करा.

जीवनामध्ये काही व्यक्ती तर आपल्याला प्रिय असतातच. मग जशाप्रकारे त्यांची आपण काळजी घेतो, त्यांना महत्त्व देतो, तसं स्वतःची पण काळजी घ्या, स्वतःला महत्त्व द्या.

स्वामी विवेकानंद म्हणतात की, जर तुम्ही स्वतःशी कधी संवाद साधला नाही. स्वतःला समजण्याचा प्रयत्न केला नाही तर,तुम्ही तुमच्या जीवनात एका चांगल्या व्यक्तिमत्वाला कधी भेटलेच नाही.

आणि हा स्वतःशी बोलणं म्हणजे काही वेळे पण नाही बरं का मॉडर्न भाषेत याला "सेल्फ टॉक" म्हटलं जाते.


बस एवढंच होतं माझ्याकडे सांगण्यासारखं आता खास काही नाही.थोडं फार काही आहे सांगण्यासारखं पण, जर सांगत बसलो तर मला अध्यात्मिक गुरु समजाल पण. मी काही अध्यात्मिक गुरु नाही बर का.!

बस एक सामान्य मुलगा आहे. ज्याच्या मनामध्ये "सुख म्हणजे नेमकं काय आहे?" या विषयावर घेऊन एक शर्य सुरू झाली.आणि ही शर्यत संपेपर्यंत माझ्याकडे हा संवाद तयार होऊन बसलेला होता.

खरं सांगू तर सुखी राहण्याचा असा कोणता सूत्र नाही. आणि असला तरी प्रत्येकासाठी तो काम करणारच अस आहे का?

एकच आयुष्य भेटलेल त्यात नकोत होता नको ती चिंता घेऊन डोक्याला ताप देण्यात काही अर्थ आहे का दादा..!

म्हणून तात्या आपले शिनचैन आणि मिस्टर बी सारखं मस्त मौलाहून जगायचं ना राव.!
आता भलं मोठ आयुष्य आहे आपलं यात थोड्याफार अडचणी तर येतीलच ना.

................................................................................
.................... काय? मंडळी झालं, आपला कार्यक्रम संपला. चला उठा आता बघा जरा इकडे तिकडे काही ना काही आनंदाचे क्षण तर भेटतीलच..
मग बघताय काय? लागा कामाला..!

मी पण येतो. आमच्या दादासाहेबांचं लग्न तर झालं पण, जेवढा पसारा होता तो आवरायचा आहे.

(पलीकडून आवाज आला) कुठे आहेस तू?
मी: हा... आलोच दादा.

चला मग धन्यवाद मंडळी..!

...................................................समाप्त