Zing Zone in Marathi Horror Stories by Akshay Varak books and stories PDF | झिंग झोन

Featured Books
Categories
Share

झिंग झोन

वाम्या एक जुने गोदाम बारमध्ये रूपांतरित करतो, जिथे त्याला एका अपूर्ण स्वप्नात अडकलेला आत्मा भेटतो.

___________________________________

आमचं गाव म्हणजे डोंगराच्या कुशीत विसावलेलं एक छोटंसं ठिकाण. एकमेव दगडांचा रस्ता, एक पान टपरी, आणि सकाळी ८ ते ११ खुलं असलेलं पोस्ट ऑफिस एवढंच काय तर आधुनिक जगाशी कनेक्शन.

गावात एक जून गोदाम होत. पण गावात ‘गोदाम’ म्हणलं की सगळ्यांच्या मनात एकच नाव येतं ते जुनं, मोडकं Warehouse.कधी काळी तिथं गहू ठेवायचे, मग काही काळ भंगाराचं सामान... आणि गेल्या १५ वर्षांपासून ते रिकामं, धुळकट आणि बदनाम झालं होतं.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना ते गोदाम बदनाम का?

तर लोक म्हणतात, "तिथं काहीतरी आहे."

कोण म्हणतं "भूत", तर कोण म्हणतं "शाप".

पण मला, वाम्या शेळक्याला, या सगळ्याचं काही घेणंदेणं नव्हतं.

माझं स्वप्न साधंच होत,स्वतःचा बार उघडायचा. अन त्यात दारू मला खूप आवडायची . मी दारूला व्यसन नव्हे,तर एक प्रकारची मैत्रिणच मानायचो. म्हणून मला वाटायचं माझी स्वतःची एक जागा असावी, जिथं लोक फक्त दारू पिणार नाहीत तर, हसतील,रडतील, आणि शेवटी हलके होऊन घरी जातील. पण खिशात पैसा नव्हता आणि गावात जागा स्वस्तात मिळत नव्हती.

तेवढ्यात ऐकलं.

"ते जुनं गोदाम विकायला आहे."

पण लोकांनी सावध केलं .

"वाम्या, ती जागा नाही, जळलेल्या स्वप्नांचा अड्डा आहे."

"तिथं गेलं की थंडी पडते. श्वास थांबतो. झिंग नाही, थरथरी येते."

पण मी त्यांच्यावर हसलो.

"तुमची थरथरी… माझं थरमाकोल! बघू काय करतो."

"दोन आठवड्यांत मी ते गोदाम विकत घेतलं.

गावाच्या कडेला, एका जुनाट वळणावर उभं असलेलं ते गोदाम – धूळ, कोळ्यांची जाळी आणि पावसाने पोपडे गेलेल्या भिंतींनी भरलेलं.

तोंडात रुमाल धरून मी पहिल्यांदा तिथे पाऊल टाकलं, तेव्हा एक प्रकारचा अज्ञात थंडावा अंगावर आला.

जणू त्या जागेच्या भिंतींना, फरश्यांना आणि छपराच्या तुटलेल्या अँगलनाही आपलं भूतकाळाचं ओझं लपवायचं नव्हतं.खूप घाण झालं होतं म्हणून मी ती जागा साफ करायला घेतली.तासन्‌तास झाडू मारत, डस्टरने भिंती पुसत, मी त्या गोदामाला जीव टाकून जिवंत करायला घेतलं.कधी काळी कुणीतरी प्रेमानं आणि योजनेनं बांधलेली ही जागा… आज धुळीखाली गुदमरून गेली होती.जुन्या धुळीच्या ढिगातून काही गोणपाट, पंख्याचा तुकडा, आणि भिंतीवर “१९८२” अशी एक पुसटशी तारीख मला दिसली.ती तारीख पाहून मी क्षणभर थबकलो.१९८२… म्हणजे माझा जन्मही नव्हता तेव्हा.

कोणीतरी त्या दिवशी काहीतरी महत्वाचं ठरवलं असावं, किंवा कदाचित त्या दिवशी काही अपूर्ण राहिलं असावं.

त्या भिंतीवरची पुसट तारीख जणू काही त्या गोदामाचा साक्षीदार होती – त्या ‘स्वप्नांच्या थांबलेल्या श्वासाची’.

त्या धुळीखाली एक जुना पंखा सापडला – तुटलेला, पण अजूनही काहीसा गोलसर वळणात वाकलेला.

कधीकाळी त्याच्या फळ्यांनी थंडावा दिला असावा… आणि गोणपाट, ज्यावर कित्येक पोती रचले गेली असतील.

त्या साऱ्या वस्तूंनी मला त्या जागेच्या इतिहासाची ओळख करून दिली – जणू मी त्या जागेचा दुसऱ्या जन्माचा साक्षीदार होतो.

मी तिथं एक छोटंसं स्टेज तयार केलं.

माझ्या दृष्टिकोनात, ते स्टेज केवळ मजा किंवा कार्यक्रमासाठी नव्हतं.ते होतं त्या जागेच्या नव्या अध्यायाचं व्यासपीठ. जसं एखादा कलाकार रंगमंचावर उभा राहून प्रेक्षकांसोबत संवाद साधतो, तसं मी इथे प्रत्येक ग्राहकाशी संवाद साधणार होतो,थेट मनातून.

मधोमध मी एक लाकडी काउंटर उभा केला.

जुना पण मजबूत लाकूड – कोरड्या थंड गोदामाला एका उबदार जागेचं रूप देणारा तो काउंटर, जणू माझं आणि ग्राहकांचं मध्यस्थीतलं नातं ठरलं.

भिंतीवर काही जुने फ्रेम्स होत्या. त्यात थोडीफार मोडकी अक्षरं, काही faded रेखाचित्रं, आणि काळ्या-शुभ्र रेघोट्या होत्या. त्या पाहून कळत होतं की – या जागेत एकेकाळी कोणीतरी प्लॅनिंग केलं होतं. बारचं की दुकानाचं माहित नाही, पण त्या फ्रेममध्ये एक हेतू साठवला होता.

स्वप्न – जी पूर्ण होऊ शकली नाहीत…त्या फ्रेम्सकडे पाहताना मला असं वाटलं की मी या जागेचा मालक नाही,

मी एक उत्तराधिकारी आहे – एका स्वप्नाचा, एका न संपलेल्या कथांचा. आणि शेवटी… काउंटरपाठी मागे मी एक फलक लावला.

त्यावर लिहिलं होतं –

"झिंग झोन – इथे झिंग मिळते, पण विसरायचं काही नसतं!"

तोफक्त एक बोर्ड नव्हतं…

ते होत माझ घोषणापत्र.

ते होत त्या गोदामाला नवा श्वास देणार फुंकर.

आणि कदाचित… कुणाच्या तरी अडकलेल्या आत्म्याचं स्वागत.

पहिल्या दिवशी मी काही फारसं गृहित धरलं नव्हतं.

स्वतःचा बार... हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं, पण ‘ग्राहक’ हा शब्द अजूनही स्वप्नातल्याच दुनियेत वावरत होता.

दुपारी बार उघडल्यावर चार पोरं आली.

दोनजण चकना घेऊन आलित. तिसऱ्याने ‘फक्त बघायला आलोय’ असं म्हणून गोंधळ घातला.

आणि चौथ्यानं दारू मागितली... उधारीवर.

मी स्वतःलाच म्हणालो, "झिंग झोन सुरू आहे की 'झिरो प्रॉफिट झोन'?"

पण ‘स्वतःचा बार आहे’ हे एकटं समाधान गालावर स्मित हास्य ठेऊन गेलं.

रात्र झाली.

साडेनऊला गाव शांत व्हायला लागलं. बाहेर कुत्र्यांचं भुंकणं कमी झालं आणि आत पंख्याचा ‘भऽऽऽभऽऽऽऽ’ आवाज भरू लागला.

दहा वाजले.

मी काउंटरवर ठेवलेले रिकामे ग्लास उचलून स्वच्छ करत होतो. अचानक, एक झपाटल्यासारखा थंड वारा आत घुसला. तो वारा झिंग देणारा नव्हता...

तो गारठवणारा होता, हाडांपर्यंत भिडणारा. त्या वार्यासोबतच कायसं न सांगता येणारं वातावरण बारमध्ये पसरलं. ट्यूबलाईट हलली. ती थरथरली. कण्हलीसारखी.

काही क्षण सगळं स्थिर झालं...

आणि मग एक शांत, पण खोलवर झिरपणारा आवाज कानावर पडला:

"वाम्या... खुर्ची ठेवशील का एक माझ्यासाठी?"

माझ्या अंगावर काटा आला मी मागे वळून कोपऱ्यात पाहिलं, तिथे एक जुनी खुर्ची ढिगाऱ्याखाली पडलेली होती, त्या खुर्चीच्या इथं एक पांढऱ्या शर्टातला माणूस उभा होता.तो हलत नव्हता.त्याच्या पायाखाली सावली नव्हती.आणि चेहरा... धूसर होता.जणू पाण्याच्या वाफेतून पाहिल्यासारखा. त्याचे हात रिकामे होते.

काही मागितलं नव्हतं. पण डोळे... ते डोळे,त्या डोळ्यांत न रडलेलं दुःख होतं.न बोललेली हाक होती.आणि सगळ्यात जास्त – एक अपूर्णतेची शांततेतली किंकाळी.

मी बोलू काहीच शकलो नाही.

काही विचारूही शकलो नाही.

पाय आपोआप मागे सरकले, पण नजर हटली नाही.

तो काही घाबरवत नव्हता... पण तरी, अंगावर एक अज्ञात गारवा कायमचा विसावला अस वाट होत.

त्या क्षणाला ‘बार’, ‘व्यवसाय’, ‘ग्राहक’ ही सगळी संकल्पनाच संपली.

फक्त दोन गोष्टी राहिल्या होत्या मी... आणि तो.

आणि त्या कोपऱ्यात...झिंग झोनमध्ये, पहिल्यांदाच... एक अदृश्य पार्टनर उभा होता.

तो कोपऱ्यात शांतपणे उभा होता.

वाऱ्याचा गार झोत त्याच्या अंगातून सरकत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव हलत नव्हता. मी माझ्या घशाखाली उतरलेली थंडी सांभाळत, थोडं पुढे झालो.

आणि मग,

त्याने पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली...

"माझं नाव माधव राव देशमुख..."

आवाज सौम्य होता, पण खोलवर झिरपणारा.

जसा एखादा जुना, काळवंडलेला आवाज – काळाच्या दाराआडून येतो तसा.

"पूर्वी इथंच राहायचो.

या गोदामातच माझं सगळं जग होतं. हाच माझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यासारखा होता."

तो हळूहळू पुढे आला. त्याच्या पावलांचा आवाज नव्हता,

पण प्रत्येक वाक्याने मी भूतकाळात खोलवर ओढला जात होतो.

"या गोदामात बार सुरू करण्याचं स्वप्न होतं.

सगळं प्लॅनिंग केलं होतं – काउंटर कुठे, मेन्यू काय,

दर शुक्रवारी गाण्यांचा कार्यक्रम,

आणि प्रत्येक टेबलवर एक दिवा होता जेव्हा कोणी पिण्याऐवजी बोलायला यायचं, तेव्हा ते दिवे लागलेले असावेत."

तो बोलत असताना, मला त्या गोदामातल्या धुळीतून ती सगळी दृश्यं दिसायला लागली होती –

एक उबदार बार, लोक हसताना, काहींच्या डोळ्यात अश्रू,

आणि माधवराव... त्या सगळ्याच्या मधोमध, हसरा, शांत.

पण मग... आवाज थांबला.

त्याच्या चेहऱ्यावर हलकासा अंधार उतरला.

"पण... आईचं आजारपण आलं.

घराची जबाबदारी अचानक माझ्यावर पडली.

गोदाम झाकून ठेवलं गेलं, स्वप्न लपवून ठेवलं गेलं.

आणि शेवटी... एका रात्री...

हृदय थांबलं."

"शरीर गेलं.

पण मन... मन इथंच थांबलं.*"

तो खूप काही सांगू इच्छित होता, पण त्याचे शब्द आता विरून गेले होते.

त्याच्या डोळ्यांत शून्यता नव्हती ,तिथं एक वादळ दडलेलं होतं, शांतपणे उसळत असलेलं.

मी घोटभर धाडस गिळून विचारलं ,

"मग तुम्ही इथे का थांबला आहात...?"

त्याला हसू आलं ,

ते हसू भयावह नव्हतं,ते हसू शोकमिश्रित होतं…जसं एखाद्या जुन्या फोटोवर अचानक धूळ पुसली जाते – तसं काहीसं.

"एवढं स्वप्न उरलं होतं…

की माझा आत्मा इथंच राहिला.

शरीर गेलं, पण माझं अस्तित्व इथून निघालंच नाही.

कारण इथंच माझं अधुरं आयुष्य साचलेलं आहे.*"

त्या क्षणी, मला तो 'भूत' वाटला नाही...तो एक अधूरं स्वप्न होता.एक न संपलेली कहाणी. एक असा माणूस, जो मेल्यावरही "काय झालं असतं?" या प्रश्नात अडकलेला होता.

तो फक्त एक भुत नव्हता.

तो माधवराव होता.

स्वतःच्या गोदामाच्या कोपऱ्यात उभा राहून,दुसऱ्या कोणाचं स्वप्न फुलताना पाहणारा आणि त्यात स्वतःची पूर्णता शोधणारा.

त्या रात्री मी काहीच बोललो नाही. तो भूत होता की माणूस – हे विचारायचाही धाडस केला नाही. कदाचित मनात तशी गरजच वाटली नाही. त्याचा आवाज, त्याची नजर, आणि त्या कोपऱ्यातली अदृश्य शांतता — सगळं मिळून जणू काही सांगत होतं: “बोलू नकोस. फक्त समजून घे.”

मी एक जुनी, पण सगळी पायं निटस असलेली खुर्ची बाहेर काढली, काउंटरच्या दुसऱ्या बाजूला ठेवली, आणि हळूच एक रिकामा ग्लास ठेवला.तो ग्लास रिकामा असला तरी... त्या रात्री तो पूर्ण भरलेला वाटत होता.

त्या रात्री काहीतरी बदललं होतं.

बारमध्ये, माझ्यात... आणि त्या गोदामात.

पुढच्या दिवसापासून, माधवराव माझा पार्टनर झाला.

तो माझ्यासोबत चर्चा करत नव्हता.भांडत नव्हता.

पण तरीसुद्धा, तो माझ्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक पेगमध्ये, आणि प्रत्येक गाण्यात सामील होता.

एखादा ग्राहक फारच उदास असेल तर, तो असा बसायचा – जणू सगळं संपल्यासारखा.

कुणाचं ब्रेकअप, कोणाचं कर्ज, किंवा फक्त जगण्याचा थकवा.तेव्हा मी साधा एक पेग द्यायचो...

आणि त्यात काहीतरी घडायचं. तो पेग गरम व्हायचा.

नाही म्हणायला बारमध्ये थंडी असे. पण त्या पेगमधून एक उबदार लाट त्या माणसाच्या छातीत उतरायची.

आणि तो माणूस म्हणायचा – "काय रे वाम्या, आज पेग भारीच आहे!"

मी फक्त हसायचो.

पण माझ्या पाठीमागे कोपऱ्यातल्या खुर्चीवर कुणीतरी हळूच समाधानाने मान डोलावलेली असायची.

कोनी उधारी मागितली,किंवा पिल्यानंतर बिल विसरून निघू लागल,

तर अचानक भिंतीवर 'बिल' झळकायचं.

खरं सांगायचं तर, माझ्याकडे डिजिटल स्क्रिन नव्हता.

पण तरी, कोपऱ्यात लावलेला एक जुना सायकलचा नंबर प्लेटसारखा फळा तेवढ्यापुरता ‘रंग बदलून’ ग्राहकाचं बिल दाखवायचा!आणि ते बघून, तो ग्राहक स्वतःच पाकीट काढून म्हणायचा –

“बरं झालं, आठवलं… नाहीतर परत आलोच असतो!”

रेडिओ तर माझ्या बारचा ‘नॉनस्टॉप साथीदार’ होता.

पण अनेक वेळा…एखादी भावना वातावरणात घुटमळू लागली तर तेव्हा कुणीही बटण न दाबता, रेडिओवर वाजायचं –

🎶 “रसिक बलमा…”

किंवा

🎶 “चिंगारी कोई भड़के…”

कधी हळू, कधी अगदी गूंजत.

आणि त्या संगीताच्या लाटेवर कोणी रडायचं, कोणी आठवणी सांगायचं,तर कोणी नाचायचं – एकटाच, पण पूर्ण झिंगमध्ये.

माझा "झिंग झोन" आता फक्त बार नव्हता.

तो झाला होता एक उबदार अड्डा, जिथे आत्मा फक्त दारूत नाही, तर खऱ्याखुऱ्या 'आत्मा'तून सुद्धा झिंग यायची.

मी हसायचो,

तो शांत असायचा.

मी बिल लावायचो,

तो ते वेळेत आठवण करून द्यायचा.मी रुमालाने काउंटर पुसायचो,आणि तो… लोकांच्या मनातली धूळ झटकायचा.

कधी कधी वाटायचं, हे स्वप्न आहे…पण दररोजचा अनुभव सांगायचा. हे स्वप्न नाही, हे स्वप्न पूर्ण करणारा एक भूत आहे.

गावात हळूहळू चर्चा सुरू झाली. सुरुवातीला फक्त हळूच कुजबुज होती – पानटपरीवर, पाणवठ्यावर, आणि चहा टपरीवर "मधल्या घोटा" मध्ये.

"काही तरी वेगळं आहे त्या वाम्याच्या बारमध्ये..."

एखादा कुशल न्हावाचं कात्री फिरवतो तशी,

वाम्याच्या काउंटरवरून हात फिरवताना लोकांच्या मनात शंका नांदायची.

"दारू तर तीच आहे… पण अनुभव काही वेगळाच येतो इथे!"

एका माणसाचं म्हणणं होतं:

"तिथं फक्त झिंग नाही रे…

तिथं सच्चेपण आहे.

जणू एखादी गोष्ट दारूच्या पेगमधून नाही, तर अंत:करणातून उतरते शरीरात."

दुसरं कुणीतरी म्हणायचं:

"माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी मी तिथं विसरलो नाही…उलट पुन्हा आठवल्या… पण वेगळ्याच नजरेनं!"

कोणीतरी तर अगदी भावनिक होऊन म्हणालं,

"तिथं दारूपेक्षा आठवणी जास्त घोटल्या जातात...

आणि त्या आठवणी सुद्धा गरम असतात. जशा माणसाच्या शरीराला नव्हे, तर आत्म्याला गरज असते."

गावकऱ्यांनी माझा बार “स्पेशल” मानायला सुरुवात केली होती. कोणी तिथं बोलायला यायचं, कोणी गुपचूप रडायला, तर काही जण फक्त त्या जुन्या रेडिओवरचं गाणं ऐकायला. कोणी काहीही म्हणो, पण तिथं मौज कमी आणि ‘मनाची जागा’ जास्त वाटायची. अस लोक म्हणायचीत.

पण... कोणीच खऱ्या कारणावर विश्वास ठेवला नाही.

कोणी म्हणालं — वाम्या जादू शिकून आलाय.

कोणी म्हणालं — त्या गोदामात काही औषध टाकलेलं आहे.

कोणी तर म्हणालं — हे 'मार्केटिंग ट्रिक' आहे. ग्राहकांना भावना विकतोय तो.

पण…

कुणालाच कल्पना नव्हती, की त्या बारमध्ये दररोज एक आत्मा खुर्चीवर बसते.

एक माणूस — माधवराव देशमुख — ज्याचं एक स्वप्न अधुरं राहिलं, आणि ते पूर्ण करण्यासाठी,

त्याचं शरीर गेलं, पण त्याचं मन थांबलं… त्या झिंग झोनमध्ये.

त्या रात्री काही वेगळंच होतं.बारमध्ये गर्दी नव्हती, वाऱ्याचाही आवाज थांबला होता, आणि रेडिओ जो नेहमी काही ना काही गुणगुणत असायचा तो आज शांत होता .मी काउंटरपाशी एकटा बसलो होतो,आणि नेहमीप्रमाणे, कोपऱ्यात ती खुर्ची रिकामी नव्हती.

माझ्या मागून हलक्या पावलांचा आवाज आला.

माधवराव होता.नेहमीसारखा पांढऱ्या शर्टात, थोडासा धूसर.पण आज त्याच्यात काही वेगळं झळकत होतं.

एक शांत झळाळी, जणू काही काळजीचं ओझं उतरलं होतं.

तो हसत हळूच म्हणाला:

"वाम्या... आज हलकं वाटतंय."

"माझ्या स्वप्नाला आता रुप मिळतंय.

तू ते जपतो आहेस, त्यात माझी झिंग मिसळतो आहेस."

"पण... अजून थोडा काळ इथेच राहीन."

त्याचा आवाज संयत होता, पण डोळ्यात काहीसं ओलंसं चमकत होतं.

त्याचं बोलणं चालूच होतं…

"हे स्वप्न पूर्ण होतानाचं बघायचं आहे.

लोक हसताना, गाताना, दुःख विसरून एकमेकांच्या नजरेत संवाद साधताना हे सगळं पाहूनच शांतपणे निघायचं आहे."

"माझं जाणंही इथलंच व्हावं – कारण माझं जग इथंच थांबलं होतं."

मी त्याला काहीच बोलू शकलो नाही.कंठ अडखळलेला.

माझ्यासमोर एक ‘भूत’ उभा होता,पण त्या क्षणी तो केवळ एक मनस्वी माणूस वाटत होता. ज्याला फक्त एक गोष्ट हवी होती: स्वप्नाचं समाधान.

तो पुढे आला आणि खुर्चीकडे बोट दाखवून म्हणाला ,

"एक दिवस, जेव्हा मी जाणार...तेव्हा एकच विनंती आहे वाम्या ,ही खुर्ची कायम अशीच ठेव."

"कोणीही त्यावर बसू नये."

मी डोळ्यांत टचकन आलेल्या पाण्याला लपवत विचारलं,

"का रे? एवढी साधी खुर्ची… काय एवढं महत्व आहे तिला?"

माधवराव हसला.

ते हसू एकदम नितळ होतं.

न भितीदायक, न दुःखद... एकदम शांत.

"कारण त्या खुर्चीत फक्त एक आत्मा नाही बसलेला...

तर एक अधुरी भावना बसलेली आहे."

"ती भावना आज तुझ्या बारात पूर्ण होऊ पाहते आहे."

त्या क्षणी वेळ थांबलेला वाटला.दारू, काउंटर, बियर, उधारी – सगळ्या गोष्टी फार क्षुल्लक वाटल्या.त्या खुर्चीवर एक भावना बसलेली होती. अधूरी, तरी तीच बाराची ओळख होती.

तेव्हापासून ती खुर्ची तशीच आहे.पुसली जाते, पण हलवली जात नाही.कोणी विचारलं, तर मी फक्त म्हणतो

"ही खुर्ची आरक्षित आहे."

"एका स्वप्नासाठी."

ती खुर्ची आता फक्त एक जागा नाही,ती आहे, एक अधुरं स्वप्न, जे दुसऱ्याच्या हातून पूर्ण होतंय, याचं जिवंत स्मारक.

आजही…प्रत्येक रात्री, मी बार बंद करतो तेव्हा, कोपऱ्यातली तीच खुर्ची तिथंच असते.

न हललेली.

न कोणी बसलेली.

पण रिकामी? — नक्कीच नाही.

जुन्या रेडिओवर हलकंसं गाणं वाजत असतं.

कधी “आज जाने की जिद न करो…”,

तर कधी “कुछ तो लोग कहेंगे…”

आणि त्या गाण्याच्या सुरवातीस… मी हळूच एक रिकामा ग्लास त्या खुर्चीसमोर ठेवतो.

दररोज.आणि वेळेत.अश्रूच्या नव्हे… तर आदराच्या श्रद्धेने.

तो ग्लास खरंतर रिकामा असतो.पण कधीच 'रिकामा' वाटत नाही. त्यातून दारूचा वास येत नाही,पण झिंगची उब येते.त्या ग्लासात बुडवलेलं दुःख नसतं, पण एक शांत समाधान साचलेलं असतं.

कधी कधी वाटतं…त्या खुर्चीवर कुणीतरी मान डोलावतो.

जसा म्हणतो , "चांगलं जपत आहेस, वाम्या.

मी आता गेलो, पण माझी झिंग इथेच राहू दे."

मी फक्त डोळे मिटतो.तेव्हा त्या रात्रीचा गार वारा

माझ्या गालावर थोपटून जातो… जसा एखादा जुना मित्र “बास झालं रे” म्हणतो तसा.

झिंग झोन आता फक्त बार नाही. ती एका आत्म्याची स्मृती आहे. एक स्वप्न… जे पूर्ण झालं, पण पूर्णत्वाचा आवाज नाही तर फक्त एक शांत गारवा सोडून गेला.

आणि ती खुर्ची…ती अजूनही तशीच आहे.

खुर्चीवर मी कधी धूळ बसू देत नाही.कोणी विचारलं तर मी हसत म्हणतो —

"ही खुर्ची आरक्षित आहे.एका आत्म्यासाठी नाही तर,

तर एका अधुरी भावना पूर्ण झाल्याच्या समाधानासाठी."

माधवराव गेला…पण त्याच्या झिंगचा गारवा,आजही प्रत्येक रात्री बारच्या कोपऱ्यात हलकेच विसावते.

-अक्षय वरक

_______________समाप्त_______________