Vayangibhoot - 3 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | वायंगीभूत - भाग 3

Featured Books
Categories
Share

वायंगीभूत - भाग 3

                           

दणदणा  तोडगा घेवून आला नी दुसऱ्या दिवशी तो शिपणं करायला गेला. चाळीसेक लाटा मारल्यावर लाट थांबवून दुसऱ्या  ओळीत पाणी परतायला तो गेला नी बघतोतर  सगळ्या ओळीत पाणी तुडुंब भरलेलं होतं. आश्चर्याचा भर ओसरल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा त्या वायंग्याच्या चेड्याचा प्रताप होता. बागेत फिरून  फिरून पडलेल्या सुपाऱ्या, नारळ पुंजावतानाही हाच चमत्कार व्हायचा. ओंजळ्भर सुपाऱ्या ठेवून बाबु पुन्हा  पडीच्या सुपाऱ्या  पुंजावून आणी पर्यंत  मूळ जागी चौपट नग वाढलेले असत. कणगीतून  भात उसपताना दोन चार मापटी उसपून पोत्यात ओती पर्यंत पोतं तोंडोतोंड भरत असे नी  कणगीतून उसपल्यावरही  कणगीतला साठा कमी होत नसे. ओसरीवर कपाटाच्या हडप्यात  ठेवलेली कापडी लुकटी काढून त्यातले रुपये बाबु मोजायला लागला की बघता बघता रुपयांचा ढीग वाढत जाई. वाटेल्यानी भात, नाचणे किंवा कडधान्याचीअर्धल आणून  ओसरीवर  टाकलेनी की बाबू त्यांनी आणलेले पोते कणगीत  किंवा कोठारात ओतीत असता ओतलेले धान्य ओती ओती पर्यंत दुप्पट  वाढतअसे.

            या गोष्टी लक्षात आल्यावर बाबु दणदण्याची जशी चलती सुरू झाली. कपाटाच्या हडप्यातले रुपये मोजून बाबूने चार गठळी साठवली. पंधरा वीस दिवसात शिरसाटाकडे गहाणवट टाकलेला ऐवज त्याने   चढ्या दराने व्याजासह रक्कम भागवून सोडवून आणला. दोन्ही हातांच्या बोटात   सोन्याचीवळी आणि  गळ्यात  गोफ घालून बाबू दणदणा रुबाबात फिरायला लागला. वाटेत कोण भेटेल त्याला कमरेच्या पिशवीत हात घालून चार ओले बेडे, चवडभर खायची पानेनी भली खाशी तंबाखूची चिमूट तो द्यायचा. कधी कधी बसून पान खाताना  पिशवीत ठेवलेली  माडाची पात दिसायची, हा लोकांच्या कुतुहलाचा विषय होता.  त्याच्या पिशवीत कायम  माडाच्या हिरव्या पातीचा तुकडा  असतो ही गोष्ट षटकर्णी  झालेली होती. पातीचा तुकडा  बघून कोण कोण चौकशी करीत.त्याना  बाबु हसून सांगे," तो म्हणशा तर  माजो खुळेचार आसा. आता मी काजऱ्याची बी खातय् ना?तेतलोच ह्यो पर्कार. " पण त्याची अकस्मात चलती सुरू झालेली  लोकांच्या नजरेत आलेली होती. त्यामुळे त्याचा काहीतरी संबंध पातीच्या तुकड्याशी असावा  असा  चाणाक्ष लोकाना दाट संशय  असे. कोणी कोणी आगावूपणे पान खाताना हळूच  पातीचा तुकडा उचललाच तर बाबू हिरवा पिवळा होत घेणाराची मानगूट धरून त्याच्या हातातला तुकडा हिसकावून घेत असे. " पुन्नारुपी असो आगावपान क्येलस तर माज्यासारखो वायट् कोन नाय..... मी व्हाणेन् मारीन......" बाबू  दम भरी.  

          रवळनाथाच्या देवळात वार्षिक रखवालीचा नारळ द्यायला बाबू  गेला. सभामंडपात बळाणीवर तो  टेकला नी कौल प्रसाद घ्यायला आलेल्या फुकट्यानी पान खायला त्याच्या भोवती गराडा घातला. पान खावून गाव गप्पा सुरू झाल्या. गप्पा मारतामारता बळी गावड्याने मुंड्याच्या खिशातून चिलिम काढली. तो पट्टीचा गांजेकस होता. चिलिमीत तळी नखभर तंबाखू  भरून त्यावर गांज्याची गोळीठेवून चिलीम फुलवली. एक जोरकस दम मारून चिलिम दुसऱ्याकडे दिली. तिघाचौघानी  एकेक दम मारून चिलिम दणदण्याकडे दिली. त्याने  दम मारीपर्यंत चिलिम विझली. मग बळीने मुंड्याच्या खिशातून नखभर तंबाखू काढून त्यावर दुसरी गोळी दाबून काडी पेटवून लावली. दणदण्याने फाकफूक करून  लागोपाठ दोन तीन दम मारले. त्याने तिसरादम मारला नी  दणदण्याला जोरदार ठसका लागून वरचा जीव वर नी खालचा जीव खाली अशी अवस्था झाली. नाकातोंडातून धूर बाहेर पडून गेल्यावर कपाळ सुन्न झाले नी  बळाणीवर  मागे  आडवाहोवून डोके टेकून त्याने डोळे मिटून घेतले. हा आता पाच दहा मिनीटे तरी असा पडून राहणारहे ओळखून बळीने त्याला आडवा करून सारखा झोपवला. त्याची पिशवी गुठाळून ती उशागती असलेल्या दगडी खांबावर ठेवली.

         दोन तीन घंटे उलटले तरी बाबू तसाच निपचित पडून राहिलेला होता. कौल प्रसाद संपलेनी लोक उठून गेले. मग कौल प्रसाद घेणारा दाजी घाडीही उठून निघून गेला. संध्याकाळी काळवं पडता पडता दणदण्याला शुद्ध आली तो डोळे चोळीत बसता झाला. जरा वेळ गेल्यावर तो पूर्ण शुद्धीत आला. तहानेने घशाला कोरड पडलेली होती. देवाच्या कट्ट्यासमोरची कळशी उचलून तशीच तोंडात ओतून दहा बारा घोट गिळल्यावर  बाबु भानावर आला. पोटात भुकेची खाई पेटली होती. तो तसाच उठून घरच्या वाटेला लागला. पावळीत वहाणाकाढून डोणग्यातले पाणी पायावर घेवून तो ओटीवर जावून टेकला. स्वयंपाक घराकडे मोहरा वळवून त्याने फर्मान सोडले." माज्या पोटात नुस्ती आग़ पेटली हा जा काय असात ता ताटात  वाडून घेवन् ये ग्ये घरणी....."  भाकऱ्या थापणं सुरूच होतं. त्याची वर्दी गेल्यावर मोठ्या भावजईने लगेच दोन भाकऱ्या बचकाभर लोणचं  नी  अच्छेरी  विरजणाची बरणी घेवून ओसरीवर ताट मांडून दिले. बाबू जेवायला बसला. रोजच्या पेक्षा दुप्पट  भाकऱ्या पोटात गेल्यावर भुकेची आग शमली. घटाघटा तांब्याभर पाणी पिवून बाबु हात धुवायला उठला.

        हात धुवून आल्यावर पान खायची तल्लफ आली तेव्हा कमरेला पानाची पिशवी नसल्याचे  त्याच्या लक्षात आले  नी त्यावेळी बळाणीवर बसून गांजाचे दोन तीन दम मारल्यावर आपल्याला जीवघेणा ठसका लागला नी  डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे झाले. नंतर  जाग आली नी देवाच्या कट्ट्यासमोरची कळशी उचलून आपण पाणी प्याले. पोटात भुकेचा नुसता आग़डोंब उसळलेला नी त्या तंद्रीत आपण घर गाठले इतपत स्मरण झाले. या सगळ्या घटनाक्रमात कमरेच्या पिशवीची आठवणच आपल्याला झाली नाही. म्हणजे देवळातून निघताना आपण पिशवी घ्यायलाच विसरलोअसा विचार करून आता तडक देवूळ गाठून पिशवी ताब्यात घ्यायची असे ठरवून फाणस घेवून तो चालत सुटला. चपला काढीत असताना तिथे ठेवलेला आपला दांडा त्याने ओळखला. मग तो पायऱ्याचढून आत गेला. बळाणीवर पिशवी नव्हती. त्याने अख्ख्या देवूळभर शोध शोध शोधले पण पिशवीचा काही पत्ता लागला नाही. दणदणा कमालीचा हताश झाला. आपण कालच पाती बदलली होती म्हणजेअजून दोन दिवस तरी  पाती सुकणार नव्हती. तोपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर पिशवी नाही मिळाली नी पाती सुकली तर ...... पुढच्या विचारानेच बाबुच्या पोटात खड्डा पडला.  (क्रमश: )