इंद्रवनाचा शाप - 1 in Marathi Fiction Stories by Vinayak books and stories PDF | इंद्रवनचा शाप - 1

The Author
Featured Books
Categories
Share

इंद्रवनचा शाप - 1

Chapter 1 – सुवर्ण किनारे, काळी सावली

इंद्रवन–संपन्नतेचा मुकुट मिरवणारं एक अभेद्य राज्य. राजधानी धर्मनगरीच्या भिंतींवर सूर्यकिरण सोनेरी रंग उधळत, तर बाजारपेठांमधून मसाल्यांचा आणि फुलांचा सुगंध दरवळत असे. समुद्रकिनाऱ्यावरचे मोत्यासारखे वाळूचे कडे, आणि दूरवर निळ्या लाटांवर तरंगणारी व्यापारी जहाजं हीच इंद्रवणची ओळख होती.

गादीवर नुकताच बसलेला राजा विरधवल, शौर्य व न्यायासाठी प्रसिद्ध. त्याची साथ देणारी ज्ञानी राजमाता जाहन्वी, रणभूमीवर वीजेसारखा भासणारा सेनापती रणभीम, आणि नौदल सेना प्रमुख चंद्रसेन या चौघांच्या हातात इंद्रवणचा श्वास धपापत होता.
..

सिंहासनकक्षात आज नेहमीपेक्षा अधिक तणाव जाणवत होता.

राजा विरधवल: “चंद्रसेन, यवन देशाकडे गेलेल्या आपल्या तीन व्यापारी जहाजांचा पत्ता लागला का?”

नौदल प्रमुख चंद्रसेन: (गंभीर) “महाराज, किनाऱ्यावरील पहारेकरी सांगतात की ती जहाजं ठरलेल्या वेळी परतलीच नाहीत. समुद्र शांत होता… पण कुठे गायब झाली, हे कुणालाच ठाऊक नाही.”

सेनापती रणभीम: “कदाचित यवन बंदरात उशीर झाला असेल?”

चंद्रसेन: (संयमाने) “हो, रणभीम, ती शक्यता नाकारता येत नाही. आपण काही दिवस वाट पाहू. मात्र…”

दरबारात शांतता पसरली.

समुद्राच्या लाटांचा मंद गडगडाट दरबारात ऐकू येतो, जणू कुणीतरी दूरवरून ऐकत आहे…

    —
दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवला तेव्हा..
इंद्रवणचे सुवर्ण किनारे आजही झगमगत होते, पण त्या सकाळी हवा काहीतरी अनोळखी सांगत होती… 

राजवाडा समुद्रकाठच्या कड्यावर वसलेला. गडाच्या भिंतींवर सागराच्या खाऱ्या वाऱ्याने थोडासा पांढरट थर चढला होता. सकाळच्या घंटानादानंतर दरबारासाठी लोक आत जमत होते.
राजा वीरधवल त्या सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शस्त्रगृहात तलवारीचा सराव करत होता. अंगावर पांढरा कापडी अंगरखा आणि कमरेला सोन्याचा कड्यासह बांधलेली तलवार – राजघराण्याची ओळख. सराव संपताच त्याचा विश्वासू सेनापती रणभीम नमस्कार करून म्हणाला –

रणभीम: "महाराज, यवन देशातून आलेला दूत अद्याप पोचला नाही."

वीरधवल (हसत): "कदाचित यवन देशाच्या बंदरात उशीर झाला असेल. जहाजांची वेळ समुद्र ठरवतो, माणूस नाही."

तेवढ्यात नौदल प्रमुख चंद्रसेन दरबारात येऊन नकाशावर नजर टाकत म्हणाला 

चंद्रसेन: "आपल्याला थांबावंच लागेल महाराज… पण आज पहाटे पहारेकऱ्यांनी दक्षिणेकडच्या किनाऱ्यावर विचित्र चिन्हं पाहिली आहेत. पायाचे ठसे… पण मनुष्यापेक्षा उंच आणि जड."

वीरधवलने थोडा विचार केला.

वीरधवल: "समुद्रकिनाऱ्यावरचे ठसे म्हणजे काहीतरी साधं नाही. लक्ष ठेवा. दूत आला की त्याची चौकशी करू."

थोड्याच वेळात दरबार भरतो–
दरबारात नेहमीचा गडबडाट. मंत्री, सरदार, व्यापारी आपापल्या अर्ज घेऊन उभे.
राजा विरधवल गादीवर बसलेला, बाजूला राजमाता जाहन्वी, समोर सेनापती रणभीम व नौदल प्रमुख चंद्रसेन.

दरबारातील चर्चा सुरू असतानाच बाहेरून गडबड ऐकू आली. राजसेवक दरवाजातून धावत आत आला –
"महाराज! एक म्हातारा रडत ओरडत आला आहे. त्याला ताबडतोब भेट हवी आहे."

वीरधवलने मान डोलावली.
थोड्याच वेळात, पांढरे केस, मीठ–मिरची दाढी आणि डोळ्यात भयानक भीती,त्याच्या डोळ्यात पाणी, ओठ थरथरत. त्याचे पाय रक्ताने माखलेले, आणि श्वास धापा टाकत होता जणू तो अनेक कोस धावत आला होता.

म्हातारा (ओरडत): “महाराजा! वाचवा… माझं गाव वाचवा!”
(तो दरबारातच कोसळतो)

राजा विरधवल (गंभीर आवाजात): “उठा, बाबा..शांत व्हा आणि नीट सांगा, काय घडलं?”

म्हातारा (श्वास सावरत): “गाव… आमचं गाव… रात्री काळ्या धुक्यात झाकलं गेलं. आणि… आणि ते आले!
माणसासारखी आकृती… पण उंचं आपल्या कोणत्याही माणसापेक्षा उंच! डोळे लाल… दात धारदार…
त्यांनी गाव लुटलं… गावकऱ्यांना ठार मारले आणि समुद्राच्या लाटांमध्ये नाहीसे झाले!”

दरबारात पसरलेली कुजबुज. काही सरदारांच्या चेहऱ्यावर भीतीची छटा.

रणभीम (पुटपुटत): “हे… शक्य आहे का?”

राजा विरधवल (थंड पण ठाम आवाजात): “तुम्ही म्हणत आहात, ते समुद्रात गेले? माणसं… समुद्रात?”

म्हातारा: “महाराजा, ते माणसं नाहीत… ते समुद्र पिशाच होते!

म्हाताऱ्याच्या तोंडून “समुद्र पिशाच” हा शब्द बाहेर पडताच, राजा विरधवल क्षणभर गप्प झाला.
त्याच्या डोळ्यात क्षणातच बालपणातील आठवणी तरळल्या-
राजमहालातील मंद दिव्यांच्या उजेडात त्याची आजी,
कपाळावर चंदनाचा टिळा लावलेली, मंद आवाजात सांगणारी ती आख्यायिका—
“कधीकाळी समुद्राच्या गाभाऱ्यात राहणारे राक्षसी जीव किनाऱ्यांवर हल्ला करत, जहाजं फोडत, आणि माणसं ओढून नेत असत. इंद्रवणच्या महान सेनांनी त्यांचा नाश केला… आणि त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत.”

तो तेव्हा लहान होता, पण त्या कथेतले रक्तलाल डोळे, धारदार दात आणि समुद्राच्या गाभाऱ्यात ऐकू येणारा विचित्र गडगडाट — हे सगळं आजही त्याच्या मनात जिवंत होतं.
तोपर्यंत त्याला वाटत होतं की ती फक्त मुलांना घाबरवण्यासाठी सांगितली जाणारी गोष्ट होती.
पण आज… दरबारात उभा असलेला तो थरथरता म्हातारा, आणि त्याच्या डोळ्यातली खरी भीती, हे सगळं त्या “कथेला” वास्तवाची छाया देत होतं.

राजाने नकळत आपला मुठ घट्ट आवळला.
“जर हे खरं असेल… तर इंद्रवणच्या सिंहासनावर बसणारा मी पहिला राजा असेन ज्याला त्यांच्याशी सामना करावा लागेल,” तो मनोमन म्हणाला.