Brahma Chaitanya Gondvalekar - Name is great. in Marathi Motivational Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | ब्रम्ह चैतन्य गोंदवलेेकर - नाम महात्म्य.

Featured Books
Categories
Share

ब्रम्ह चैतन्य गोंदवलेेकर - नाम महात्म्य.

                  🌹  नाम  महात्म्य ! 🌹                         अत्यंत समाधानाची तुर्यातीत अवस्था जो संत प्राप्त करतो त्याला संत म्हणतात. असा संत जेंव्हा लोकसंग्रह करू लागतो तेंव्हा अक्षरशः हजारो जीव (मनुष्य प्राणी)आत्मज्ञानाच्या मार्गाला लागून समाधानाची अवस्था गाठतात. असे संत निर्माण होणे हे त्या समाजाचे महद्भाग्यच समजायला हवे.

   श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज हे अशाच श्रेष्ठ श्रेणीतील थोर संतापैकी एक होते. भगवंतांनी गीतेत सांगितल्या प्रमाणे "जन्म कर्मच मे दिव्यम" हे वचन त्यांच्या जीवनात पदोपदी प्रत्ययास येते. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे, त्यांचा व्यवहार, त्यांची शिकवण, त्यांचे चारित्र्य या सर्वांना दिव्यत्वाचा स्पर्श असल्यामुळे आजही त्यांचे स्मरण अत्यंत आनंद व समाधानाची अनुभूती देते. आपल्या प्रवचनातून त्यांनी सतत ईश्वराच्या (रामनाम) नाम चिंतानाचा महिमा सांगून नाम स्मरणार्थ भाविक भक्तांना मार्गदर्शन केले. हजारोना नामस्मरणाची गोडी लावून भक्ती मार्गाला लावले.

    नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, हीं क्रीडा त्या भगवंताची सतत चालु असते.पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे, ही केवढी विलक्षण लीला आहे ! महाराज पुढे सांगतात, "खरोखर, तुम्हाला मी काय सांगू ! बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे, अजून नामाचे माहात्म्य संपत नाही. नामाचे माहात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात 'मी' पणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या माहात्म्याची कल्पना आली. असा पुरूष नामाविषयीं मौन तरी धरील, कारण त्याचे माहात्म्य कोणालाच सांगता येणार नाही; किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे माहात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही, आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही. नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते.नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे, कसे ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. ते लहान थोर, ज्ञानी अज्ञानी सर्वासाठी सुगम व सुलभ आहे." वेदांच्या मंत्रांचा आरंभ ॐकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणूनच देवऋषी नारद मुनी अहोरात्र "नारायण नारायण " नाम स्मरणात दंग असतात. नाम अगदी सहज घेतले गेले तरी त्याचा उद्दार झाल्याशिवाय राहत नाही. पापी आजामीळाने अंतःकाळी "नारायण"  म्हणून पुत्राला हाक मारली तेव्हढया पुण्याईने उद्धार झाला हे सर्वज्ञात आहे.अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते; पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती, वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे. नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत्‌ म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, नाम हे साक्षात्‌ भगवंताकडे पोहोचवते. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात, कारण या दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे, आणि नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय, भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल ?

      प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे,त्याच्या स्मरणात राहावे, आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे.

          -----------------------------------------------

                मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.