Contact list in Marathi Comedy stories by Arjun Sutar books and stories PDF | कॉन्टॅक्ट लिस्ट

Featured Books
Categories
Share

कॉन्टॅक्ट लिस्ट

मोबाइलमधली कॉन्टॅक्ट लिस्ट समोर तर दिसते, पण नेहमीच दुर्लक्षित राहते
तंत्रज्ञानाने अनेक पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे तिच्याकडे आता म्हणावे तसे लक्ष जात नाही.
आपल्याला हवा तो नंबर शोधा आणि समोरच्याला कॉल करा – एवढंच काय ते कॉन्टॅक्ट लिस्टचं काम राहिलेलं आहे.

आज कितीतरी महिन्यांनी मोबाइलमधली कॉन्टॅक्ट लिस्ट चाळली, आणि मग जाणवलं –
ही तर मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच चालली आहे!
कधी काळी शंभर-दोनशे नंबर असणारा हा आकडा कधी 1500 च्या वर गेला, हे समजलंच नाही.
त्या फुगलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टकडे पाहून मनात एक विचार आला –
👉 “खरंच एवढे लोक आपले ओळखीचे आहेत का? की ही फक्त नावांची गर्दी आहे?”

इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किंवा यूट्यूबचे सब्स्क्राइबर्स जसे वाढत जातात,
तशीच ही कॉन्टॅक्ट लिस्टही वाढत गेली आहे असं वाटू लागलं.
मग ठरवलं – थोडी साफसफाई हवी.
सर्वप्रथम जुन्या-नव्या कंपन्यांचे नंबर बाजूला केले.
कंपनी बदलली की सोबतचे लोकही बदलतात.
शहर बदललं की नवीन ओळखी होतात.

मग जे नंबर फक्त एकेरी नावाने सेव्ह केले होते, त्यांच्याकडे मोर्चा वळवला…
आणि गाडी अडकली – ‘आलिया’ या नावावर!
डोकं खाजवत बसलो –
“ही आलिया कोण? माझ्या फोनमध्ये हिचा नंबर कसा आला?” 🤔
नाव एवढं कॉमन की ओळख पटवणं अवघड.
घरी विचारावंसं वाटलं, पण लगेच विचार बदलला –
“‘आलिया कोण आहे?’ असं विचारलं तर नंबरपेक्षा जास्त प्रश्नांचा भडीमार होईल.” 😅

स्वतःच तपास सुरू केला – व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक...
पण काहीच हाती लागलं नाही.
शेवटी एकच पर्याय उरला – थेट कॉल.
पण त्यांनी मला ओळखलं आणि मी त्यांना नाही, तर उगाच माझी नाचक्की!
म्हणून कॉल करणं टाळलं.
त्याऐवजी मेंदूला अजून ताण देऊन आठवणींवर जोर दिला…

आणि समोर ड्रेसिंग टेबलवर लक्ष गेलं… हळूहळू थोडं चित्र स्पष्ट होऊ लागलं.
एकदा दुबईतील भारतीय दूतावासात गेलो होतो.
तिथे मोबाइल, बॅग काहीच आत नेता येत नाही – फुल सिक्युरिटी.
सगळे लोक शांत बसलेले.
काही लोक पेपर चाळत होते, पण माझ्या नशिबी वाचायला मिळालं ते फक्त जाहिरातींचं पान!
मी टोकनकडे एकटक बघत बसलो होतो आणि आपला नंबर कधी येईल याची वाट पाहू लागलो,
तेवढ्यात शेजारच्या बाईंनी विचारलं –
“तुम्ही पण पासपोर्टसाठी आला आहात का?”
मनात आलं –
“अरे वा, कुणीतरी माझ्यासारखाच या गंभीर वातावरणाला कंटाळला आहे आणि बोलायला उत्सुक आहे!”

आणि मग काय, सुरू झाली गप्पांची मैफल.
मुंबईपासून ते सौदी-दुबईपर्यंतच्या चर्चा रंगल्या.
त्यावेळी समजलं – तिचा पासपोर्ट सौदीत हरवला होता आणि त्याच्या चौकशीसाठी ती इथे आली होती.
तिने स्वतःची ओळख ब्युटिशियन अशी करून दिली.
तिचं कामाचं शेड्यूल ऐकून मला फारच नवल वाटलं –
या क्षेत्रात किती मागणी आहे, आणि त्यात पैसा देखील!
विशेष म्हणजे इथे महिला पैसे देण्यासाठी घासाघीस करत नाहीत, हे तिच्याकडून समजलं.
तिच्या समोर तर मी अगदीच बिनकामाचा वाटायला लागलो –
ना अपॉइंटमेंट्स, ना कुणी विचारणारे… फक्त ठरलेल्या वेळेत ऑफिसला जाणं एवढंच! 😁

बराच वेळ गप्पा झाल्यावर तिने जाताना स्वतःचा नंबर दिला –
“तुमच्या बिल्डिंगमधल्या ओळखीच्या लोकांना ब्युटीविषयक सल्ला लागला तर नक्की कॉल करा.”
जाता-जाता माझ्यासाठी एका क्रीमचं नावही सुचवून गेली.
मी बाहेर पडलो आणि तो नंबर तिथेच विसरलो.

पुन्हा एक विचार मनात आला –
उद्या जर घरच्यांनी कॉन्टॅक्ट लिस्ट उघडली आणि अशा नावांबद्दल चौकशी केली,
तर अशा कितीतरी नंबरांचं स्पष्टीकरण कसं द्यायचं? 😅

शेवटी ठरवलं –
मागच्या सहा महिन्यांत ज्यांच्याशी खरंच संपर्क झाला आहे, तेच नंबर ठेवायचे.
आणि लक्षात आलं –
असे नंबर तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत!

म्हणजे ही जी कॉन्टॅक्ट लिस्टची गर्दी आहे,
ती तर मुंबई लोकल प्रवासासारखीच –
रोज दिसतात, पण बोलणं मात्र कधीच नाही.
तसेच काही लोक रोज ऑनलाईन दिसतात, पण संवाद मात्र होत नाही.
👉 ज्यांच्यासोबत एका वर्षात एकदाही बोलणं झालं नाही,
ते नंबर मोबाइलमध्ये ठेवून गर्दी कशाला करायची?
उगाच भविष्यात प्रश्न पडायला… 😄
ओळख ही फक्त कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाही तर आठवणींमध्ये सेव्ह करायला हवी