*कावळ्याचा निबंध*
माझा आवडता पक्षी *कावळा* या विषयावर शालेय जीवनात कधी निबंध लिहिता आला नाही. माझा आवडता पक्षी मोर किंवा फार तर पोपट इतकच आम्ही लिहीत राहिलो. आम्ही शिकत होतो तेव्हा इयत्ता दुसरीच्याच पुस्तकात *चतुर कावळा* असा धडा होता. त्यात कावळ्याला खूप तहान लागते. खूप भटकून त्याला कुठे पाणी प्यायला मिळत नाही. खूप थकल्यावर त्याला एक रांजण दिसतो. मात्र तो रांजण खूप मोठा असून त्याच्या तळाशी अगदी थोडेसेच पाणी असते.तळाशी असलेलं पाणी कसे प्यावे या विचारात असतांना कावळ्याने आपल्या चोचीतून एकेक दगडाचा खडा आणून त्या रांजणात टाकत राहिला. खूप साऱ्या दगडाचे खडे त्या रांजणात टाकल्यानंतर पाणी वर आले.कावळा ते पाणी पिऊन तृप्त होऊन भूर्र्र्र्र उडून निघून गेला. असा हा चतुर कावळा.
पुढे आम्ही आणखी इयत्तांपर्यंत शिकलो परंतु आमच्यापैकी एकालाही *माझा आवडता पक्षी कावळा* असा निबंध लिहावासा वाटला नाही. का ते माहित नाही. कावळा चाणाक्ष नजरेचा असतो. असं म्हटलं जातं की,आपण वेळप्रसंगी कोणत्याही पक्षाची शिकार करू शकतो. मात्र कावळ्याची शिकार करणे अशक्यच. आज पर्यंत कावळा दोनच कारणाने मेला.एक तो वयोवृद्ध झाल्यावर आणि दोन तो लाईटच्या तारेला शॉक लागून मेल्यावर. इतर कोणत्याही कारणाने कावळा मेलेला पाहता येत नाही. का? तर त्याची नजर चाणाक्ष असते. अशा या चाणक्ष कावळ्यावर निबंध लिहावा असं का आमच्या कोणाच्या मनात आलं नाही? काही कळत नाही.
मागच्या काही वर्षांपूर्वी एक सिनेमा पाहिला.कावळ्याच्या स्पर्शाचा सिनेमा येऊ शकतो अशी कुठल्या मराठी रसिकाला कल्पना सुद्धा नसेल. परंतु एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांने ते केलं देखील. *काकस्पर्श* असं त्या सिनेमाचं नाव. आपल्याहून लहान असलेला भाऊ मरून जातो. त्याची पत्नी विधवा होते. या विधवा पत्नीचा स्वीकार आपल्या मोठ्या भावाने पत्नी म्हणून करावा.अशी इच्छा त्या मृत झालेल्या लहान भावाची असते.इच्छा पूर्ण करण्याचं वचन मोठा भाऊ पिंडदान विधी वेळी मनातल्या मनात करतो.तेव्हा एक कावळा त्या पिंडाला स्पर्श करून उडून निघून जातो. असा झाला *काकस्पर्श.* अर्थात कावळ्याचा स्पर्श.
परिसर अभ्यासाच्या दृष्टीने कावळ्याकडे पाहिले तर कावळ्याला स्वच्छता दूत म्हटल्यास योग्य ठरेल. कारण निसर्गात अन्य मृत झालेल्या पशूपक्षांच्या शरीरातून जे जीवजंतू बाहेर पडतात ते जीवजंतू कावळा आपल्या चोचीने गिळंकृत करीत असतो.व अन्य ठिकाणचे अशा प्रकारचे घाणेरडे पदार्थ जे अन्य कुठला प्राणी खात नाही ते कावळा खात असतो.म्हणून तो स्वच्छता दूत योग्य ठरतो.
परिसरात पडलेले काटे कुटे, काट्यांची फांदी,गंजलेल्या लोखंडाच्या तारा अशी साधने कावळा आपल्या चोचीत धरून नेऊन झाडावर एक छान घरटं बांधतो. यासाठी तो सुबक सोपी सामूग्री वापरीत नाही. काटे तारा टोचून माणसाला व इतर प्राण्यांना टोचून काही बाधा होऊ शकते. नेमका हाच अडसर कावळा दूर करतो. व याच सामूग्रीचं घरटं कावळा आपल्या पिलांसाठी बांधित असतो.कधीमधी तर कोकिळाच या घरात घुसखोरी करते व आयत्या घरावर ताबा मिळविते. मात्र ती गाते गोड म्हणून तिचा अपराध आम्ही पिढ्यांपिढ्या विसरत आहोत. पुराणात वाचलेली एक गोष्ट कोणीतरी योगी घोर तपश्चर्या करून अशाच काट्यांच्या शय्येवर नियमितपणे झोपत असे. मात्र कावळा काट्यांच्याच घरट्यात कायम राहतो. आपली लहान बाळं सुद्धा तो याच काट्यांच्या घरात संगोपन करीत असतो. मात्र कावळ्याचं कौतुक अशावेळी कोणी करीत नाही. अशावेळी कावळा शूद्रच ठरतो. गुणवत्ता असूनही केवळ शूद्रपणासाठी त्याला डावळलं जातं काहीही निकष लावतात हे बुद्धिवंत.तरीही कावळा अमुक एका दिवसासाठी इतका आवश्यक असतो की, या दिवशी काही ठिकाणी कावळा चक्क भाड्मायाने सुध्दा दिला व घेतला जातो.माझ्या बुद्धी विकासानुसार कावळ्यावर निबंध लिहिणारा आतापर्यंतचा केवळ मीच एक असावा असा माझा समज आहे. असा हा कावळा पक्षी मला मनापासून खूप खूप आवडतो.
निबंध संपला.
लेखन
संतोष रामचंद्र जाधव
शहापूर जि.ठाणे 7507015488