Good character and good thinking required in Marathi Children Stories by Ankush Shingade books and stories PDF | चांगला स्वभाव व चांगले विचार आवश्यक

Featured Books
Categories
Share

चांगला स्वभाव व चांगले विचार आवश्यक

चांगल्या संस्कारासाठी चांगले विचार व चांगला स्वभाव आवश्यक?

          स्वभाव....... स्वभाव जर चांगला असेल तर दूरची मंडळीही जवळ येतात. अन् स्वभाव जर वाईट असेल तर जवळची मंडळीही दूर जातात. उदाहरण द्यायचं झाल्यास रावणाचं देता येईल. रावणाचा स्वभाव हा वाईट असल्याचं जाहीर असल्यानं त्याचा सख्खा भाऊ त्याचेपासून दूर गेला तर रामाचा स्वभाव चांगला असल्यानं त्याचा सख्खा भाऊ लक्ष्मणही त्याच्या जवळ राहिला. म्हणूनच स्वभाव हा अतिशय महत्वपुर्ण आहे.
        माणसाचा स्वभाव हा महत्वाचा आहे. तसंच महत्वाचं आहे त्याचं कार्य. कार्य जर चांगले असतील तर चार माणसं जुळत जातात. जसं रामासोबत घडलं. रामाचे कार्य चांगलं असल्यानं रामासोबत अनेक माणसं जुळत गेली. 
         माणसाचा स्वभाव हा विचार व कार्यावरुन घडत असतो. चांगले कार्य घडण्यासाठी चांगले विचारही मनुष्यात असणे तेवढेच गरजेचे आहे. वाईट विचार जर असतील तर उत्कृष्ट कार्य घडणारच नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे चांगले कार्य महत्वाचे आहे. तसेच महत्वाचे आहे चांगले विचारही. परंतु अलिकडील काळात असे चांगले विचार व चांगले कार्य आपल्याला पाहायला मिळत नाही.
          अलिकडील काळात गुंडगीरी व गुंडेगीरीनामक विचार सगळीकडे पाहायला मिळतात. संस्काराला जणू तिलांजलीच मिळालेली दिसते. लहान लहान शाळेत शिकणारी मुलं ही मार दूँगा, कॉंट दूँगा ची भाषा बोलत असतात. त्यातच हातात काठ्या घेवून तशी कृतीही करुन दाखवत असतात. शिवाय अभ्यास करा म्हटलं तर बारा गाडे बोंब असते. त्यावर हे कुठून शिकलाय असे विचारले असता ते मौन बाळगून असतात. हीच मुलं पुढं वात्रट स्वभावाची निघतात. 
          अलिकडील काळात मोठ्या माणसांच्या स्वभावाबाबत विचार केल्यास सगळीकडे भ्रष्टाचार दिसतो. कोणी सरकारी कार्यालयात नोकरी करुन भ्रष्टाचार करतो. कोणी नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून भ्रष्टाचार करतो. कोणी आपली कामं लवकर करुन घेण्यासाठी भ्रष्टाचार करतो. हा झाला भ्रष्टाचाराचा भाग. कोणी बलात्कार करुन आपली हौस भागवत असतात. ज्यातून महिला सुखी दिसत नाही व तिला रात्री, अपरात्री कामानिमित्त बाहेरही पडता येत नाही. कोणी दिन दहाडे खुन करायलाही मागे पाहात नाहीत. तेही किरकोळ गोष्टीवरुन. इथं आपल्या जन्मदात्या बापाचे मुडदे पाडले जातात. वासनेसाठी स्वतःची बहिण वा लेक ओळखता येत नाही अन् मुलगा वात्रट निघाला म्हणून खुद्द आईवडील आपल्या मुलांची हत्या करतो. एवढंच नाही तर आपली कामवासना भागावी म्हणून काही महिलाही आपल्या पती आणि मुलांची हत्या करीत असते. 
         काही तर स्रिया अशा आहेत की ज्या विवाह अगदी थाटामाटात करतात. त्यातच त्या स्रियांना कोणीही बंधनात ठेवलेलं आवडत नाही. अशा स्रिया विवाह झाल्यानंतर ताबडतोब दोन तीन महिन्यात फारकत घेतात. त्यातच खटले दाखल करतात. मग खावटी मागतात वा खावटी म्हणून समूळ रक्कम मागतात व एकट्याच मायबापाच्या घरी आनंदाने खात बसतात. 
          एकंदरीत समाजातील वास्तविकतेचा विचार केल्यास आज देशातील लोकांची परिस्थिती व विचारही चिघळलेले आहेत की ज्यातून कोणाला कोणावर विश्वास ठेवता येत नाही. आज यावर खऱ्या अर्थानं विचारमंथनाची गरज आहे. संस्काराची उणीव जाणवत असून आजच्या काळात संस्कार हे तुटत चालले आहेत. असे जाणवायला लागलेले आहे.
          असे का झाले? असे का होत आहे? याबाबत विचार केल्यास व अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या बालस्तरावर जावे लागेल. विद्यार्थ्यांच्या बालस्तरावरचा विचार केल्यास विद्यार्थ्यांच्या बालवयात विद्यार्थ्यांवर संस्कार होतांना चांगले संस्कार होत नाहीत. ज्यातून वाईट संस्कार विद्यार्थ्यात वाढीस लागतात. जे संस्कार घरातूनच होत असतात. जे संस्कार परीसरातून होत असतात. जे संस्कार शाळेमधूनही होत असतात. हे तिन्ही स्थळ विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देतील तरच चांगले संस्कार मुलांवर होतील. जे चांगले संस्कार मुलांमध्ये टिकून राहून त्याला भविष्यात आदर्श बनविण्यात कारणीभूत ठरु शकतील. 
        मुलांमध्ये सर्वप्रथम संस्कार पेरणारे घटक असते त्याचं घर. घरात त्याच्या आईवडिलांचं बोलणं, वागणं चांगलं असायला हवं. ते कुटुंब त्यांच्या आजी आजोबांची वा म्हातारे, अपंग, अनाथांची सेवा करणारे हवे. त्यातच त्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याच प्रकारची व्यसनं नसायला हवीत. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक घरातच मी माझी मुलं व माझी पत्नी. एवढंच विश्व आहे व म्हातारी मंडळी ही वृद्धाश्रमात असतात. तिथं निरनिराळी व्यसनं असून खुद्द वडील आपल्या मुलांना खर्रे आणायला पाठवतात नव्हे तर दारुची बाटलही घरातून आणायला पाठवतात. एवढंच नाही तर मुलांसमोरच दारु पितात. यात आईही मागे नाही. तिही आपली फॅशन करुन तोकड्या कपड्यात मिरवीत असते. पती कामावर गेल्यावर व्याभिचार करीत असते. शिवाय घरात मुलांच्या समोरच आईवडीलांच्या बोलण्याची भाषा वात्रट निघते. वागणं वात्रटच स्वरुपाचं असते. त्यातच सतत काही ना काही कारणानं भांडणं होतच असतात. या सर्व गोष्टीत गुंफलेले आईवडील. त्यांचं बाळाकडं लक्षच नसतं. त्यातच आजच्या महागाईच्था काळात पती पत्नी दोघंही कामाला जातात, मुलांना बेवारस ठेवून. ज्यातून मुलांवर संस्कार होतांना अडचणी निर्माण होतात. हेच पाहतात मुलं व त्याचेवर याच गोष्टीतून बरेवाईट संस्कार होत असतात. दुसरा संस्कार हा परिसरातून होतो. परिसरातून संस्कार होतांना मुलं आपल्या मित्रांसोबत रमतात. ती जशी वागत असतील, बोलत असतील, तशीच वागतात, बोलतात. ज्यातून मुलं ही वाईट स्वरुपाची घडू शकतात. त्यातच तिसरा मुलांच्या संस्कारावर परिणाम करणारा घटक आहे शिक्षक. मुलं जेव्हा शाळेत येतात. अशावेळेस त्यांचं चांगलं वाईट वर्तन घडतं. अशावेळेस चांगल्या वर्तनाला चांगलं व वाईट वर्तनाला वाईट म्हणण्याची पात्रता ही शिक्षकात असावी. शिक्षकात संस्कार फुलविणारा गुण असावा व त्यांना चांगले, वाईट हे अतिशय उत्कृष्टपणे मुलांना समजावता यावे. ज्यातून चांगले संस्कार होतील. तसाच स्वतः शिक्षक हा संस्कारी असायला हवा. परंतु अलिकडील काळात शिक्षकही विद्यार्थ्यांप्रती स्वार्थी दृष्टिकोन ठेवतात. तसं पाहिल्यास त्यांच्यातच संस्कार नसतो. मग ते मुलांवर संस्कार कुठून करतील? अशावेळेस शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार होत नाहीत. 
           आज संस्काराची वानवा आहे. विभक्त कुटुंबपद्धती असल्यानं लहान मुलांवर त्यांच्या आजी आजोबांमार्फत होणारे संस्कार, केले जात नाहीत. व्यसनानं परिस्थिती हलाखीची होत असल्यानं संस्कार करायला चांगल्या संस्कारी जागेवर वास्तव्य करता येत नाही. तसंच इच्छा असूनही मुलांना चांगले संस्कार करण्यासाठी चांगल्या शाळेत दाखल करता येत नाही. इथूनच संस्कार तुटत जातात. ज्यातून भविष्यात चांगल्या संस्काराला तिलांजली मिळते व हीच मुलं मोठी झाली की त्यांच्यात गुंडगीरी वाढीला लागते. ज्यात दोष त्या मुलांचा नसतो. दोष असतो, शिक्षक, पालक आणि सवंगडी यांचा.
         खरं तर मुलांची ही भविष्यात निपजणारी पिढी संस्कारक्षम व्हावी. त्यासाठी मायबापानं प्रयत्न करायला हवेत. कोणत्याही आईवडीलांना आपली मुलं ही वाईट विचारांची निघायला हवी असे वाटत नाही. आजची मुलं ही आईवडीलांचं अजिबात ऐकत नाही. त्याचंही कारण आहे, आईवडीलांचं वागणं. घरात म्हातारे आजीआजोबा नसणं आणि असतीलही तर त्यांच्यावर आपल्याच आईवडीलांचं रागावणं. ज्यातून ही मुलं आजीआजोबांचं ऐकण्याऐवजी त्यांची हेळसांड करतात. ज्यातून मुलांवरील चांगल्या संस्कारावर डाग लागतो. आजची मुलं शिक्षकांचंही अजिबात ऐकत नाहीत. त्याचंही कारण आहे शिक्षकांचं वागणं व त्यांचा विद्यार्थ्यावर मुळातच धाक नसणं. छडीचा मार कायमचा दूर झाल्यानं मुलं शिक्षकांना दबत नाहीत. उलट ते शिक्षकांनाच दाबतात. तसाच परीसरही महत्वाचा आहे. मुलं परीसरातून बरंच काही शिकतात. हे जरी खरं असलं तरी महत्वाचा भाग आहे आनुवंशिकता. चांगल्या गुणांसाठी रक्तही तेवढंच चांगलं असावं लागतं. चांगल्या संस्कारी लोकांच्या पोटी चांगलीच संस्कारी मुलं जन्मास येतात की ज्यांच्यावर कितीही वाईट परिणाम होत असला, परिसर, आईवडील वा शिक्षकांचा. तरीही काहीच फरक पडत नाही. गाईच्या गर्भातून कधीच वाघ जन्माला येत नाही. भक्त प्रल्हादावर कधीच त्याच्या आईवडीलांचा, गुरुंचा व मित्रपरीवारांचा परिणाम झाला नाही. 
         महत्वपुर्ण बाब ही की कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नाही. मग ते कुठंही टाकलं तरी. तसं संस्कारांचं आहे. संस्कारही कुत्र्याच्या शेपटीगत सहज होत नाहीत. थोडासा प्रयत्न तेवढा करु शकतो आपण. ज्यातून रक्तीतील संस्काराला आपल्या प्रयत्नानं थोडीशी दिशा तरी देता येईल. चांगली पिढी निपजण्यासाठी रक्तातच चांगल्या संस्काराचा गुण असावा लागतो. तो जर असेल तर परिसर कितीही वाईट असू द्या. आईवडील कितीही वात्रट वागू द्या. शिक्षक कितीही वाईट मिळू द्या. मुलं घडणारच. हे जरी खरं असलं तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न केल्यावर शेतातीलही उत्पन्न वाढवता येतं. ही तर संस्काराची गोष्ट आहे. ती सहज शक्य करता येवू शकते. चांगल्या स्वभावानं व चांगल्या विचारानं चांगल्या संस्काराची रुजवणूक करता येते.
         विशेष म्हणजे आपला स्वभाव व विचार चांगले असावे की ज्या स्वभावानं व विचारानं आपल्याला वाईट संस्कारावर मात करता येईल. वाल्याचा वाल्मिक बनवता येईल. अंगुलीमालचा अहिंसक बनवता येईल. तसंच आम्रपालीलाही विशेष असा सन्मान प्राप्त करुन देता येईल. अलिकडील काळात त्यावर कोणीच विचार करीत नाहीत. कारण कुणाकडे त्यावर पुरेसा विचार करायला सवडच मिळत नाही. खरं तर याच गोष्टीवर विचारमंथन व्हावं. शिबीरं आयोजित केली जावीत. शाळेशाळेतून चांगल्या संस्काराचे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच इमानदारीवर बक्षीस दिले जावेत आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला थेट फाशीच. असं जर घडलं तर कदाचीत त्यातून परिणाम घडून चांगले संस्कार फुलवता येतील. तसेच आपले संस्कार असे असावेत की भविष्यात आपण मरण जर पावलो तर चार लोकं एकत्र येतील. प्राणी, पक्षीही आपल्या मयतीला असतील. त्यातच पाऊस, वाराही आपली उपस्थिती दाखवेल. यात तीळमात्र खोटपण नाही. तसेच आपले संस्कार जर चांगले नसतील तर कावळेही आपल्या पिंडाला शिवणार नाहीत. म्हणून कोणी कितीही वाईट असेना, आपलाही स्वभावगुण भूतकाळात वाईट का असेना, समजदारी आल्यावर आपल्यात परीवर्तन करावं. जेणेकरुन कावळाही आपल्या मयतीला येईल व आपल्या पिंडीला शिवेल. असेच आपले संस्कार असावेत. चांगले संस्कारच भविष्यात येणाऱ्या संकटांना टाळून नेतात. वाईट संस्कार भविष्यात अनेक अडचणी निर्माण करीत असतात.

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०