Totaya - 6 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | तोतया - प्रकरण 6

Featured Books
Categories
Share

तोतया - प्रकरण 6

तोतया प्रकरण 6
मी पुन्हा सावध झालो माझ्या सह्या त्या खोट्या मृत्युपत्रावर केल्यानंतर मला दोन कोटी मिळतीलच याची काय खात्री होती? शिवाय मी प्रखर प्रजापतीचा तोतया म्हणून होतो. प्रखरच्या मृत्युपत्रानंतर माझं अस्तित्वच संपणार होतं. 
मी तिच्याकडून आणखीन काही माहिती काढायचं ठरवलं कारण मला माझा निर्णय लगेच द्यायचा नव्हता मी तिला विचारलं,
“ तू म्हणतेस त्याला पुरावा काय?”
“ कशाचा?” तिने विचारलं.
“ म्हणजे प्रखर प्रजापती तू म्हणतेस तसा दोन वर्षापासून आजारी आहे. बिछान्यातून उठू शकत नाही याला काय आधार आहे तुझ्याकडे?”
“तसा पुरावा आहे, प्रखर चे स्टेट बँकेत फोर्ट मुंबई आणि दुबई बँकेत जे वैयक्तिक खाते आहे त्यावर व्यवहार करणे प्रखर ला शक्य नव्हते, तेव्हा त्याने पॉवर ऑफ अॅटॉर्नी करून बँकेला दिली त्या बरोबर डॉक्टरांचा दाखला दिला होता की शारीरिक अत्यावस्थतेमुळे ते अंथरुणाला खिळून आहेत.”  
“ या बोलायच्या गोष्टी झाल्या. तुझ्याकडे त्याचा पुरावा असेल तर मी मदत करीन.” मी म्हणालो.
ती तयारीनेच आली होती जणू. तिने मला डॉक्टरांचा दाखला आणि पॉवर ऑफ अॅटॉर्नी
ची कॉपी दिली. खरंच दोन वर्षा पूर्वीचा दाखला होता.
“भालेकर च काय? तुझा प्लॅन त्याला माहिती आहे?” 
“त्याची काळजी करू नको. त्याच्या भविष्याचा तो विचार करेल. वारा वाहेल तसं वाहणारा तो माणूस आहे” 
“प्रखरची आई?” मी विचारलं 
“मी प्रखर ची पत्नी आहे हे एकदा सिद्ध झालं की ती काही करू शकणार नाही. तिची काळजी सोड.तू मला सहकार्य करणार आहेस?” 
मला हो म्हणण्या वाचून काय पर्याय होता ? मी सापळ्यात अडकलो होतो. मी तिला हो म्हणालो नसतो तर भालेकर करवी तिने आत्ताच माझा काटा काढला असता. हो म्हटलं तर किमान दोन कोटी तरी हातात येण्याची शक्यता होती. 
“माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस तू.” मी म्हणालो. तशी ती निघून गेली.
***
मजहर नेहेमी प्रमाणे नाश्त्याची ट्रॉली घेऊन आला तेव्हा त्याच्या ट्रॉलीवर कालच्या दिवसाचा बँकेचा ड्राफ्ट होता.मी कॉफी पिता-पिता तो सहज हातात घेतला.त्यावर बँकेच्या अधिकाऱ्याच्या सह्या होत्या पण शिक्का नव्हता. मला आठवलं की आधीच्या ड्राफ्ट वर शिक्का आणि सही दोन्ही होतं.माझ्या मनात संशय आला की ड्राफ्ट खोटा तर नाही? या आधीचे ड्राफ्ट मला मिळाल्यावर ते बँकेत माझ्या खात्यात भरायचे काम मजहरच करायचा. कारण मला बाहेर जायला परवानगी नव्हती. मला का कोण जाणे पण मनात आलं की आपण खात्री करून घ्यावी की खरोखर माझ्या खात्यात पैसे जमा होत आहेत ना? पण कशी करून घ्यायची ही खात्री हे मला काही सुचेना मी ऑफिसला जायला निघालो होतो. अचानक मला आठवलं की सानवी आपल्या उपयोगी पडू शकेल. नक्कीच या मुलीत काहीतरी होतं. मी एका कागदावर सानवीला उद्देशून एक चिठ्ठी लिहिली त्याच्यावर अत्यंत गोपनीय व खाजगी असे शब्द लिहिले . माझ्या बँकेचे नाव आणि माझ्या बँकेचा खाते नंबर कागदावर खरडला. चंद्रहास चक्रपाणी या नावाने वरील खाते आहे का आणि त्यात रकमा जमा होत आहे का त्याची चौकशी कर. असेल तर होकारार्थी मान डोलव. नसेल तर नकारार्थी हलव, माहितीच मिळाली नाही तर ओठांची विचित्र हालचाल कर.अशी चिट्ठी लिहून माझ्या हातावरच्या घड्याळाखाली लपवली.ऑफिसात आल्यावर सानवी सह्या करण्याच्या फाईल्स घेऊन आत आली तेव्हा मजहरच्या नकळत मी घड्याळातून चिट्ठी काढून तिच्या हातात दिली. मला एकदम टेन्शन आलं.ती नेमकी काय प्रतिक्रिया देईल? पण तिने मला सांभाळून घेतलं.आपल्या चेहेऱ्यावर काहीही भाव दाखवले नाहीत आणि आपल्या हातात चिट्ठी बेमालूम लपवली. आणि निघून गेली. मी नंतर तासभर भरमसाठ सह्या केल्या. त्या दरम्यान सतत माझ्या मनात विचार येत होते, सानवी आपलं काम करेल? ते करत असताना तिला भालेकर किंवा कोणी पाहेल? सह्या झाल्यावर मजहर ने सानवीला आत बोलावलं. मी तिच्या खुणेची वाट बघत होतो, छाती धडधडत होती.माझ्या कडून सह्या झालेली पत्रे गोळा करताना मी जाणीव पूर्वक तिच्याकडे पहात होतो.तिने मानेची हालचाल केलीच नाही,ओठ विचित्र हलवले,म्हणजे मी अजून अंधारातच होतो. माझा खून नक्कीच केला जाणार होता? केव्हा? मी मजहरला विचारलं की अजून हे काम किती दिवस चालू राहील? मला आता कंटाळा आलाय आणि मला नवीन टीव्ही सिरीयल मिळाल्ये, त्याचं शुटींग चालू होणार आहे. मजहरने अंदाज दिला की भालेकर काही दिवस एका डील साठी बाहेर जाणारे तो आल्यावर आणखी काही पत्रावर सह्या कराव्या लागतील, आणखी आठ-पंधरा दिवस राहावे लागेल.म्हणजे माझं आयुष्य तेवढेच दिवस होतं तर !. मजहर माझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होता त्यावरून त्याला हे माहित नसावं की ड्राफ्ट च्या रकमा बँकेत जमा होतं नाहीयेत. पण मी तर ड्राफ्ट त्याच्याच कडे देत होतो, माझ्या खात्यात भरायला.तो बँकेत पाठवत असेल कोणाबरोबर तरी पण ते ड्राफ्ट बोगस असतील तर बँक माझ्या खात्यात रक्कम कशी जमा करणार होती? मी ठरवलं, या लोकांनी मला सापळ्यात अडकवलं तर मी सुद्धा त्यांना त्यात अडकवीन.मी थंड पणे सगळ्या शक्यता पडताळून पहायचं ठरवलं. 
शक्यता एक, ते मूर्ख असतील तर त्यांनी जसं समीप सिन्नरकर ला संपवलं, तसं ते मला मारतील, त्या स्थितीत त्यांना पुन्हा पहिल्यापासून सर्व सुरु करावं लागेल, म्हणजे माझ्या जागी दुसरा तोतया आणणं, त्याला ट्रेनिंग देणं, हुबेहूब प्रजापती च्या आवाजाची नक्कल करणारा, सह्या करणारा माणूस शोधणं सर्वच वेळ लागणारं होतं आणि अत्ता तर डील पूर्ण होण्यासाठी माझी अजून गरज लागणार होती, त्यामुळे हा पर्याय ते निवडणार नाहीत. त्यामुळे मला अजून जगायला संधी होती.
शक्यता दुसरी, मालविकाला संपत्ती हवी होती,त्यासाठी मी प्रजापती म्हणून तिच्याशी लग्न करणे, मृत्यपत्र करणे यासाठी तिने मला दोन कोटी देऊ केले होते.ते ती प्रत्यक्ष देईल किंवा नाही हा वेगळा मुद्दा होता पण मी ते सर्व करे पर्यंत ती मला मारू शकत नव्हती. म्हणजे या ही पर्यायात मी अजून जिवंत राहणार होतो.
आता मी निश्चिंत झालो होतो, कंपनीच्या स्वार्थासाठी आणि मालविकाच्या स्वार्थासाठी मी जिवंत राहणेच जर फायद्याचे होते तर मी का घाबरावं? ‘इथून पुढे सह्या करायला ठामपणे नकार दे.’ मी स्वत:ला बजावलं. माझा आत्मविश्वास वाढला होता.
मजहर माझ्या बरोबर टेनिस खेळायला आला. चांगले तासभर आम्ही खेळलो.टेनिस कोर्टाच्या डावीकडे आमच्या बंगल्याची दुसरी विंग होती. बहुदा तिथेच प्रजापतीला ठेवलं असावं. मजहर बॉल आणि रॅकेट आवरून ठेवत होता तेवढ्यात मी त्या विंग कडे पाहिलं.विंग म्हणजे तो दुसरा बंगलाच होता. सर्वात वरच्या बाजूला तीन मोठ्या फ्रेंच विंडो होत्या पण त्याला बाहेरून लोखंडी बर मारून बंदिस्त केलं होतं. का बरं? म्हणजे प्रजापती प्रत्यक्ष आजारी नसावाच, त्याला प्राशिलाआणि भालेकर दोघांनी आपल्या स्वार्थासाठी कैद केलं नसेल ना? मग मालविकाने तो मानसिक रुग्ण असल्याचं मला का सांगितलं असेल? कदाचित मला तोतया म्हणून का आणलं याचं कारण देण्यासाठी तिने ही बतावणी केली असेल का? विचारांच्या गर्दीत मी आणि मजहर आमच्या विंग कडे जायला निघालो आणि पहिलीच पायरी चढताना थबकलो. पायरीवर पामेरियन कुत्र, शेरू, उभं होतं.
***
मजहरनं मला सावध केलं की प्राशिला प्रजापती आल्ये इथे अचानकच. का ते सांगता येणार नाही.त्याने मला पटकन आवरून तयार व्हायला सांगितलं आणि तो निघून गेला. “मास्क घालायची गरज नाही कारण तीच तुझ्या रूम मधे येणारे” जातांना तो सांगून गेला. 
“ तू खूप चांगलं काम करतो आहेस. भालेकरनं मला सगळं सांगितलं, तू फोन वर कसं बोललास, सह्या कशा केल्यास सर्व काही.तो खूप खुष आहे.” आत येता येताच प्राशिला म्हणाली.
“ त्या साठीच मला आणलं गेलंय इथे. ” मी म्हणालो.
“ फार थांबावं लागणार नाही तुला, भालेकर बाहेर गेलाय कामाला, तो आला की आणखी काही कागदपत्रावर सही करायची की झालं.मग तुला आम्ही परत पाठवू.तू तुझ्या पूर्वीच्या सिनेमा आणि टीव्ही सिरियल्स साठी वेळ देऊ शकतोस.”
हीच वेळ होती, तवा तापला होता तोवर भाकरी भाजून घ्यायची.
“ मी थोडं स्पष्टच बोलतो, पण मी समाधानी नाहीये या तुमच्या कामावर.”
ती चमकली. “ म्हणजे?”
“ तुम्ही माझं कोरडं कौतुक करताय, मला सहानुभूती दाखवताय, पण मला खुष करावं असं वाटत नाही का तुम्हाला? ” मी म्हणालो.
“ म्हणजे? तू का खुष नाहीयेस?”
“ भालेकरने मला प्रजापतीचा तोतया म्हणून काम करण्यासाठी रोज पाच हजार द्यायचं कबूल केलं होतं.”मी म्हणालो.
“ बरोबर आहे.तसंच ठरलं होतं आपल्यात. तुला जास्त रक्कम हव्ये?” तिने विचारलं.
“ नाही.मी त्या रकमेला तयार झालोय आधीच.मला फक्त इथे मोकळीक हव्ये वावरण्याची.मला हवं ते करण्याची. माझ्या खात्यात रक्कम जमा झाल्ये का हे बँकेला फोन करून विचारण्याची.इथले फोन बंद आहेत, बाहेर पडायला मला बंदी आहे.सतत माझ्यावर तुमचे बॉडी गार्ड नजर ठेऊन असतात.उद्या सकाळ पर्यंत मला इथून फोनवर माझ्या बँकेशी बोलून तुम्ही दिलेल्या सगळ्या रकमा माझ्या खात्यात जमा होत असल्याची खात्री करून घेता आली पाहिजे. आता पर्यंत मी सहकार्य केलंय तुम्हाला, आता तुमची वेळ आहे.”
आत येताना असलेली प्राशिला आणि आताची प्राशिला एकदम वेगळ्या जाणवल्या मला.
“ उद्या सकाळी दहा वाजता तुला तुझ्या बँकेशी बोलता येईल अशी मी व्यवस्था करते.” ती तुटकपणे म्हणाली आणि दाराकडे जायला उठली.मी पुढे होऊन तिच्यासाठी दार उघडलं.
“ दुसऱ्यावर अविश्वास दाखवण्या एवढा समंजस आहेस. ” माझ्या खांद्यावर हात ठेऊन ती म्हणाली.
“ तुम्ही ठेवता दुसऱ्या कोणावर विश्वास?” माझ्या या प्रश्नावर ती फक्त हसली आणि बाहेर पडली.
***
पहिली लढाई मी जिंकलो होतो. माझी खात्री होती की मला बँकेशी बोलायला दिले जाईल.बँक मला सांगेल की पैसे जमा झाले आहेत. सानवीने जरी झाले नाहीत म्हणून सांगितलं असलं तरी मी प्राशिलाला एवढं बोलल्यानंतर ती नक्कीच तशी व्यवस्था करेल. आणि ती रक्कम जमा झाली की मला उद्या बँकेची संपर्क करून देण्यात येणार होता. माझ्या दृष्टीने माझे तीन शत्रू होते प्राशिला, मालविका आणि भालेकर यापैकी प्राशिला आणि मालविका हे दोघेही प्रजापती साम्राज्य आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. भालेकर या दोघींपैकी नक्की कोणाच्या बाजूने होता याचा अंदाज येत नव्हता, पण ज्या अर्थी भालेकर वॉशिंग्टनला गेल्या गेल्याच प्राशिला इथे आली होती त्याअर्थी तो तिच्या बाजूने असावा. आणि हो, मजहर ! तो कोणाच्या बाजूनी असावा? त्याच्या चेहऱ्यावर जी चिंता दिसत होती त्यावरून माझा अंदाज होता की तो मालविका च्या बाजूने असावा 
समीप सिन्नरकर आणि गंधार चा खून करण्याची व्यवस्था नेमकी कोणी केली असावी? प्राशिला की मालविका? सगळ्याचा सांगोपांग विचार करता माझ्या अंदाज होता की प्राशिला आणि भालेकरने मिळूनच हे कांड केलं असावं. पैसे दिले की बाहेरचे मारेकरी आरामात मिळतात आणि या दोघांना हे अशक्य नव्हतं मला वाटत नव्हतं त्यांनी हे काम मजहरला दिलं असेल. मजहर माझ्या विरोधात नव्हता हळूहळू मी त्याला गुंडाळायला लागलो होतो. 
प्रखर प्रजापती चा विचार माझ्या मनात आला. खरंच तो मरणासंन्न अवस्थेत होता का? त्याला एखाद्या कैद्यासारखं डांबवून ठेवण्यात आलं होतं का? हे लोक ज्याला दुसरी विंग म्हणत होते तो प्रत्यक्ष बंगलाच होता आणि तिथेच त्याला ठेवलं गेलं होतं. तिथे जाऊन त्याला भेटायची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण आजूबाजूला त्यांचे पहारेकरी होते त्यांना चुकवून मी तिकडे जाऊ शकेन का याचा विचार माझ्या मनात यायला लागला.
विचारांच्या गर्दीत असतानाच अचानक मालविका आत आली. माझ्याशी लगट करून माझ्या शेजारी बसली. 
"ती म्हातारी तुला काय सांगत होती?"
तिने विचारलं. 
"खास असं काही नाही. मी जे तोतया म्हणून काम करतो आहे त्याबद्दल ती कौतुक करत होती" मी सावधगिरीने उत्तर दिलं. 
"माझ्याबद्दल काही सांगत नव्हती?"
"नाही तुझ्याबद्दल काहीच विषय निघाला नाही" मी उत्तर दिलं 
"तो हरामखोर भालेकर! त्यानेच तिला इथे पाठवलं असेल. तो इथे नसतो तेव्हा माझ्यावर नजर ठेवायला म्हणून तो तिला इकडे यायला सांगतो. आपल्या लग्नाच्या तयारीच्या दृष्टीने मी त्या रजिस्ट्रारला इकडे बोलावून घेणार होते. त्यांने यायचं ही कबूल केलं होतं. आता ही थेरडी इथे असेपर्यंत त्याने इथे येणं बरोबर नाही."
मी काहीच उत्तर दिलं नाही 
"भालेकर येईपर्यंत ही माझी सासू इथेच थांबेल. ती गेली की भालेकर येईल मग तो रजिस्ट्रार इथे कसा येईल? सगळा प्रॉब्लेमच होऊन बसलाय."
तरीही मी काहीच बोललो नाही 
"तू काहीच का बोलत नाहीयेस मला तुझी मदत हव्ये."
"मला जे जे सांगण्यात येतं ते करण्यासाठी मी इथे आहे. फक्त ते कुणी सांगायचं याबद्दल पुरेशी स्पष्टता नाही ते सांगण्याचे तुला अधिकार असतील तर मला सांग. मी ते करीन." मी म्हणालो. 
"तुला दोन कोटी रक्कम हवी असेल तर मी सांगेन ते तू केलं पाहिजेस" ती आवाज चढवून म्हणाली. 
"तू मजहर वर विश्वास ठेवू शकतेस?"
माझ्या या प्रश्नाने ती चमकली अर्थात ठेवू शकते विश्वास त्याचा काय संबंध आहे इथे?
“म्हणजे तू त्याला एखादी कामगिरी सोपवली तर तो तुला प्राशिला पुढे पालथा पाडणार नाही ना?” 
“पूर्वी एकदा त्यांना तसा प्रयत्न केला होता पण आता नाही.” ती म्हणाली.
या बयेने मला जसा नादी लावण्याचा प्रयत्न केला तसाच मजहर ला सुद्धा केला असावा म्हणून तो आता तिच्या बाजूने झाला असावा. मी अंदाज केला.
“मला जरा विचार करू दे. आपल्याला मजहर कितपत उपयोगी होईल याचा अंदाज घेऊ दे.” मी म्हणालो 
“ठीक आहे उद्यापर्यंत काय ते सांग तू मला. माझ्या गोटातल्या एका वकिला कडून मी मृत्युपत्र तयार करून घेतलं आहे. ते उद्या माझ्या ताब्यात येईल. मी त्याच्यावर तुझ्या घेण्यासाठी उद्या रात्री परत येईन.” 
“लग्नाचा दाखला मिळाल्याशिवाय मृत्युपत्राला काही किंमत नाही.” मी म्हणालो. काही झालं तरी त्या मृत्युपत्रावर प्रजापती म्हणून मी सही करायची नाही असं ठरवलं होतं.
अचानक ती आनंदाने किंचाळली.
अरे तुला काय म्हणायचं होतं मला आत्ता कळलं तू थेट शब्दात बोलला नाहीस पण तुझ्या मनात काय होतं ते मी आत ओळखलं.मजहर वर माझा कितपत विश्वास आहे असं तू का विचारलं हे मी बरोबर ओळखलं. तू बरोबर मार्ग सुचवलास मला!” 
“काय म्हणायचय तुला? मी समजलो नाही.” मी म्हणालो 
“अरे, कसं कळत नाही तुला? तू खूप मोठी कल्पना सुचवली आहेस मला. मजहर पूर्णपणे माझ्या बाजूने आहे ती थिरडी झोपली की तो काहीतरी निमित्त काढून तिच्या खोलीत जाईल आणि ती झोपलेली असताना तिच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिला संपवून टाकेल. म्हणजे मला फक्त भालेकरलाच कसं हाताळायचं ते ठरवायला लागेल आणि मला माहिती आहे की ते मी सहज करू शकते. थँक्स चंद्रहास, तू माझा मोठा कार्यभाग हलका केलास. या बदल्यात तुला दोन कोटी मिळालेच असं समज.” कमालीच्या आनंदात ती उठून खोली बाहेर निघून गेली आणि दार बंद केलं. 
मी प्रचंड घाबरलो होतो. मी प्रत्यक्षात तिला असं काहीही सुचवणार नव्हतो कारण ते मलाच सुचलं नव्हतं. आता मी खरोखर अडचणीत सापडणार होतो. समजा तिने पैसा आणि आपल्या मादक सौंदर्याच्या आधारावर मजहर ला तिच्या सासूचा खून करायची सुपारी दिली आणि खरंच त्यांने तसं केलं तर? तपासासाठी नक्कीच पोलीस इथे आले असते त्यांच्या चौकशीला सामोरी जाताना तिने माझंच नाव घेतलं असतं तर? 
बापरे! आता माझ्या बँकेत प्राशिलाने पैसे जमा केले आहेत किंवा नाहीत याचा काहीही विचार न करता मला प्रथम इथून पळून जाणं भाग होतं.
पण कसं? 
मी खिडकीतून खाली नजर टाकली तर बंगल्या भोवती रखवालदारांचा पहारा चालूच होता. मी काहीतरी क्लुप्ती काढून गेटच्या बाहेर जायचा प्रयत्न केला तर मला मारतील ते? मला तसं वाटलं नाही कारण माझ्या अजून बऱ्याच सह्या त्यांना हव्या होत्या. मी ठरवलं आत्ता अगदी या क्षणीच प्रयत्न करायचा पुढे काय होईल ते होईल. संरक्षणासाठी मला माझ्या हातात कुठलं तरी शस्त्र हवं होतं माझं लक्ष टेबलवर ठेवलेल्या काचेच्या पेपरवेट कडे गेलं. मी ते माझ्या पॅन्ट च्या खिशात सरकवलं. हालचाल करत मी हॉलचा दरवाजा उघडला अंधारलेल्या लांब सडक कॉरिडॉर मधून अंधुक प्रकाश येत होता खाली जाणाऱ्या पायऱ्यांकडे मी पाहिलं
एका रखवालदाराची खुर्चीत बसलेल्या आकृती मला दिसली.तो जागाच होता. मी पायऱ्या उतरण्यापेक्षा फ्रेंच डोअर बसवलेल्या खिडक्या उघडून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. हळूच दार सरकवलं आणि कशाचा आवाज येतो आहे का याचा कानोसा घेतला. मी माझं पाऊल खिडकी पलीकडे टाकणार तेवढ्यात वरच्या मजल्यावरून हातात रिव्हॉल्व्हर घेऊन मजहर उतरताना दिसला. बाहेरच्या रखवालदारानं हाताच्या बोटान मी राहत असलेल्या मजल्याकडे निर्देश करून काहीतरी सांगितलं 
"ठीक आहे मी बघतो काय आहे ते" मजहर चा दबका आवाज मी ऐकला. 
अरे बापरे म्हणजे फ्रेंच डोअर बाहेर काहीतरी सेंसर बसवलेली सिस्टीम होती तर! मी पाय बाहेर टाकल्यामुळे ती कार्यरत झाली आणि त्याचा सिग्नल मजहर ला मिळाला असावा. हॉलचं दार ताडकन उघडलं गेलं दारात मजहर उभा होता 
“काही हवंय का तुम्हाला मिस्टर प्रजापती?” आपले भेदक डोळे वटारून त्याने विचारलं
“मला झोप लागत नव्हती. खाली जाऊन थोडं फिरुन येणार होतो.” 
मी उत्तर दिलं 
“आता नको सकाळी जाऊ फिरायला” 
एखाद्या लहान मुलाला समजवावे तसं तो म्हणाला. “आता शहाण्या मुलासारखा आत जाऊन झोप बरं. अरे मी सुद्धा इथून पळून जाऊ शकत नाही, जायचं ठरवलं तरी.” तो म्हणाला आणि मी मुकाट बेडरूम मध्ये जाऊन आडवा झालो थोड्याच वेळात किल्ली फिरवून बाहेरून दार लॉक करण्यात आल्याचा क्लिट असा आवाज झाला.
(प्रकरण सहा समाप्त)