मी आणि सांगण्यासारखे बरेच काही -भाग २
वाचन, सिनेमा आणि आठवणींची दुनिया
आधीच्या लेखात मी सांगितले होते की त्या काळात पत्रलेखनाचे विषय सिनेमे, वाचन, बिंदू चौकातील सभा, खासबागेतील कार्यक्रम अशा गोष्टींवर आधारित असायचे. मात्र एक गोष्ट सांगायची राहिलीच — आम्ही कॉमर्स आणि लॉचे विद्यार्थी असल्यामुळे आमच्या पत्रांत त्या काळातील इंग्रजी भाषेचा, कधी कधी पद्यरचनेचा, आणि कॉमर्सच्या भाषेचा छटा असायचा.
वाचनाचा विषय निघालाच आहे तर ‘कनवामं’ म्हणजेच करवीर नगर वाचन मंदिर याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. शाळेत जाताना रोज जसे तिथे पाय वळायचेच, तसेच रविवारीही ते ठिकाण ओढ लावत असे. जुन्या इमारतीत प्रशस्त वाचन हॉल, वर्तमानपत्रांची रांग, आणि पुस्तकांनी भरलेले कपाट — हे सर्वच एक वेगळे विश्व होते. आम्ही वाचायच्या पुस्तकांची यादी करून ठेवलेली असायची; पण सभासदांनी आणून ठेवलेली नवीन पुस्तके पाहण्यातच अर्धा तास कसा जायचा ते समजायचे नाही.
गो. ना. दातार (शास्त्री) यांचे प्रवाळद्वीप, कालीकामूर्ती, तसेच मृत्युंजय ही पुस्तके एका बैठकीत वाचलेली आजही लक्षात आहेत.
बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांपासून (काळा पहाड) पुढे ॲगाथा ख्रिस्ती, गार्डनरचा पेरी मेसन, शेरलॉक होम्सचे लेखक आर्थर डॉयल, विमादी पटवर्धनांचा जीवा, आणि खांडेकरांपासून ते आयर्विंग वॅलेसपर्यंत — वाचनाचा आवाका वाढत गेला. पुलं आणि वपु हे तर त्या वाचनसंस्कृतीचेच प्रतीक होते. पुढे बाबा कदम आणि सुहास शिरवळकर यांनीही आपले स्थान निर्माण केले. गुरुनाथ नाईक यांनी एक हजार रहस्यकथा लीहील्या होत्या.
अनंत मनोहर, द. पां. खांबेटे, जी. ए. कुलकर्णी, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, ना. स. इनामदार, वि. स. गुर्जर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, चिं. वि. जोशी, बाळ सामंत, वि. आ. बुवा, विजय पांढरीपांडे — हे सारे त्या काळातील आदरणीय नावे.
काकोडकर आणि बोधे यांचाही एक वाचकवर्ग होता.
लेखिकांमध्ये दुर्गा भागवत, सुमती देवस्थळे, योगिनी जोगळेकर, सुमती क्षेत्रमाडे — या सर्वांच्या लेखनाने वाचकवर्ग मंत्रमुग्ध झाला होता.
आध्यात्मिक वाचनात अ. ल. भागवत आणि संत-महात्म्यांची चरित्रेही वाचायचो. मेहेरबाबांवरील एक पुस्तक विशेष भावले होते.
आवडलेल्या काही पुस्तकांची यादी:
टॉलस्टॉय एक माणूस, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, मनीचेंजर्स, मृत्युंजय, छावा, आर डॉक्युमेंट, पत्रांजली, कुणा एकाची भ्रमणगाथा, पराजित अपराजित... अजून बरीच नावे पुढच्या ओघात येतीलच.
तेव्हा आम्ही पाहिलेल्या सिनेमांचीही यादी तयार केली होती.
वाचनालयांचा विषय निघालाच आहे तर ‘भास्करराव जाधव वाचनालय’ हेही भरपूर पुस्तकांनी समृद्ध असे ठिकाण होते; तिथेही आमची वर्गणी होती. खासबाग परिसरात एक खाजगी वाचनालय होते — एका वाचनप्रेमी माणसाचे, पण त्याचे नाव आठवत नाही. कॉमर्स कॉलेजच्या लायब्ररीतही विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध होती.
एका वाचनालयातील एक तरुण ग्रंथपाल खूप बुद्धिमान होता; पण एका गैरप्रकारामुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आले, अशी बातमी समजली.
तेव्हा प्रथमच जाणवले — माणूस ओळखणे किती अवघड असते.
माणूस ओळखणेच नव्हे, तर माणूस आवडणे किंवा नावडणे याचीही एक कहाणी सांगावीशी वाटते.
शाळेत माझा एक जिवलग मित्र होता. म्हणतात ना — प्रत्येक माणसासारखी या जगात सात माणसे असतात. तसाच माझ्या मित्रासारखा दिसणारा एक मुलगा कोल्हापुरात असायचा. आमच्यात भांडण झालेले असले की तो मुलगा दिसला की मला त्याचाही राग यायचा. आणि जेव्हा सगळं ठीक असायचं, तेव्हा त्याला पाहून त्या मित्राला भेटल्यासारखं वाटायचं.
मानवी मनाचा हा गूढ खेळच — राग, प्रेम, ओढ या भावना किती विचित्रपणे व्यक्त होतात!
तेव्हा ‘झंकार’ नावाची एक कॅसेट लायब्ररी होती — रसिक आणि जाणकार माणूस चालवायचा ती. आम्ही गाण्यांची यादी करून देत असू आणि तो त्यावर आधारित सुंदर कॅसेट बनवून देत असे. दहा वर्षांपूर्वी ती जुनी पिशवी सापडली, तर चक्क पन्नास कॅसेट निघाल्या!
प्रत्येक कॅसेट एखाद्या थीमवर — गायक, संगीतकार, गझल किंवा भावगीतांवर — आधारीत असायची.
नंतर व्हीसीडीचा जमाना आला. वीस रुपयांत सिनेमा मिळायचा, २०००च्या सुमारास शाहरुख–आमिरचा काळ सुरु झाला तोपर्यंत तरी आठवतायत.
आता विचार केला तर — “कॅसेट-सीडी — जमाना गुजर गया!”
वाचनालयात व्याख्यानमाला असायच्या, त्यांना मी आवर्जून हजेरी लावायचो.
प्रा. शिवाजीराव भोसले यांचा तो भारदस्त चेहरा आणि भारावून टाकणारा आवाज अजूनही कानात घुमतो.
देवळातील कीर्तनांचीही आवड होती — श्री. मेहेंदळे बुवा, श्री. आफळे बुवा यांच्या कीर्तनांनी मनाला वेगळाच स्पर्श व्हायचा.
आज मी भगवद्गीता, गीतारहस्य, पुराणे, अध्यात्म रामायण, रामचरितमानस वाचतो, आणि त्यावर आधारित लिखाणही करतो.
पूर्वी लेखन वहीपुरते मर्यादित होते, पुस्तकातील उतारे लिहून ठेवायचो; आता माध्यमं बदललीत — विचार अजूनही तेवढेच जिवंत आहेत.
सध्या इथेच थांबतो.
— गिरीश