त्याचं नाव सुशांत, तो एका खाजगी कंपनीत काम करतो आणि चांगला पगार देखील मिळवितो, त्याच्या पत्नीचे नाव सुमती असून ती चांगली गृहिणी, चांगल्या स्वभावाची पण जरा आळशी आहे. दोघांचा स्वभाव मात्र एकसारखा आहे तो म्हणजे माझे तेच खरे आहे. यामुळे त्यांच्या संसारात काय खटके उडाली आणि ते एकमेकांना कशी समायोजित केले ? यावर आधारित ही कथानक आहे, मला आशा आहे आपणांस हे नक्की आवडेल. तेव्हा चला पहिला भाग पाहू या .....!
तालुक्यापासून बरेच दूर अंतरावर असलेल्या एका छोट्याश्या गरीब कुटुंबात सुशांतचा जन्म झाला. तसे ते कुटुंबात सर्वात शेवटचे पुत्र रत्न, त्यांना दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. म्हणजे छोट्याशा घरात आई-वडील आणि पाच भावंडे असे एकूण सात जण राहत होते. काम करणारे हात एक आणि खाणारी तोंडे मात्र सहा यामुळे सुशांतच्या वडिलांची घर चालविताना ससेहोलपट व्हायची.
त्यांचे राहते घर म्हणजे काय ते घर होते काय ? ती एक झोपडीच होती. पावसाळ्यात तर पावसाचे पूर्ण पाणी त्या झोपडीत यायचे, हिवाळ्यात हवेतील गारवा झोपडीत शिरायचं आणि उन्हाळ्यात तर सारेच मंडळी झोपडीच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आपले बस्तान मांडलेले असायचे. पाऊस, थंडी, वारा आणि ऊन याची त्यांना सवय झाली होती. सहन केल्याशिवाय पर्याय देखील नव्हता. सुशांतचे आई-वडील दोघेही दिवसभर शेतात काम करायचे. त्यांच्याकडे स्वतःची फार कमी शेती होती, त्यामुळे ते दोघे इतरांच्या शेतात मजुरी करायचे. मिळालेल्या पैशात आपले घर चालवित असत. घरच्या गरिबीमुळे दोन भाऊ व दोन बहिणींनी गावातल्या शाळेत शिक्षण घेऊन थांबले आणि आई-वडिलांच्या कामात मदत करू लागले. कमावणारे हात वाढले म्हणून घरात थोडी फार लक्ष्मी येऊ लागली होती. काही वर्षानंतर त्यांनी झोपडीच्या जागी दोन खोल्याचे बांधकाम केले. थोडीफार शेती देखील खरेदी केले. गरिबीचे दिवस जाऊन जरा चांगले दिवस त्यांच्या जीवनात येऊ लागले होते. सुशांत त्यावेळी प्राथमिक वर्गात शिक्षण घेत होता. कमीतकमी सुशांत तरी शिकून मोठा व्हावा म्हणून घरातील सर्व मंडळी दिवसरात्र मेहनत करीत होती. जास्तीत जास्त पैसा कमावून आपली प्रगती करत होते.
सुशांतची मोठी बहीण उपवर झाली होती. त्यामुळे तिच्यासाठी वर संशोधन करण्याचे काम चालू झाले होते. एकदा तिचे लग्न जमले तर सुशांतच्या मोठ्या भावाचे देखील सोयरीक जुळवून दोघांचे लग्न एकाच मंडपात करावे असा विचार त्याचे आई-वडील करत होते. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन स्थळ बघितली पण कोणाचीही सोयरीक जुळत नव्हती, त्यामुळे जरा परेशान झाले होते. चिंताग्रस्त दिसत होते. शेतकरी बापाची ही पोरं, घर ही जेमतेम त्यामुळे कोणीही येऊन नाक मुरडून जायचं. सुशांतच्या मामाला दोन मुली होत्या त्यातील एका मुलींसाठी त्यांनी मागणी घातली होती पण ते विचार करून सांगतो असे कळवून चार-सहा महिन्यांचा काळ उलटला तरी त्यांचे उत्तर काही मिळत नव्हते. गावातीलच एका गृहस्थाने सुशांतच्या बहिणीसाठी एक स्थळ सुचवलं. ते गावातच होतं. पण यांच्या घरापेक्षा गरीब होतं म्हणून ते स्थळ नाकारत होते. मात्र त्याला इलाज नव्हता म्हटल्याप्रमाणे शेवटी सुशांतच्या आई-वडिलांनी त्या स्थळाला होकार दिला. त्याच गृहस्थाच्या मध्यस्थीने मावळ्यांच्या घरी देखील भावाची सोयरीक जुळली.
दोघा बहीण-भावाचे लग्न एकाच मंडपात करून एक मुलगी सासरी गेली तर दुसरी सून म्हणून घरात आली. आपल्या भावाची मुलगी म्हणून सुशांतच्या आईने तिला आपली लेक समजत होती. मात्र दोन-चार महिन्यात तिने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. नवऱ्याला गोडी गुलाबी ने बोलून वेगळं राहण्याचं सोंग करू लागली. आपण दिवसरात्र मेहनत करायची आणि यांचं घर चालवायचं हे चालणार नाही. असे म्हणून ती घरात त्रागा करू लागली. शेवटी मुलगा आणि सून तरी आनंदात राहावं म्हणून त्या दोन खोलीपैकी एक खोली त्यांना देऊन एका खोलीत आता ते पाच जण राहू लागले. दोन वेगळे चूल मांडले गेले. एकीकडे खाण्याचे वांदे होऊ लागले तर एकीकडे गोड धोड, चंगळमंगळ खाल्ले जाऊ लागले. सुशांत त्यावेळी माध्यमिक शिक्षण घेत होता. सुट्टीच्या दिवशी तो देखील कामाला जाऊन कुटुंबाच्या खर्चाला हातभार देऊ लागला. घरातले पाच ही जण काम करू लागले आणि घरात लक्ष्मी यायला वेळ लागला नाही.
सुशांत माध्यमिक परीक्षेसाठी तयारी करू लागला होता. महत्वाचे वर्ष असल्याने तो कुठेही कामावर न जाता शाळा-अभ्यास करू लागला. दहावीच्या परीक्षेत तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षण घेण्यासाठी घरातून विरोध होत होता मात्र धाकटी बहीण त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होती. अकरावी बारावी शिकून पुढे काय करावं ? हा प्रश्नच होता. ते नाही तर काय शिकावं ? घरातले सर्वजण तर अडाणी होते, त्यांना काही कळत नव्हते. कोणतं शिकावं ? काय करावं ? हे काही सुशांतला सुचत नव्हतं. continue to next
NASA YEOTIKAR