समाज आणि पंडित शास्त्री व साधूसंत
काही शतकांपूर्वी महाराष्ट्रात शास्त्री–पंडितांचा एक अहंकारी वर्ग समाजात वावरू लागला होता. त्यांना आपल्या ज्ञानाचा एवढा अहंकार झाला होता की, दिवसा मशाली घेऊन ते पालख्यांमधून हिंडत होते. सर्वसामान्य माणसांना या पंडितांचा खूप त्रास सोसावा लागत होता.शब्दांचा खेळ करण्याच्या बाबतीत या धूर्त पंडित जणांचा कुणीही हात धरू शकत नव्हते.शब्दांशी खेळ खेळण्याचा त्यांना नाद लागला होता. त्यामुळेच की काय, तुकारामादी संत आणि ज्ञानदेवादी भावंडांनासुद्धा या पंडितवर्गाने खूप त्रास दिला. त्यांचा मौंजीबंधनाचा अधिकारसुद्धा केवळ निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपान ही सन्याशाची मुले म्हणून हेटाळणी करत नाकारला होता.शब्दांचा खेळ करीत त्यांचा अतिशय छळ केला. शब्दांशी खेळ खेळण्यात यांचे ज्ञान वाया चालले होते. हे समर्थ स्वतः अनुभवीत होते. म्हणून प्रस्तुत श्लोकातून त्यांनी या शास्त्री–पंडितांविषयी आपली भूमिकाच जणू मांडली. समर्थ म्हणतात की आजपर्यंत मोठमोठे ज्ञानी पुरुष, विद्वान माणसे केवळ ज्ञानाच्या अहंकारामुळे वादविवादात आपले आयुष्य खर्ची करत गेले. ते कधी निखळ ज्ञानमार्गावरून गेलेच नाहीत. त्यामुळे झाले काय की वादविवादामुळे ते संतसज्जनांच्या सहवासात आलेच नाहीत आणि मग ते पंडित म्हणजेच ज्ञानभारले अतृप्त आत्मेच समाजात वावरत राहिले. ज्ञानाच्या मार्गावरून जाणे नाकारणारे हे पंडित लोक सतत एका गडद अंधारात शब्दांचा किस पाडत राहिले. त्यामुळे झाले काय की, ते ब्रह्मराक्षस म्हणून नांदू लागले. हे सारे केवळ ज्ञानाच्या अंधःकारामुळे घडले. दिवसा मशाली घेण्यात वर सूर्य आहे ही संकल्पना ते पार विसरून गेले. समर्थ म्हणतात की, हे व्युत्पन्न ब्राह्मण पंडित पार फुकट गेले. त्यापेक्षा ते जर संतसज्जनांच्या सहवासात नांदले असते तर त्यांच्या पांडित्याला ज्ञानाची अमृत फळं लगडली असती. म्हणून समर्थ आपल्या मनाला म्हणतात की, बा माझ्या मना, आपण ज्ञानी आहोत ह्या अहंकारापासून पूर्ण दूर हो. तू निरहंकरी हो.
हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या मानवी जीवनात जगभर कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर सतत चर्चा चालू राहिली आहे. अशी चर्चा जणू काही या समाजाचं आवश्यक अंगच बनून गेलं होतं. मोजके शास्त्री पंडित आणि अफाट अज्ञानी समाज यामध्ये सतत ज्ञान अज्ञानची भिंत निर्माण होऊन आजतागायत हीं वादग्रस्त चर्चा तग धरून आहे.ही चर्चा मग तत्त्वज्ञानावर असो, धर्मविषयक अशी की आणखी कुठल्याही गोष्टींविषयी असो, चर्चेच गुऱ्हाळ सतत धगधगत राहिलेलं दिसेल. कुणीतरी बोलतंय आणि सर्वजण ऐकत आहेत. त्यातून प्रश्नोत्तरे झडताहेत हे दृश्य नवे नाही. धर्म आणि नीतिविचार यावर तर प्रचंड काथ्याकूट आजपर्यंत झाला. त्यातून वाद – विवाद निर्माण झाले आणि अजूनही ते होतच आहेत. समर्थ यासंदर्भात एवढंच म्हणतात की, सत्याचा शोध घेणाऱ्या, ब्रह्मतत्त्वाचा शोध घेणाऱ्या साधकांनी या वादविवादात कदापिही पडू नये. फक्त वृथा शीण होईल. त्या वादचर्चेतून निष्पन्न काहीही होणार नाही. प्रस्तुत ठिकाणी समर्थ आपल्या मनाला समजावून सांगत आहेत, की या हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीने आजपर्यंत कितीतरी प्रकारच्या चर्चा ऐकल्या. वाद ऐकले. ज्ञानगर्भ भाषणं ऐकली. परंतु या चर्चांना आजपर्यंत सीमा, मर्यादा सापडली नाही. हा जनातला वादविवाद आजपर्यंत शिल्लकच राहिला. कारण वाद करणारे आजपर्यंत चिवटपणे जिवंतच राहिले आणि वादासाठी वाद चालूच ठेवला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, मानवी मनाला संशयाचा जबरदस्त तीव्र शाप मिळालेला आहे आणि त्या संशयातून वाद अग्निसारखे निराकरण फुलतच गेले. म्हणून समर्थ आपल्या मनाला सांगत आहेत की, बा माझ्या मना, या वादात तू आपलं अस्तित्त्व मिसळू देऊ नकोस. तू केवळ संतसंगतीत तुझं आयुष्य वेचण्याचा प्रयत्न कर. संतांमुळे तुला संवादसुखाची चव कळेल आणि मोक्षाचा मार्ग तुझ्या दृष्टिपथात येईल. संत हेच आपल्या मानसिक शांतीचं सूत्र आहे.संतच या समाजाला हिताचा व कल्यानाचा उपदेश करतात आणि योग्य दिशा देतात, मार्ग दाखवितात.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मच्छिन्द्र त्रिंबक माळी, छत्रपती संभाजीनगर.