पॉवर बंद केल्यावर सगळी सिस्टम बंद झाली. त्यामुळे थ्रस्टर सुद्धा बंद झाले. उडायला लागणारी ऊर्जा, शक्ती सगळ शून्य. अवकाशात उडताना तिकडे निर्वात पोकळी होती तिथे सगळ बंद केल्यावर सुद्धा यानं आपल्या वेगाने पुढे सरकत होते कारण कसलाच अवरोध नसायचा. हाच विचार करून या पाच तबकड्यांनी पॉवर बंद केल्या. पण झाले भलतेच. निर्वात पोकळीत कोणताही फोर्स नसतो पण या तबकड्या आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत होत्या. काही कळायच्या आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्यांना खेचून घेतले. काही वेळातच त्या चारही तबकड्या पृथ्वीवर चार ठिकाणी कोसळल्या. जी पाचवी तबकडी मदर स्पेसशिपच्या ताब्यात होती ती आता हळूहळू मदर स्पेसशिपच्या बरोबर खाली आली, आली नाही आणली गेली, कारण ती मदर स्पेसशिप मधून ऑपरेट केली जात होती. तिच्या खालचा दरवाजा उघडला गेला आणि ती पाचवी तबकडी मदर स्पेसशिपच्या पोटात सामावली गेली. दुर्दैवाने चंद्रावर खोदकाम करून जमा केलेली माती, दगड आणि स्फटिक एका तबकडी सोबत पृथ्वीवर पडले. ते तबकड्या ज्या ठिकाणी कोसळल्या तिथे मोठा स्फोट होऊन धुराचे लोट आकाशात उडाले.
आपल्या ४ तबकड्या कोसळण्याचा कोणताही परिणाम मदर स्पेसशिपवर असणाऱ्या त्या परग्रहवासीयांवर झाला नाही. शेवटी त्यांनी बंडखोरी करून नियम तोडले होते त्यामुळे त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ही होणारच होती. पृथ्वीवर पडलेल्या तबकड्या तशाच सोडून ती मदर स्पेसशिप बंडखोरांच्या एकमेव तबकडीला घेऊन मंगळ ग्रहावर परतली. पण परतताना त्यांनी आपल्या दुसऱ्या एका मोठ्या तबकडीला म्हणजे मदर स्पेसशिप सारखीच आकाराने अवाढव्य आणि नुकतीच त्यांच्या ग्रहावरून इतर सामान आणि यंत्रणा घेऊन मंगळावर उतरली होती तिला पृथ्वीवर कोसळलेल्या तबकड्यांच्या शोधाला बोलाऊन घेतले. आपण त्या तबकडीला MS 2 म्हणू. MS म्हणजे मदर स्पेसशिप.
मदर स्पेसशिप मंगळावर उतरली तशी तिच्या भोवती खूप गर्दी झाली. तिच्या पोटात असणाऱ्या तबकडीला बाहेर काढण्यात आले. त्या तबकडीतल्या सगळ्यांना आता मृत्युदंड होणार हे सगळ्यांना माहितीच होत. सदर तबकडी बरेच दिवस यांच्या संपर्कात नव्हती त्यामुळे आतमध्ये नक्की कोण आहे आणि किती जण आहेत याची कल्पना त्यांना नव्हती. नक्की आपलेच शास्त्रज्ञ आहेत की इतर कुठल्या ग्रहावरचे लोक आहेत हे त्यांना माहित नव्हते. ती तबकडी एकदम दूरवर नेण्यात आली. एक सशस्त्र दल आपली शस्त्रास्त्रे लोड करून तयार होती. मदर स्पेसशिपमधील हॅकर्सनी त्या पकडून आणलेल्या तबकडीचा दरवाजा उघडला. आतमध्ये आपले शास्त्रज्ञ सोडून अजून कोणी दिसले तर दिसताक्षणी गोळ्या घाला असा आदेश त्या सशस्त्र दलाला देण्यात आला होता. ते सशस्त्र दल आतमध्ये शिरले आणि समोरचे दृश्य पाहून ते हादरलेच. आतमध्ये सगळी प्रेते पडली होती.
त्यांनी मदर स्पेसशिपमधील हॅकर्सना संदेश दिला, "दरवाजे बंद करा, आतमध्ये विषारी वायू असण्याची शक्यता. आतमध्ये सगळी प्रेते पडली आहेत." तात्काळ दरवाजा बंद करण्यात आला. त्या सशस्त्र दलाला लीड करणाऱ्या जवानाच्या छातीवर उच्च दर्जाचा कॅमेरा लावला होता. त्यात सगळे आतले शूट झाले होते. तो व्हिडिओ मदर स्पेसशिपमध्ये सुद्धा दिसत होता. त्या व्हिडिओला काळजीपूर्वक अभ्यासल्यावर त्यांना दिसून आले की त्या तबकडीतला एक शास्त्रज्ञ जिवंत आहे आणि तो हालचाल करत आहे. त्यांनी तात्काळ संदेश दिला, "एक शास्त्रज्ञ अजूनही जिवंत आहे. त्याला बाहेर काढा." विषारी वायूपासून नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी विशेष मास्क लावून तबकडीत प्रवेश केला. तबकडीत शास्त्रज्ञांची प्रेत पडली होतीच पण आतमध्ये असलेली छोटीशी प्रयोगशाळा बघून सगळेच थक्क झाले. मदर स्पेसशिपमध्ये असणारे शास्त्रज्ञ सुद्धा थक्क झाले. जवानांनी लागलीच त्या जिवंत असणाऱ्या शास्त्रज्ञाला नायट्रोजन मास्क लावले आणि त्याला बाहेर घेऊन आले. आतमध्ये कोणताही विषारी वायू किंवा अज्ञात जीव नाही याची खात्री पटल्यावर शास्त्रज्ञांची एक टीम आतमध्ये गेली. सगळी प्रेते बाहेर काढण्यात आली. शास्त्रज्ञांनी सगळा डेटा गोळा करून घेतला आणि ती तबकडी पुढच्या तपासासाठी एका बाजूला नेण्यात आली.
तबकडीच्या डेटाचे विश्लेषण करताना त्यांना जे आढळले ते पाहून ते थक्क झाले. पृथ्वीवरचे अनेक फोटो होते त्यात. पाण्याचे फोटो, झाडांचे फोटो, पाऊस, वादळ, ढग, बर्फ, उडणारे सजीव, जमिनीवरचे सजीव यांचे फोटो पाहून ते हादरून गेले. आपल्या ग्रहासारखे इथेही सजीव आहेत पण उडणाऱ्या सजीवांचे त्यांना आश्चर्य वाटले. जिवंत सापडलेल्या बंडखोर शास्त्रज्ञाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. कारण वाचलेल्यांपैकी तो एकच होता आणि या सगळ्या बंडखोरीची माहिती तोच देऊ शकत होता. पृथ्वीबद्दल जी काही मोडकी तोडकी माहिती त्यांना मिळाली होती ती त्यांनी आपल्या मूळ ग्रहावर आणि MS 2 वर पाठवली.
इकडे MS 2 म्हणजे दुसरी मदर स्पेसशिप आता पृथ्वीभोवती फेऱ्या मारत होती. घिरट्या मारताना त्यातल्या लोकांना पृथ्वीवर जे काही दिसत होते ते पाहून ते आश्चर्यचकित झाले होते. इतक्यात त्यांना मंगळावरील मदर स्पेसशिप मधून पृथ्वीबद्दलचा संदेश मिळाला. आता एवढ्या मोठा ग्रहावर तबकड्या शोधणे तसे अवघड काम होते. त्या नक्की कुठे पडल्या याचा ठावठिकाणा काहीच नव्हता. रडारवर त्या दिसणे अशक्यच होते कारण कोसळून त्या बेचिराख झाल्या होत्या. पण नंतर त्यांनी त्यांच्या तबकड्यांमध्ये लावलेल्या ब्ल्यू बॉक्सची आठवण झाली. तो ब्लू बॉक्स म्हणजे विज्ञानाचा अजब नमुना होता. कोणत्याही तापमानात ते तग धरून राहू शकत होता. त्याच्या आतमध्ये एक असे यंत्र होते जे हजारो वर्ष चालू शकत होते. त्यात एक लो फ्रीकवेन्सी रिसिव्हर होता जो त्याला सेट केलेल्या लो फ्रीकवेन्सी रेडिओ सिग्नलला स्वतःहून उत्तर देऊ शकत होता. प्रत्येक तबकडीला स्वतःचा असा ब्लू बॉक्स होता आणि प्रत्येकाची फ्रीकवेन्सी वेगवेगळी होती. एकदा का ह्या फ्रीकवेन्सी मॅच झाल्या की ब्ल्यू बॉक्स सगळ्या बाजूंनी एक निळा प्रकाश सर्वदूर फेकायला सुरू करतो. याचाच वापर करून त्यांनी तबकड्या शोधायचे ठरवले. त्यांनी एक लो फ्रीकवेन्सी सेट केली 3.13 Hz.
ही लो फ्रीकवेन्सी त्या कोसळलेल्या ४ तबकड्यांपैकी एका तबकडीची होती. 3.13 Hz च्या लहरी आता पृथ्वीवर पडू लागल्या. या लहरी पाणी, डोंगर यांच्यातून आरपार जातात. बराच वेळ शोधल्यानंतर MS 2 च्या रिसिव्हर ने एक फ्रीकवेन्सी पकडली. ती होती 3.13 Hz. याचा अर्थ एका तबकडीच्या ब्ल्यू बॉक्सने MS 2 ची फ्रीकवेन्सी पकडून तिला पुन्हा आल्या ती दिशेला पाठवली होती. अचानक पृथ्वीवरून निळा रंगाच्या प्रकाश किरण दिसू लागली. हळूहळू आजूबाजूचा अंदाज घेत MS 2 त्या प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागली. उच्च दर्जाच्या दुर्बिणीतून त्यांनी त्या प्रकाशाच्या दिशेने पाहिले तर त्यानं त्यांचा ब्ल्यू बॉक्स दिसला ज्यातून निळा प्रकाश बाहेर पडत होता. थोड्याचवेळात MS 2 त्या ब्ल्यू बॉक्सपासून थोडी लांबवर उतरली. आकाशातून खाली उतरत असतानाच त्यांना कळले होते की ही तबकडी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वेगाने खाली येऊन आदळली होती. मोठा भयानक स्फोट होऊन तिथे मोठा खड्डा पडला होता. MS 2 मधल्या लोकांना आधीच पृथ्वीबद्दल थोडी माहिती मिळाली होतीच त्यामुळे त्याच्या पोटातून शोधकार्यासाठी काही गाड्या बाहेर पडल्या. पाठोपाठ असंख्य ड्रोन बाहेर पडले. ब्ल्यू बॉक्सच्या आजुबाजूला खूप लांबवर सर्च ऑपरेशन राबवले गेले पण एवढ्या भयानक स्फोटात कोणी वाचण्याची शक्यता फार कमी होती. ब्ल्यू बॉक्स सारखाच आणखी एक बॉक्स, खरेतर त्याला बॉक्स नाही म्हणता येणार पण चेंबर म्हणू शकतो. तर प्रत्येक तबकडीमध्ये एक झीरो चेंबर (zero chamber) नावाचा असा एक चेंबर होता ज्यात एकाचवेळी १० लोक आणि महत्वाची माहिती, वस्तू साठवता येऊ शकत होत्या. जेव्हा तबकडी क्रॅश होते तेव्हा क्रॅश होण्याआधी त्या झीरो चेंबरला तबकडीतून वेगळे करता येत होते. Energency escape म्हणालात तरी चालेल.
सगळ्यात आधी तो ब्ल्यू बॉक्स हस्तगत करण्यात आला. त्याला घेऊन एक गाडी MS 2 मध्ये आली. बाकीच्या गाड्या आणि ड्रोन्स झीरो चेंबरला शोधण्यासाठी फिरत होते.