Devi - 2 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | देवी (कादंबरी) भाग 2

Featured Books
Categories
Share

देवी (कादंबरी) भाग 2

*******७*******************

          ती रात्र...... ती रात्र आज सम्राटांना भयाण वाटत होती. आज रात्रीला त्यांना पुरेशी झोप येत नव्हती. देवीला भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ते सारखे या कुशीवरुन त्या कुशीवर कड फिरवीत होते. अशातच सकाळ झाली व सकाळी सकाळी त्या राजवाड्याच्या भिंतीतून पक्षांचा किलबिलाट कानी आला. तसे ते उठले. उठल्याबरोबर त्यांनी हातपाय धुतले व राजवाड्याच्याच परसबागेत थोडा वेळ फिरण्यासाठी सज्ज झाले. त्यानंतर सकाळची न्याहारी आटोपून त्यांनी राज्यकारभाराची सुत्र कारुवाकीकडे सोपवली व ते देवीला भेटण्यासाठी राजवाड्यातून रवाना झाले.
          तो रस्ता. आज तो रस्ताही दूर दूर वाटत होता. सम्राटांच्या मनात विचारांचं वादळ सुरु झालं होतं. त्यातच घोडेही तेवढ्या ताकतीनं चालतांना दिसत नव्हते. 
           पाटलीपुत्रचं अंतर तेवढं लांब नव्हतंच. तरीही आज सम्राटांना ते अंतर जास्त वाटत होतं. तसे मजल दरमजल करीत सम्राट अशोक विदिशाला पोहोचले. तशी दासीनं देवीला सुचना दिली. सुचना दिली की महाराज आलेय. त्यातच देवीला फारच आनंद झाला. परंतु दुसर्‍याच क्षणी देवीचा चेहरा पडला. तिला वाटलं, ते महाराज, ज्यांनी कलिंगशी युद्ध केलं आणि तिथं निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्या महाराजांच्या येण्याबद्दल का आनंदीत व्हायचं.
          तिचा तो विचार. तोच तिला दासी म्हणाली,
         "महाराणीसाहेबा, आपले महाराज येत आहेत. कलिंगवर विजय मिळविल्यानंतर पहिल्यांदाच येत आहेत आपल्या भेटीला. आपण त्यांचं स्वागत करणार नाहीत का?"
          ते दासीचं बोलणं. त्यावर विचार करुन देवीनं उत्तर दिलं.
            "मल्लिका, त्या महाराजांपेक्षा तू तरी बरी आहेस की तू कोणाची हिंसा तर करीत नाहीस. परंतु ते महाराज, ते महाराज. त्या महाराजांनी कलिंग युद्धात निष्पाप जीवांना मारलं. त्यांच्या आयाबहिणींना आणि पुत्रांना ठेच लावली. त्या महाराजांच्या आगमनाचा मी का आनंद साजरा करावा?"
           "परंतु राणीसरकार. ती राजांना आवडणारी गोष्ट. राजा जर आपलं साम्राज्यवादी धोरण स्विकारणार नाहीत तर उद्या सर्वच राज्य राजांवर हावी होतील व संपुर्ण राज्यच गुलाम होईल. यामुळंच मला तर कलिंगचं युद्ध करतांना महाराजांचं काहीही चुकलेलं दिसत नाही."
           "मल्लिका, तुला नाही कळत यातलं."
           "राणी सरकार, परंतु ते सगळं जावू द्या. ते आपलेच महाराज आहेत. त्यांना माफ करा."
          "माफ तरी मी कशी करु? माफी त्या व्यक्तीला करावी. जो आपलं ऐकेल. मल्लिका, महाराजांना मी कलिंग युद्धापुर्वी बरंच वेळा समजावलं. परंतु महाराजांनी ते ऐकलं नाही. बदलाची भुमिकाच घेत नाहीत महाराज. काय करावं, ते कळत नाही मल्लिका आम्हास. कदाचीत महाराजात असा बदल केव्हा होणार, तेही कळत नाही आम्हास."
          "महाराणी साहेबा, होईल बदल महाराजात. वेळ लागेल. कदाचीत वयोवृद्ध झाल्यावर महाराज बदलतील असं वाटतं."
         "मल्लिका, त्याच क्षणाची वाट आहे मला. वाटतं की तोच क्षण उजळेल व महाराज बदलतील. पालन करतील, प्रज्ञा, शिल करुणेचं. तेव्हाच शांती लाभेल. शांती लाभेल या जीवास. मगधातही शांती लाभेलच."
          "जावू द्या महाराणी. जे झालं ते झालं. आता गेलेले दिवस काही परत येणार नाहीतच. ते परत येतील महाराज बदलल्यावर. कदाचीत आपलं प्रेम कमी पडतंय महाराजांवरचं. आपण भरभरुन प्रेम द्या महाराजांना. मी तर असं ऐकलं आहे की एका स्रीमध्ये भरपूर ताकद असते. एवढी ताकद असते की ती अख्खं साम्राज्यच नष्ट करु शकते. आपल्यासमोर फक्त एका महाराजांना बदलवणं आहे. जे बदलू शकतात." 
          मल्लिका बोलून गेली. मात्र महाराजांबद्दलची असलेली खंत काही देवीला स्वस्थ बसू देत नव्हती. 
          महाराज विदिशा नगरीत आले होते. सर्व प्रजाजनांनी त्यांचं स्वागत केलं होतं. तसं नाईलाजास्तव देवीनंही त्यांचं स्वागत केलं. परंतु राग तो होताच देवीच्या मनात. तो काही बाहेर निघाला नव्हता. अशातच रात्र झाली.
          ती रात्र. त्या रात्रीला चंद्राच्या प्रकाशानं चिरुन टाकलं होतं. रात्र फारच झाली होती व देवी आपल्या कक्षाच्या बाहेर उभी होती. तोच तिथं महाराज प्रवेशले. म्हणाले,
         "राणीसाहेब, आपण अजुनही जागेच आहात. का बरे?"
         ते महाराजांचं बोलणं. परंतु त्याला दुजोरा न देता देवी गप्प होती. तोच सम्राट अशोक पुन्हा म्हणाले,
          "राणीसाहेब, आज आपण खुश वाटत नाहीत. कारण कळावं म्हणतो आम्ही. काय कारण आहे?"
          ते परत सम्राट अशोकांचं बोलणं. त्यावर पुन्हा गप्प होती देवी. तोच पुन्हा सम्राट बोलले.
          "राणीसरकार. मी आपल्या भावना समजल्या आणि कारणही समजलं. आपण नाराज आहात. कारण आम्ही आपलं काहीच ऐकलं नाही. आपलं काहीही एक न ऐकता आम्ही कलिंगशी लढाई केली. रक्तपात केला. कित्येक माणसं मारली. नाहक बळी घेतले. हे पापच घडलं आमच्या हातून. ज्याला प्रायश्चित नाही. क्षमाही नाही. परंतु राणीसरकार, आता यापुढं असं कधीच घडणार नाही. आता परत कोणत्याच कलिंगशी युद्ध होणार नाही. आपली शपथ आहे आम्हाला."
           ते सम्राट अशोकांचं बोलणं. त्यात आत्मियता होती. दया होती, प्रज्ञा, शिल, करुणा होती. तरीही महाराणी बोलली नाही त्यांच्याशी. ते पाहून परत सम्राट म्हणाले,
          "राणीसाहेब, आपण आम्हाला माफ करा आणि आम्हास हे सांगा की आम्हास बौद्ध धम्म घ्यायचा आहे. तो कुठे मिळेल व कसा प्राप्त होईल वा करता येईल ते सांगावे म्हणजे झालं."
           तो बौद्ध धम्म. ज्या धम्मात आचार विचाराला स्थान होतं. तो धम्म मुक्त विचार करण्याला वाव देत होता. तो धम्म बुरसटलेल्या अंधश्रद्धेला तिलांजली देत होता. तो धम्म आत्मा परमात्याला मानत नव्हता. तोच धम्म आपल्यासाठी चांगला. असं मनात ठरवून सम्राट अशोक विदिशाला आपली प्रिय पत्नी देवीची भेट घेण्यासाठी आले होते. ज्यात विदिशा भार्या देवीनं बौद्ध धम्मातील चांगली तत्व सम्राट अशोकांना सांगीतली होती. ज्या चांगल्या तत्वानं सम्राट प्रभावीत झाले होते.
           ते बौद्ध धम्माचं स्फुर्लिंग. ती ज्योत. ती ज्योत सम्राटांच्या मनात विदिशा भार्या देवीनं जागवली होती कलिंग युद्धापुर्वीच. त्याच स्फुर्लिंगाच्या भरवशावर आज सम्राट अशोक देवीला बोलून गेले होते की त्यांना बौद्ध धम्म घ्यायचा आहे. तो कुठं मिळेल व कसा घ्यावा, ते महाराणी देवीनं सांगावं.
          ते सम्राट अशोकांचे बोल. त्या बोलण्यावर विश्वास करुन सम्राटांनी देवीला जे प्रभावीत केलं. त्याच प्रभावीतपणानं तिनं सम्राटांना बौद्ध धम्म कसा घ्यायचा. त्यासाठी काय करायचं. तो कुठे मिळतो. हे सर्व सांगीतलं व लागलीच सम्राटांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला.
         तो बौद्ध धम्म. तो बौद्ध धम्म एका राजानं आणि तोही चक्रवर्ती सम्राटानं घेताच संपुर्ण राज्य आनंदीत झालं. त्यातच सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा स्विकार करणं, ही गोष्ट आजुबाजूच्या शत्रूंनाही चांगली वाटली. त्याचं कारण होतं, सम्राटांचा पराक्रम. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा स्विकार करेपर्यंत आजुबाजूला दहशतच असायची. वाटायचं की सम्राट आपल्या राज्याशी युद्ध थोपवतील व आपल्याला मांडलिक बनवतील. मांडलिक असणं म्हणजेच गुलामी. अशी गुलामी की संपुर्ण राज्यातील प्रजेला सम्राट अशोकांनी सांगीतलेली कामं बिनविरोध करावी लागतील. तो धोका आज नसल्यानं आज संपुर्ण सम्राटांचंच राज्य नाही तर इतरही आजुबाजूंची राज्य खुश झाली होती. 
           सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म घेतला होता. तसे आज सम्राट अशोक बौद्ध धम्मातील आचरणाचे व नियमांचे पालन करीत होते. काळ हळूहळू सरकत होता. तसतशी बौद्ध धम्माची महतीही सम्राट अशोकांना कळू लागली होती. वाटू लागलं होतं की काश! हा बौद्ध धम्म मी कितीतरी वर्षापुर्वी घेतला असता तर...... तर आज माझ्यावर विशाल पाप बसलं नसतं. आज मी बौद्ध धम्म घेतल्यावर सुखी झालो असलो तरी माझ्यावर कलिंगच नाही तर इतरही युद्धात मेलेल्या लोकांचं पाप आहे. ते पाप कधीच दूर होवू शकत नाही.
         बौद्ध धम्म घेताच त्यातील सत्य सार व आचरण सम्राटांना कळले. त्यातच त्यांनी ठरवलं की एवढा जर चांगला धम्म आहे, तर या धम्माचा प्रचार व्हावा. त्यासाठी त्यांनी राज्यात कितीतरी स्तूप बांधले. वाटलं की जेवढं धम्माचं स्थापत्य होईल व ते स्थापत्य लोकांना दिसेल. तेवढे लोकं बौद्ध धम्म घेतील. वाटलं की लोकं सुखी व्हावेत. वाटलं की ज्या गोष्टी शाश्वत नाहीत. त्या गोष्टीत लोकांनी गुरफटून राहू नये. वाटलं की लोकांच्या मनात अंधश्रद्धेची वाढ होवू नये. वाटलं की मरणानंतर आपली आत्मा स्वर्गात व नरकात जाते. ही गोष्ट लोकांना भावू नये. वाटलं की आपल्या आपल्या कर्मानुसार आपल्या स्वर्ग व नरक मिळतो. याचं स्मरण लोकांना असू नये. याचाच अर्थ मृत्यूची लोकांना भीती वाटू नये हा होता. याचा अर्थ असा नव्हता की मृत्यूची भीती लोकांच्या मनातून निघून लोकांनी वाईट आचरण करावं. कारण ज्यांना मृत्यूची भीती नसते. तो वाईट आचरण करतो. त्यासाठी बौद्ध धम्मात शिल, प्रज्ञा, करुणेलाही महत्व दिलं होतं. लोकांच्या मनातून पाप पुण्य या गोष्टी निघून जाव्या हे सांगीतलं होतं बौद्ध धम्मानं आणि त्याच पाप पुण्याची जागा प्रज्ञा, शिल करुणेनं घेतली होती. त्या प्रज्ञा, शिल करुणा ज्यांना समजल्या. तो व्यक्ती बुद्ध अर्थात ज्ञानवंत झाला. असं समजलं जाई. त्या गोष्टी ज्या व्यक्तीला समजल्या. त्या व्यक्तीला त्यांच्या वर्तन बदलासाठी भीतीची गरज नाही. तर समजदारीची गरज आहे. हेच बौद्ध धम्म सांगत होता. त्याच गोष्टी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म घेतल्यानंतर त्यांना समजला व तसा समजल्याने त्याच बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोक आता सरसावले होते.
          स्तूप बांधून झाले होते. त्यातच आता त्यांना वाटत होतं की शेजारच्या राज्यातही बौद्ध धम्म वाढावा. बौद्ध धम्माची सर्व जगालाच गरज आहे. मनातील भीती नष्ट करण्यासाठी व अंधश्रद्धा दूर लोटविण्यासाठी. स्वतः ज्ञानवंत होण्यासाठी नव्हे तर ज्ञानाचा दिव्य प्रकाश लोकांच्या जीवनात फुलण्यासाठी. त्याच गोष्टीच्या भरवशावर सम्राट अशोकांनी सांची इथं एक धम्म परीषद भरविण्याचं ठरवलं. ज्यात त्यांनी आपल्याही मुलांना उपस्थित ठेलं व तसं वाटत असल्यानं त्यांनी त्याबाबत चर्चा करण्यासाठी परत एकदा ते विदिशात आले. त्याच देवीला भेटण्यासाठी. जिच्या बोलण्यानं प्रभावीत होवून सम्राटांनी बौद्ध धम्म स्विकारला होता.
           आज परत एकदा सम्राट अशोक आपल्या पत्नीला भेटण्यासाठी विदिशातच आले होते. ती विदिशा भार्या आजही पाटलीपुत्रमध्ये नाही तर विदिशातच राहात होती. तिनं आपले पती अशोकाशिवाय संपुर्ण जीवन विदिशातच घालवलं होतं. त्यातच तिनं सम्राट अशोकाशिवाय आपली मुलंही विदिशातच लहानाची मोठी केली होती. शिवाय त्यांना बौद्धच तत्वज्ञानातील चार चांगल्या गोष्टी तिनं विदिशातच शिकवल्या होत्या. आज तीच तिची मुलं बौद्ध तत्वज्ञान शिकून लहानाची मोठी झाली होती. ती मुलं केवळ आपल्या शरीराच्या आकारानंच मोठी झाली नव्हती तर ती ज्ञानवंतही बनली होती.
          आज सम्राट अशोक देवीला भेटायला आले होते. ते भेटले व म्हणाले,
            "देवी, आम्हाला आपल्या भावना कळल्यापासून आम्ही सुखी झालोत. आपण आम्हाला बौद्ध तत्वज्ञान सांगीतलं नसतं तर आज आम्ही बौद्ध धम्म स्विकारले नसते. अन् आम्ही आज राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर या पाच षड़रिपूपासून दूर गेलो नसतो. आपण जर नसता तर आम्ही आजही व्याभिचारी राहिलो असतो. आजही आम्ही स्माज्यवादी धोरणच ठेवलं असतं आणि सतत युद्धात माणसं मारुन पापच करीत राहिलो असतो. सतत सुरेच्या आहारी जावून नशेतच धृत राहिलो असतो. कधी द्यृत खेळून आम्ही आमचं राज्य कदाचीत हरलोही असतो. आज ना आपलं राज्य राहिलं असतं ना कोणी या सम्राटाला चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखलं असतं. परंतु आज लोकं आम्हालाही ओळखू लागले आहेत. आमचा सन्मान करु लागले आहेत. आमच्या गोष्टी ऐकू लागले आहेत. आता आम्हालाही समजू लागलं आहे की बौद्ध तत्वज्ञान महत्वाचं आहे. आम्हालाही वाटू लागलं आहे की या बौद्ध तत्वज्ञानाची खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे. त्यामुळंच लोकांनी बौद्ध तत्वज्ञान अंगीकारावं असं वाटू लागलं आहे आज. त्यामुळंच राणीसरकार आम्ही अनेक स्तूप बांधले आणि बांधतच आहोत. ही झाली राज्यातील काम॔ आणि आमची राज्यातील कामगीरी. परंतु राज्याबाहेरही आमचं काही कर्तव्य बनतं. आम्हालाही वाटतं की आमच्या शेजारील राज्यांना याच तत्वज्ञानाचा फायदा व्हावा. आम्हालाही वाटतं की शेजारील राज्य आपल्या बौद्ध तत्वज्ञानानं चालावीत. त्यांच्या मनात लोभ द्वेष निर्माण होवू नये की त्यांनी एकमेकांसोबत युद्ध करावं. ज्यातून विनाकारण लोकं मरतील व पाप घडेल. त्यासाठी महाराणीसाहेबा, आम्ही ठरवलंय की बौद्ध धम्माची परीषद आयोजित करायची. देशोदेशीतील लोकं या परीषदेला बोलवायचेय. ज्यात आपल्या राज्यातीलही विद्वान असावेत. ज्यात आपले आप्तही असावेत आणि त्यातच आपले पुत्रही आणि त्या पुत्रात आपला महेंद्र आणि संघमित्राही. आता आम्हाला सांगा राणीसरकार की आम्ही त्या परीषदेच्या निमित्यानं का असेना, आम्ही महेंद्र आणि संघमित्रालाही घेवून जाणार आहोत पाटलीपुत्रला. मात्र आपलं यावर मत काय? ते निर्भीडपणानं सांगावं. आपण नकार देत असाल तर आम्ही आपल्यावर जबरदस्ती करणार नाही. तशी राजकुमारी संघमित्रा व युवराज महेंद्र ही आपल्या दोघांची जरी मुलं असली तरी त्यांच्यावर आपला अधिकार जास्त आहे. कारण आपणच त्यांना वाढवलंय. लहानाचं मोठं केलंय. त्यांना शिकवलंय. ते तत्वज्ञान शिकवलंय. ज्यांची त्यांना आज गरज होती. ज्यांची आम्हालाही गरज होती. त्यामुळंच आपलाच त्यांच्यावर जास्त अधिकार आहे आमच्यापेक्षा. असं जरी असलं तरी राणीसरकार आम्ही त्यांना बौद्ध धम्म परीषदेसाठी नेणार आहोत पाटलीपुत्रला. कारण आम्हाला बौद्ध तत्वज्ञानाचा बाह्य देशातही प्रचार करायचाय. मात्र आपलं मत सांगा."
          देवीनं सम्राट अशोकांचे बोलणे ऐकले. ती शांतपणे ऐकत होती. तिनं त्यांच्या तोंडून बौद्ध धम्माबद्दलच्या चांगल्याच गोष्टी ऐकल्या. ज्यातून तिचं मन प्रभावीत झालं. ज्यातून तिला सम्राट अशोकांची महत्ता समजायला आली. ज्यातून ती उत्तरादाखल म्हणाली,
           "महाराज, आम्ही राजकुमारी संघमित्रा आणि युवराज महेंद्रच्या मातोश्री असलो तरी त्यांच्यावर आपलाही जास्त अधिकार आहे. कारण आपण त्यांचे पिता आहात. त्यामुळंच मुलांचं काय चांगलं करायचं आणि काय वाईट हे आपल्याला चांगलंच कळतंय. तेव्हा आपण आपल्याला जसं वाटतंय. तसं करा. आमची परवानगी घ्यायची काहीही गरज नाही. त्यामुळं आपण जेही कार्य महेंद्रला सोपवाल. तेही कार्य करायला लावण्यास आपण सक्षम आहात. राजकुमार महेंद्र व राजकुमारी संघमित्रा. ही जशी माझी मुलं आहेत. तशीच आपलीही आहेतच."
           महाराणी देवीनं सम्राटांना तसं बोलताच त्यांना अधिकच स्फुरण चढलं. त्यानंतर ते परत म्हणाले,
           "राणी सरकार, मी आपणालाही विनंती करतोय की आतातरी आपण पाटलीपुत्रला चालावं व एका पट्टराणीचं जीवन पाटलीपुत्रातच घालवावं. अशी माझी इच्छा आहे."
            ते सम्राट अशोकांचं बोलणं. त्यावर विचार करीत देवी म्हणाली,
          "महाराज, आपण युवराज महेंद्र आणि राजकुमारी संघमित्राला पाटलीपुत्रला घेवून जावं. परंतु आम्हाला नेवू नका पाटलीपुत्रला आणि तशी विनंतीही करु नका पाटलीपुत्रला नेण्याची. आम्ही इथेच सुखी आहोत. शिवाय आमचं तिथं येणं म्हणजे आपलं वचन मोडणं होईल. आम्ही वचनाला मोठं स्थान देतोय. आम्ही आपणाकडून वचन घेतलेलं आहे की आम्ही विदिशातच राहू. आपल्या पाटलीपुत्रला येणार नाही. कृपा करुन आपण आमचं वचन मोडू नका म्हणजे झालं."
           ते सम्राट अशोकांची महाराज्ञी देवीचं म्हणणं. ते सम्राट अशोकाला भावलं व तद्नंतर सम्राट अशोकांनी देवीला पाटलीपुत्रला न नेता विदिशातच ठेवलं. त्यातच ते संघमित्रा आणि महेंद्रला पाटलीपुत्रला घेवून गेले होते. 
            महेंद्र व संघमित्राला सम्राट अशोकांनी पाटलीपुत्रला आणलं. देवी विदिशातच राहिली. ती पाटलीपुत्रला आली नाही. त्यातच दिवसामागून दिवस जावू लागले. तसं एक दिवस सम्राट अशोकांनी एक दिवस सांची इथं धम्म परीषद भरविण्याचं ठरवलं. ज्या धम्मपरीषदेला देशोदेशीची मंडळी बोलाविण्याचं धोरण सम्राट अशोकांनी अंगीकारलं व एक दिवस धम्मपरीषद झाली. ज्यात देशोदेशीची मंडळी उपस्थित झाली होती.
           ती धम्मपरीषद. त्या धम्मपरीषदेत आलेली देशोदेशीची मंडळी. त्यांनी धम्मपरीषदेत बौद्ध धम्माची तत्वे व आवश्यकता ऐकली. त्यातच त्यांनी काही प्रश्नही धम्मपरीषदेत केले. ज्यांची उत्तरं सम्राट अशोकांनी व त्यात सहभागी झालेल्या विद्वानांनी दिलीत. त्यानंतर ते जेव्हा परत गेले. तेव्हा त्यांनी सम्राट अशोकांना विनंती केली की आम्हीही त्या धम्मपरीषदेतील विचारांनी प्रभावीत झालेले असून आमच्याही देशात त्या तत्वज्ञानाचा फायदा आमच्याही देशातील प्रजेला व्हावा. अशी आमची इच्छा आहे. तेव्हा आपण आमची विनंती स्विकार करुन आमच्या देशात आपले दूत पाठवावे. ते दूत की जे बौद्ध तत्वज्ञान आम्हाला चांगल्याप्रकारे समजावून सांगू शकतील. 
          देशोदेशीचे राजे व राज्याचे प्रतिनिधित्व करणारे दूत आले तसे माघारी निघून गेले. त्यानंतर सम्राट अशोकांनी त्या त्या देशांच्या आग्रहास्तव आपल्या देशातील काही विश्वासू लोकांना त्या त्या देशात पाठवले. ज्यात त्यांचा मुलगा महेंद्र होता. ज्याला श्रीलंकेला पाठवले होते.
         महेंद्र श्रीलंकेत गेला. त्यानं बौद्ध धम्माचं तत्वज्ञान श्रीलंकेतील लोकांना त्यांच्याच देशात सांगीतलं. ज्यातून श्रीलंकेतील लोकं प्रभावीत झाले व त्यांनी पुरुषांचा भिक्षू संघ काढला. 
           महेंद्रच्या बौद्ध तत्वज्ञान मांडण्यानं निघालेला भिक्षू संघ. ज्यात फक्त पुरुषच होते. परंतु त्याच तत्वज्ञानानं तेथील राजकुमारीही प्रभावीत झाली होती. तिलाही वाटत होतं की या देशात महिलांचाही बौद्ध संघ स्थापन व्हावा. त्याच हेतूनं त्यांनी महिलांसाठी बौद्ध भिख्खू संघ व्हावा. याची मागणी करणारं याचिका पत्र सम्राट अशोकांना पाठवलं होतं. ज्यातून त्यांनी आपली स्वतःची मुलगी संघमित्राची निवड केली होती. 
         
**********************८****************
              
           संघमित्रा...... जिचा जन्म भारतात झाला होता. जिनं विचार केला नसेल की आपल्यालाही महत्व दिलं जाईल एखाद्या देशात. आपल्याही नावाचा एक दिवस असेल. परंतु म्हणतात की विधीचं विधान टळत नाही. मृत्यू हा सारस्वत सत्य असतो व तो टळत नाही. प्रत्यक्ष यमदूत येतो व यमदूत हा जीवंत असलेल्या व्यक्तीला घेवून जातो. परंतु त्याचं कार्य जीवंत राहातं. पैसा जीवंत नसतो त्याच्या जीवनातील. तेच घडलं संघमित्राबाबत व तिच्या जीवनाबाबत.
           संघमित्रा....... कोण होती संघमित्रा? काय केलं तिनं की तिला मानलं जातं श्रीलंकेत? असं काय घडलं तिच्या हातून की तिच्या नावानं एक दिवस असतो?
           संघमित्रा ही ती स्री की जिचा जन्म ऐश्वर्यसंपन्न अशा घराण्यात झाला. ती अशी स्री होती की जिला घरात काहीच कमी नव्हते. अन् तरीही तिनं असं महान कार्य केलं की जे कार्य आजही वाखाणण्याजोगंच आहे. म्हणतात की आपल्याला मृत्यू येवू नये म्हणून दिवस वाढवले जातात. त्यासाठी व्रतवैकल्ये करण्याची भुमिका काही धर्म मांडतात. कोणी त्याला पुनर्जन्माचा आधार देतात. म्हणतात की पुनर्जन्मात पाप केले असेल तर ते या जन्मात भोगावेच लागते. आता पुनर्जन्म आहे किंवा नाही हे काही कोणी पाहायला गेलेले नाही. मृत्यू हा येणारच असतो. तो कोणाला वयोवृद्ध झाल्यानंतर येतो तर कोणाला अगदी ते बाळ एक वर्षाचे असतांना. ज्यानं नुकतंच जगात पाऊल ठेवलेलं असतं. परंतु मृत्यू जरी येत असला तरी आपल्याला आपले जीवन अजरामर करता येते. त्यात दोन प्रकार आहेत. एक म्हणजे चांगले कर्म करुन व दुसरा प्रकार आहे वाईट कर्म करुन. चांगले कर्म करीत असणाऱ्या माणसाची झटपट प्रसिद्धी होत नाही. बराच वेळ लागतो. अन् तो जेव्हा प्रसिद्ध होतो. ती प्रसिद्धी काही लवकर नष्ट होत नाही. मात्र वाईट कर्म करणारा झटपट प्रसिद्ध होतो व त्याची दुर्गती होते. एखादाच व्यक्ती तेवढ्या प्रमाणात प्रसिद्ध होतो.
         आपल्याला माहीत आहे की मृत्यू हा कितीही व्रतवैकल्ये केली तरी येतोच. तो जसा यायचा तसा येतोच. ज्याप्रमाणे मृत्यू हा टाळल्या जावा म्हणून व्रतवैकल्ये असतात. त्याप्रमाणे पैसा वाढायला हवा म्हणून वैभवलक्ष्मीचे किंवा महालक्ष्मीचे व्रत केले जातात. ज्यात महालक्ष्मीचे व्रत करण्याचा काळ हा साधारणतः मार्गशीर्ष महिन्याचा असतो. 
          मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केले जातात. उद्देश असतो लक्ष्मी अर्थात पैसा प्राप्ती. आख्यायिका पसरवली आहे की या महिन्यात तशा स्वरुपाचे व्रत केल्याने पैसा हा केवळ टिकतच नाही तर वाढतो. त्यासाठी एक कथा सांगीतली जाते. जी शिला नावाच्या एका स्रीची कथा असते.
           ज्याप्रमाणे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला किंमत आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धम्मातही याच महिन्याला महत्व आहे. बौद्ध धम्मात संघमित्रा नावाची सम्राट अशोकांची कन्या आपल्या तान्ह्यूल्या मुलाला घेवून याच दिवशी श्रीलंकेतील अनुराधापूरात गेली होती. केवळ धम्माचा उपदेश देण्यासाठी. पैसा कमवता यावा हे सांगण्यासाठी नाही. त्याचं कारण होतं, तेथील युवराज्ञीचं सम्राट अशोकाला पत्र लिहून बौद्ध भिक्षुणीची मागणी करणं. जिचं नाव अनुला होतं. त्याचं कारण होतं, महेंद्राचं श्रीलंकेत जाणं.
          म्हणतात सर्वात पहिलं बौद्ध संमेलन हे सम्राट अशोकांनी सांची येथे भरवलं. ज्यात अनेक मान्यवर व उपासक उपस्थित होते. ज्यात सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्रही उपस्थित होता. तो आपल्या पित्याची अवस्था व इच्छा पाहून श्रीलंकेला जाण्यास तयार झाला व तो जेव्हा श्रीलंकेला पोहोचला. तेव्हा तेथील राजा देवनामप्रिय तिस्स यांनी त्याचं स्वागत केलं.
           श्रीलंकेत असतांना युवराज महेंद्रचा स्वभाव व त्याची तेजस्वी वाणी लोकांनी ऐकली व ते प्रभावीत झाले. त्यातच त्यांनी बौद्ध भिक्षु संघांची स्थापना केली. परंतु महिलांचाही बौद्ध संघ असावा. याच उद्देशानं लिहिलेली सम्राट अशोकाला चिठ्ठी व ती चिठ्ठी पाहताच त्या चिठ्ठीची चर्चा घरातच सम्राट अशोकांनी करताच त्यांची मुलगी संघमित्रा तयार झाली. परंतु सम्राट अशोकांनी नकार दर्शवला. म्हटलं तान्हुलं लेकरु. दुरचा प्रवास. ती व ते लेकरु कसं सहन करेल? मात्र निश्चेचा महामेरु ढळू न देता संघमित्रानं ते आव्हान स्विकारलं व ती श्रीलंकेत महिलांचा बौद्ध भिख्खू संघ स्थापन करण्यासाठी निघाली. ज्यात तिला सात दिवस लागले व जातांना तिनं सोबत बोधीवृक्षाचं लहानसं रोपटंही नेलं. 
          संघमित्रा श्रीलंकेत गेली व ती ज्या दिवशी श्रीलंकेत पोहोचली. तो दिवस होता त्यावेळचा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार. तेव्हापासून बौद्ध धम्मातही मार्गशीर्ष महिन्याला मानलं जातं. 
         सध्याचा काळ म्हणजे पैशाकडे धावण्याचा काळ. या काळात केवळ पैशाला मान दिला जातो. दोन चांगल्या गोष्टी ऐकण्याला व करण्याला महत्व दिलं जात नाही. म्हणूनच या काळात महालक्ष्मी व्रताला महत्व आलेलं आहे आणि संघमित्रा दिवस कालबाह्य ठरलेला आहे. मात्र श्रीलंकेत आजही संघमित्रा दिवस म्हणून मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार मानल्या जातो. संघमित्रानं भारतातून ज्या बोधीवृक्षाचं रोपटं श्रीलंकेत नेलं होतं व लावलं होतं. तो बोधीवृक्ष आजही तेथे अस्तित्वात असून त्याच लावलेल्या बोधीवृक्षाखाली लोकं गोळा होतात. त्यानंतर साधारणतः हा उत्सव तेथे महिनाभर चालतो. 
         मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात महालक्ष्मी व्रत म्हणून तर बौद्ध धम्मात संघमित्रा दिवस म्हणून मानण्यात येतो. प्रत्येक धर्मानुसार त्या त्या गोष्टी व प्रथा परंपरा. मात्र काही लोकं आपल्या आपल्या प्रथेनुसार एकमेकांच्या धर्मावर आगपाखड करतात. त्वेषाचे बोल बोलतात. हे बरोबर नसून डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात जी धर्मनिरपेक्षता दाखवली. ज्यातून सहिष्णुता व एकमेकांच्या धर्माबद्दल आदर. ही मुल्य दिसत नाही. जे दिसायला हवं ते दिसत नाही आणि जे दिसायला नको. ते दिसतं. 
         धर्म हा कोणताही असो. तो धर्म वाद करणे शिकवीत नसून प्रत्येकच धर्म हा सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरीग्रह, ब्रम्हचर्य, या गोष्टींना महत्व देते. प्रत्येकच धर्म वादाला स्थान देत नाही. प्रत्येकच धर्म बळजबरीला स्थान देत नाही. तसेच प्रत्येकच धर्म हे एकमेकांच्या कुरघोडींना स्थान देत नाही. हे खरं असतांना आम्ही आज आपला धर्म वाढविण्यासाठी एकमेकांच्या धर्मावर आगपाखड करतो. आपला धर्म वाढायला हवा म्हणून बळजबरी करतो. अशानं धर्म काही काळच वाढतो. जेव्हापर्यंत शासन काळ असतं. शासनकाळ व हुकूमशाही संपली की आपोआपच वाढलेला धर्म हा कमी होतो. म्हणून धर्म जर वाढवायचा असेल तर असल्या हुकूमशाहीला थारा नाही. आजही श्रीलंकेत पुर्ण श्रीलंकाच बौद्धमय आहे. त्याचं कारण संघमित्रा व महेंद्र या भाऊ बहिणीने केलेला त्याग. बिचारी आपल्या तान्ह्युल्या बाळाची चिंता न करता पायपीट करुन श्रीलंकेच्या अनुराधापूरात गेली व तिनं बौद्ध धम्माचा प्रचार केला. तोही मनात किंतु परंतु न बाळगता.
         संघमित्रा ही श्रीलंकेत गेली व आयुष्यभर ती तेथेच राहिली. ती वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी मरण पावली. त्यातच तिचा भाऊ महेंद्र हा ऐंशीव्या वर्षी मरण पावला. आज बौद्ध धम्म टिकून आहे. तो महेंद्र व संघमित्रा सारख्या भावाबहिणींनी आपल्या ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग केल्यामुळेच. त्यांना त्यांच्या राज्यात काहीच कमी नसतांना केवळ बौद्ध धम्मावरील आस्था व त्यातील चांगले तत्व जगाला देण्याची भुमिका व प्रेरणा. त्या प्रेरणेला त्रिवार नमन करावंसं नक्कीच वाटतं. ज्याला त्याचं महत्व कळतं. कदाचीत ते दोघं भाऊबहिण श्रीलंकेत गेले नसते तर आज श्रीलंकेत बौद्ध धम्म नसता व मार्गशीर्ष महिन्यात संघमित्रा दिवस साजरा करायला कोणीच श्रीलंकेत वाली उरला नसता. हे तेवढंच खरं. संघमित्रा व महेंद्रनं आपल्या हयातीत धम्मप्रसाराचे चांगले कार्य करुन दाखवून दिलं की पैसा कमविण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शिकणे अती महत्वाचे आहे. मृत्यूनंतर चांगल्याच गोष्टी सोबतीला येत असतात. पैसा नाही. त्यांच्या घरी ऐश्वर्यसंपन्नता असूनही त्यांनी केलेलं चांगलं कार्य आज लोकांच्या स्मरणात आहे. जर त्यांनी तशा स्वरुपाचं कार्य केलं नसतं तर आज तेही जगाच्या नजरेतून ओझल झाले असते यात शंका नाही.
          महत्वाचं सांगायचं झाल्यास माणसानं पैसे कमविण्यापेक्षा चांगलं कार्य करावं. जेणेकरुन आपलाही कोणी एखादा संघमित्राच्या दिवसासारखा एखादा दिवस साजरा करावा. आपलाही लौकिक व्हावा साऱ्या जगतात आणि आपणही श्रेष्ठ नव्हे तर पुजनीय ठरावे. आपण पुजनीय ठरु. जर आपण आपले चांगले विचार संघमित्रा व महेंद्रसारखे जगाला देवू तर..... जसा त्यांनी केलेला त्याग आजही जगाला त्यांची आठवण करुन देतो. तथागत गौतम बुद्धांसारखा.........
           संघमित्रा व महेंद्र श्रीलंकेत स्थिरावले होते. त्या दोघांनीही श्रीलंकेत आपआपल्या परीनं प्रचार करणं सुरु केलं होतं. संघमित्रानं तिथं गेल्यानंतर स्रियांसाठी बौद्ध भिख्खू संघ स्थापन केला होता आणि ती आनंदानं जीवन कंठत होती. 
            सम्राट अशोकांना श्रीलंकेतील श्रीलंकन राजा देवनामप्रिय कडून आलेली चिठ्ठी. त्यात संदेश वाचल्यानंतर सम्राट अशोकांनी देवीची भेट घेतली. तिला तो संदेश वाचून दाखवला व तिचं मत विचारलं. तेव्हा ती म्हणाली,
           "महाराज, आपण जे ठरवाल. ती गोष्ट मला मान्य आहे."
            देवीनं आपलं मत प्रदर्शित केलं. ते पाहून ते म्हणाले,
            "महाराणीसाहेब, परंतु या संदेशानुसार श्रीलंकेत कोणाला पाठवायचे. ते कळेनासे झाले. आपण जाता काय?"
            ते सम्राटाचं बोलणं. त्यावर देवी म्हणाली, 
            "महाराज, मी कशी जाणार. मी आता जास्त वयाची झालेली आहे. मला तेवढं चालणं शक्य होणार नाही. शिवाय माझ्याच्यानं तेवढ्या प्रमाणात मार्गदर्शन करणंही शक्य होणार नाही. धम्म प्रसाराचं कार्य आहे. ते महान कार्य आहे. त्यासाठी कदाचीत आपण एखादी तरुणी पाहावी."
          "महाराणी, तरुणी तरी विश्वासातील कोणती पाहावी? तसं पुरुषांना पाठव म्हटलं असतं तर काहीतरी व्यवस्था करता आली असती. परंतु स्रियांचा प्रश्न आहे. कोणती स्री श्रीलंका सारख्या दूरच्या स्थळी पाठवावी. हे कळेनासे झाले. कदाचीत आपल्याच संघमित्राला पाठवलं असतं. परंतु तिचंही बाळ लहानसंच आहे. शिवाय ती आपली पोटची मुलगी आहे. तिला तिथं पाठवणं योग्य ठरणार नाही. ती खरंच एकटी जावू शकेल काय? मला तर प्रश्नच पडलेला आहे."
            देवीनं ते महाराजांचे बोल ऐकले. त्यानंतर ती म्हणाली, 
            "महाराज, आपण संघमित्राला पाठवा श्रीलंकेत. वाटल्यास आपण तिला माझ्याकडे पाठवा. मी समजवितेय तिला आणि पाठवतेय श्रीलंकेला. महाराज, मी तिला विचारांच्या मुसळीत तयार केलं आहे. आपण घाबरु नका तिच्याबाबतीत. तीच श्रीलंकेत जाण्यासाठी योग्य आहे."
            महाराणी देवीनं केलेलं मार्गदर्शन. त्यातच सम्राट अशोक सकाळ होताच पाटलीपुत्रला रवाना झाले. त्यांनी राजकुमारी संघमित्राशी वार्तालाप केला व त्याचक्षणी संघमित्राही श्रीलंकेत जाण्यासाठी तयार झाली होती. परंतु श्रीलंकेत जाण्यापुर्वी तिनं आपली प्रिय आई देवीची भेट घेतली होती सांची इथे. त्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी. ज्या आईनं तिला विदिशाला असतांना बौद्ध तत्वज्ञान शिकवले होते. 
            संघमित्रा श्रीलंकेत स्थिरावली होती. त्यातच महेंद्रही श्रीलंकेत स्थिरावला होता. तसा श्रीलंका बौद्धमय झाला होता. तसा सम्राट अशोक आज वयोवृद्ध झाला होता. त्यातच खुश होवून तेथील राजानं एक दूत सम्राट अशोकांचं आभार व्यक्त करण्यासाठी मगधला पाठवला. ज्यांच्याहस्ते एक नजराणाही सम्राट अशोकांसाठी तेथील राजानं पाठवला. यो नजराणा प्रत्यक्ष मानवदेह होता. जी तेथील राजाची सेविका होती. जिचं नाव होतं, तिष्यरक्षिता.
           सम्राट अशोकांना भरपूर दास्या होत्या. ज्या त्यांची सेवा करायच्या व त्यांना नंतर सेविका म्हणून संबोध मिळाला. सम्राट अशोकांचा स्वभाव तसं पाहिल्यास पुष्कळ क्रूर स्वरुपाचा होता. परंतु त्यांचा तो क्रूर स्वभाव शाक्यराणी देवीनं बदलवला. त्यात आणखी भर असंधीमात्रानंही टाकली. जो असंधीमात्रावरही प्रेम करु लागला होता. 
          सम्राट अशोकाचा जन्म अंदाजे इस पुर्व ३०४ मधील व त्यांची पत्नी देवीचा जन्म हा इस पुर्व ३०२ मधील. दोघंही समवयस्कच होते. त्यातच देवीचा जेव्हा विवाह झाला. तेव्हा त्यांना जी मुलं झाली. त्यातील महेंद्रचा जन्म इस पुर्व सन २८४ व संघमित्राचा जन्म इस पुर्व २८२ सांगीतला जातो. देवी ही सम्राट अशोकाची पहिली पत्नी. परंतु ती पाटलीपुत्रला राहायला न आल्यानं त्यांनी दुसरी पत्नी विवाह करुन आणली. जिचं नाव कारुवाकी होतं. तिही प्रेमाचीच पत्नी असल्यानं सम्राट अशोक तिच्यावर निरतिशय प्रेम करु लागले होते. ती पाटलीपुत्रला राहात असे. त्यामुळे सम्राट अशोक तिच्यावर प्रेम करु लागले होते. परंतु ती पाटलीपुत्रला कमी व कलिंगला जास्त राहात असल्यानं त्यांनी पुढं पद्यावतीशी विवाह केला. त्यातच ते पद्यावतीवर निरतिशय प्रेम करु लागले होते. प्रेमासाठी त्यांना त्यांची भार्या पाटलीपुत्रला असणे गरजेचे होते आणि पद्यावती ही पाटलीपुत्रलाच राहात होती. मात्र पद्यावतीही सम्राट अशोकांच्या जीवनात जास्त दिवस राहिली नाही. तिही लवकरच मरण पावली. 
          कोणी म्हणतात की सम्राटांनी असंधीमात्राशी विवाह हा महाराणी पद्यावती मरण पावल्यानंतर केला. ज्यातून कृणालला सांभाळणे होते. 
          कारुवाकी ही कलिंग राज्यातील असून ती जास्त करुन पाटलीपुत्रला राहात नसे. जिचा विवाह हा इस पुर्व २८८ चा असू शकतो. जो कारुवाकीशी झाला होता. कारुवाकी ही देखील महाराज अशोकांची प्रेमिकाच होती. कोणी म्हणतात की कारुवाकी ही एका मासोळी पकडणाऱ्या व्यक्तीची कन्या तर कोणी म्हणतात की ती कलिंगच्या राजाची कन्या. त्यानंतर त्यांनी इस पुर्व सन २७० मध्ये पद्यावतीशी तिसरा विवाह केला. जी पद्यावती लवकरच म्हणजे त्यांचेसोबत तेरा वर्षाचा संसार करुन मरण पावली. जिनं एका मुलाला जन्म दिला होता. त्याचं नाव कृणाल होतं.
         कृणालचं जन्मनाव होतं, धर्मविवर्धन. परंतु त्याचे डोळे हे हिमालयातील लांब चोच असणाऱ्या व अतिशय सुंदर दिसणाऱ्या प्राण्यांसारखे दिसायचे. म्हणूनच त्याला पुढे कृणाल म्हटलं जावू लागलं.
          कुणाल हे हिमालयातल्या एका लांब चोच असणाऱ्या पक्षाचे नाव आहे. या पक्षाला इंग्रजीत पेंटेड स्नाईप्स असे म्हणले जाते. साऱ्या भारतवर्षावर राज्य करणाऱ्या सम्राट अशोकांनी या पक्षाच्या डोळ्यांवरून आपल्या मुलाचे नाव कुणाल ठेवले होते. कुणाल या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे सुंदर डोळ्यांचा पक्षी तर माणसाचे नाव कुणाल असेल तर त्याला अर्थ आहे असा माणूस की ज्याला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसते किंवा असा माणूस की ज्याला काहीही पाहण्यासाठी सुंदर डोळे लाभलेले आहेत. कृणालचे डोळे सुंदर होते. त्यामुळंच त्याचं नाव कृणाल ठेवलं गेलं होतं. तसंच संस्कृत भाषेनुसार या शब्दाचा अर्थ कमळ असाही होऊ शकतो.
           सम्राट अशोकांनी आपल्या या मुलाला लहानपणीच उज्जैनला पाठवले होते. तेथेच त्याने लहानाचे मोठे व्हावे, राजपुत्र म्हणून तेथेच शिक्षण घ्यावे आणि मौर्य साम्राज्याचा वारस म्हणूनच त्याची जडणघडण व्हावी हा अशोकांचा हेतू होता. परंतु झालं उलटच. जो विचार सम्राट अशोकांनी केला नव्हता. 
           सम्राट अशोकांचा राज्यभिषेक इस पुर्व २६८ मधील. तसं पाहिल्यास त्यांनी इस पुर्व २७२ मध्ये मगधची राजसत्ता हातात घेतली होती. परंतु आपला राज्यभिषेक केला नव्हता. राज्याची बागडौर सांभाळत असतांना व घडी बसवत असतांना सम्राटांचा तीन चार वर्षाचा काळ निघून गेला. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे इस पुर्व २६८ मध्ये त्यांनी आपला राज्यभिषेक साजरा केला. ज्यात राज्यभिषेकाचा आनंद म्हणून त्यांनी असंधीमात्राशी विवाह केला.
          असंधीमात्रा ही सम्राट अशोकाची चौथी पत्नी होती. इस पुर्व २५७ ला सम्राट अशोकाची पत्नी पद्यावती मरण पावली. त्यानंतर कृणाल अनाथ झाला. तसा तो अनाथ झाल्यानं त्याचेवर सम्राटाचं निरतिशय प्रेम होतं. सम्राटांना वाटत होतं की कृणालच पुढं पाटलीपुत्राचा राजा बनावा. त्यासाठी तो कृणालला तयार करीत होता. त्यावेळेस कृणाल लहानच होता. तसं पाहिल्यास ज्यावेळेस कृणालला राज्यकारभार करता यावा म्हणून उज्जैनला पाठविण्यात आले. त्यावेळेस त्याचेसोबत सम्राट अशोकांनी आपली प्रिय पत्नी असंधीमात्रालाही पाठवले. तसं पाहिल्यास असंधीमात्रा देखील बौद्ध धम्माशीच निगडीत होती. 
          असंधीमात्राला मुलं नव्हतीच. त्यामूळं की काय तिनं कृणालचं पालनपोषण अतिशय चांगल्या प्रकारे केलं होतं. तसं त्याला धर्माचं ज्ञान देण्यापासून तर पुढं शस्रविद्या शिकविण्यापर्यंत असंधीमात्रानंच कार्य केलं. कारण सम्राट अशोकांना तसा फारसा वेळच मिळायचा नाही. म्हणतात की सम्राट अशोक हे कारुवाकी व असंधीमात्राला जास्त मानाचं स्थान देत होते. परंतु असं जरी असलं तरी ते महाराणी देवीलाही तितकच महत्वाचं स्थान देत होते.
          महाराणी देवीनं दोन मुलं जन्माला घातली होती. मोठ्याचं नाव महेंद्र होतं तर मुलगी ही लहान असून तिचं नाव संघमित्रा होतं. महाराणी कारुवाकीनं एका राजपुत्राला जन्म दिला होता. ज्याचं नाव तिवर होतं. त्यातच महाराणी पद्यावतीनं धर्मविवर्धनला जन्म दिला होता. ज्याचं पुढं नाव कृणाल पडलं होतं. 
         कृणाल हा अतिशय सुंदर व देखणा होता. परंतु तो अनाथ होता. त्यामुळंच त्याला लोकं असहाय्य समजत होते. सम्राट अशोक त्याला राज्याच्या दूरच ठेवायचे. कारण पाटलीपुत्रला कारुवाकीचा मुलगा तीवर असायचा. ज्याची आई जीवंत होती. तसं पाहिल्यास सम्राट अशोक हे ज्याप्रमाणे सर्व राण्यांवर प्रेम करायचा. तसेच ते आपल्या सर्व पुत्रांवरही प्रेम करीत असत.
          सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्म घेतला होता. ज्यात त्यांनी सांची इथे बौद्ध धम्म परीषद भरवली होती. अशातच त्यांनी आपला मुलगा महेंद्र व राजकुमारी संघमित्राला श्रीलंकेला पाठवले होते. 
          संघमित्रा व महेंद्र श्रीलंकेत रमले होते व त्यांनी श्रीलंकन जनतेला प्रभावीत केले होते. ज्यातून राजा तिष्यही प्रभावीत झाला होता. 
          ते श्रीलंकेतील राजाचं प्रभावीत होणं. तसे आज सम्राट अशोक थोडे वयोवृद्ध झाले होते. त्यांना सेविकेची गरज होतीच. तसं पाहिल्यास मगधमध्ये अनेक सेविका होत्या की ज्या सम्राट अशोकांची सेवा करायच्या. परंतु श्रीलंकेतील राजे तिष्यला वाटलं की सम्राट अशोकांचे त्यांच्या देशावर उपकार आहेत. तेव्हा आपण त्यांची सेवा करण्यासाठी एक सेविका पाठवावी. अशातच त्यांना आठवलं तिष्यरक्षितेचं नाव. जी श्रीलंकेतील राजा तिष्यची आवडती सेविका होती. जी त्यांना प्राणाहून प्रिय वाटत असे. त्याचं कारणही तसंच होतं. तिष्यरक्षितेनं आपल्या जीवावर उदार होवून राजा तिष्यचा जीव वाचवला होता. 
           ती घटना होती साप चावण्याची. त्यावेळेस तिचंही नाव तिष्यच होतं. रक्षिता नव्हतं. अशातच राजाला चावलेल्या सापाचं विष तिष्यरक्षितेनं स्वतःच्या तोंडानं ओढून त्यांचा जीव वाचवला होता. तेव्हापासून राजे तिला तिष्यरक्षिता म्हणू लागले होते.
         श्रीलंकेतील राजांनी सम्राट अशोकाचे उपकार म्हणून एक आपली जवळची सेविका सम्राट अशोकांची सेवा करायला मगधमध्ये पाठवली व सोबत राजमोहोर लावून एक चिठ्ठीही पाठवली. ज्यात आपण आमच्यावर थोर उपकार केलेले असून त्या उपकाराची परतफेड म्हणून आम्ही आपली सेवा करायला एक सेविका आपल्याला पाठवीत असलेल्या नजराण्यात पाठवीत आहोत. त्या सेविकेचा आपण स्विकार करावा. नकार देवू नका. असंही लिहिलं होतं.
         सम्राट अशोकांनी ती चिठ्ठी वाचली. त्यानंतर क्षणभर तिच्याकडे पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिचा स्विकार करीत तिला आपल्या सेवेत ठेवले. पुढं तिनं त्यांची एवढी सेवा केली की ती त्यांची प्रिय सेविका बनली होती. अशातच ती एक घटना घडली. 
         तो एकदाचा प्रसंग. सम्राट फारच आजारी पडले होते. त्याच काळात तिष्यरक्षितेनं त्यांची फारच सेवा केली. ज्यातून ते वाचले व त्यांनी तिला काही वर दिलेत. सम्राट एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तिला राजमोहोरही दिली व सांगीतलं की राज्याची महत्वाची मोहोर असून या मोहोरेचा वापर अति आवश्यक कामासाठीच करावा.
        ते सम्राटांनी तिष्यरक्षितेला दिलेली राजमोहोर. त्यातच ती दिलेली काही वचनं. तशा महाराजांच्या सर्वच महाराण्या मरण पावल्या होत्या. राणी पद्यावती तर केव्हाच हे जग सोडून गेली होती. कारुवाकीही आज जीवंत नव्हती आणि देवी? देवीही इस पुर्व सन २४२ मध्ये मरण पावली होती. तसे महाराजही वयोवृद्ध झाले होते. त्यातच त्यांची एकमेव प्रिय महाराणी असंधीमात्रा जीवंत राहिली होती. तिही इस पुर्व सन २४० मध्ये मरण पावली होती. आता मात्र सम्राट असहाय्य झाले होते. अन् त्यातच वयोवृद्धही. 
           सम्राटांच्या सर्व महाराण्या मरण पावल्या होत्या. जी एक प्रिय महाराणी होती, असंधीमात्रा. तिही मरण पावली होती. त्यातच असहाय्य झालेल्या सम्राटांना पुन्हा एक मदतनीस म्हणून महाराणीची गरज होती. ज्यात राज्यातीलच काही मान्यवरांनी सुचवलं. सुचवलं की त्यांनी विवाह करावा. कारण म्हातारपण आहे व म्हातारपणात आधार म्हणून पत्नीची आवश्यकता असते. 
          असंधीमात्राचा मृत्यू होताच लोकांच्या म्हणण्यानुसार व मान्यवरांच्या सल्ल्यानुसार सम्राट अशोकानं तिष्यरक्षिताशी विवाह केला. तशी ती फार सुंदर दिसत असे. परंतु राजाचा निर्णय इथंच चुकला. कारण त्यांचं वय फार मोठं होतं व तिष्यरक्षिताचं वय हे फारच लहान होतं. अशातच तिष्यरक्षिताची कामुकता ती तरुण असल्यानं वयोवृद्ध सम्राटानं पुर्ण होत नव्हती. त्यामुळंच ती त्यांचा मुलगा कृणालच्या प्रेमात पडली.
         कृणाल दिसायला सुंदर होता. त्यातच तो तरुणही होता. ती सम्राट अशोकांना सोडून त्यांच्या मुलावर म्हणजे कृणालवरच तो तरुण असल्यानं प्रेम करु लागली होती. अशातच एक दिवस संधी साधून ती कृणालला म्हणाली, 
          "कृणाल, आम्ही आपल्यावर प्रेम करीत असून आमची कामुकता आपण पुर्ण करावी अशी आमची इच्छा आहे. ही इच्छाच नाही तर आमची आज्ञाही आहे."
           ते तिष्यरक्षितेचं कृणालला बोलणं. त्यावर कृणाल तिला म्हणाला,
           "आपण असे अभद्र बोलू नका. आपण आमच्या मातेसमान आहात नव्हे तर आमच्या माताच आहात. आपल्यासोबत कामुकता करणं हे माझ्यासारख्या पुत्राला शोभणार नाही. अन् तसं करणं हे आमच्यासाठी पापच ठरेल. आपण आपली कामुकता आमच्या वडिलांकडून पुर्ण करुन घ्या. हेच एका पुत्राचं आपल्या मातेला सांगणं असेन. जर आम्ही असं केलं तर उद्या काळ आम्हाला कधीच माफ करणार नाही आणि हीच गोष्ट जर आमच्या पिताश्रींना माहीत झालीच तर आमचे पिताश्रीही आम्हाला प्राणदंडच देतील यात शंका नाही."
         कृणालचं आपल्या मातोश्रीला म्हणणं. कारण तिष्यरक्षिता ही त्याची आई होती. 
          कृणालनं तिला म्हटलं. परंतु ती ऐकेल तेव्हा की नाही. ती आपलं पुत्रप्रेम विसरली होती व पुत्राच्याच हातून आपली भडकलेली शारिरीक भावना तृप्त करण्याच्या मागे लागली होती. त्यातच कृणालनं नकार देताच तिला त्याचं फार वाईट वाटलं. तिला कृणालचा महाभयंकर राग आला व रागाच्या भरात ती त्या घटनेचा बदला घेण्याची वाट पाहू लागली. तसं तिला आठवलं ते सम्राटांनी दिलेलं वचन. त्यातच तिला आठवली ती राजमोहोर. आपलं आपण या राजमोहोरेनं कृणालचा बदला घ्यावा.
          तिष्यरक्षितेचा तो बदला घेण्याचा विचार. तसा विचार करीत असतांना तिनं एक चिठ्ठी लिहिली. त्यात तिनं कृणालचे डोळे काढून त्याला अंध करण्यात यावं असंही लिहिलं आणि त्यावर आपली राजमोहोर लावली व ती चिठ्ठी तिनं दुतांकरवी तक्षशिलेला पाठवून दिली. जिथं राजकुमार कृणाल होता. तो तक्षशिलेत होत असलेला विद्रोह मिटविण्यासाठी गेला होता.
          दूतानं ती चिठ्ठी तक्षशिलेत असलेल्या सम्राट अशोकांच्या मंत्र्यांजवळ दिली. मंत्र्यांनी ती चिठ्ठी वाचली. त्यातच त्यात लिहिलेला संदेश व सम्राट अशोकाची राजाज्ञा कृणालला दाखवली. शेवटी कृणालला वाटलं की ही आपल्या वडिलांचीच राजाज्ञा आहे. ती टाळावी कशी. त्यानंतर त्यानं स्वतः त्या चिठ्ठीनुसार स्विकृती देवून स्वतःचे डोळे फोडण्यास सांगीतले.
         ती कृणालला अंध करण्याची राजाज्ञा. त्याला थोडं ना माहीत होतं की यात आपल्या वडिलांची राजाज्ञा नाही तर ते एक षड़यंत्र आहे. तिष्यरक्षितेनं त्याच्या विरोधात रचलेलं षड़यंत्र. त्याला ते सत्यच वाटलं व त्यानुसार त्यानं आपले स्वतःचे डोळे आपल्याच मंत्र्यांना फोडू दिले. त्यानंतर अंध झाल्यावर कृणाल रानावनात फिरु लागला. स्वतःची ओळख लपवून राहू लागला. त्यातच त्याला त्याची पत्नी जी त्याची प्रेमिका होती, कांचनमाला. ती त्याला मदत करु लागली. 
     
     **********************९**************

          कृणाल शूर होता. परंतु त्याचं अंध बनताच त्याचं शूरपण गेलं होतं. तसा तो एक संगीततज्ञही होता. तो आता आपलं मोरंजन गाणे म्हणून करीत असे. एकदा तो आपली ओळख लपवत लपवत राजमहालात आला. राजदरबार भरलेला होता. सर्व मंत्रीगण बसले होते. अशातच तो त्या दरबारात आला व त्यानं त्याला संधी मिळताच एक गीत सादर केलं. ज्यात त्यानं आपल्या जीवनाचा संपुर्ण वृत्तात त्या गीतात सादर केला. शेवटी सम्राटानं विचारलं. अशी आपल्याच पुत्राला अंध करणारी माता कोण आणि तिचा तो पुत्र कोण? त्यावर ओळख दाखवत तो म्हणाला,
         "महाराज, तो अंध पुत्र मीच आहे कृणाल. आपण आमचेच पिताश्री आहात व ती अंध करणारी मातोश्री आपलीच महाराणी तिष्यरक्षिता आहे."
          कृणालनं सांगीतलेली घटना. झालेली चूक सम्राटाच्या लक्षात आली. आता त्यांना आठवलं ते कलिंग युद्ध. ज्या कलिंग युद्धात रणमैदानावर फिरत असतांना व ते शव पाहात असतांना अनेक स्रिया रडत होत्या व त्यातील एका स्रिनं व्यथीत होवून एक शापवाणी उच्चारली होती की विनाकारण त्रास देणाऱ्या हे राजा. स्वतःला चक्रवर्ती सम्राट बनविण्याच्या नादात तू आमच्या पतीचे जीव घेतलेत. उद्या तुझ्याच राज्यात विद्रोह होईल व तू ज्या पुत्रावर प्रेम करशील ना जीवापाड. उद्या तुझीच राणी तुझ्या त्या जीवाभावाच्या असलेल्या मुलांचे डोळे फोडेल व त्याला अंध करेल. तेव्हा राज्याला वारसच उरणार नाही.    
          सम्राट अशोकांना आपली चूक कळली. त्यानंतर त्यांनी तिष्यरक्षितेला तिची शिक्षा म्हणून प्राणदंड दिला. त्या प्राणदंडात म्हणतात की तिला जीवंत जाळण्यात आलं. 
           ते कलिंग युद्ध. त्या कलिंग युद्धात सम्राटाचं संपुर्ण आयुष्य बदलवलं. त्यांना पश्चातापही झाला. ते बौद्ध धम्माचे अनुयायी बनले. त्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसारही केला. परंतु झालेलं पाप काही दबलं नाही. काही कालावधीनं त्या पापानं आपले डोळे बाहेर काढले व तेवढ्याच तत्परतेनं त्या पापानं सम्राटांना शिक्षाही दिली.
          विशेष म्हणजे सम्राट अशोकांच्या हातून घोर पाप घडलं होतं. ज्या पापानं त्यांना माफ केलं नाही. राज्याचा वारस असलेला राजकुमार कृणाल अंध झाला होता. 
         काही दिवस निघून गेले. सम्राट अशोक आता जास्तच वयोवृद्ध होत चालले होते. त्यातच काही दिवसानं कृणाल पाटलीपुत्रातच राहू लागला होता आपली पत्नी कांचनमाला व आपल्या पुत्रासमवेत. शेवटी राज्याचा वारस कोणाला बनवावं. हा विचार जोर धरु लागला होता. असा विचार सुरु असतांना कृणाल आपल्या वडीलांना म्हणाला,
          "पिताश्री, आपण मलाच राज्याचा वारस बनवणार होते. तेव्हा आपण मलाच राज्याचा वारसदार बनवावं."
          ते कृणालचं बोलणं. त्यावर सम्राट अशोक कृणालला उद्देशून म्हणाले की कृणाल अंध आहे. तो राज्याचा कारभार कसा काय चालवू शकेल. शेवटी कृणाल सम्राट अशोकाला म्हणाले,
          "पिताश्री, आपण मला जर वारसदार बनवीत नसाल तर आपण माझ्या पुत्राला राज्याचा वारसदार बनवून पाटलीपुत्रचा राजा बनवावे."
         ते कृणालचं बोलणं. त्यावर सम्राट म्हणाले,
          "तुला असा पुत्र केव्हा झाला?"
          ते सम्राटाचं बोलणं. त्यावर आश्चर्य वाटणाऱ्या सम्राटाला कृणालनं म्हटलं,
          "पिताश्री संप्राती."
          ते कृणालचं बोलणं. त्यावर सम्राट काय ते समजून गेले व त्यांनी संप्रातीला राज्याला वारसदार घोषीत केलं नाही. पुढं संप्रातीला सम्राट अशोकानं राज्याचा वारसदार बनवलं नाही व पाटलीपुत्रचं राज्यही संप्रातीला दिलं नाही आणि कृणाल अंध असल्यानं त्यालाही राज्याचा वारसदार बनवलं नाही. कारण संप्रांती याचा अर्थ सम्राटानं आताच झालेला पुत्र असा लावला होता. तो नेमका कुणाचा पुत्र आहे. हे सम्राट ओळखू शकले नव्हते. शेवटी अतिशय शूरवीर असा विचार करुन सम्राटांनी आपली प्रिय राणी कारुवाकीच्या नातवाला म्हणजेच तीवरचा पुत्र दशरथाला पाटलीपुत्रचं राज्य सोपवलं व त्याला पाटलीपुत्रचा राजा बनवलं.
          सम्राट अशोक इस पुर्व २३२ मध्ये मरण पावले. त्यानंतर त्यांचा नातू तीवरचा पुत्र राजा दशरथ पाटलीपुत्रच्या गादीवर आला. त्यांनी आपल्याच वडीलांचा बौद्ध धम्म पुढे सुरुच ठेवला. परंतु तो तेवढ्या प्रमाणात पाटलीपुत्रचा राज्यकारभार करण्यात यशस्वी ठरला नाही. मात्र कृणाल हा अंध असूनही महत्वाकांक्षी होता. त्यानं हार मानली नाही. पुढं दशरथ मौर्य गादीवर बसताच मौर्य साम्राज्याला जी उतरती कळा लागली. काही मांडलिक राजांनी आपलं स्वतंत्र्य अस्तित्व ओळखलं व ते स्वतंत्र्य झाले. ते ओळखून त्यातच इस पुर्व सन २२४ मध्ये कृणालनं दशरथाला बाजूला सारुन आपल्या मुलाला म्हणजेच संप्रातीला पाटलीपुत्रच्या गादीवर बसवले व पाटलीपुत्रचं राज्य हातात घेवून न्यायीक राज्य केलं. त्यातच संप्रातीनं पुढं बौद्ध धम्मं सोडला. तो धर्म संप्रातीला चांगला वाटला नाही व त्यानं जैन धर्म घेतला. अशाप्रकारे हळूहळू मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली व इस पुर्व १८९ मध्ये पुष्यमित्र शृंगानं मगधचा शेवटचा सम्राट बृहद्रथाची हत्या करुन मगधचं राज्य आपल्या हाती घेतलं व मौर्य साम्राज्याचं नाव संपुर्णतः जगाच्या नकाशातून मिटवलं. 
         महत्वाचं म्हणजे ज्या सम्राटानं कलिंग युद्ध लढलं नव्हे तर मगधला जगाच्या नकाशावर नेलं एक चक्रवर्ती सम्राट बनून. ते राज्य फार काळ टिकलं नाही. सम्राट इस पुर्व २३२ मध्ये मरण पावले. त्यानंतर सम्राटाचं ना अस्तित्व उरलं होतं. ना सम्राट पद उरलं होतं. उरल्या होत्या त्याच्या आठवणी. ज्या आठवणी सम्राट बनून सम्राटानं केलेल्या विधेयक कार्याच्या होत्या.
          आज सम्राट अशोक आपल्यात नाहीत. परंतु आजही त्यांचं कार्य आपल्यात आहे. तेच विधायक कार्य आपल्याला आजही आठवत आहे. अन् ते विधेयक कार्य आपल्याला तोपर्यंत आठवत राहणार. जोपर्यंत बौद्ध धम्म अस्तित्वात राहील. सृष्टीच्या अंतापर्यंत. जे एका देवी नावाच्या त्यांच्या राणीमुळं घडलं. 
          आज सम्राट अशोकांची पहिली पत्नी. आज ती जीवंत नाही ना सम्राट अशोक अशोक जीवंत आहेत. परंतु देवीनं आधीच तथागताच्या निमित्यानं अस्तित्वात आलेला बौद्ध धम्मं व देवीनं स्वतः सम्राट अशोकांच्या मनात बिंबविलेला बौद्ध धम्म आजही जीवंत आहे. जरी त्यांच्याच पुढे आलेल्या वारसानं बौद्ध धम्म सोडून जैन धर्म स्विकारला असला तरी. तसेच मौर्य शासकानंतर आलेल्या इतर शासकांनी बौद्ध धम्माला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला असला तरी. सम्राट अशोकांच्याच वारसांनी बौद्ध धम्म जीवंत ठेवला होता. 
          बौद्ध धम्म जीवंत असणं ही सम्राट अशोकांचीच किमया आहे. जरी भारतातील त्यांच्या वंशजांनी म्हणजेच सम्राट अशोकाच्या नातवानं पुढे जैन धर्म स्विकारला होता तरी. तरीही श्रीलंकेत त्यांचेच वंशज बौद्ध धम्माला जीवंत ठेवून होते. जरी सम्राट अशोकाच्या लहान महाराणीनं म्हणजेच तिष्यरक्षितेनं बोधिवृक्षाला नष्ट केले होते तरी. जरी ती श्रीलंकेतील असली तरी. काळानं कधीच बौद्ध धम्माबद्दल माघार घेतलेली नाही. बौद्ध धम्म वाढतच गेला होता. कारण सम्राट अशोकाच्या पत्नीनं सम्राट अशोकांच्या मनात बौद्ध धम्माबाबत जे रणशिंग फुंकलं होतं. त्याचा आवाज दूरदूरपर्यंत म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यात गेला होता. ज्यात श्रीलंकेचाही समावेश होता. ती देवी, जी साक्षात पृथ्वीतलावर प्रत्यक्ष देवी स्वरुपात अवतरली होती. म्हणूनच तसं घडलं होतं. घडवता आलं होतं. यात शंका नाही.

**********************************समाप्त *************