The journey is endless. in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | प्रवास अनंता पर्यंतचा

Featured Books
Categories
Share

प्रवास अनंता पर्यंतचा

ही गोष्ट आहे तुझ्या अनंताच्या प्रवासाची

तुझा वाढदिवस होता 31ऑगस्ट ..खुप छान साजरा झाला..खुप दिवस व्हाईट आर्मीला देणगी द्यायचे मनात होते ती सकाळीच देऊन आलो काही कारणाने गावात त्या दिवशी खूप गर्दी होती म्हणून आपल्याच भागात थोडे लांब असलेल्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो भरपूर भाज्या असलेले ते जेवण खूप आवडले होते तुला तिथेच एक जुने मित्र भेटले फोटो वगैरे झाले..जवळ जवळ सप्टेंबर तिसऱ्या आठवड्या पासून तुला बारीक त्रास होत होताच डोके दुखी असह्य सुरू झाली होती एका डॉक्टर मित्रांना दाखवले त्यांनी कॅटरोल गोळी घेऊन पहा असा सल्ला दिला ती पण सारखी घेऊन effect कमी होऊ लागला मात्र आपले सकाळचे फिरणे योगासने वगैरे रूटीन छान सुरू होते जेवण पण छान होते नंतर दात दुखायला लागले तू डॉक्टर असल्याने सगळे डॉक्टर तुझे मित्रच..डेंटिस्ट पण मित्रच होते दाखवून आलो कोपऱ्यात किड होती ती भरून रूट कॅनल आणि नंतर cap बसवायची treatment सुरू झाली डोके दुखी अधून मधून होतीच मुंबईला सहजच जायचे ठरवले होते  हॉलिडे होम चे बुकिंग सुद्धा झाले होते दाताच्या ट्रीटमेंट दरम्यान तेही जाऊन आलो भरपूर फिरलो खरेदी केली वीणा वर्ल्ड ऑफिस मधे जाऊन पुढील ट्रिप साठी आयटीनरी पण घेतल्या परत येऊन परत ट्रीटमेंट सुरू झाली दाताच्या त्रासाने तू फक्त लिक्वीड आहार घेऊ लागला पोळी आमटी कुस्करून सोबत दूध किंवा दही तुझ्या आवडीची सॅलड डिश, मोड, ड्राय फ्रुट सगळे बंद करायला लागले यातच डोकेदुखीचे योग्य निदान होईना म्हणून तुझ्याच एका मित्राकडे सायनस ट्रीटमेंट घेऊ लागलो त्याचाही फार उपयोग नाही झाला सर्दी चोक अप असेल म्हणून तुला वेळोवेळी सुंठ पण उगाळून देत होते तुझ्या सोबत मीही रोज रात्री जागीआणी सतर्क राहू लागले दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुझी दाताची ट्रीटमेंट एकदा संपली हुश्श वाटले दिवाळीची सजावट ,तयारी , खरेदी केली होतीच ती सगळी आपण दोघांनी पार पाडली आता पुढच्या वेळेस कुणाकडून तरी आकाशकंदिल लावून घ्यायचे कारण खूप दगदग होते..असेही ठरले दिवाळी छान झाली तू थोडा मंद होतास पण फारसे लक्षात आले नाही भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी  24 ऑक्टोबर ला  अचानक संध्याकाळी नऊच्या सुमारास तू अस्वस्थ झालास मला दवाखान्यात घेऊन चल म्हणालास तू सांगितलेला दवाखाना बराच लांब होता उद्याची अपॉइंटमेंट मिळाली असती मी आपल्या जवळचा दवाखाना सुचवला तिकडे चालतच गेलो तपासणी झाल्यावर समजले शुगर साडेचारशे होती बीपी ECG सगळेच abnormal होते लगेच ट्रीटमेंट सुरू केली MRI पण झाली फार काही निघाले नाही आपला मुलगा  कुटुंबासोबत दुसऱ्या दिवशीच आला चार दिवस ट्रीटमेंट झाली 28ऑक्टोबर ला तुला डिस्चार्ज मिळाला तुला बरे वाटले आणि ते सर्व परत गेले नंतर मात्र  तू बरा होऊन घरी चालत आला होतास तेव्हा तुझी दृष्ट काढूनच घरात घेतले होते  औषध पाणी चालूच होते तसे सगळे बरे चालले होते पण थकवा असल्याने तू घरीच फिरणे पसंत केलेस.. मी  म्हणले ठीक आहे हळूहळू होईल recovery नंतर काही दिवसांनी नऊ नोव्हेंबर ला जेव्हा तुला पहिला कार्डियाक arrest आला तेव्हा प्रथम तर मला समजलेच नाही हे काय होतेय  संध्याकाळी तुझे खाणे वगैर झाले होते आपण थोड्या गप्पा पण मारत होतोआणि साडे आठ नऊला तुला श्वास घ्यायला अडचण होऊ लागली रविवार असल्याने जवळचे डॉक्टर पण परगावी होते त्यांनी त्यातल्या त्यात जवळचा दवाखाना सुचवला पण तिकडे जायला रिक्षा मिळेना ओळखीच्या लोकांचे फोन लागेनातएक दोन जण बाहेरगावी होते शेवटी नाईलाजाने तू आपली गाडी काढलीस आणि पाऊण किलोमीटर ड्राइव केलेस नंतर मात्र बाहेर येऊन पायरीवर मटकन बसलास मी धावत जाऊन आतून लोकांना बोलावले तेथे सगळे खूपच स्लो चालले होते एव्हाना दहा वाजून गेले होते तुला व्हील चेअर वरून नेऊन ऑक्सिजन लावण्यात आला.ECG काढला असता त्यात दोष निघाला होता ताबडतोब cardiac hospital मध्ये हलवायला सांगितले मी आपल्या जवळच्या डॉक्टर मित्रांना फोन केला त्यांनी हॉस्पिटल मध्ये सांगून ठेवले होते पण आपल्या घराच्या समोर असलेली ॲम्ब्युलन्स ...त्याचा फोन लागेना दुसरी मागवली ती लवकर येईना अखेर आली पण त्यात ऑक्सिजन नव्हता तरीही तसेच तुला आत झोपवले मी तुझा हात हातात घेऊन बसले होते अर्धा तास प्रवासात तुझी तगमग बघत होते तू पार्क केलेली गाडी रस्त्यावरच सोडून अँब्युलन्स मधून गेलो होतो अखेर दवाखाना आला आणि तुला स्ट्रेचर वरून आत नेले तुझी तडफड चालली होती दोनच मिनिटात अनेक डॉक्टरानी  महत्प्रयत्न करून तुला  CPR देऊन stable केले माझ्या समोरच हे घडत होते मी शांतपणे महामृत्युंजय जप करीत होते सोबत रामरक्षा ,गणपती स्तोत्र चालू होते ताबडतोब डॉक्टरनी बोलावून सांगितले यांच्यासाठी आता फक्त सहाच तास आहेत रात्रीचे अकरा वाजून गेले असतील मी मुलाला फोन करून परिस्थिती कळवली त्यालाही सर्व व्यवस्था लावून यायला वेळ लागणार होता पण काय आश्चर्य तासाभरात तू उपचारांना प्रतिसाद देऊ लागलास ऑक्सिजन कपॅसिटी वाढली डॉक्टरांनी तू stable आहेसअसे सांगितले मी परत मुलाला फोन करून येण्याची गडबड करू नको असे सांगितले त्या दिवशी प्रथम तुला मी मृत्यूपासून ओढून बाहेर आणले होतेमला हुश्श वाटले देवाचे शतशः आभार मानले होते ती रात्र हॉस्पिटल मधेच बसून काढली सकाळी थोडा चहा नाश्ता करून आले मुलगा दुपारी येऊन पोचला तू icu मधेच होतास तुला liquid फॉर्म मध्ये खायला देत होते आत जायला फारशी परवानगी नव्हती मुलगा आणि मी बाहेर पडून पार्क केलेली गाडी घेऊन घरी गेलो दुसऱ्या दिवशी पुढील तपासण्या करण्या साठी मोठ्या हॉस्पिटल मध्ये हलवले तपासण्या मध्ये anjiography मध्ये समजले तुला बरेच हार्ट ब्लॉकेज होते जे पूर्वी Ecg मध्ये आढळले नव्हते आणि आपल्या नेहेमीच्या रूटीन शेड्युल मध्ये खरे तर ही गोष्ट कधीच आढळून आली नव्हती आपला रोजचा फिरण्याचा व्यायाम योगासने नियमित आणि योग्य आहार दर पंधरा दिवसाला शुगर चेकिंग.मस्त चालले होते आयुष्य..आपल्या नियमित फिरण्याचे आणि एकत्रित जीवन शैलीचे आपल्या सर्व परिचितांना आणि आजूबाजूच्या सर्वांना फारच कौतुक असे सगळीकडे आपण एक बेस्ट जोडी म्हणून अगदी फेमस होतो या वर्षी पाऊस थोडा कमी झाला की थोडा टूर प्रोग्राम पण तू आखत होतासनुकत्याच आपणं केलेल्या नॉर्थ ईस्ट टूर मध्ये माझा एक छोटा accident झाला होता त्यातून हळूहळू सावरायला मला एक दोन महिने लागले होते आता मात्र मी बरीच सावरले होते तू ट्रेवल कंपनीच्या tour आयटीनरी घेऊन कुठे जायचं याचा अभ्यास पण करीत होतास मध्ये जेव्हा  मुंबईला गेलो तेव्हा टूर कंपनीच्या ऑफिस मधे ही भेट दिली होती असे असताना इतके ब्लॉकेज दिसून आले म्हणजे कमालच होती त्यात हार्टच्या मागे एक छोटी गाठ पण दिसत होतीती काढायला हवी होती हे इतके प्रॉब्लेम खरेच यापूर्वी कोणतीच लक्षणे कधीच दाखवत नव्हते बघता बघता तब्येती मधील इतके दोष बघून थक्क व्हायला होत होते डॉक्टरनी ठरवले की आधी हार्ट सर्जरी करावी आणि नंतर मग त्या गाठीचे पहावे कारण प्राण वाचवणे आधी जरुर होते तुला हार्ट ऑपरेशनचे सांगितले मात्र गाठ असल्याचे नाही बोललो तुला ही थोडे नवल वाटले तू स्वतः डॉक्टर असल्याने तुला तर  मेडिकली सर्वच माहित होतेसकाळ दुपार संध्याकाळ मी तुला घरून डबा घेऊन येत होते आणि भरवत होते तुला अन्न चवीचे लागत नव्हते थोडी नाराजी जाणवत होती मी धीर देत होते सर्जरी झाली की सर्व छान होईल असे सांगत होते अखेर १४ नोव्हेंबर सर्जरी दिवस ठरला दुपारी दीड दोनला तुला सर्जरी साठी नेले.सर्जरी खूप कठीण आणि धोक्याची होतीमाझे मन घाबरून गेले होतेजवळ जवळ चार तास सर्जरी चालली होती तू सर्जरी होऊन बाहेर आल्याशिवाय काही खायचे नाही असे मी ठरवले होते सोबत फक्त थोडे सरबत होते कॉरिडॉर मध्ये फिरत परत मी महामृत्युंजय जप, रामरक्षा, देवी स्तोत्र, दत्ताचा जप करीत होतेअखेर चार तासांनी सर्जरी उत्तम पार पाडलीमला हायसे झालेही दुसरी वेळ होती जेव्हा तुला मी मृत्यूपासून दूर ओढून आणले होते रात्रभर तू बेशुद्ध असणार होतास आम्हाला सकाळी बोलावलेसकाळी तू शुद्धीवर आला होतास आम्हा दोघांना बघून तू खुश होतास बायपास चांगली झाल्याचे तुला मी सांगितलेत्या दिवशी बालदिन होता तुला मी सांगितले आता तुझा नवीन बाल जन्म झाला आहे आपण आपली एन्जॉयमेंट पुन्हा नव्याने सुरू करायची आहेस तू हो म्हणालास ट्रीटमेंट नंतर चार पाच दिवस तुला झोप मात्र लागत नव्हती ICU असून सुद्धा लोकांचा तिथे बऱ्यापैकी गोंधळ चालत असे तसेच शेजारी कोणीतरी सिरियस होत असे किंवा दगावत असे ..तू स्वतः डॉक्टर असल्याने काय चालले आहे कोणावर कोणती ट्रीटमेंट चालू आहे या बाहेरील स्टाफ च्या गप्पा तुला चांगल्याच समजत होत्या झोपेवर परिणाम होऊन तुझा मूळचा शांत स्वभाव चिडचिडा होत होता मी तुझी समजूत काढून तुला शांत करीत असे अखेर चार पाच दिवसांनी तुला ICU मधून बाहेर काढले व care युनिट मध्ये ठेवले तिथे उठून खुर्चीत बसणे, थोडे व्यायाम सुरू झाले खुर्चीत बसून तू थोडा पेपर वाचू लागला नुकत्याच बिहार निवडणुका झाल्या होत्या त्याच्या निकालाची बातमी तु मनापासून वाचत होतास मलाही बरे वाटले असे वाटले गाडी रुळावर येऊ लागली अखेर पाचव्या दिवशी स्पेशल रूम मध्ये तुला हलवले दुसऱ्या दिवशी तुला डिस्चार्ज मिळू शकेल असे समजले आपण सगळेच आनंदलो 19 नोव्हेंबर  दिवशी डिस्चार्ज मिळेपर्यंत सगळे सोपस्कार आटोपून जवळ जवळ पाच वाजत आले मी आणलेले घरचे कपडे तू घालून व्हील चेअर वरून हॉस्पिटल मधून बाहेर पडलास आपला मुलगा तुझ्यासाठी केअर टेकर आणि आपली गाडी घेऊन आला होता तू गाडीत बसलास खुप आनंदी होतास मी पण म्हणले बघा योगायोग किती छान आहे मुलगा आपली गाडी चालवतो आहे आणि तु शेजारी बसला आहेस घरी गेल्यावर परत तुझी दृष्ट काढून तुला आत घेतले बेडरूम मध्ये सगळी व्यवस्था केली होती तुझा डोक्याचा बँड तुझे ayodex अमृतांजन जवळच भरलेली पाण्याची बाटली केअर टेकर ठेवलेला होताच सोबत आणलेली औषधे त्याने टेबल वर मांडून ठेवली गेले दहा बारा दिवस मुलाची सगळी कामे  पेंडिंग होतीत्यामुळे इकडे राहिलेला तो दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला परत गेला दुसऱ्या दिवशी पासून सकाळीच केअर टेकर येऊ लागला तुझी आंघोळ व्यायाम औषधे बीपी शुगर चेकिंग इकडे लक्ष देऊ लागला घरच्या घरी चालणे खुर्चीत बसणे हे ही व्यायाम सुरू झाले रात्री मात्र बेड पॅन, पाणी तुला लागले तर मीच देत होते रात्री तुला खूप तहान तहान होत असे आपल्या कडचा एक नोकर रात्री झोपायला येऊ लागला दोन दिवस पार पडले दुसऱ्या दिवशी 21नोव्हेंबर रोजी संध्याकाळी परत तुला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला परत पूर्वीचीच वेळ रात्री नऊची  तोच प्रसंग दवाखान्यात जायला तुला शक्ती नव्हती घरासमोर बसलेल्या काही लोकांना ॲम्ब्युलन्स मागायला सांगितली ॲम्ब्युलन्स आली पण पंक्चर स्थितीत होती त्यातील स्ट्रेचर घेऊन लोकांनी तुला त्यावर झोपवून बाहेर आणले अतिशय दुर्दैवी दृश्य होते मनात शंकेची पाल चुकचुकत होती आपले एक मित्र पण लगेचच धावून आले त्यांनी दुसरी ॲम्ब्युलन्स बोलावली तुला त्यात झोपवून Oxygen लाऊन परत पूर्वीचाच दवाखाना गाठावा लागला तुला ऍडमिट करून घेतले छातीत पाणी झाले होतेलक्षणे न्युमोनियाची होती जी घातक होती परत मुलाला पुण्याला कळवले तो ही लगेच येऊ शकत नव्हता दवाखान्याच्या जवळच असलेल्या  भावाच्या मित्राच्या घरी मी थोडे फार सामान घेऊन राहायला गेले तिथून तुला रोज डबा घेऊन जाणे मला सोपे झाले असते तीन चार दिवस ट्रीटमेंट चालू होती पण अजूनही काहीच निदान होत नव्हते तू वैतागला होतास दुखण्याला कंटाळला होतास दवाखान्याचा अनागोंदि कारभार तुला उबग आणू लागला वेळेवर इन्सुलिन देणे नाही रात्री बेरात्री कधीही रक्त काढायला नर्सेसनी येणे रात्र पाळी ड्यूटी वर नर्सेस नी गप्पा मारत बसणे अथवा चक्क झोपी जाणे हे सगळे तुझ्या शिस्तशीर मनाला पटेना झाले तू पुण्याला मुलाकडे जायचा धोशा घेतलास आपला मुलगा सून आणि नात सगळे परत इकडे आले तू पुण्यात  उपचार करूया असे म्हणू लागलास त्यामुळे तुला घेऊन जाण्याच्या तयारीने ते सगळे आले होते ते खरेतर तितके सोपे नव्हते कारण परगावी हलवावे अशी तुझी कंडीशन  सध्या नव्हती तरीपण सेफ विंडो मध्ये तुला हलवावे अशी आमची खटपट चालू होती आपली नात तुझी खूप लाडकी होती तिला तू शंभू म्हणत होतास हॉस्पिटल मध्ये ती येत होती पण तुला भेटू शकत नव्हती मग तिचे लाइव्ह व्हिडिओ मी तुला काढून दाखवत होते तुला फार आनंद होत असे एकदा आपले डॉक्टर मित्र भेटायला आल्यावर तू हॉस्पिटल च्या अनागोंदी कारभारची तक्रार केलीस कोणालाही हे हॉस्पिटल रेफर करू नका असेही सांगितलेस तुला पुण्यात हलवण्या साठी अखेर दोन दिवसांनी ती सेफ विंडो मिळाली आणि रविवारी तुला पुण्यात हलवायचे ठरवले Cardiac ambulance ची सोय केली तुझे सेन्सेस चांगले होते तू मला सूचना केलीस जरी ॲम्ब्युलन्स अद्ययावत असली तरी आपला ग्लूकोमीटर बी पी मशीन ऑक्सिमीटर सोबत ठेव त्याही स्थितीत ही सूचना करणाऱ्या तुझे कौतुक वाटले होते घरातली सगळी आवरा आवरी करून निघायचे होते कारण तुझ्या ट्रीटमेंट नंतर काही महिने पुण्यातच राहायचे होते मी काय काय घ्यायचे ही यादी केली होतीच माझे स्वेटर घे कानाचे बँड घे शर्ट पॅन्ट दोन मोठ्या चड्ड्या घे माझे पाकीट घेतले का अशा तुझ्या सूचना चालू होत्या पुण्याला गेल्यावर आपण बरे होऊ याची तुला खात्री होती मी रीतसर सर्व बांधाबांधी करून घरची सर्व कड्या कुलपे लावून घेतली आपला मुलगा सून नात आम्ही सर्व तुला घेऊन जाण्या साठी हॉस्पिटल कडे निघालो हॉस्पिटलची सगळी  डिस्चार्ज प्रोसेस पूर्ण करून दहाच्या सुमारास आपण दोघे कार्डियाक अँब्युलन्स मधून आणि मुलगा, सून, नात आपल्या गाडीतून आपल्या मागे असे निघालो चार तास प्रवासात तुला अँब्युलन्स मध्ये असलेले  डॉक्टर आणि मी तुला थोड्या थोड्या वेळाने जागे ठेवत होतो तेव्हाही तू स्वतः आपला मॉनिटर बघत होतासशुगर सुद्धा नॉर्मल होती पुण्यातील नावाजलेल्या अत्यंत मोठ्या अशा ज्यूपीटर हॉस्पिटल मध्ये तुला घेऊन जायचे सुन मुलगा यांच्या प्रयत्नाने तुला ऑक्सिजन बेड मिळाला होता मुलगा सून गाडीतून हॉस्पिटल मधे पोचेपर्यंत भाऊ आणि भाची येऊन ऍडमिशन प्रोसेस साठी थांबली होती लगेच तुला casualty मधे दाखल केले Admission ची सर्व प्रोसेस पुरी होईपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती अखेर तुला ICU मधे दाखल करून आम्ही निघालो मग दुसऱ्या दिवशी पासून तुझ्या अनेक तपासण्या सुरू झाल्या वेगवेगळे निष्णात डॉक्टर येऊन पाहून जात होते तुझ्या हार्ट च्या ऑपरेशन मधे त्यांना काही दोष आढळला नाही तुझी केस pulmologist कडे रेफर केली होती फुफूस आणि श्वसन संस्थेमध्ये दोष होता तो दोष काय आहे हे शोधणे चालू होते डॉक्टर म्हणत होते तुला Idiopathic Pulmonary Fibrosis detect झाला होता ज्याचे निदान होत नव्हते त्यामुळे त्यावर उपाय शोधणे सुद्धा कठीण होते तरी डॉक्टरी प्रयत्न अथक चालूच होते रक्ताच्या पण अनेक चाचण्या चालू होत्या तुझा आहार हॉस्पिटल मधूनच होता मी रोज सकाळ दुपार संध्याकाळ तुला खाऊ घालण्या साठी दवाखान्यात जात होते सकाळी चहा बिस्कीट देत होते नंतर नाश्ता नाश्ता बरा असायचा पूर्ण dietician च्या सल्ल्यानुसार सारे चालू होते मी रोज तुला भरवायचे ऑक्सिजन मास्क बाजूला करून ऑक्सिजन लेवल कडे लक्ष देत दोन दोन घास घालून तुला पाणी पाजत असे जेवणात दही, दूध, रोज असे कधी कस्टर्ड ,खीर असे ते तुला आवडायचे भाज्या वगैर खूप तिखट असायच्या तू खात नव्हता. फक्त डाळ खिचडी पूर्ण बाऊल खात होतास गोड बोलून जितके शक्य आहे तितके पोटात जाईल असे बघायचे इकडच्या तिकडच्या गप्पा करायचे हात पाय दाबून त्याला क्रीम लावून द्यायचे कधी कधी तुझ्या आवडीची गाणी हलक्या आवाजात गायचे तुला आनंद व्हायचा ओठाला तूप लावायची तुझी रोजची सवय..पण इथे तूप नसल्याने मी एक छोटी vaselin ची बाटली जवळ ठेवली होती ते दोन तीन वेळेस तुला लावून द्यायचे वेट tissue पेपरने तुझे नाक साफ करून द्यायचे पूर्वी कधीच माझी कोणतीच सेवा न घेणारा तू मी तुझी अशी सेवा करताना तू फार आनंदी व्हायचा मी बरा झालो की ही सर्व सेवा तुला परत करणार असेही म्हणायचा खुप दिवस झोपून अंग खूप दुखायचे तुझे दाबले की बरे वाटायचे का कोण जाणे तू मला जवळ बोलावून माझ्या तोंडावरून हात फिरवायचा मला भरून यायचे मुश्किलीने मी डोळ्यातले पाणी लपवत होते रोज तुला अनेक वेळा मी बोलून बोलून उभारी देत असे माझ्या मागच्या accident मधे मी मरणाच्या दारातून परत आले होते असे तू मला नंतर सांगितले होतेस त्याची तुला आठवण करून देऊन तू पण आता या दुखण्यातून बरे होऊन आपला एन्जॉयमेंट चा कोटा आपण पूर्ण करायचा आहे असे म्हणायचे तू पण रुकार देत होतास दोन तीन दिवस टेस्ट मधून काहीच निदान होत नव्हते इतक्या मोठ्या हॉस्पिटल मधे निदान का होत नाही तूही विचारत होतास या मधल्या काळात तुझे भाऊ, आपले बरेच नातेनाईक भेटून गेले काही नातेवाईकांच्या सोबत तू फोन वर बोलला होतास काहीना व्हिडिओ कॉल करून भेटवले होते सगळ्यांना तू फोन वर मी भेटायला येणार आहे असे सांगत होतास तीन चार दिवसांनी तू थकला असल्या सारखे वाटत होते डॉक्टर बाईंनी सांगितले होते आता हळू हळू हात पाय बोटे हलवा स्वतःचा स्वतः श्वास घ्यायचा प्रयत्न करा तू डॉक्टर असल्याने हे तू आपल्या आपण चालू ठेवले होतेस गुरुवारी नेहेमी प्रमाणे सकाळी दुपारी येऊन तुला भरवून गप्पा मारून गेले संध्याकाळी जेवण द्यायला आले मी तुझे हातापायाचे व्यायाम दहा वेळा करून घेतले हाताची बोटे तू हलवून दाखवलीस मी तुला सांगितले उद्या तुझ्या आणखी टेस्ट चे रिपोर्ट येतील तुझी नवीन ट्रीटमेंट सुरू होईल आता मस्त खुश रहायचे तू पण ठीक होतास मी जाण्यापूर्वी नेहेमीचे मालिश वगैरे झाल्यावर तुझे केस विचारून दिले आणि तुला जाते म्हणून टाटा केला तू पण संमती दिलीस तेव्हा आपल्या दोघांना ही माहित नव्हते की ही आपली शेवटची भेट असेल..मी खुशीत घरी परत आले दुसऱ्या दिवशी नेहेमी प्रमाणे लवकरच मी साडेसात वाजता नाश्ता देण्यासाठी आले इतर वेळेस आठ सव्वा आठ शिवाय आत घेत नसत तेव्हा मात्र मला लगेच आत बोलावले आत बोलावताच समजले कधीतरी रात्रीतून तुझे ब्रेन हॅमरेज झाले होते तू uncoutios होतास Ventilator ही लावला होता ब्रेन hamrej झाले तरी त्यासाठी तुझे ऑपरेशन केवळ अशक्य होते ती रिस्क डॉक्टर पण घ्यायला तयार नव्हते शिवाय ते करून सुद्धा यश येईल याची शाश्वती नव्हती उलट पक्षी त्यामुळे पॅरालिसीस अथवा इतर काही विपरीत परिणाम होऊ शकले असते...त्यामुळे ऑपरेशन नको असेच सुचवले गेले दोन दिवस तू होतास व्हेंटिलेटर वर मी ओळखले होते तू आता आम्हाला सोडून जायच्या तयारीत होतास दोन दिवस डोळ्याला डोळा नव्हता सतत डोळे भरून येत होते अश्रू लपवून लपत नव्हते तुझी साथ सुटणार हे समजले होते पण मन मानत नव्हते...दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...हेच खरे आहे तू इहलोक सोडला ती वेळ मात्र खूप चांगली होती नुकतेच मोरया गोसावी चे नवरात्र चालू झालेले दिवस संकष्टीचा होता तुझे रक्षा विसर्जन आम्ही देहू येथे इंद्रायणी नदीत केले जिथे तुकाराम महाराजांची लोकांनी बुडवलेली गाथा तरुन वर आली होती अतिशय पुण्यवान होतास तू तुझा पुढचा प्रवास अगदी सुखकर झाला तुझ्या मृत्यूच्या वेळी त्रिपाद नक्षत्रातील पुनर्वसु नक्षत्र होते या तुझ्या अनंताच्या प्रवासात तुझी माझी साथ इथपर्यंतच होती तू मला सोडून पुढे निघून गेलास अचानक ब्रेन hamrej झाल्याने तू गेलास हे कदाचित तुला सुद्धा समजले नव्हते इतकी व्यवस्थित लाईफ स्टाईल असणाऱ्या तुला असे महिन्याभरात मरण का यावे..याचे उत्तर फक्त प्रारब्ध असेच होते तुझा असा मृत्यू होणे हे पूर्वीच लिखित होते या तुझ्या अनपेक्षित मृत्यू मध्येफक्त मी मनाची समजूत घालून इतकेच लक्षात ठेवायचे की आपण जी बेचाळीस वर्षे संसाराची घालवली ती अतिशय उत्तम होती खुप हिंडलो, देश परदेश पाहिले, भरपूर चांगले चांगले खाल्ले अनेक ठिकाणी दोन,दोन चार,चार वेळेस सुद्धा जाऊन आलो होतो आयुष्य भरभरून जगलो एकमेकांची मने कायम जपली..अगदी.. जो तुम को हो पसंद वही बात करेंगे... या गाण्या सारखे एकमेकांना आयुष्यभर भरपूर क्वालिटी टाइम दिला आणि यातून तू वाचला असतास तर काही शारीरिक अपंगत्व कदाचित आले असतेजे तुला अजिबात आवडले नसते आणि रुचले सुद्धा नसते पण तुझ्या मागे तू असंख्य प्रश्न सोडून गेला आहेस जे हळूहळू सोडवायचा मी प्रयत्न करतेय रे तुझ्यामागे जगणे ही तर माझ्यासाठी खूप कठीण शिक्षा आहे तुझ्यामागे जगून तरी काय करायचे असे वाटते पण माझ्या हातात काहीच नाही रे तू फक्त कायम माझ्या आसपास..सोबत रहा इतकेचकदाचित त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असा मला विश्वास वाटतो तुच त्या अवकाशातून माझे प्रश्न. सोडवायला मदत करशील आणि मला माहित आहे आपल्या सहजीवनात मी दुःखी असलेले तुला कधीच आवडायचे नाही आताही मी आनंदी असलेलेच तुला बघायचे आहे. मी नक्की प्रयत्न करेन तुझ्या आवडीप्रमाणे रहायचा