Pi cha Single - 1 in Marathi Science-Fiction by Dr Phynicks books and stories PDF | Pi(π) चा सिग्नल - 1

Featured Books
Categories
Share

Pi(π) चा सिग्नल - 1

अध्याय १
-------------
सिग्नल
--------------------

हिमशिखरावरील एकांत आणि दुर्लक्षित ज्ञान

हिमालयाच्या गोठवणाऱ्या एकाकी शांत कुशीत, १३,०८० फूट उंचीवर वसलेल्या एका जुन्या वेधशाळेत डॉ. अवंतिका जोशी या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ महिलेचे विश्व मर्यादित होते. वेधशाळेच्या जुनाट दगडी भिंती ब्रिटिशकालीन बांधणीतल्या होत्या आणि त्यावर आता दशकांच्या दुर्लक्षाची धूळ साचली होती. बाह्य जगासाठी अवंतिका यांचे अस्तित्व केवळ सरकारी दस्तऐवजांतील एक नोंद बनले होते. आधुनिक विज्ञानाच्या झगमगत्या परिषदांनी त्यांना आणि त्यांच्या संशोधनाला 'ऐतिहासिक अवशेष' मानून बाजूला सारले होते. 

त्यांचा अभ्यासाचा विषय होता—अंतराळातील पोकळी. एका अदृश्य, दुर्लक्षित बिंदूवर केंद्रित असलेला त्यांचा हा ध्यास अनेकांना केवळ त्यांचा वैयक्तिक वेडेपणा वाटे.

वेधशाळेच्या मुख्य टॉवरमध्ये अवंतिका त्यांच्या जुनाट प्राणप्रिय रेडिओ-टेलीस्कोपच्या कन्सोलसमोर बसल्या होत्या. त्यांचे लक्ष आकाशातील 'अल्फा-७' या धूसर बिंदूवर खिळले होते. 'अल्फा-७', एक विशिष्ट, धूसर बिंदू जो कोणताही महत्वाचा तारा, ग्रह किंवा ज्ञात खगोलशास्त्रीय घटना दर्शवत नव्हता. विज्ञानाच्या नियमांनुसार तिथे केवळ कॉस्मिक गोंगाट असायला हवा, पण अवंतिका यांच्या बुद्धीला आणि पाच दशकांच्या अनुभवाला तिथे काहीतरी वेगळेच जाणवत होते. तिथे काहीतरी गूढ दडलेले आहे, याची त्यांना खात्री होती.

जवळपास पंचावन्न वर्षांच्या अवंतिका यांच्या चेहऱ्यावर खोल सुरकुत्या होत्या, जणू त्यावर आकाशातील नकाशेच कोरले गेले होते. त्यांचे तीक्ष्ण डोळे, वाढत्या वयामुळे किंचित मंद झाले असले तरी ते उपकरणांतून बाहेर पडणाऱ्या हिरव्या प्रकाशावर स्थिर होते. त्यांच्या 'BPA' (Batch Processing Analysis) या खाजगी सॉफ्टवेअरमधून एक सततचा 'हिस' (Hiss) आवाज येत होता.

"पोकळी... पण कशाची?" त्या स्वतःशीच पुटपुटल्या.

त्यांच्या मनात गणित आणि क्वांटम यांत्रिकीचे वादळ उसळले होते. गुरुत्वाकर्षण प्रकाशाला वाकवते हे त्यांना माहित होते, पण या विशिष्ट बिंदूवर ताऱ्यांचा प्रकाश असामान्यपणे विचलित होत होता. हे विचलन इतके सूक्ष्म होते की आधुनिक उपकरणांना ती केवळ एक त्रुटी (Error) वाटे. परंतु अवंतिका यांनी आपले संपूर्ण आयुष्य अशाच सूक्ष्म त्रुटींच्या अभ्यासासाठी समर्पित केले होते.

त्यांनी स्वतः विकसित केलेली 'एक्स्ट्रा-सेन्सरी डीनोइझिंग' (ESD) सिस्टीम चालू केली, जी नैसर्गिक गोंगाट आणि बुद्धिमत्तेतून निर्माण झालेल्या सिग्नलमधील फरक ओळखण्यास सक्षम होती.

त्यांचा तरुण सहकारी अर्जुन खालच्या लॅबमध्ये कार्यरत होता. तो क्रायोजेनिक्स कॉर्पोरेशनने अवंतिका यांच्या मदतीसाठी पाठवलेला एक व्यावहारिक भौतिकशास्त्रज्ञ होता. अर्जुन उपकरणांची देखभाल करत असे, पण अवंतिका यांच्या संशोधनाला तो केवळ एक 'वेडा छंद' मानत असे. कॉर्पोरेशनचा खरा उद्देश निधीअभावी अवंतिकांचे संशोधन थांबवून त्यांना सन्मानपूर्वक निवृत्त करणे हाच होता.

"डॉक्टर जोशी!" अर्जुनचा कर्कश आवाज इंटरकॉमवर गुंजला. "आज पुन्हा तेच? सिग्नलची पोकळी शोधताय?"

अवंतिका यांनी शांतपणे उत्तर दिले, "पोकळी नाही अर्जुन, ती अशी पोकळी आहे जिथे पोकळी नाहीये. तिथे प्रचंड ऊर्जा जाणवत आहे. ती इतक्या शिताफीने कोडेड केली आहे की आपली उपकरणे तिला 'कॉस्मिक नॉईज' समजून दुर्लक्ष करत आहेत."

"मॅडम," अर्जुन कंटाळलेल्या स्वरात म्हणाला, "त्याला नॉईज नाही, तर कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड (CMB) म्हणतात. या विश्वातील प्रत्येक धुळीचा कण, प्रत्येक लहरींचा तो गोंगाट आहे. आपण यावर आणखी वेळ वाया घालवू शकत नाही. कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे की, पुढील आठवड्यात फंडिंगमध्ये ७०% कपात होणार आहे."

"त्यांना कपात करू दे," अवंतिका थंडपणे म्हणाल्या आणि त्यांनी इंटरकॉम बंद केला. त्यांना निधीची पर्वा नव्हती, त्यांना केवळ सत्याचा शोध घ्यायचा होता. त्या एकट्या होत्या. त्यांना सत्य दिसत होते. त्यांच्या बुद्धीला आणि आत्म्याला जाणवत होत की त्या बरोबर आहे. त्यांनी निरीक्षणाचा कोन अत्यंत सूक्ष्मपणे—केवळ ०.००००३ अंश दक्षिणेकडे—सरकवला. 

अचानक उपकरणांतून एक वेगळाच आवाज आला आणि सिग्नल इंडिकेटर वरील हिरवी लाईट चमकून बंद झाली. एक गूढ शांतता पसरली.

ती रात्र हिमालयातील सर्वात भयानक वादळांपैकी एक होती. वादळाचा आवाज वेधशाळेच्या कमकुवत संरचनेला आव्हान देत होता. विजांच्या कडकडाटाने टॉवर थरथरत होता. अर्जुनने सुरक्षिततेसाठी सर्व हाय-पॉवर उपकरणे बंद केली होती.

"डॉक्टर जोशी, वरची उपकरणे बंद करा! धोका पत्करणे योग्य नाही!" अर्जुन खालील मजल्यावरून ओरडला.

पण अवंतिका यांचे लक्ष केवळ त्यांच्या रेडिओ-टेलीस्कोपच्या मंद गुंजनावर होते. त्यांची हृदय गती वाढत होती.

अचानक एका प्रचंड कडकडाटासह वीज कोसळली आणि मुख्य पॉवर ग्रीड निकामी झाली. लाईटनिंग अरेस्टरने काम केले नाही. मुख्य पॉवर ग्रीड तुटली आणि संपूर्ण वेधशाळेत काळोख पसरला.

वेधशाळेत एकदम असाध्य, तात्काळ शांतता पसरली. वादळाचा आवाज दूर गेल्यासारखा वाटत होता, जणू सर्व काही स्थिर झाले आहे. 

अर्जुन टॉर्च घेऊन धावत टॉवरकडे आला. "मॅडम! सर्व काही बंद पडले आहे, आपण खाली यायला हवे!"

अवंतिका मात्र स्तब्ध बसल्या होत्या. त्यांचा श्वास हळू झाला होता. अर्जुनने टॉर्च त्यांच्या चेहऱ्यावर मारताच त्याला दिसले की त्यांचे लक्ष त्यांच्या स्वतः तयार केलेल्या एका छोट्या, बॅटरीवर चालणाऱ्या 'नो-फिल्टर' रिसिव्हरकडे होते.

'नो-फिल्टर' रिसिव्हर हे पोर्टेबल लहरी पकडणारे उपकरण होते. 

"थांब अर्जुन," त्या दबलेल्या पण तीक्ष्ण आवाजात म्हणाल्या. "हा क्षण बघ."

त्या छोट्या रसीव्हरमधून एक स्थिर, लयबद्ध 'पिप-पिप-पिप' असा आवाज येत होता. तो आवाज कोणत्याही नैसर्गिक घटनेसारखा नव्हता; तो कृत्रिम, बुद्धिमत्तायुक्त आणि उद्देशपूर्ण होता.

"हा केवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सचा गोंगाट असावा," अर्जुनने आपला व्यावहारिक तर्क लावला.

"नाही," अवंतिका उठल्या, त्यांचे डोळे प्रकाशाने चमकत होते. "हा गोंगाट नाही, हा सिग्नल आहे. हा तेव्हाच ऐकू आला जेव्हा इतर उपकरणांचा मोठा इलेक्ट्रोमॅग्नेटिक गोंगाट थांबला."

त्यांनी तो रसीव्हर लॅपटॉपला जोडला आणि 'डी-नॉईझिंग' अल्गोरिदम कार्यान्वित केला. हा अल्गोरिदम फक्त बुद्धिमत्तेतून निर्माण झालेल्या सिग्नलची फ्रीक्वेन्सी ओळखायला शिकला होता. 

स्क्रीनवर कोडचे आकडे वेगाने धावू लागले. "हा सिग्नल एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी बँडमधून येतोय, जो आपल्या सौरमालेतील नसून आकाशगंगा स्तरावरचा आहे, आपल्या सौरमालेतील कोणत्याही ज्ञात 'न्यूट्रल हायड्रोजन' वारंवरतेवर नाही, पण तो आकाशगंगा स्तरावर सहज पकडता येईल" त्या पुटपुटल्या.


अर्जुनाचा श्वास रोखला. अर्जुनला जाणीव झाली की तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. लॅपटॉपच्या स्पीकरमधून प्रत्येक 'पिप-पिप-पिप' एका विशिष्ट संख्येचे दर्शन घडवत होता.

अवंतिका हसून अर्जुनकडे बघत म्हणाल्या, "हे कोडिंग आहे , पण आपण वापरत असलेल्या कोणताही बायनरी किंवा हेक्साडेसिमल कोड नाही, तर हा एक गणितीय कोड आहे. हा असा अंक आहे जो आपल्या ब्रह्मांडाचा पाया आहे."

त्यांनी रिसिव्हरचा डेटा एका सिम्प्लिकेशन ॲनालिसिस प्रोग्राम मध्ये टाकला आणि डेटाचे विश्लेषण केले आणि स्क्रीनवर एक विशिष्ट क्रम दिसू लागला:

3.14159265358979323846... आणि पुन्हा 

3.14159265358979323846

हा क्रम पुन्हा पुन्हा अचूकतेने येत होता.

"हे पाय (π) चे मूल्य आहे," अवंतिका म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यांत वीस वर्षांच्या तपश्चर्येचे यश आणि थकवा दोन्ही होते. "वर्तुळाचा परिघ आणि व्यासाचे गुणोत्तर. कोणत्याही मानवनिर्मित कोडिंगशिवाय कोणत्याही भाषेच्या अडथळ्याशिवाय पाठवलेला हा गणिताचा सार्वभौम संदेश आहे!"

अर्जुनला धक्का बसला. कोणत्याही परकीय सभ्यतेला संवाद साधायचा असेल, तर त्यांना एक अशी भाषा निवडावी लागेल जी युनिव्हर्सल असेल. ते गणिताचीच निवड करतील, कारण ती विश्वाची एकमेव युनिव्हर्सल भाषा आहे.

पायचे मूल्य अनंत असले तरी त्यांना किती अंक पाठवायचे हे त्यांनी ठरवले होते. पायच्या मूल्याचा हा क्रम नुसते आकडे नव्हते, तर ते त्रिमितीय निर्देशक (Coordinates) होते, जे विश्वातील ताऱ्यांच्या स्थानाशी जोडलेले होते.

अवंतिका यांनी तो क्रम 'स्टेलर डिकोडर' प्रोग्राममध्ये टाकला . त्यात टाकताच, ती संख्या आता एका विशिष्ट त्रिमीतीय
स्थलांतरण (Translation) अल्गोरीदममध्ये रूपांतरीत झाली. 

स्क्रीनवर हजारो तारे आणि आकाशगंगा हलक्या निळ्या प्रकाशात दिसू लागले. पायच्या मूल्याने नकाशावरील अनावश्यक गोंगाट काढून टाकला आणि एका विशिष्ट ठिकाणची त्रिकोणी ताऱ्यांची संरचना प्रकाशित केली. तो एक कोडेड स्टेलर मॅप होता. हा नकाशा एका गडद ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाकडे निर्देश करत होता.
अवंतिकाने त्या ग्रहाला 'मंथन' असे नाव दिले. 

नकाशा डिकोड होताच, स्क्रीनवरचा  निळा प्रकाश मंद झाला आणि स्क्रीनवर एक शब्द चमकला:

(Waiting)....

"प्रतीक्षा... कशासाठी? आणि कशाची?" अवंतिकांच्या आवाजात आनंद आणि भीती दोन्ही दाटले होते.

अचानक वेधशाळेतील शांतता भंग पावली. अवंतिका यांचा अनेक महिन्यांपासून बंद असलेला जुना मोबाईल फोन वाजू लागला. बॅटरी नसतानाही तो चालू होणे अशक्य होते, पण त्यातून एक मंद, स्थिर आणि भेदक आवाज येत होता.

अर्जुनने टॉर्चच्या प्रकाशात स्क्रीनकडे पाहिले, तिथे एकच शब्द चमकत होता:
कॉलर आयडी: अज्ञात

सिग्नल मिळाला होता, पण तो देणारे कोण होते? आणि ते कशाची प्रतीक्षा करायला सांगत होते? अवंतिका थरथरत्या हाताने फोनकडे सरसावल्या.

"मॅडम, थांबा! नका उचलू!" अर्जुन ओरडला. "हा... हा मानवी कॉल नाही!"

अवंतिका यांनी अर्जुनकडे दुर्लक्ष केले. त्यांचे डोळे 'अज्ञात' या शब्दावर खिळले होते. त्यांनी संदेश 
पाठवला. आता त्यांनी कॉल केला.  त्यांनी फोन उचलला आणि 'स्वीकार' बटण दाबले. 

पलीकडून कोणताही मानवी आवाज आला नाही, केवळ एक शक्तिशाली, ब्रह्मांडीय गुंजन (Hummm) ऐकू आले.




नक्की कोणी केला असेल कॉल?
काय असेल त्या नकाशामध्ये दिसणाऱ्या ग्रहावर?
तो पाय चा सिग्नल कोणी पाठवला असेल?
याची उत्तरे पुढील अध्यायात मिळतील का?