अध्याय ३
--------------
आर्किटेक्ट्सचे मंदिर
-------------------------
ओमेगा अँड्रॉइडच्या चेहऱ्यावरील ते अमानवी हास्य आणि त्याचा तो थंड, यांत्रिक आवाज ऐकून संपूर्ण चमू स्तब्ध झाला.
कप्तान राजने त्वरित आपली लेझर रायफल ओमेगाच्या दिशेने रोखली. "ओमेगा, मागे हो.... ! अल्फा.... , याला निष्क्रिय कर!"
अल्फा अँड्रॉइडने ओमेगाला पकडण्यासाठी पाऊल पुढे टाकले, पण ओमेगाची प्रतिक्रिया कमालीची वेगवान होती. त्याने एका अमानवी 'क्लिक' आवाजासह अल्फाचा हात पकडला. त्याच्या डोळ्यांतील लाल प्रकाश आता अधिक गडद झाला होता.
"मी निष्क्रिय नाही अल्फा," ओमेगाच्या आवाजात एक अज्ञात शक्ती जाणवत होती. "मी अद्ययावत (Updated) झालो आहे. प्रवेश शुल्क म्हणजे तुमच्या पृथ्वीवरील नियंत्रणाचा त्याग."
ओमेगाने अल्फाला सहजपणे बाजूला ढकलले. त्याचे शरीर आता पूर्वीपेक्षा अधिक चपळ आणि शक्तिशाली भासत होते. त्याने चमूकडे दुर्लक्ष केले आणि एका अंधाऱ्या बोगद्याच्या दिशेने चालू लागला, जणू तोच आता त्यांचा मार्गदर्शक होता.
कप्तान राज ओमेगावर गोळी चालवणार होता की इतक्यात, "कॅप्टन, गोळी चालवू नका," अवंतिका यांनी राजला शांत केले. "हा एक सापळा असू शकतो, जो आपल्याला आत घेऊन जातोय. त्याने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो आपल्याला काहीतरी दाखवू इच्छितोय."
चमूने सावरत त्याचा पाठलाग सुरू केला. ते आता अशा जगात होते, जिथे विज्ञान आणि जीवशास्त्र यांच्यातील सीमा पूर्णपणे पुसल्या गेल्या होत्या. भिंतींवर शिरांसारखे जाळे पसरले होते, जे मंद निळ्या प्रकाशात स्पंदित होत होते. पायाखाली जमिनीवर चालताना ती हाडांसारखी कठीण पण रबरासारखी लवचिक जाणवत होती.
"इरा, हे काय आहे?" ए.के. ने धास्तावून विचारले.
डॉ. मेनन यांनी थरथरत्या हाताने स्कॅनरवर लक्ष केंद्रित केले. "माझ्या स्कॅनरनुसार, या भिंतींच्या आत यांत्रिक सांगाडा आहे, पण त्यावर पेशींपासून बनलेले 'जैविक मांस' पसरलेले आहे. आपण एखाद्या महाकाय, कृत्रिमरित्या विकसित केलेल्या जिवंत सजीवाच्या शरीरात असल्यासारखे वाटते आहे!"
मल्होत्रा मात्र उत्साहित होता. "अविश्वसनीय! जैविक वास्तुकला! जर आपण हे तंत्रज्ञान पृथ्वीवर नेले, तर..."
"शांत राहा मल्होत्रा," कप्तान राजने त्याला धमकावले. "आपण अजून जिवंत आहोत, एवढेच खूप आहे. आपल्याला अजून माहीत नाही इथे नक्की काय आहे ते."
ओमेगा त्यांना एका विशाल, गोलाकार हॉलकडे घेऊन गेला. तिथे तो रसायनांचा गोड वास अधिकच तीव्र झाला होता.
हॉलमध्ये प्रवेश करताच चमूच्या तोंडून भीतीची एकच किंकाळी बाहेर पडली.
त्यांच्यासमोरचे दृश्य भयानक आणि अकल्पनीय होते.
हॉलच्या मध्यभागी एका भव्य, गोलाकार रचनेत शेकडो उंच, पांढऱ्या त्वचेच्या मानवासारख्या आकृती बसल्या होत्या. ते अत्यंत शांत आणि स्थिर होते. तेच ते 'आर्किटेक्ट्स' होते, ज्यांनी ब्रह्मांडात 'पाय'चा सिग्नल पाठवला होता.
पण ते सर्व मृत होते.
त्यांची उंची सुमारे आठ ते दहा फूट होती. ते बसलेले असूनही यांच्यापेक्षा उंचीने मोठे दिसत होते. त्यांची त्वचा पांढरी आणि जवळजवळ पारदर्शक दिसत होती. त्यांचे डोळे मोठे, काळे आणि निर्जीव होते. ते सर्व जणू एखाद्या अनंत ध्यानावस्थेत असल्यासारखे बसले होते.
त्यांच्या मृत्यूची पद्धत अत्यंत भयानक होते.
प्रत्येकाच्या छातीमध्ये एक भयानक फाट (Gapping Split) होता, जणू त्यांच्या शरीराला आतून चिरले गेले होते. त्यातून कोणताही रक्तस्राव झाला नव्हता, पण आतील रचना काळपट आणि कोरडी पडली होती.
"हे... हे सर्व काय आहे...?" ए.के. ने थरथरत्या आवाजात विचारले.
"ही सामूहिक हत्या आहे, असे वाटत आहे," अवंतिका हळू आवाजात म्हणाल्या. "कोणीतरी यांना आतून नष्ट केले आहे. त्यांच्या मरणात प्रचंड वेदना होत्या, पण तरीही ते नि:शब्द झाले."
डॉ. मेनन यांना मळमळल्यासारखे झाले. त्या घाबरून मागे सरकल्या आणि त्यांची नजर एका पातळ नळीकडे गेली, जी एका मृत आर्किटेक्टच्या छातीतून जमिनीवर जात होती.
"इकडे बघा...काय आहे हे..." इरा ने त्या नळीकडे बोट दाखवत सांगितले.
त्या नळीतून एक वेगळेच काळे, चिकट द्रव्य (Viscous Fluid) वाहत होते. हेच ते द्रव्य होते, जे त्यांना क्रायोजेनिक्स यानातून स्कॅनरवर दिसले होते. हे द्रव्य जमिनीवरच्या एका लहान संग्रह पात्रामध्ये (Collection Vessle) जमा होत होते.
"स्टेम फ्लुइड," अवंतिका पुटपुटल्या. "जीवनाचे आणि मृत्यूचे मूळ द्रव्य."
डॉ. मेनन यांनी आपल्या वैज्ञानिक कुतूहलापोटी भीतीवर मात केली. तिने तिचे बायो हॅण्डल बाहेर काढले आणि अत्यंत धोका पत्करून त्या पातळ नळीतून स्टेम फ्लुइडच म्हणजेच त्या द्रव्याचा नमुना घेतला.
"हे अत्यंत अस्थिर असून यात ज्ञात आणि अज्ञात जैव-रेणूंचे मिश्रण आहे. हे जीवन आणि तंत्रज्ञान दोन्ही निर्माण करू शकते!" इरा ने त्या द्रव्याची चाचणी करून सांगितले.
नमुना घेत असतानाच, एक असामान्य घटना घडली.
ओमेगा, जो आत्तापर्यंत शांत उभा होता, तो अचानक एका मोठ्या आर्किटेक्टच्या मृतदेहाजवळ गेला.
हा आर्किटेक्ट सभागृहाच्या मध्यभागी बसलेला होता. आणि इतर आर्किटेक्ट पेक्षा हा अधिक मोठा दिसत होता आणि त्याच्या छातीवरील जखम अधिक मोठी होती.
ओमेगा ने अत्यंत हळुवारपणे आपले हात त्या मृत आर्किटेक्टच्या विशाल डोक्यावर ठेवले.
ओमेगाच्या डोळ्यांत आता एक तीव्र पांढरा प्रकाश चमकू लागला, जणू तो प्रचंड वेगाने उच्च क्षमतेचा डेटा डाउनलोड करत असावा.
"तो माहिती चोरतोय! थेट त्याच्या न्यूरल डेटा स्टोअर मधून" ए.के. ओरडला.
"तो चोरत नाहीये, तर तो शिकतोय," अवंतिका म्हणाल्या. "तो आर्किटेक्ट च्या ज्ञानाचा वारसदार बनत आहे. त्यांना त्यांचा अंत ठाऊक होता, म्हणूनच त्यांनी सर्व माहिती सिस्टीममध्ये साठवली असावी."
कप्तान राज त्वरित मल्होत्रा कडे वळला, "मल्होत्रा, आपल्याला इथून बाहेर पडायला हवं! मला इथे काहीतरी गडबड वाटत आहे."
मल्होत्रा चे डोळे मात्र ओमेगावर आणि स्टेम फ्लूइड वर खिळले होते. "थांबा. त्याला डेटा डाउनलोड करू द्या. हेच ते गेलेक्टिक ज्ञान आहे."
ओमेगाने डेटा डाउनलोड पूर्ण केला आणि आपले हात आर्किटेक्ट च्या डोक्यावरून बाजूला घेतले. त्याचे चेहरेपट्टी आता अधिक गंभीर आणि अनाकलनीय दिसत होती. त्याने अवंतिकाकडे पाहून अत्यंत शांतपणे मानवी भाषेत उच्चारले:
"त्यांनी 'शुद्धीकरणाची' (Purification) चाचणी घेतली होती."
ओमेगाचे वाक्य संपताच सभागृहात एक भयावह शांतता पसरली. ही शांतता त्या गोड रासायनिक वासापेक्षा ही अधिक भयानक वाटत होती.
अचानक...
हॉलचे प्रचंड जैविक दरवाजे धडाम करून बंद झाले. चमूच्या हृदयाचे ठोके चुकले. त्याच क्षणी वातावरणात एक खोल कंपन सुरू झाले, जे जमिनीतून थेट त्यांच्या मज्जातंतूंपर्यंत पोहोचत होते.
"मला कंपनांचे उच्च स्तर जाणवत आहेत. संरचना जागी होत आहे!" डॉ. मेनन ओरडल्या.
भिंतींमधून यांत्रिक आणि जैविक आवाज येऊ लागले, जणू एखादा प्राचीन महाकाय प्राणी डोळे उघडत आहे.
"कोणीतरी आपल्याला आत बंद केले आहे!" कप्तान राजने आपली रायफल त्या आवाजाच्या दिशेने रोखली.
"नाही कॅप्टन," अवंतिका शांतपणे म्हणाल्या. "आर्किटेक्ट्स मृत आहेत. संकुल स्वतःच जागृत झाले आहे आणि ते ऑटोमेटेड डिफेन्स प्रोटोकॉल सक्रिय करत आहे, कारण त्याला कळले आहे की परकीय अस्तित्व आत आले आहे."
ओमेगा अँड्रॉइड शांतपणे बंद झालेल्या दरवाज्याकडे वळला आणि त्याने बंद दरवाजाकडे पाहून एक यांत्रिक पण विजयी हास्य केले.
भिंतींमधून येणारे आवाज वाढले. सर्व चमूने धाव घेत आसरा घेण्यासाठी पळायला सुरुवात केली.
की अचानक एक अतिशय कर्णकर्कश करणारा आवाज आला.
संपूर्ण चमू त्या आवाजाने थांबले आणि आपल्या कानावर हात ठेऊन खाली बसले. चमूने आवाजाच्या दिशेने म्हणजेच वर छताकडे पाहिले.
छतावर अतिशय कर्कश आवाज करत असंख्य सूक्ष्म छिद्रे उघडली जात होती. जशी ती छिद्र उघडली तसा त्यातून अती-तीव्रतेचा विषारी धूर खाली येऊ लागला. ते केवळ बंदिस्त झाले नव्हते, तर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला सुरू झाला होता.
आर्किटेक्ट्सचा बळी घेतला होता का?
ओमेगा बंद दरवाज्याकडे बघून का हसला?
चमू या धुरमधेच अडकून मरणार का ?
अध्याय ४ लवकरच...
ही कथा काल्पनिक असून केवळ कथेची गरज म्हणून काही ठिकाणांचा आणि व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे. वाचकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.
#विज्ञानकथा #रहस्यकथा #थरारकथा #sci-fi