A farewell like this. - 4 in Marathi Thriller by Ashish Devrukhkar books and stories PDF | एक निरोप असाही... - 4

Featured Books
Categories
Share

एक निरोप असाही... - 4

    युद्ध होणार याची जाणीव प्रत्येकाला झालीच होती. इकडे लग्न उरकून त्याची बहिण सासरी निघाली. सगळे लग्नात हजर होते पण त्यांचे मन मात्र ह्याच्याकडे लागले होते. ह्याचे मन मात्र वेगळेच विचार करत होते. युद्धात भाग घ्यायला मिळणार म्हणून तो उत्सुक झाला होता. त्याला त्याचे लहानपण आठवले.

    शाळेत असताना अचानक व्हरांड्यात लावलेल्या कर्णा म्हणजे जे पत्र्याचे स्पीकर यायचे पहिल्यांदा त्यातून फुंकल्याचा आणि "हॅलो हॅलो माईक टेस्टिंग वन, टू, थ्री माईक टेस्टिंग" असा आवाज आला. सगळ्या मुलांनी एकच गलका केला कारण असे काही वाजले की शाळा लवकर सुटते हे सगळ्यांना माहिती होते. सगळ्यांनी आपापली दप्तर आवरायला घेतली. नेहमी शाळा लवकर सुटणार हे त्यांचे पिटी चे शिक्षक सांगायचे पण ह्यावेळी स्वतः मुख्याध्यापक होते. त्यांचा आवाज ऐकून गलका कमी झाला. ते बोलत होते.

"सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी आपण सर्वांना माहितच आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध भडकले आहे. आज आपले हे संपूर्ण शहर आणि आपली शाळा एका अत्यंत जड अंतःकरणाने उभी आहे."

आता मात्र एकदम शांतता पसरली. ते पुढे बोलू लागले.

"मला तुम्हांला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, आपल्याच शहराचा सुपुत्र, ज्याने याच मातीत खेळून देशाचे रक्षण करण्याचे स्वप्न पाहिले होते. तो ढाण्या वाघ आज देशाच्या सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झाला आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी त्याने आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. मुलांनो, सैनिक कधीच मरत नसतो, तो 'अमर' होतो. आज आपल्या शहराने एक वीर सुपुत्र गमावला असला, तरी देशाने एक महान नायक मिळवला आहे. ज्या तिरंग्यासाठी त्याने रक्ताचा शेवटचा थेंब सांडला, तो तिरंगा आज त्याच्या सन्मानार्थ नतमस्तक झाला आहे. त्याच्या या बलिदानातून आपल्याला हेच शिकायचे आहे की, देशप्रेम ही केवळ शब्दांत व्यक्त करण्याची गोष्ट नाही, तर ती जगण्याची जिद्द आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, आपण सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या वीर आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करूया आणि देवाला प्रार्थना करूया की, त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो."

महिला शिक्षकांचा बांध फुटला. काही मूल रडायला लागली. काहीजण दुःख दाबून होती. मुख्याधापक पुढे बोलत होते.

"मुलांनो, केवळ अश्रू ढाळणे ही त्या वीर सुपुत्राला खरी श्रद्धांजली ठरणार नाही. माझी एक मोठी इच्छा आहे की  आपल्या या शाळेने, याच मातीतून असे पराक्रमी सैनिक तयार करावेत, जे उद्या देशाच्या सीमांचे रक्षण करतील. सैनिक होणे म्हणजे केवळ गणवेश घालणे नव्हे, तर आपल्या कामाप्रति निष्ठा, शिस्त आणि प्रसंगी सर्वोच्च त्याग करण्याची तयारी असणे होय. आज आपल्यासमोर त्यांचा आदर्श आहे. त्यांनी ज्या जिद्दीने आपले कर्तव्य पार पाडले, तीच जिद्द तुम्ही तुमच्या अभ्यासात आणि आयुष्यात अंगीकारली पाहिजे. त्यांचे बलिदान आपल्यासाठी एक प्रेरणा आहे. मला खात्री आहे की, उद्या तुमच्यापैकीच काही वीर तरुण  या देशाच्या रक्षणासाठी सिद्ध होतील आणि आपल्या शाळेचा व शहराचा नावलौकिक देशपातळीवर नेतील.

चला तर मग, आज आपण ही शपथ घेऊया की, आपण आपल्या देशाचा मान सदैव उंचावत ठेवू.

वीर जवान... अमर रहे!

भारत माता की जय!"

आता मात्र सगळी मूल रडत होती. शाळा सुटल्यावर त्यांना न्यायाला आलेल्या पालकांना बिलगुन ती रडू लागली. त्यावेळी डी.आशू रिक्षाने शाळेला यायचा. शाळा सुटल्यावर जेव्हा रिक्षावाले काका त्याला न्यायला आले तेव्हा तो त्यांना बिलगुन रडायला लागला.

"काका, आपला जवान गेला ओ."

"रडू नको बाळा, तो गेला नाही, शहीद झालाय. शहीद नेहमी अमर असतो. आपण शहीद जवान अमर रहे म्हणतो ना?"

"हो काका, नाही रडणार मी."

"गुड बॉय."

"काका,  मीपण सैन्यात जाणार. तो गणवेश चढवणार."

"भावनेच्या भरात बोलू नकोस."

"भावनेच्या भरात नाही काका. मी हिंमतवाला आहे. मी सैन्यात जाणार."

"बाळा, सैन्याचा गणवेश फक्त हिंमत नाही मागत, तो सोबत बलिदान सुद्धा मागतो."

"मी बलिदान द्यायला पुढे मागे नाही बघणार."

     रिक्षावाल्या काकांनी त्याला पोटाशी धरले. दुसऱ्या दिवशी शहीद जवानावर अंतिम संस्कार होणार होते म्हणून शाळेला सुट्टी होती.

     कोल्हापुरातल्या गांधी मैदानात जवानाचा पार्थिव देह अंतिम दर्शनासाठी ठेवला होता. दर्शनासाठी लांब रांग लागली होती. अंत्य दर्शनासाठी त्याचे वडील त्याला घेऊन गेले होते. त्या पवित्र पार्थिवासमोर येताच त्याला गहिवरून आले. त्यांच्यासोबत त्याचा जवळचा मित्र आणि त्याचे वडील सुद्धा आले होते. पूर्ण अंतिम यात्रेत ते होते. जवानाला शेवटची सलामी देताना त्याने आणि त्याच्या मित्राने शपथ घेतली होती की मोठे होऊन शत्रूला यमसदनी पाठवू. शपथ घेतल्यावर तो वडिलांना बोलला होता, "पप्पा मी शहीद झाल्यावर अशीच गर्दी होईल का ओ?" ते ऐकल्यावर वडिलांनी त्याला उराशी कवटाळले होते.

"पप्पा, मी शहीद झालो की माझा देह माझ्या शाळेच्या मैदानात ठेवा. जी शाळा मला घडवत आहे तिच्या सोबत मला शेवटच्या क्षणी राहायला मिळेल."

"गप्प, आला मोठा शहीद होणारा. बस ने घरी जा सांगितली की फाटते तुझी आणि म्हणे मी शहीद होणार."

हे आठवत असताना तो गालातल्या गालात हसत होता.

"ओ विंग कमांडर, काय होतंय?"

"कुठे काय स्कॉड्रन लीडर सत्यजित."

"मग हसताय काय गालातल्या गालात?"

"काही नाही, लहानपणीच्या गोष्टी आठवल्या."

"अच्छा."

"हो."

"आता युद्ध झाल्यावर तुम्ही नेहमीप्रमाणे सुसाट शत्रूच्या हद्दीत जाणार आणि सगळा विध्वंस करून परत येणार आणि मग विंग कमांडरवरून ग्रुप कॅप्टन होणार."

"आणि तुम्ही विंग कमांडर." डी. आशू हसत हसत बोलला आणि सगळे पायलट आपल्या हरवलेल्या साथीदारांचे दुःख थोड्यावेळ का होईना विसरले.

      थोड्याच वेळात चिनुक भुज एअरबेसवर उतरले. तिथे उतरल्यावर सगळ्यांना तातडीने मीटिंग रुममध्ये नेण्यात आले. हाच तो भूज एअरबेस आहे ज्यावर १९७१ च्या युद्धात डिसेंबरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाने एअरबेसच्या धावपट्टीवर (Runway) प्रचंड बॉम्बफेक केली होती, ज्यामुळे धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि भारतीय विमानांचे उड्डाण थांबले. पण युद्ध सुरू असतानाच, जवळच्याच माधापर गावातील ३०० महिलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, अवघ्या ७२ तासांत ही धावपट्टी पुन्हा तयार केली. या धाडसामुळे भारतीय हवाई दल पुन्हा कार्यान्वित झाले आणि युद्धात भारताचे पारडे जड झाले. या घटनेवर आधारित 'भुज: द प्राईड ऑफ इंडिया' हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच.

तर त्या मीटिंग रुममध्ये वायुदलाचे काही अधिकारी बसले  होते आणि बरेच पायलट सुद्धा होते. भूज एअरबेस हा पाकिस्तान सीमेपासून जवळ असल्याने तो प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असा होता. इंद्रा-II आणि रोहिणी रडार तिथे होते आणि हवेत उडणारा Aerostat रडार हवेत आपले काम बजावत होता. 

     इंद्रा -II हे संपूर्ण भारतीय बनावटीचे रडार असून कमी उंचीवरून येणाऱ्या विमानांना पकडते तर रोहिणी रडार एकाचवेळी अनेक विमानांना पकडू शकते. Aerostat रडार म्हणजे फुगा असलेले रडार. हे आकाशात उंच जातात आणि डोंगर दऱ्यातून आणि लांबून येणाऱ्या विमानांवर लक्ष ठेऊन असतात. इतर म्हणाल तर या एअरबेसवर मिग-२९ आणि सुखोई Su-30MKI तैनात होती आणि Mi-75 V5 हेलिकॉप्टर तैनात होत. 

तातडीची मिटिंग सुरू झाली. मिटिंग सुरू होते ना होते तेच एक बातमी येऊन धडकली. 

(क्रमशः)