"सुनेत्रा!"
ट्युशनवरून येताना एक मुलाचा आवाज मागून आला. सुनी आणि मी वळलो. मला विश्वासच बसेना. तो सचिन होता.
" हं!? " सुनीचा एवढाच उच्चार निघाला.
"जरा काम होतं." तो म्हणाला. माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तो पूर्णपणे तिच्याकडेच बघत होता.
" माझ्याकडे? काय? " सुनी शांत स्वरात बोलली.
" संस्कृतच्या क्लासला जातेस ना तू? मला नाही जायला मिळत. कामे असतात इतर घरातली .. तर.. मला रविवारच्या दिवशी अभ्यासासाठी तुझी क्लासची वही मिळेल का? इतर कोणाची घेतली असती पण तू वर्गात पाहिली असतेस.. म्हणून तूला विचारलं. जमेल का?" एका खेपेत तो म्हणाला.
"देऊ शकते.. पण परत मला सोमवारी सकाळी वर्गात परत हवी." ती म्हणाली. तिने चक्क होकार दिला होता. तसं ती अभ्यासातल्या गोष्टींसाठी नाही म्हणणं शक्य नव्हतं. मदत करणं तिचा स्वभाव होता.
"हो नक्की देणार. रविवार बस आहे मला अभ्यासाला. हो.. आणि आणखी एक... जर काही अडलं तर तूला विचारलं तर चालेल ना?" त्याने परत विचारले.
" ठीके. विचारत जा." ती वही पुढे करत म्हणाली.
त्याने घेतली आणि त्याच्या सायकलला लटकवलेल्या पिशवीत टाकली.
"अरे हो.. आणि.. ते... तुझ्यावर पण चिखल उडाला त्यादिवशी त्याबद्दल सॉरी." ती म्हणाली.
" ते होय.. अगं असू दे.. तुझी चूक नव्हती त्यात. समरने तसं नव्हतं करायला हवं. उगाच तूला राग आणून दिला त्याने." तो म्हणाला. त्यात त्याने जाणीवपूर्वक माझा उल्लेख टाळलेला मला कळला. जणू त्याच्या लेखी मी तिथे नव्हतोच.
" हम्म!" ती म्हणाली.
"ठीके.. सोमवारी सकाळी वर्गात देतो वही. Thank you. " तो म्हणाला आणि तिच्याकडे बघून हसत निघून गेला.
काही सेकंद तीने तो गेला तिकडे पाहिले आणि मग मला चल म्हणाली.
" हा त्या सम्यासारखा नाहीये. जरा बरा दिसतोय वागण्यात. " ती म्हणाली.
"काय गं सुने? तू रविवारी अभ्यास करणारं नाही का?" मी विचारलं.
" अरे तुझी वही आहे कीं. त्यातून करू. अरे त्याला गरज आहे असं वाटलं मला. मेहनत करणाऱ्याला मदत करावी जाडू आपलं काय बिघडणारे. " ती म्हणाली.
" पण लगेच एका भेटीत असं वही वैगरे मागणं..? आगाऊपणा नाही वाटत का? " मी म्हणालो.
" नाही रे वर्गातलाच मुलगा आहे ना? पळून जाणारे का तो कुठे वही घेऊन. विश्वास टाकून दिलीये.. बघू काय करतो. " सुनी म्हणाली.
माझ्या वहीचा सपोर्ट सुनीला मिळणं ठीक होतं, पण त्या सचिनला तिची वही आम्हा दोघांकडे असणाऱ्या माझ्या वहीच्या सपोर्टमुळे मिळाली. सुनी तिच्या माणुसकीच्या तत्वाने चालत होती कीं सचिन ने तिच्या मनात एक बारीकशी जागा मिळवली म्हणून तीने वही सहज देऊ केली होती ते मला कळत नव्हतं. सचिनचं ते माझ्या अंगावर बाकीच्यांनी चिखल उडवून झाल्यावर, माझ्याकडे पहात बारीक हसत जाणं मला अजूनही सलत होतं. तो माझ्यापर्यंत काही पोहोचवू पाहत होता. माझ्याशी काहीही न बोलता पण त्याने ते माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं.
🍁🍁🍁🍁
सोमवारी सचिनने तीला वर्गात वही परत दिली. ते करताना
"तुझं अक्षरं फार भारी आहे." हे सांगायला तो विसरला नाही.
सुनीने त्या स्तुतीचा हसून स्वीकार केला.
नंतर मात्र हे सत्र सुरु झालं. दर शनिवारी ट्युशनच्या रस्त्यात सचिनला सुनीची संस्कृतची वही मिळायची. सोमवारी तो ती परत करायचा.
दोघे बोलत असल्यामुळे सचिन त्याच्या मामांना सुतार कामात आणि पेंटिंग मध्यें कसा मदत करतो. मामींचे 17-18 डबे कसे घरोघरी पोहोचवतो. त्याचा पेपरची लाईन टाकायचा विचार आहे पुढल्यावर्षी. अशी बारीक बारीक माहिती मला सुनीकडून विनाकारण मिळत होती. तर कधी मी तिच्या सोबत असताना सचिनसुद्धा असायचा तेव्हा त्यांच्या बोलण्यातून डायरेक्ट मला कळत होती. अजूनही त्याने माझ्याशी होऊन चकार शब्द बोलला नव्हता. मी त्याच्यासाठी गोलाकार शून्य होतो जणू. सुनी पण तो असताना जास्त करुन त्याच्याशीच बोलायची. हा फरक मला जाणवत होता.
सुनीच्या मनात त्याने एक रॅपो बनवला आहे, हे मला कळत होते. काहीवेळा तो मधल्या सुट्टीत तीला गाठून अभ्यासाचं आणि अवांतर बोलायचा. तसा मला समरकडून परत डायरेक्ट कसलाचं त्रास वैगरे नव्हता होत. पण त्याचं माझ्याकडे बघत निघणारं एक प्रकारचं विचित्र हास्य मला सतवायचं, जेव्हा सचिन सुनीशी बोलत असायचा. जणू त्यात समर म्हणत असायचा की बेट्या तुझ्याकडून काही काढून घेतलं जातंय. तू बस हात चोळत.
सुनी मात्र माझ्याशी तशीच वागत होती. सहज होती. तिने मला त्याच्यासाठी अजूनतरी अजिबात डावलले नव्हते.
एका रविवारी संध्याकाळी मी सुनिकडे आलो. तीला बॅडमिंटन खेळायचं का विचारायला गेलो. घरात आलोच होतो तेवढ्यात कानावर काही पडले.
" खोखो आणि कबड्डी मध्यें मी गेम पहिलाय याचा. कॅप्टन होता आधी त्याच्या वर्गाच्या दोन्ही टीम्सचा. Best प्लेयर आहे सचिन." सुनी सचिनचे कौतुक करत. बोलत होती.
सचिन तिथे.. तिच्या घरी होता. वहिचे निमित्त करुन त्याने तिथे प्रवेश मिळवला. सुनीचे आई वडील तसे मोकळ्या मनाचे आणि खूप छान स्वभावाचे होते. मला तर कायमच घरचा समजत होते. सुनीला त्यांनी मित्र मैत्रिणींबाबतीत विनाकारण अडसर ठेवला नव्हता. तिच्या बोलण्यावरून मला एवढे तर कळले होते कि सुनीला याआधी सचिन माहित होता. फक्त दोघांची ओळख नव्हती.
"आमच्या वर्गाला दोन्हीमध्ये हरवले होते त्याने. आता आमचा वर्ग त्याच्या आधीच्या वर्गाला हरवेल." सुनी त्याचं कौतुक आईवडिलांना सांगत होती.
मी दबकतच परत फिरू लागलो तसं तिच्या बाबांनी मला पाहिलं.
" अरे!! ये ये.." सुनीचे बाबा मला म्हणाले.
" सुनी बॅडमिंटन खेळायला येणार का? विचारायला आलो होतो." मी म्हणालो.
" हो चल खेळू कि. आज तर सचिन पण आहे. वही द्यायला आला होता. आपण तिघे खेळू" ती म्हणाली.
"बरं." मी एवढंच म्हणालो. हा आमचा.. आमच्या दोघांचाच राखीव time होता एकत्र असण्याचा. त्यात तिने त्याला घ्यावं हे मला किती झालं तरी रुचेना. पण लगेच तसं दाखवणं मलाच चूक ठरवून गेलं असतं.
" मला येत नाही खेळता बॅडमिंटन. मला शिकव बरं का गं. "
घरातून निघता निघता सचिन तीला सोज्वळपणाने म्हणाला.
"बरं काका काकू येतो." सचिन त्यांचा निरोप घेत म्हणाला. स्वतःचे उच्च मॅनर्स दाखवायचे होते बहुतेक त्याला.
मला तर त्याचा रागच आलेला. का हा घुसला असेल इथे? हा प्रश्न मला सारखा बोचत होता.
पुढला एक दीड तास मी फक्त प्रेक्षक होतो. सुनीच्या घरासमोर अंगणात दोघांचा खेळ बघत. त्यांच्यालेखी तिथे असून नसल्यासारखा. खरंतर माझी वेळच चुकली आणि सचिनला सुनीसोबत वेळ घालवायला संधी मिळाली. सचिन यावेळी एकदाच मला त्याच्या चांगुलपणाची (?) ओळख दाखवत म्हणाला,
"अरे तू पण खेळ कि. घे." त्याने रॅकेट पुढे केली.
"नाही खेळ तू.. आम्ही काय खेळत असतो अधूनमधून." मी म्हणालो आणि परत बघ्या झालो. त्याने सुनिकडून शिकण्याचा अभिनय वठवल्याचं माझ्या लक्षात येत होतं. उगाचच काहीतरी पांचट विनोद करत तीला हसवण्याचे प्रयत्नपण मूर्खासारखेच वाटत होतें. आज संध्याकाळ लवकरात लवकर संपून पटकन अंधार पडावा असे वाटत होतें.
कारण तो तीला जिंकवत होता. आणि मी...?
मी मला हरवत होतो.
🍁🍁🍁🍁
विश्व् काही फक्त दोघांचच नसतं, मान्य आहे.
पण त्यातला एक कण तरी दोघांचाच असू शकतो ना..
तू सध्यातरी माझी नाहीस, मान्य आहे.
पण तुझ्याकडे जे माझं आहे, ते माझ्यासाठीच ठेऊ शकतेस ना..
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁