फुल्ल स्पीड मध्ये चालु असलेला व्हायपरब्लेड गाडीच्या काचेवरचा पाण्याचा थर दूर करायला निष्फळ ठरत होता. संदीप आणि विद्या कार मध्ये बसून घरी निघाले होते. काळजीच कारण पाऊस नव्हता तर... विद्याला अचानक पणे सुरु झालेल्या प्रसव वेदना हे होतं. घाट रस्ता, निबीड आरण्य, रोरावणाऱ्या वाऱ्यांसहीत भयाण कोसळणारा पाऊस आणि पसरलेला दाट अंधार. यामध्ये जीव मुठीत घेऊन संदीप गाडी चालवत होता. पुढं काय वाढून ठेवलंय याची दोघांना किंचितही कल्पना नव्हती.
हे सुरु झालं ते विद्याच्या अचानक मनात आलेल्या इच्छेने.
"आज मला हिरवं कुरण आणि टपटपणारा पाऊस बघायचाय." असं विद्या संदिपला म्हणाली. बुधवार दुपार होती. बाहेर पाऊस पडत होता. संदिपला वाटले कारने तिनेक तासाचा ड्राईव्ह करुन परत येऊ. घरून काम करत असल्याने त्याने फोन करुन शॉर्टलीव्ह घेतली. विद्याचे मन आनंदी ठेवणे बाळासाठी गरजेचे होते. एवढी छोटी इच्छा पुर्ण करने त्याला नक्कीच जमणार होते. दुपारी दोनला शहर सोडून गाडी घाटाला लागली. रिमझिम पाऊस सुरु होता. ऑड दिवस असल्याने पर्यटन करणाऱ्यांची रस्त्यावर तशी जराही गर्दी नव्हती.
एका वळणावर गाडी वळवताना संदिपला झाडात जरा दुरवर एक पडीक पण दुमजली इमारत दिसली. ह्याआधी तो इथे कित्येक वेळा आला होता. पण त्या इमारतीकडे त्याचे लक्ष कधी गेले नव्हते. त्याने रस्त्यावर मान वळवलीच होती तितक्यात समोर एक काळे कोकरू रस्त्यावर आडवे धावताना त्याला दिसलें. तो जरा गडबडला. पण गाडी त्याने रस्त्यावर स्थिर ठेवली. त्याला वाटले आलेच खाली गाडीच्या, पण तसे काही झाले नाही. रेअर व्यू मिरर मध्ये त्याला ते रस्त्याच्या मधोमध उभे दिसलें.
"आश्चर्य आहे." तो म्हणाला.
"का काय झालं?" दरीचा सुंदर देखावा मोबाईल मध्ये शूट करणाऱ्या विद्याने विचारले.
"पाहिलं नाहीस तू? बकरीच पिलू. रस्त्यावर जनावरे सोडतात ही लोकं. मेलं एखाद गाडी खाली तर. नशीब वाचलं." तो म्हणाला.
"काय होतं? मला नाही दिसलं काही." ती म्हणाली.
"जाऊदे सोड."तो वातावरण हलकं करत म्हणाला. पण ते कोकरू कसं काय वाचलं. त्याला खरंच प्रश्न पडला होता.
घाटाने ड्राईव्ह करत दोघे मुख्यरस्ता सोडून हमरस्त्याने काही किलोमीटर लांब धबधबे बघत एका छोट्या धरणापाशी आले. इथे छान हिरवळ होती. उथळ पाणी होतं. संदिपने कुठल्याश्या टपरीवरून भाजलेली कणसे आणली. ती खात तो आणि विद्या त्या गवतावरून सावकाश वॉक घेत होते. थर्मासमध्ये आणलेली कॉफी दोघांनी घेतली. दोनाचे तीन तास त्यांना तिथेच झाले. विद्या खुश होती. तिचा आठवा संपत आला होता. संदीप तिला खूप जपत होता. काही वेळाने खूपच काळवंडून आलं. रपरप पावसाला सुरुवात झाली. दोघे पटकन गाडीत बसले. जवळजवळ सहा वाजत आले होते. अंधार वाढत चालला होता. गाडी हमरस्त्याला असल्यामुळे चिंचोळ्या रस्त्यावरून मंद गतीने चालली होती. डोंगरावरच पाणी मधूनच रस्ता कापत ओहोळाच्या स्वरूपाने आपली गतिमानता दाखवत होतं.
मुख्य रस्त्याला लवकरात लवकर लागणं गरजेचं होतं. उजेड असतानाच लवकर निघालो असतो तर बरं झालं असतं असं संदिपला वाटलं. मुख्य घाटाला लागेपर्यंत अंधार गडद झाला. पावसाने थैमान मांडलं. घाट रस्ता सुरु झाला आणि गाडी एका खड्ड्यात दणकण आदळली.
"संदीपssss !!!" विद्या जोरात किंचाळली.
तिला दणका असहनीय जाणवला. पोटातलं सगळं दणक्याने हललं. भयानक कळ येत तिला त्रास होऊ लागला.
संदीप घाबरला. त्याने गाडी बाजूला घेतली.
"विद्या. विद्या काय होतंय? " तो म्हणाला.
"खूप कळा जाऊ लागल्यात मघाशी गाडी आपटल्यामुळं. प्लिज लवकर.. लवकर निघू..हॉस्पिटल हवंय मला लवकर संदीप.. आह्हह्ह sss " ती ओरडत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा असह्य ताण त्याला स्पष्ट दिसतं होता. त्याने गियर टाकला आणि अंदाजानेच तो पुढे निघाला. विसेक मिनिटांनी तो त्या वळणावर आला जिथे त्याला ती पडकी इमारत दिसली होती. तिथे त्याला उजेड दिसला. पण तिथे का थांबायचं म्हणून तो पुढे निघाला. अचानक परत तसाच खड्डा लागला, जसा त्याला मागे मुख्य रस्त्याला लागल्यावर आला होता. त्यात गाडी परत जोरात आपटली. यावेळी गाडी जास्तच जोरात असल्याने दणका भयानक होता. त्याने गाडी अगदीच कशीबशी सावरली.
"आई ssssss...गं....नाही... sss...संदीप प्लि sssss ज... मी... मरेन..." विद्या कांठाळ्या बसवणारी किंकाळी फोडत ओरडली. सोबत तिने संदीपचा खांदा ओरबडत धरला होता. ती त्याचा शर्ट देखील ओढत होती.
"हा.. हा खड्डा परत कसा आला.. काहीच कळत नाहीये विद्या." तो घाबरून बोलत होता.
संदीप चक्रवला होता. त्याला भीतीही वाटू लागली होती. सरळ सरळ रस्ता, त्यात गल्लत होणं शक्यच नव्हते. रस्त्याला एकही गाडी जातं येत नव्हती. पंधरा मिनिटांनी परत तेच वळण आलं जिथे ती इमारत होती. तिथं त्याला पुसटश्या उजेडात बोर्ड दिसला. "शासकीय रुग्णालय" असं त्या बोर्डवर लिहिलेलं होतं.
हे परत कसं आलं. तो भयानक गोंधळला होता. पोटातली भीती आता त्याच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण रुग्णालय म्हणजे तिथे काहीतरी व्यवस्था असण्याची चिन्हे दिसत होती. आत्ताच्या वेळेला त्याला ते उपयोगी पडणार होतं. गाडी हळू करत त्याने त्या दिशेला वळवली.
"संदीप... कुठे चाललोय.. आ... आपण... " विद्या कळवळत म्हणाली.
"विद्या आपण हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल. इथे शासकीय रुग्णालय आहे. सरकारी डॉक्टर मिळेल. आपल्याला मदत मिळेल. जाऊ आपण तिथं." तो म्हणाला.
गाडी मुख्यरस्ता सोडून झाडीतल्या मंद प्रकाशित रस्त्यावर घुसली. दुपारी येत असताना ती वास्तू जितकी पडीक वाटत होती तितकी आता वाटत नव्हती. मुख्य म्हणजे तिथे उजेड होता. विजही दिसत होती. बाहेर मात्र कोणी नव्हतं. जशी गाडी आत येत गेली तसं त्या संपूर्ण परिसरावर एक सोंग पांघरत गेलं. अगदी त्या वास्तूच्या मागेपर्यंत काहीतरी सरकत गेलं. जे तिथलं सत्य होतं. पण शिकारीसाठी सावजालाच खाद्य पुरवत आणणारे ते सोंग, गरजवन्त असणाऱ्या संदीप आणि विद्याला त्यांच्या सामान्य बुद्धी आणि डोळ्यांना कसं दिसणार होतं?
त्या वास्तूच्या शेवटाला तो तिथं ठाण मांडून बसलेला छळवाद खसखसत हसत होता. हळूहळू टाळ्या पिटत होता. आपण लावलेला सापळा जिंकतोय हे बघत मजा घेत होता. खरंतर तो सरळपणे झेप घेण्यासाठी सरसवत होता. पण त्याला त्यांना अजून वेड्यातही काढायचं होतं.
संदिपने बाजूला गाडी पार्क केली. तो हातात छत्री घेऊन खाली उतरला. पलीकडे येत त्याने दार उघडले. विद्याला हळूच उतरवत त्याने तिच्यावर छत्री धरली. अगदी हळूहळू दोन पायऱ्या चढवत त्याने तिला. त्या वास्तूच्या ओट्यावर आणले.
ती कन्हून थकली होती. असह्य पिडेने तिला नकोस झालं होतं. तिथल्या बाकड्यावर ती कशीबशी बसली. संदिपने जोरजोरात दार वाजवले. दोन मिनिटांनी दारं उघडले. समोर एक वयस्कर अशी स्त्री होती. तिचे डोळे संदिपला प्रमाणाबाहेर मोठे वाटले.तिला पाहून तिथं थांबावं की जावं याचा त्याला निर्णय घेता येत नव्हता.
"काय झालं?" तिने निर्विकारपने विचारलं. तिचा आवाजही जरा खर्जातलाच वाटला. स्त्रीच्या मानाने जरा जास्तच.
"माझी पत्नी. तिला लेबर पेन सुरु झाल्या आहेत. तिला बघा प्लिज." तो म्हणाला.
"आणा तिला आत." असं म्हणून ती आत वळाली.
संदिपने विद्याला आधार देत उठवली. ती कन्हत कुंथत कशीबशी पावले टाकत त्याच्या सोबत आत आली.
ती नर्स आतल्या एका दाराशी उभी होती. हॉस्पिटल आतून नीट रंगवलेलं आणि व्यवस्थित दिसतं होतं.
"यांचा चेकअप करतील डॉक्टर. ते आत आहेत. तुम्हाला पाचच मिनिटात काय ते सांगतील. तोवर त्या खुर्चीत बसा." तिचं ते निर्वीकार चेहरा ठेवत मोठाल्या डोळ्यांची पापणीही न हलवता एकसारख्या नजरेने बघणं. संदिपला तसं जरा भितीदायक वाटलं खरं. पण अशा भागात कामं करुन ही माणसे अशीच भावनांशून्य झालेली असावीत अशी फसवी समजूत त्याने स्वतःला घातली.
तिने विद्याला हळूहळू चालवत आत नेले. पण आत जाताना तिने एकदाच संदिपकडे वळून पाहिले. परत मान पुढे नेत असताना ती संदिपची टिंगल करत असल्यासारखी हसली असे त्याला वाटले. शेवटी कशाने तरी भरून तयार केलेलं आणि नाटक वठवायला वापरलेलं ते अमानवी सोंग त्याचं कामं करुन गेलं.
संदिपने घड्याळाकडे पाहिले आठ वाजत आलेले. तो खुर्चीत रेलला. भयानक ताणाने त्याला मानसिक थकवा आलेला. विद्या आत होती. तिचा आता आवाज येत नव्हता म्हणजे ती ओके होती....डॉक्टर चांगलेच दिसतायत.... इथे आल्याचा फायदाच झाला म्हणायचा.... बरं झालं गाडी वळवली.... टेन्शन गेलं... आपणही थकलो आहोत.. जरा डोळे मिटून घेऊ.. थोडी झोप काढू... काय होणारे...ते सांगतील... ती म्हणाली की... ते सांगतील... जरा... वेळाने...
"कसं दिसतं बाळ बघायचं नाही का तुला.... ही ही ही... बघ की... हीहीही.... तूझं बाळ.... कसंय.... उठ... उठ उठून बघ... बघ.... " कानाशी कुणीतरी बोललं.
बराच वेळ झाला वाटतं आपण झोपलेलो...स्वतःशी म्हणत त्याने डोळे चोळत स्वतःला जागे केले. मघाचा उजेड क्षीण झाला होता. हवेत प्रचंड गारठा भरला होता. हॉस्पिटलचे दार सताड उघडे होते. एकच दिवा चर्चरत जळत होता. सारे अंग शेकडो डास चावल्यामुळे आग होऊन भडकलं होतं.
"नर्स.... नर्स.. डॉक्टर... डॉक्टर... विद्या... " त्याने हाका मारल्या पण कसलाच आवाज येत नव्हता. आजूबाजूला पाहिलं तर त्या हॉस्पिटलची दशा अत्यंत किळसवानी झालेली होती. तो बसला होता तो सडलेल्या लाकडाचा ओंडका होता. भिंती कळकटलेल्या. घाण वास मारत होता सगळीकडे...भीतीने तो गारठला.
"व... व... विद्या... विद्या.. विद्या.." उठून हाका मारत तो इकडे तिकडे बघू लागला.
"एक चिऊ आली.
बाळाला पाहून गेली.
एक पोपट आला.
पेलू देऊन गेला.
एक खाल आली
बोर देऊन गेली."
त्याला गाण्याचे बोल ऐकू येऊ लागले. तो आतल्या खोलीच्या दिशेने घाबरत घाबरत चालु लागला. त्याने दबकत दबकत आत डोकावले. जमिनीवर विवस्त्र अवस्थेत केसं मोकळे सोडून विद्या बसली होती. तिच्या हातात तिने एक अर्भक धरलं होतं. ते मळकं रक्ताळलेलं अर्भक तिच्याशी नाळेने अजूनही जोडलेलं होतं. तिचं फाडलेलं पोट आणि त्यातून वाहणार रक्त तिच्या शरीराला भिजवत होतं.
तो देखावा पाहून भीतीची एक भयंकर वीज त्याच्या मेंदूकडून पोटाकडे सररकन धावत गेली. त्याचे हात पाय गळाले. डोकं चक्रवलं भिंतीचा आधार घेत तो भेलकांडला. अचानक...
ती आणि बाळ त्याच्याकडे बघू लागले ते बाळ हसू लागले. ती ही हसू लागली.
"बाबा आले.. आपले बाबा आले..." दोघांचे डोळे पांढरे झाले होते. त्यात अशुभ चेतना होती. अमानवीय घटकांनी चालवलेलं त्या दोघांचं शरीर संदिपला खोट्या सुखाचं चित्र दाखवत खिजवत होतं.
तो पळण्यासाठी कष्ट करुन उठू पाहत होता. पण त्याचा शक्तिपात झाला होता. सर्व शरीर गळून गेलं होतं.
ती तशीच उठली. मुलाला कवेत धरलं होतं. तिची फाटल्या पोटाची जखम तिला आता दुखणं पोहोचवू शकत नव्हती.
"बरं का बाबा... आपला बाळ दुदु नाही हा पीत....खी खी खी... ते ना.. ते ना... लक्त पितं लक्त.. मी त्याच्यासाठी लक्त आणायला जाते... डॉक्टरांनी सांगितलंय... त्याला रक्त द्यायला... बघा बघा मी कसं मागणारे लक्त.." असं म्हणत तिने स्वतःच्या केसांना एका हाताने ओढत स्वतःचे डोके धडावरून वर उचलले. तळहातवर तिने स्वतःचे मुंडके आणि एका कवेत ते हिडीस बाळ घेत चालायला सुरुवात केली.
"रक्त द्या रक्त.. माझ्या बाळाला रक्त..." असं म्हणत ती खोली बाहेर निघून गेली.
संदिपची किंकाळी त्या इमारतीला भेदून असमंतात विरली.
त्याच्या डोळ्यात त्या धक्क्याने शून्य उतरला होता.
"ती गेली तिच्या वाटेने. आता तू जा तुझ्या वाटेने.. हीहीही.. " त्याच्या कानात काही खूसफुसलं.
👹👹👹👹
त्या घाटात आजही संध्याकाळी त्या वळणावर पडक्या वास्तूमध्ये मिनमिनता प्रकाश दिसला.... कोणी बाई बाळाला घेऊन बाटलीसोबत चालताना दिसली.... दाढी केसं वाढलेला एखादा इसम माझी बायको "त्या घरात अवघडल्या अवस्थेत पडलेली आहे." असं म्हणून मदत मागत असला.
थांबू नका...
नाहीतर, तुमच्या आयुष्यातही तमःकार घडेल. काळजी घ्या.... सावध रहा.
- शब्दभ्रमर