Dhukyataln chandan - 16 in Marathi Love Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | धुक्यातलं चांदणं ....... भाग १६

Featured Books
  • Operation Mirror - 4

    अभी तक आपने पढ़ा दोनों क्लोन में से असली कौन है पहचान मुश्कि...

  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

Categories
Share

धुक्यातलं चांदणं ....... भाग १६

रात्री पूजाने माथेरानची माहिती search केली, इंटरनेट वर. चार अनाथाश्रम होती तिथे. चारही ठिकाणाचे नाव आणि पत्ते लिहून घेतले तिने. सकाळीच निघाली पूजा. मजल-दरमजल करत पूजा पोहोचली माथेरानला. तेव्हा सकाळचे १० वाजले होते. माथेरानला उतरली आणि थंड हवा आली. अजूनही रस्त्यावर धुकं होतं. आभाळ भरलेलं,सोबत वाराही होता. कुंद वातावरण,मनाला हवंहवंसं वाटणारं. पूजा हरखून गेली. पहिल्यांदा आली होती ती इथे. विवेकचा विचार आला आणि ती भानावर आली. पहिला पत्ता काढला आणि विचारत विचारत ती पोहोचली तिथे. विवेकचा फोटो घेतला होता तिने मोबाईल मध्ये. त्या अनाथाश्रमात गेल्या गेल्या तिने, तिथे काम करणाऱ्या एका माणसाला विचारलं,
"याला पाहिलं आहे का तुम्ही इथे?", त्याने निरखून पाहिलं.
"विवेकसाहेब ना हे… ",पूजाला आनंद झाला.
"हा … हो, तुम्ही बघितलं का इथे त्याला,आता आहे का तो इथे?",
"आता नाही,पण हे साहेब येतात कधीतरी इकडे.शहरात राहतात ना हे." पूजा निराश झाली.
"हा… पण ते कूठे थांबतात ते आमच्या सरांना माहित आहे. ते सांगतील तुम्हाला." त्याने पूजाला ऑफिसमधे आणून सोडलं.
"excuse me sir… ",
"yes!!",
" सर, तुम्ही विवेकला ओळखता का?",फोटो दाखवत पूजाने विचारलं.
"हो… विवेकला लहान असल्यापासून ओळखतो मी.",
"तो इकडे होता का राहायला?",
"नाही. पण पुढे अजून एक असं आश्रम आहे तिथे होता तो. लहानपणापासून धडपड्या होता, शिवाय छान स्वभाव म्हणून तो सगळ्यांना आवडायचा. म्हणून त्याला ओळखतो मी. आणि आता तो तिथेच असेल कदाचित आताही.",
"Thanks sir" म्हणत पूजा बाहेर पडली.तिथला address तर होताच,त्यामुळे तिला जास्त वेळ नाही लागला शोधायला.


ती गेट जवळ आली आणि पावसाला सुरुवात झाली. पूजा आडोश्याला उभी राहिली. समोरचे द्रुश्य किती मनमोहक होतं. पाऊस रिमझिम पडत होता. अजूनही धुकं होतं. सूर्याची किरणं झाडांच्या पानांवर पडून चमकत होती. सकाळच होती ना ती, पक्षांची किलबिल सुरु होती.पूजा सर्वत्र नजर फिरवत होती. नजरेसमोरचा सर्व परिसर जणू सोन्याने न्हावून निघत होता,त्या कोवळ्या उन्हामध्ये. आणि एका कोपऱ्यात तिला विवेक उभा असलेला दिसला. हो… तो विवेकचं आहे. दीड महिन्यांनी त्याला पाहत होती ती. पाऊस जसा आला तसा लगेच गेला.विवेक तिथेच येत होता. पूजाकडे लक्ष गेलं तसा तो जागीच थांबला. पूजा पुढे झाली. विवेकची नजर गोठलेली तिच्यावर." विवेक… " पूजाने हाक मारली त्याला. फक्त जरासं उसन हसू त्याने चेहऱ्यावर आणलं. " कसा आहेस?","ठीक आहे. तू इथे कशी?", विवेकने विचारलं. इतक्यात तिथली लहान मुलं धावत आली आणि " विवेक दादा… विवेक दादा."करत त्याच्या भोवती जमा झाली. " तू सकाळी कूठे गेलास रे दादा… खेळायला नाही आलास…" एक लहान मुलगा रागात विवेकला बोलला. विवेक सगळ्यांना घेऊन आत आला. सोबत पूजा होतीच. विवेक त्याच्यासोबत खेळू लागला. पूजाला गंमत वाटली. तिलाही सामील करून घेतलं त्या मुलांनी खेळामध्ये. सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही पूजाला. छान दिवस गेला. विवेकसुद्धा भेटला होता. परंतु त्याच्यासोबत बोलणं झालचं नाही तिचं.


संध्याकाळ झाली तशी विवेक तिला सांगायला आला.
"आता जाऊ नकोस, रात्र झाली आहे. थांब इथेच. उद्या सकाळी निघ." विवेक जाऊ लागला तसा तिने त्याचा हात पकडला.
"थांब विवेक, मला बोलायचे आहे तुझाशी." विवेक थांबला, तिच्या नजरेत न पाहता बाहेर पाहत राहिला कूठेतरी.
" का आलास इथे… तेही न सांगता.",
"असचं… ",
"आणि एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस… माझ्यापासून, सुवर्णापासून.",
"तुला आईने पाठवलं वाटते इथे.",
" हो… आणि तिकडे कूठे पाहत आहेस… माझ्याकडे बघ ना…",
"नको…",
"का… ", विवेक बाजूला जाऊन उभा राहिला.
" माझी हिंमत होतं नाही,तुझ्या डोळ्यात पहायची.",
"असं काय केलं रे मी, कि सगळं सोडून आलास. ते सुद्धा तुझं कुटुंब होतं ना… मग… त्या सुवर्णाचा तरी विचार करायचा ना एकदा… " विवेक अजूनही बाहेर पाहत होता. खुप वेळानंतर बोलला,
" कसं असते ना पूजा… प्रत्येक वेळेस, आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतील असं नसते ना. शिवाय दुसऱ्यांचा खूप विचार केला मी, माझ्या मनाचा कोणी विचार नाही केला… कधीही." पूजा ते ऐकून गप्प झाली.


" अरे… पण सुवर्णाला तरी सांगायची होती ती गोष्ट. मी सोड, पण सुवर्णा…. ती तर तुझी एवढी best friend होती ना… मग.",
" ती खूप हळवी आहे माझ्यासाठी, तिला सांगितलं असतं आणि तीसुद्धा दूर झाली असती तर मी काय केलं असतं.आणि तिला आताही नाही कळलं पाहिजे हे. तुला माझी शप्पत आहे." पूजाला ऐकावचं लागलं.
" ठीक आहे मग, चल परत तिथे शहरात. तुझ्या त्या घरी… उद्या निघू आपण." विवेकने नकारार्थी मान हलवली.
" तिथलं वातावरण आता पहिल्यासारखं नाही राहिलं. जीव घुसमटतो माझा शहरात.",
" असं का बोलतोस तू… तुला घेऊन जायला आले मी.",
"का आलीस?",
" कारण माझं प्रेम…. " बोलता बोलता पूजा थांबली. विवेकने ऐकलं ते पण काही बोलला नाही.
" हे… प्रेम वगैरे काही नसते. काल्पनिक गोष्ट आहे ती.",
" मग ती मानसी, अजून का काळजी करते तुझी…सुवर्णा, तू गेल्यापासून रोज दादर स्टेशनला जाऊन उभी राहते,तुझ्यासाठी.…तू भेटावंसं म्हणून. मीही आले नसते मग इथे." विवेक काही बोलला नाही त्यावर.
" हि लहान मुलं… त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर.",
" या सगळ्याला प्रेम नाही म्हणत…. 'ओढ' असते ती मनाची फक्त,बाकी काही नाही. मानसीचं प्रेम असतं तर मला तिने खरी गोष्ट समजल्यावर सुद्धा एकट सोडलं नसतं. सुवर्णाचं प्रेम असतं तर तिने ते आधीचं सांगायला पाहिजे होते. आणि तुही…. मला अनोळखी बोलली नसतीस मग…. बरोबर ना. सगळं कसं छान असते आपल्या आयुष्यात. फक्त आपल्याला आपला "तारा" शोधायचा असतो. मुंबईत कूठे आभाळ clear असते. मग कसा दिसणार माझा तारा मला. काय ना…. मलाही सुखी व्हायचे आहे आता." पूजाच्या डोळ्यात पाणी आलं.


"प्रेम जर असतं ना, तर माझ्या आई-वडीलांनी मला असंच सोडून दिले नसतं ना. इथल्या ma'am नी सांगितलं,कि माझ्या आई-वडिलांनी मी एक वर्षाचा होतो तेव्हा इकडे आणून सोडलं. का ते माहित नाही. पुन्हा कधी आलेच नाही ते. लहानपणापासून मी माझ्या माणसांना शोधत आलो. कधी त्या आईत, मानसीमध्ये, कधी सुवर्णा नंतर तुझ्यात. प्रत्येकात गुंतत गेलो. हाती काय आलं माझ्या.",
"प्रेम…. प्रेम भेटलं ना तुला.",
"प्रेम नको होतं मला… माझी माणस पाहिजे होती मला. ती कधीच भेटली नाही मला. आईने माया लावली मला, तरी प्रत्येक वेळेस मला ' अनाथ' असल्याची जाणीव व्हायची. तुमच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. जाऊ दे, मी पण काय एवढ्या रात्रीचा बोलत राहिलो. तू आत जा. पाऊस सुरु होईल आता.",
"पावसात भिजला नाहीस सकाळी.",
"सोडून दिलं आहे आता. भीती वाटते पावसाची. त्या आठवणी नको वाटतात मला, पुन्हा." पूजाच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं.


" एखादी कविता ऐकवतोस…. खूप दिवस झाले ना, नवीन काही लिहिलंस कि नाही.",
"विचार येतंच नाहीत हल्ली डोक्यात,मग कसं लिहू." तेवढ्यात आतून विवेकच्या ma'am आल्या.
" अरे विवेक… चल जेवायला आणि तुझ्या मैत्रिणीला सुद्धा घेऊन ये.",
"ma'am हि आज इथेच राहणार आहे. हिची व्यवस्था होईल का?",
"हो ना… मी सांगते कोणाला तरी." विवेक आत जाण्यासाठी निघाला तसं पुन्हा पूजाने त्याचा हात पकडला,
"तुला उद्या माझ्या सोबतच निघावं लागेल. माझी शप्पत आहे तुला विवेक… ", विवेक त्यावर काही बोलला नाही.


पूजा रात्री विवेकचा विचार करत करत कधी झोपली ते कळलंचं नाही. सकाळी जाग आली तेव्हा ९ वाजले होते. लवकर लवकर तयार झाली पूजा आणि विवेकला शोधू लागली. भेटलाचं नाही तिला. त्या कालच्या ma'am दिसल्या तिला,
" ma'am…. विवेक कूठे आहे.…. कूठे पाहिलंत का त्याला?",
"हो… तो तर निघून गेला, कूठे ते माहित नाही.",
"मग तो किती वेळात परत येईल तो?",
"तुला कळलं नाही, मी काय बोलले ते. तो त्याचं सामान घेऊन निघून गेला.",
"काय ?",पूजाला काय बोलावं ते कळत नव्हतं.
" कधी गेला ? काही सांगून गेला का तो ?",
"पहाटे ५ वाजताच गेला आणि त्याने तुझ्यासाठी एक चिट्टी ठेवली आहे.",
"मग तुम्ही थांबवलं का नाही त्याला.",त्यावर त्या ma'am हसल्या,
"हि जागा त्याचीच आहे. इतर मुलंही मोठी झाली कि निघून जातात इथून. पुन्हा येतात कधी कधी भेटायला पण पाहुणे म्हणून. विवेक सुद्धा तसाच आलेला आणि आता गेला निघून. मी कशी थांबवणार कूणाला?" त्यांनी ती चिट्टी पूजाच्या हातात दिली आणि आत निघून गेल्या.


चिट्टी वाचायला सुरुवात केली तिने. "Hi पूजा… माफ कर मला. पुन्हा न सांगता जात आहे. पण आता कायमचा जात आहे. प्लीज… शोधायचा प्रयत्न करू नकोस. सुवर्णाला सांग,विवेक भेटलाच नाही म्हणून. माझासाठी तुला हे करावंच लागेल. खरी गोष्ट आहे कि मला प्रेम आणि मैत्री यातला फरक कधी कळलाच नाही. त्या दोन्ही गोष्टी माझ्या नशिबात नव्हत्या. मानसी तिचं आयुष्य जगत आहे, सुवर्णानेही तसच करावं. तुम्ही तुमचं आयुष्य माझ्यासाठी खराब करू नका. तस माझ्याजवळ काही नाही तुम्हाला द्यायला. Specially, सुवर्णाची काळजी घे. खूप केलं तिने माझ्यासाठी. मीच समजू शकलो नाही तुम्हाला. मनावर कंट्रोल आहे असं बोलायचो,नाही राहिला कधी कंट्रोल. लोकांनीही कधी समजून घेतलं नाही. दमलो आहे आता मी दुसऱ्यासाठी जगून,आता आराम करावा म्हणतो. मी सुद्धा खूप प्रयत्न केला,माणसं जोडायचा…. कधी जमलंच नाही मला. शिवाय इकडचं वातावरणही ढगाळ होऊ लागलं आहे. माझा तारा शोधायचा आहे ना मला. लहानपणापासून शोधतो आहे.… बघू… दुसरीकडे गेल्यावर माझं नशीब खुलते का ते. आणि हो… पावसात भिजणं सोडू नकोस,छान असतो तो पाऊस. भिजताना माझी आठवण काढू नकोस कधी, त्रास होतो आठवणी आल्या कि. चल, तुला 'येतो' असही म्हणू शकत नाही.कारण पुन्हा आपली भेट होईल असं वाटत नाही. निघतो मी आणि हो…. तू काल बोलत होतीस ना… कविता ऐकव एखादी….लिहिली आहे बघ. तू म्हणायचीच ना, कि मी सर्वात मोठी fan आहे तुझी. तुला कसं नाराज करीन मी. शेवटची कविता… तुझ्यासाठी… Bye पुजू… miss you always…


आजकाल……. आजकाल, पौर्णिमेला सुद्धा चंद्र पूर्ण दिसत नाही.
कदाचित मला बघून तोंड फिरवून घेत असेल.
मीही सांगतो मग त्याला, ठीक आहे रे. नको बघूस माझ्याकडे.
नाहीतरी तू काहीच नव्हताच "तिच्या" समोर पहिल्यापासून.


आजकाल……. आजकाल, मी मनाचं आणि मन माझं ऐकतंच नाही.
कदाचित तुझचं ऐकण्याची सवय झाली आहे त्याला,
मीही सांगतो मग त्याला, माझे ऐकत नाहीस ते ठीक आहे.
पण तुझा मनाचे तरी ऐकत जा कधीतरी.


आजकाल……. आजकाल,पाऊससुद्धा कोरडा कोरडाच असतो.
जणू काही, त्यातला ओलावा तुझ्यासोबतच निघून गेला.
मीही सांगतो मग पावसाला, उगाचच भरून येत जाऊ नकोस.
तू आलास, तर डोळ्यातल्या आभाळाच काय करायचं.


आजकाल……. आजकाल,कळ्या माझाशी बोलत नाहीत.
तुझ्या वळणावर गेल्या आहेत कदाचित.
मीही सांगतो मग त्यांना,फुलू नका कधीच,उमलू नका.
पुन्हा कोणी प्रेमात पडायला नको तुमच्या.


आजकाल……. आजकाल, उन्हात देखील सावली नसते सोबतीला.
कदाचित, तीसुद्धा वैतागली असेल माझ्यासोबत राहून.
मीही सांगतो मग तिला, तुला सांगणारच होतो निघून जा म्हणून.
एकट रहायची आता "सवय" करून घ्यायची आहे मला.


पूजा कविता वाचता वाचता बाहेर आली. डोळ्यात पाणी, काय केलं आपण ,एका मनमोकळ्या पाखराला. कूठे गेला असेल तो. सकाळचे ९ वाजले तरी अजून धुकं होते बाहेर. पावसाने हळूच सुरुवात केली होती. विवेकची आठवण झाली… पावसात हात पसरून भिजणारा विवेक आठवला तिला. खरंच, प्रेम नसते का…विवेक बोलायचा ते बरोबर, खरं प्रेम असंच असते, समोर असते तेव्हा दिसत नाही आणि जाणीव होते तेव्हा खूप दूर गेलेलं असते. आपला तारा आपल्या समोरच होता. त्याला ओळखूचं शकलो नाही आपण. खरंच, माझा तारा आता कायमचा दूर गेला माझ्यापासून…. त्या स्वप्नातल्या धुक्यात हरवून गेला… आता तो कधीच दिसणार नाही मला… पुन्हा एकदा धुक्यातलं चांदणं…..


........................................The End........................................