mayajaal -2 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | मायाजाल-- २

Featured Books
  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

  • The Risky Love - 25

    ... विवेक , मुझे बचाओ...."आखिर में इतना कहकर अदिति की आंखें...

Categories
Share

मायाजाल-- २

मायाजाल -- २

मायाजाल-- २
निमेशवर इंद्रजीतने चांगलीच छाप पाडली होती.
"आई! काय मस्त पर्सनॅलिटी आहे या इंद्रजीतची! मी ब-याच वेळा पाहिला होता त्याला! बरं झालं; ताईमुळे ओळख झाली! माझ्या मित्रांनाही तो खूप आवडतो! तो समोर आला; की सगळे बघत बसतात त्याच्याकडे! आता मला मित्रांकडे भाव खाता येईल! सगळे ओळख करून दे; म्हणून माझ्या मागे लागतील!---आणि तो इकडे आला, की माझ्या डिफिकल्टीजसुद्धा सोडवून घेता येतील! " तो डोळे मिचकावत म्हणाला.
" वर्गातला स्काॅलर तू! तुला कसल्या डिफिकल्टीज? उगाच त्याला त्रास देऊ नकोस!" आई म्हणाली.

"काय गं आई!---- तुला आतापासूनच त्याची काळजी वाटायला लागली!" त्याच्या या बोलण्याचा रोख ओळखून नीनाताई हसल्या. इंद्रजीतच्या डोळ्यातली प्रज्ञाविषयीची ओढ त्यांच्या अनुभवी नजरेने ओळखली होती. त्यामुळे त्याच्या वैभवशाली 'वेदांत ' बंगल्यात प्रज्ञाने गृहप्रवेश केला आहे; असं दृष्य आतापासूनच त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागलं होतं.
त्या दोघांच्या बॊलण्याकडे प्रज्ञाचं लक्ष नव्हतं. तिने पुस्तक उघडून रिव्हिजन करायला सुरूवात केली होती. तिच्या दृष्टीने आज विशेष काही घडलं नव्हतं असं वरकरणी वाटत होतं; पण तिची नजर पुस्तकाकडे असली; तरी मनात वेगळेच विचार चालले होते. तिला काही गोष्टी खटकत होत्या, " इंद्रजीत हर्षदचा इतका जवळचा मित्र आहे; तर तो त्याच्याविषयी कधी काही बोलला कसा नाही?" निदान मी जेव्हा मेडिकल काॅलेजला अॅडमिशन घेतली; तेव्हा तरी, ' त्याच मेडिकल काॅलेजला माझा मित्र इंद्रजीत आहे, तुला सिनिअर आहे' , एवढं तरी त्याने सांगायला हवं होतं. एरव्ही तर मला कोणतीही गोष्ट सांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. --- जाऊ दे! कदाचित् त्याला काॅलेजमध्ये लांब ---नवी मुंबईला जावं लागतं; त्यामुळे येऊन सांगायला वेळ मिळाला नसेल!--- तरीही तो कधी भेटला, की त्याला नक्कीच विचारेन!"
प्रज्ञा लहान होती; तेव्हा नीनाताई एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. प्रज्ञा दिवसभर हर्षदच्या घरी असे. माई आणि तात्या हर्षद एवढीच माया तिच्यावरही करत असत. तेव्हापासून दोन्ही घरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. हर्षदला ती तिचा चांगला मित्र मानत होती; पण त्याच्या मनात काय आहे, हे मात्र तिला माहीत नव्हतं; त्यामुळे अशा वागण्याचं तिला आश्चर्य वाटणं अगदी साहजिक होतं.
*******
इंद्रजीत गाडीजवळ आला; तेव्हा त्याच्याही मनात हेच विचार होते; हर्षद प्रज्ञाचा चांगला मित्र आहे असं ती म्हणते; पण मी जेव्हा "तिच्याशी माझी ओळख करून दे--" अशी विनंती त्याला केली, तेव्हा तो म्हणाला की; " माझी आणि तिची विशेष ओळख नाही!"
"तो खोटं का बोलला असेल? कधीतरी विचारायला हवं त्याला!" त्याचा चेहरा गंभीर होता. अजूनपर्यंत दोघांनी एकमेकांपासून काही लपवलं नव्हतं. काहीतरी चुकत होतं; हे नक्की.
त्याने घड्याळ पाहिलं.
" वेळ कधी गेला; कळलंसुद्धा नाही. खूप उशीर झालाय! आई काळजी करत असेल! लवकर घरी जायला हवं. "
असा विचार करत तो गाडीत बसणार- - तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने चमकून मागे पाहिलं ---- मागे हर्षद उभा होता.
" माझ्या घरी जाऊन आलास? सॉरी यार! पावसामुळे उशीर झाला घरी यायला! तू येणार होतास; तर फोन का नाही केलास? चल आता घरी चल परत!" हर्षद इतक्या दिवसांनी मित्राला पाहून खूश झाला होता.
" हर्षद! प्लीज आता नको! आता खूप उशीर झालाय! मी परत कधीतरी येईन! नाहीतर तू असं कर------ उद्या रविवार आहे, तूच सकाळी माझ्या घरी ये! मी वाट पाहतो." त्याची नजर चुकवत गाडीत बसताना इंद्रजीत म्हणाला.
गाडी चालवताना तो स्वतःला प्रश्न विचारत होता," मी प्रज्ञाकडे गेलो होतो ही गोष्ट हर्षदला सांगावी; असं मला का वाटलं नाही? अजून पर्यंत एकमेकांपासून आम्ही कधीच काही लपवत नव्हतो. बहुधा प्रज्ञाच्या बाबतीत तो माझ्याशी खोटं बोलला हेच कारण यामागे असावं. उद्या तो येईल तेव्हा त्याला सरळ विचारून घ्यावं लागेल. प्रज्ञाविषयी त्याच्या मनात काहीतरी अढी असावी; असं वाटतं."
***********
दुसऱ्या दिवशी सकाळीच हर्षद इंद्रजीतच्या ' वेदांत ' बंगल्यावर गेला, त्यावेळी इंद्रजीतचे आई-बाबा -- अविनाश आणि स्नेहलताई हॉल मध्ये चहा घेत होते. हर्षद ला पाहून स्नेहलताईंना खूप आनंद झाला. त्यांनी त्याचे हसून स्वागत केले.
” ये हर्षद! खूप दिवसांनी आलास! आम्हाला विसरलास कि काय? घरी सगळे ठीक आहेत ना? आईची तब्येत कशी आहे आता?" चहा आणि बिस्किटे त्याच्यासमोर ठेवत त्यांनी मनापासून चौकशी केली.
हर्षद आणि इंद्रजीतची शाळेपासून ची मैत्री होती. आणि एरव्ही घरात गंभीर असलेला आपला मुलगा त्याच्या बरोबर असताना मनापासून हसत - खेळत असतो हे त्यांना माहीत होतं. हल्ली कॉलेजमधली काही मुले घरी येत असत पण त्यांच्याबरोबर त्याची जवळीक काही मर्यादेपर्यंत होती. हर्षदशी त्याचं नातं वेगळं होतं. तो इंद्रजीतच्या बरोबर असला; की त्या निर्धास्त असत. तो इंद्रजीतकडे व्यवस्थित लक्ष ठेवेल याची त्यांना खात्री असे.
" तसं काही नाही आई. मी सध्या एम. बी. ए करतोय खूप अभ्यास असतो; शिवाय काॅलेज खूप लांब---- खारघरला आहे; त्यामुळे यायला वेळ मिळत नाही. जीतला जेव्हा वेळ असतो; तेव्हा तो घरी येतोच मला भेटायला! " चहा घाईघाईने संपवत हर्षद म्हणाला.
"इतक्या लांबचा प्रवास तू दररोज करतोस? अभ्यासाला वेळ कधी मिळतो?"
बाबांच्या आपुलकीने विचारलेल्या प्रश्नाला हर्षदने मान हलवत,
" हो- रात्री अभ्यास करतो!" एवढेच उत्तर दिले. अविनाशविषयी त्याच्या मनात आदरयुक्त भीती होती. त्यांचं व्यक्तिमत्वचा तसंच भारदस्त होतं; आणि कर्तृत्वही मोठं होतं!
" हर्षद! चल आपण गार्डन मध्ये जाऊन बसू. हल्ली मोकळ्या हवेत बसायला वेळच मिळत नाही." इंद्रजीत हर्षद चहा कधी संपतोय याची वाटच पाहत होता.
********
बंगल्याभोवती चारही बाजूंना प्रशस्त बगीचा होता. देश-विदेशातून आणलेली सुंदर झाडे तिथे होती. शिवाय गुलाब , मोगरा, जास्वंद अशा अनेक रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांनी सुशोभित केलेली होती. काल पाऊस पडून गेल्यामुळे हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा मन प्रसन्न करत होता. त्या फुलांची नक्षी केलेल्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर बाहेरून 'वेदांत' बंगला एखाद्या चित्रासारखा दिसत होता.
" खरंच! या सुंदर बंगल्यात राहणारा जीत किती नशीबवान आहे!" हर्षाच्या मनात विचार आला. त्याला त्याचा लहानसा फ्लॅट डोळ्यासमोर दिसत होता.वडिलांची सुमार नोकरी, घरची ओढगस्तीची परिस्थिती - - - त्या लहानशा फ्लॅटचे हप्ते फेडताना तात्या जेरीला आले होते; आणि त्यात तीन मुलांची शिक्षणं! माई आणि तात्या त्याचं शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला कधी लागतोय याचीच वाट पाहत होते.... तरीही मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं; या जिद्दीने त्यांनी हर्षदला आता एम. बी. ए. ला प्रवेश घेऊन दिला होता; पण तिथला पुढे लागणारा इतर खर्च करणं त्यांच्या आवाक्यातलं नाही, हे त्याला आता जाणवू लागलं होतं.
त्यामुळेच आजकाल हर्षदचं अभ्यासकडे विशेष लक्ष नव्हतं. पैशांसाठी त्याने वाईट संगत धरली होती. इंद्रजीतसाठी जरी तो एकुलता एक जवळचा मित्र होता; तरी त्याला मात्र हल्ली अनेक मित्र मिळाले होते. आणि हे त्याचे नवीन मित्र स्मगलिंग करणारे गुंड होते. त्यांना त्यांच्या कामात मदत करून तो हल्ली पैसे मिळवू लागला होता. आणि आता त्याला ते लोक इंद्रजीतपेक्षाही अधिक जवळचे वाटू लागले होते. हर्षदचा थेट बाॅसशी संबंध नव्हता. त्याला हवं तेव्हा तो हे काम सोडू शकत होता; असं त्याच्या मित्रांनी त्याला प्राॅमिस केलं होतं. त्याचं हे नवीन रूप अजून इंद्रजीतलाही कळलं नव्हतं तर त्याच्या माई - तात्यांना कसं कळणार? कॉलेज घरापासून दूर होतं आणि हे त्याचे नवीन मित्र त्याच्या कॉलेजच्या परिसरात राहणारे होते. इकडे आजूबाजूचे सर्वजण त्याला साधा - सरळ मुलगा समजत होते. आणि इंद्रजीत त्याला आपला जीवश्च-कंठश्च मित्र समजत होता.
*********** contd--- chapter III