Hoy, mich to apradhi - 1 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | होय, मीच तो अपराधी - 1

Featured Books
  • فطرت

    خزاں   خزاں میں مرجھائے ہوئے پھولوں کے کھلنے کی توقع نہ...

  • زندگی ایک کھلونا ہے

    زندگی ایک کھلونا ہے ایک لمحے میں ہنس کر روؤں گا نیکی کی راہ...

  • سدا بہار جشن

    میرے اپنے لوگ میرے وجود کی نشانی مانگتے ہیں۔ مجھ سے میری پرا...

  • دکھوں کی سرگوشیاں

        دکھوں کی سرگوشیاںتحریر  شے امین فون کے الارم کی کرخت اور...

  • نیا راگ

    والدین کا سایہ ہمیشہ بچوں کے ساتھ رہتا ہے۔ اس کی برکت سے زند...

Categories
Share

होय, मीच तो अपराधी - 1

(१) होय, मीच तो अपराधी!
न्यायालयाचे ते दालन खचाखच भरले होते. एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी त्यादिवशी होणार होती. उपस्थितांमध्ये तरुणाई आणि त्यातच मुलींची संख्या अधिक होती. तो खटलाही एका पीडित मुलीच्या संदर्भात होता. त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकास पकडून न्यायासनासमोर उभे करण्यात आले होते.
"होय, मायलॉर्ड, होय! या तरुणीवर मीच बलात्कार केलाय. माझ्या हातून घडलेल्या घोर अपराधाबद्दल मी शिक्षेस पात्र आहे. मला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. मला फाशीची शिक्षा द्यावी. मी ती शिक्षा आनंदाने भोगायला तयार आहे परंतु मी चूक केलीय असे मला वाटत नाही..." तो तरुण न्यायालयाच्यासमोर निर्धाराने म्हणाला. त्याचे बोल ऐकून उपस्थित सारे आश्चर्यात पडले. सरकारी वकील म्हणाले,
"ऑब्जेक्शन मायलॉर्ड, एकीकडे आरोपी गुन्ह्याची कबुली देतोय आणि त्याचवेळी चूक केली नाही असेही म्हणतोय..."
"थांबा, मायलॉर्ड, मला बोलू द्या. मी अपराध केलाय परंतु या.. या.. मुलीने मला तसे आव्हान केले होते..." तो मुलगा स्पष्टीकरण देत असताना त्याला थांबवून सरकारी वकील म्हणाले,
"हा काय प्रकार आहे? अजब आहे सारे. न्यायाधीशमहाराज, 'बलात्कारासाठी आव्हान? अर्थात माझ्यावर बलात्कार कर. असे आव्हान एखादी तरुणी देईल? देऊ शकेल? केवढा मोठा विरोधाभास आहे हा!' नवीनच ऐकतो मी. मला एक समजत नाही, अशी कोणती मुलगी असेल जी स्वतःवर बलात्कार करण्यासाठी एखाद्या तरुणास प्रवृत्त करेल? या या गुन्हेगाराने अगोदर मिस नलिनीवर बलात्कार तर केलाच आहे परंतु त्याने आत्ता केलेल्या विधानामुळे नलिनीसह समस्त स्त्री जातीचा अपमान केलाय. मी त्याच्या विधानाचा जाहीर निषेध करतो."
"शेम! शेम! निषेध असो. या नराधम राक्षसाला भर चौकात फाशी द्या. कायदा मजबूर नि आंधळा असेल तर या नीच माणसाला आमच्या हवाली करा. आम्ही..." न्यायालयात उपस्थित असणाऱ्या मुलींचा एक जत्था तावातावाने बोलत असताना त्यांना अडवून न्यायाधीश म्हणाले,
"ऑर्डर! ऑर्डर! असा गोंधळ घालून न्यायालयाच्या कामात अडथळे आणू नका. ज्या कुणास बोलावयाचे असेल त्याने रीतसर परवानगी घेऊन बोलावे. मिस्टर नरेश, तुम्हाला वकील..."
"नाही. मला तशी आवश्यकता नाही. मी केलेल्या अपराधापासून पळून जाण्याचा किंवा कायद्यातील त्रुटींचा, कायद्याच्या आंधळेपणाचा फायदा घेऊन सुटायचे नाही. मी केलेल्या गुन्ह्याची मला शिक्षा भोगायची आहे. थांबा. वकिलसाहेब, थांबा. महोदय, एक विनंती आहे, मी माझी बाजू स्पष्ट करीत असताना अडथळे नकोत. मी वकील नाही. सामान्य माणूस आहे. कुणी अडथळा आणला तर मी माझे मुद्दे मांडू शकणार नाही. माझ्या बयानावर कुणाला आक्षेप असेल तर ते त्यांनी माझे बोलून झाल्यावर घ्यावेत. मायलॉर्ड, आपणास किंवा वकिलांना माझ्या बोलण्यातून न्यायालयाचा वेळ वाया जातोय असे वाटण्याची शक्यता आहे परंतु माझे ऐकून घ्या. मी कधीच असा दावा करणार नाही की, मी बलात्कार केलेला नाही आणि माझ्या घोर अपराधाची मला कमीतकमी शिक्षा द्या अशी मागणी करणार नाही. मला फाशीच द्या पण..."
"एक मिनिट, मायलॉर्ड, थोडे माझेही ऐकून घ्या. आरोपी स्वतः फाशीची मागणी करतोय त्यामागे आरोपीचा अभ्यास आहे. महोदय, देशातील अनेक गुन्हेगारांना माहिती आहे की, महामहिम राष्ट्रपतींकडे दयेची भीक मागितली की, शिक्षा रद्द होते. तसेच जाहीर झालेल्या शिक्षेवर 'पुनर्विचार' या कलमाचा आधार घेऊन फाशी लांबणीवर टाकता येते. मान्यवर, हा तरुण बेकार आहे. ऐतखाऊ आहे. यानिमित्ताने काहीही काम न करता कायद्यातील तरतुदींचा फायदा घेऊन जास्तीत जास्त काळ तुरुंगात राहण्यासाठी फाशी मागतोय कारण इथे जर फाशीची शिक्षा ठोठावली तर उच्च, सर्वोच्च न्यायालयात जाता येते, महामहिम राष्ट्रपतींकडे दयेची याचना करता..."
"वकिलसाहेब, अगोदर माझे ऐकून तर घ्या." नरेश म्हणाला.
"ठीक आहे. तुला तुझे म्हणणे मांडण्याची परवानगी आहे. सरकारी वकिलांनी स्वतःचे आक्षेप नंतर नोंदवावेत."
"परंतु महोदय, गुन्हेगारास असे स्वातंत्र्य देणे योग्य आहे का? गुन्हेगाराने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. तेव्हा संपले सारे. न्यायालयास विनंती की, गुन्हेगाराचा कबुलीजबाब लक्षात घेऊन यास कठिणात कठीण शिक्षा..."
"फाशी! फाशीच द्या. याला नपुंसक बनवा. याचे लिंग कापून कापा..." मुलींच्या त्याच जत्थ्याने पुन्हा ठेका धरला.
"महोदय, आजच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार एका नेत्याने म्हटल्याप्रमाणे या नरेशला समलैंगिक संभोगाची सवय असणाऱ्या किंवा एड्स असलेल्या रोग्यांसोबत..."
"थांबा. न्यायालय असे घोषणाबाजीवर किंवा शेरेबाजींवर निर्णय देत नसते. आरोपीने गुन्हा कबूल केला असला तरीही आरोपीला त्याचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याने गुन्हा का केला ती पार्श्वभूमी कोर्टासमोर येणे गरजेचे आहे."
"मान्यवर, माफ करा. शेवटी गुन्हा तो गुन्हाच! पार्श्वभूमी कशीही असली तरी नलिनीवर याच नरेशने बलात्कार केला हे त्रिवार सत्य आहे."
"हे सत्य तो नाकारत नाही. शिक्षा देण्यापूर्वी सर्व गोष्टी कोर्टासमोर यायलाच पाहिजेत कारण सामान्यांसाठी जिथे सारे संपते तिथेच पोलीस आणि कोर्टाचे काम सुरू होते."
"मायलॉर्ड, मला एक समजत नाही, हे वेळकाढू धोरण कशासाठी? गुन्हेगाराला झुकते माप..." सरकारी वकील तावातावाने बोलत असताना त्यांना थांबवून मा. न्यायाधीश कठोर शब्दात म्हणाले,
"मिस्टर प्रॉसिक्युटर, आपण न्यायालयाचा अपमान करताय. थांबा. नरेश, तू म्हणालास की, नलिनीने तुला बलात्काराचे आव्हान..."
"महोदय, ते तसे शाब्दिक आव्हान नव्हते. महोदय, मी एक बेरोजगार तरुण आहे..."
"म्हणून 'हा' व्यवसाय निवडलास? मिस नलिनीकडून किती पैसे घेतलेस? तिच्यावर बलात्कार करण्यासाठी?" सरकारी वकीलांनी व्यंगात्मक बाण सोडला.
"मिस्टर प्रॉसिक्युटर, स्वतःवर आणि शब्दांवर ताबा ठेवा. जोशमध्ये येऊन होश घालवू नका. तुम्ही केवळ नरेशचाच नाही तर नलिनीसह अनेक पीडित तरुणींचा अपमान करीत आहात. तुम्ही असे कसे म्हणू शकता? काही पुरावा आहे तुमच्याकडे? येस नरेश, गो अहेड! परंतु केससंदर्भातच बोल. निरर्थक बोलू नको."
"थँक्यू सर. ही.. ही.. नलिनीच नाही तर अनेक तरुणी मलाच नाही तर समस्त पुरुषांना तसे आव्हान सातत्याने देत असतात... कृतीतून आणि पोशाखातून! होय! महोदय, होय! विचित्र वाटेल, चमत्कारिक वाटेल परंतु आजच्या मुलींचा पेहराव, त्यांचे वागणे-बोलणे, सार्वजनिक ठिकाणी हसणे- खिदळणे या गोष्टी माझ्यासारख्या तरुणाला केवळ उत्तेजितच करीत नाहीत तर तसे उघडउघड आव्हान करतात, प्रवृत्त करतात..."
"धिक्कार! धिक्कार!! या राक्षसाचे काही ऐकू नका. याला आत्ताच्या आत्ता फाशी द्या..."मुलींचा तो जत्था पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहून न्यायाधीश दरडावून म्हणाले,
"ही तुम्हाला शेवटची संधी आहे. यापुढे असा आरडाओरडा, घोषणाबाजी केली तर तुमच्यावर खटला भरल्या जाईल. तुम्हाला काही बोलायचे असल्यास तशी संधी मिळेल परंतु अगोदर ऐकून घ्या. यु मे प्रोसीड..."
"थँक्स! सर, ज्या तरुणी आपल्यासमोर माझा वारंवार धिक्कार, निषेध करीत आहेत त्यांच्याकडे पहा. वकिलसाहेब, उठू नका. महोदय, ह्यांची हेयरस्टाइल बघा, मेकअप बघा. दोन क्षण बघण्याचे धाडस तुम्ही करु शकाल? स्लीवलेस म्हणता म्हणता हाफ टॉपलेसचा जमाना आलाय. आपादवक्ष सारा पेहराव किती तंग आहे. शरीर झाकायचे की दाखवायचे असा प्रश्न पाहणारांना पडतो. वकिलसाहेब, विनंती आहे, थोडे ऐकून घ्या. तुम्हाला असेच म्हणायचे ना की, कुणी कसे राहावे? काय घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अधिकार आहे. बरोबर आहे. परंतु परिणामांचा विचार व्हायलाच हवा. सातत्याने घडणाऱ्या घटनांमध्ये पोशाख हे एकमेव कारण निश्चित नाही पण ते एक कारण नक्कीच आहे. एखाद्या बाबीमुळे समाजमन, समाजस्वास्थ्य जर बिघडत असेल तर मग त्या गोष्टी टाळणे हितावह नाही का? 'पुढच्याच ठेच लागली तर मागचा शहाणा होतो.' किंवा 'दुधाने तोंड पोळलेला ताकही फुंकून पितो...' पण आपल्याकडे असे होत नाही. अनेक ठिकाणी होणारे बलात्कार पोशाख आणि मोकळे वागणे यातून होत नसतील परंतु काही घटना मात्र निश्चितच या गोष्टींमुळे होतात. मुलं मुलींच्या पोशाखावर कॉमेंट्स करतात, त्यांच्या वागण्याचा गैरफायदा घेतात हे ठिकठिकाणी झालेल्या चर्चांमध्ये समोर आलंय तरीही या समस्येवर सकारात्मक तोडगा का निघत नाही? आणखी एक महोदय, जरा यांच्या पोशाखावर लिहिलेले शब्द, वाक्य वाचू शकाल? नलिनीच्या शरीरावर त्या दिवशी हाच पोशाख होता. बघा कसा आहे तो? त्यावर काय लिहिलंय... touch here... आजच्या प्रचलित भाषेत सांगायचे म्हणजे याहीपेक्षा सेक्सी किंवा द्विअर्थी शब्द पोशाखावर लिहिलेले असतात. पोशाख, राहणे, वागणे हे माझ्यासारख्या तारुण्यात पदार्पण केलेल्या तरुणांसाठी आव्हानात्मक नसतात? महोदय, रस्त्याने जाणाऱ्या दोन स्त्रीयांपैकी मुलगी कोण आणि आई कोण असा संभ्रम व्हावा असा त्या दोघींचा पोशाख आणि मेकअप असतो..."
"मायलॉर्ड, सॉरी! आरोपी न्यायालयाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतोय, चर्चा वेगळीकडे नेतोय." सरकारी वकील म्हणाले.
"मुळीच नाही. मी केलेल्या कृतीचा जसा देशभर निषेध झाला तसाच किंवा त्याहून कडक निषेध माझ्या या वक्तव्याचा होणार आहे. परंतु काही गोष्टी न्यायालयाच्या माध्यमातून जगासमोर यायलाच पाहिजेत..." नरेश बोलत असताना न्यायमूर्ती म्हणाले,
"न्यायालय जेवणाची सुट्टी घेत आहे. बरोबर एक तासाने कामकाज पुन्हा सुरू होईल."
०००
नागेश सू. शेवाळकर