Mayajaal - 32 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | मायाजाल -- ३२

Featured Books
  • ओ मेरे हमसफर - 12

    (रिया अपनी बहन प्रिया को उसका प्रेम—कुणाल—देने के लिए त्याग...

  • Chetak: The King's Shadow - 1

    अरावली की पहाड़ियों पर वह सुबह कुछ अलग थी। हलकी गुलाबी धूप ध...

  • त्रिशा... - 8

    "अच्छा????" मैनें उसे देखकर मुस्कुराते हुए कहा। "हां तो अब ब...

  • Kurbaan Hua - Chapter 42

    खोई हुई संजना और लवली के खयालसंजना के अचानक गायब हो जाने से...

  • श्री गुरु नानक देव जी - 7

    इस यात्रा का पहला पड़ाव उन्होंने सैदपुर, जिसे अब ऐमनाबाद कहा...

Categories
Share

मायाजाल -- ३२

मायाजाल-- ३२
प्रज्ञा सुन्न होऊन ऐकत होती. अनपेक्षितपणे इंद्रजीतचं सत्य स्वरूप तिच्या समोर येत होतं----
इंद्रजीतचा फोन स्पीकरवर होता; त्यामुळे सुजीतचं बोलणंही प्रज्ञाला स्पष्ट ऐकू येत होतं,
"पण तू सूझीशी फोनवर बोलणं का टाळतोस? इथे असताना तर रात्रंदिवस ती तुला आजूबाजूला लागते! गेली दोन वर्ष अगदी नवरा - बायकोप्रमाणे रहाता आहात तुम्ही दोघं! मला तर वाटलं होतं; की तू तिच्याशी लवकरच लग्न करशील!"
इंद्रजीत सुजीतला सांगू लागला,
"-होय रे! कबूल आहे! ती मला आवडते! गेली दोन वर्षे आम्ही रिलेशनमध्ये आहोत. मी तिथे आल्यापासून एकटेपणाची पोकळी तिनेच भरून काढली आहे! ती खूप चांगली आहे---- सगळं मान्य; पण तिला मी लग्नाचं प्राॅमिस कधीच दिलं नव्हतं!" इंद्रजीत बोलत होता. जीतचं खरं चारित्र्य आज अचानक् प्रज्ञासमोर उलगडत होतं.
"जीतने जर नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे; तर त्याने मला प्रपोज का केलं?" प्रज्ञाला त्याच्या वागण्याचा अर्थ कळत नव्हता.
ती त्यांचं संभाषण ऐकू लागली. इंद्रजीत मित्राला सांगत होता,
"मी तुला प्रज्ञाविषयी सांगितलं होतं; तुला माहीत आहे की मी तिच्यासाठीच मुंबईला आलोय; मी तिकडे येताना तिच्याशी ठरलेलं लग्न मोडून आलो होतो--- खूप रागावली होती माझ्यावर! तिला मी कसं समजावलं; माझं मलाच माहीत! पण आज ती माझं प्रपोजल स्वीकारण्याच्या मूडमध्ये होती; आणि त्याच वेळी सूझीचा फोन आला!
"पण तू सूझीच्या इतका जवळ आला आहेस; तर प्रज्ञाला प्रपोज का केलंस?" सुजीतने विचारलं. प्रज्ञालाही हाच प्रश्न पडला होता--- ती इंद्रजीत काय उत्तर देतोय; ते ऐकू लागली,
------ हो ! तुझं बरोबर आहे! सूझीही चांगली मुलगी आहे;, सुंदर आहे; पण ती साधी नर्स आहे; प्रज्ञा हुशार डाॅक्टर आहे. अत्यंत देखणी आहे--- माझ्यासारख्या सर्जनला स्टेटसप्रमाणे पत्नी म्हणून सूझीपेक्षा तीच जास्त योग्य आहे. --" जीत तराजूने मोलभाव केल्याप्रमाणे बोलत होता.
" मग तू सूझीला आशेवर का ठेवतोयस? तिला खरं सांगून का टाकत नाहीस?" सुजीत सरळमार्गी माणूस वाटत होता.
"---नाही तिला इतक्यात काही सांगायचं नाही . कारण प्रज्ञाचं एम डी पूर्ण होईपर्यंत -- आमचं लग्न होऊ शकणार नाही. तोपर्यंत मी सूझीला काही सांगणार नाही--- मी अामचे रिलेशन्स चालू ठेवणार आहे. म्हणूनच आता ती इकडे येता कामा नये! आधीच प्रज्ञाला समजावण्यासाठी मला सगळी हुशारी पणाला लावावी लागली! ती 'हो' म्हणाली; तर मला बहुतेक इथे रहाण्याचा कालावधी वाढवावा लागेल! तिचे वडील सहजासहजी आमच्या लग्नाला परवानगी देतील; असं मला वाटत नाही. त्यामुळे तिच्याशी निदान एंगेजमेंट होईपर्यंत मी तिकडे येणार नाही. कारण आता मला रिस्क घ्यायची नाही! त्या काळात मला शोधत सूझी भारतात आली; किंवा तिने कोणत्याही मार्गाने आई- बाबांशी संपर्क साधला, तर माझा सगळाच प्लॅन बिघडेल. ते मला प्रज्ञाशी लग्न करू देणार नाहीत; उलट सूझीशीच लगेच माझं लग्न लावून देतील! माझे बाबा किती कडक स्वभावाचे आहेत; तुला माहीतच आहे--- " स्वतःला त्यागमूर्ती म्हणवून घेणारा इंद्रजीत किती खालच्या पातळीवर गेला होता; ते त्याच्या बोलण्यातल्या सहजतेवरून कळत होतं.
" तू हे बरोबर करत नाहीस! सूझीला जर हे सगळं कळलं; तर ती काय करू शकते---- विचार केलायस?" सुजीत इंद्रजीतला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होता.
इंद्रजीत त्याला समजावू लागला,
" त्याची काळजी तू करूस ! पुढच्या वर्षी प्रज्ञाशी लग्न झाल्यावर काहीतरी कारण देऊन तिला समजावेन; आता फक्त तिला सांग की , मी लवकरच तिकडे येणार आहे. एकसारखे फोन करू नकोस! काँन्फरन्स चालू असताना सगळे डिस्टर्ब होतात. ------ हो! तिला काँन्फरन्सचं कारण सांगून इकडे आलोय. हर्षदच्या लग्नाविषयी काही सांगितलं नाही---तुझ्यावर विश्वास आहे तिचा! ती ऐकेल तुझं! ----- नंतर सगळं सांभाळून कसं घ्यायचं; हे मला चांगलंच माहीत आहे.! " जीतचा आत्मविश्वास त्याच्या प्रत्येक शब्दात डोकावत होता.
"एवढी फसवणूक करून कसं समजावणार तू तिला? ती एवढी मूर्ख आहे का?" सुजीत इंद्रजीतवर चिडला होता.
पण इंद्रजीत मोठ्याने हसला, आणि म्हणाला,
"कसं समजावणार? तू मला इतका जवळून ओळखतोस तरी असं विचारतोस? जेव्हा हर्षदने मला मारायला गुंड पाठवले होते; अाणि त्याला पोलिसांनी पकडलं होतं; तेव्हा त्याला खडी फोडायला पाठवावं असं मला मनापासून वाटत होतं; पण त्यावेळी मी लंडन युनिव्हर्सिटीमध्ये पुढच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होतो. जर भारतात कोर्ट कचे-यांमध्ये अडकून पडलो असतो; तर लंडनचा प्लॅन बारगळला असता; म्हणून त्याला माफ करून टाकलं! हे मी हर्षदच्या आई-वडीलांसाठी करतोय असं सागितलं; तेव्हा प्रज्ञाला माझा किती अभिमान वाटला होता! तिच्यासारख्या बाळबोध संस्कारात वाढलेल्या मुलीला मानवता-- त्याग--- प्रेम -- या गोष्टींची अपूर्वाई असते; हे मला चांगलंच माहीत होतं. हे गूण दाखवूनच तिला मी आपलंसं केलं होतं!"
हर्षदच्या बोलण्यातला दंभ प्रज्ञाचा संताप वाढवत होता. सुजीतने त्याला थांबवून विचारलं,
"इतकं सगळं करून; नंतर लग्न का मोडलंस?"
इंद्रजीत आता मात्र थोडा गंभीर झाला, आणि म्हणाला,
"नंतर हर्षदचा त्रास खूपच वाढला; त्याने चारी बाजूंनी मला कोंडीत पकडलं होतं! शेवटी कंटाळून तिकडे निघून आलो! मी त्याचा फोनही घेत नव्हतो! तू म्हणालास; की लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी त्यानं फोन केलाय; म्हणून बोललो त्याच्याशी! नाही तरी माझं मन प्रज्ञा आणि सूझीची सतत तुलना करत होतं--- प्रज्ञा आता सहजपणे माझी होऊ शकते; हे लक्षात आलं; आणि मी त्याचं लग्न अॅटेंड करायचं ठरवलं! "आपल्या प्रेमासाठी एक कुटुंब उध्वस्त झालेलं मला आवडलं नसतं; " --- असं प्रज्ञाला तिची माफी मागताना सांगितलं--- " मित्रासाठी त्याग केला" असं सांगून माझ्या सगळ्या चुका माफ करायला तिला भाग पाडलं; अरे या मुली खूप भावनाप्रधान असतात. ----- हो! अगदी लंडनची गोरी मुलगीही या नियमाला अपवाद नाही. सूझीलाही सांगेन, की आई - बाबांचं मन राखण्यासाठी प्रज्ञाशी लग्न करावं लागलं! मला खात्री आहे; तिचा माझ्याविषयीचा आदर जराही कमी होणार नाही! उलट वाढेल! पुढे काय करायचं; ते तीच ठरवेल. ती तयार असेल; तर संबंध असेच रहातील; नाहीतर ब्रेक - अप होईल ! मला काहीच फरक पडत नाही!" -.इंद्रजीत त्याला समजावत होता.
इंद्रजीतच्या फुशारक्या ऐकून प्रज्ञाच्या अंगाचा तिळपापड होत होता. पण दुसरीकडे ; त्याचा खरा वेळेवर स्वभाव समजला; आणि अशा माणसाबरोबर लग्नबंधनात अडकण्यापासून सुदैवाने सुटलो; याचा आनंदही होत होता.
पुढचं संभाषण तिच्या कानावर पडत होतं---
सुजीतला त्याचे विचार पटत नव्हते--
" अशा त-हेने माणसांना फसवण्यात तुला नेहमीच यश मिळेल असं नाही. फजिल आत्मविश्वास एक दिवस तुला नक्कीच भोवणार आहे!" सुजीत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
"तू माझा जवळचा मित्र आहेस म्हणून मी तुला ह्या गोष्टी सांगितल्या. माझ्या स्वभावातला हा पैलू फक्त हर्षद माझा बालमित्र आहे म्हणून त्याला माहीत आहे! पण त्याने कितीही सांगितलं तरीही प्रज्ञा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही; याची मला खात्री आहे. तुला मी अनेक वेळा मदत करतो. तुझी प्रॅक्टिस तितकीशी चांगली चालत नाही. तुला मदत तर केलीच पाहिजे! यापुढेही करत राहीन! पण माझ्यासाठी एवढं कर! सूझीला चार गोष्टी सांग." इंद्रजीतच्या आवाजात आता सुजीतसाठी धमकी होती. त्याला दिलेल्या पैशांचा मोबदला इंद्रजीत अशात-हेने वसूल करत होता. आणि नाइलाजास्तव त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणं सुजीतला भाग होतं.
प्रज्ञाला आठवलं; हर्षद अनेक वेळा इंद्रजीतच्या स्वभावाविषयी तिच्याशी बोलला होता; पण तिला त्याच्यावर विश्वास ठेवावा असं वाटलं नव्हतं.
इंद्रजीतचं मनुष्यस्वभावाचं निरीक्षण जबरदस्त होतं.
आणखी काही ऐकायची गरज तिला वाटली नाही. ती तिथून निघाली.
बाबांचे शब्द प्रज्ञाला आठवत होते, " बाळा! माणसाचा स्वभाव कधीचम बदलत नाही! इंद्रजीत विश्वासपात्र नाही! तुला परत दुःखी झालेलं मी पाहू शकणार नाही! विचारपूर्वक निर्णय घे!"
बाबांचे अनुभवाचे बोल खरे ठरले होते. तो इतके दिवस लंडनला कसा राहिला असेल; याविषयी जराही संशय कधी तिच्या मनात आला नव्हता. नकळत तिने त्याच्यावर परत एकदा पूर्ण विश्वास ठेवला होता!
एखाद्या उंच कड्यावरून तोल जाऊन खाली पडताना जणू एक अज्ञात शक्तीने तिला सावरलं होत; .. जीतचं खरं रूप योग्यवेळी तिच्यासमोर आलं होतं.
ड्रेसवर पडलेले डाग धुवायला ती आली होती; हे सुद्धा ती विसरली होती.आता तिला लवकरात लवकर हाॅटेलमधून बाहेर पडायचं होतं! तिला टेबलजवळ बघून वेटर कोल्ड काॅफी घेऊन आला.
"मॅडम! तुमच्या ड्रेसवरचे डाग तसेच आहेत! इथल्या नळाला पाणी नसेल; तर आत जाऊन धुवून या!"
"असू देत! काही हरकत नाही!" तिला खराब झालेल्या ड्रेसकडे पाहून हसताना बघून वेटरला आश्चर्य वाटत होते.
प्रज्ञा मनात म्हणत होती,
" हे डाग चालतील!आयुष्याला मोठा डाग लागणार होता; पण ---- वाचले!"
ती मनाशी आश्चर्य करत होती; की तिला झाल्या गोष्टीचे जराही दु:ख होत नव्हतं. उलट. इंद्रजीतच्या चक्रव्यूहातून ती आज सहीसलामत बाहेर पडली होती; याचा आनंद तिला जास्त होत होता.
ती वेटरला म्हणाली " मला लगेच इथून निघावं लागतंया! काॅफी प्यायला मला वेळ नाही! साहेब आले की त्यांना सांग! "
तिचा मोबाइल वाजू लागला. हाॅस्पिटलमधून फोन होता.
" मॅडम, एक अर्जंट केस आलीय! डिलिव्हरीचे दिवस भरत आलेले असताना एक बाई जिन्यावरून पडली. तिला लेबर पेन चालू झाल्यायत! तिची कंडीशन क्रिटिकल वाटतेय! मी मोठ्या डाॅक्टरना फोन लावलाय पण त्यांना यायला थोडा वेळ लागेल असं म्हणतायत! तुम्ही लगेच येऊ शकाल का?" नर्स मीनाक्षी बोलत होती.
"मी हाॅस्पिटलपासून जवळच आहे! लगेच येते! तू काळजी करू नकोस!" प्रज्ञा म्हणाली.
खराब झालेल्या ड्रेसवर तिला हाॅस्पिटलमध्ये जावं लागत होतं; पण हरकत नाही. त्या स्त्रीला आणि तिच्या बाळाला वाचवणं महत्वाचं होतं.
टेबलापाशी बसून तिने टिश्यू पेपरवर नोट लिहिली, --- 'गुड बाय! मला परत भेटण्याचा प्रयत्न करू नकोस."
न रहावून तिने खाली एक वाक्य जोडलं,
" लंडनची सूझी असो; किंवा भारतातली प्रज्ञा --- भावना आणि सुख- दुःख सगळीकडे सारखीच असतात! दुस-यांच्या संवेदनांचा आदर करायला शीक!---तरच आयुष्यात सुखी होशील! "
त्या नोटवर इंद्रजीतने दिलेलं गुलाबाचं फूल ठेवलं; आणि तिथून ती वेगाने बाहेर पडली.
प्रज्ञा स्वतःलाच हसत होती,
गरिबांविषयी मनात करुणा असणारा मोठ्या मनाचा जीत----देवमाणूस ---- तिच्यावर उत्कट प्रेम करणारा जीत -- मित्रासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करायला तयार झालेला जीत, ---- त्याने निर्माण केलेल्या ह्या सगळ्या शाब्दिक मायाजालात ती गेली अनेक वर्षे गुरफटली होती. तिनं प्रेम केलं होतं, त्याच्या दिलदार स्वभावावर! तो लग्न मोडून निघून गेला; पण त्याच्या जागी दुस-या कोणाचा विचार तिच्या मनात कधी आला नाही; कारण त्याच्या तथाकथित महान चारित्र्यापुढे इतर सगळे तिला खुजे वाटत होते. त्याने कितीही दुःख दिलं असलं; तरीही त्याचं प्रेम खरं आहे; या विश्वासाने ती आज सर्व काही विसरायला तयार झाली होती. तिने इतका विश्वास ठेवला होता; तोही कोणावर?
आज तिच्या मनावरचं इंद्रजीतच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचं ओझं उतरलं होतं. तिच्या मनाचा गाभरा रिता झाला होता! इंद्रजीतने तिच्या भोवती उभ्या केलेल्या मायाजालातून ती आज ख-या अर्थाने मुक्त झाली होती.
********** END