Aren't women working? in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | स्रिया काम करीत नाहीत काय?

Featured Books
Categories
Share

स्रिया काम करीत नाहीत काय?

स्रियांची कामं ; आम्ही खरंच दयावान आहोत का?   


     स्री...... स्रियांचा आजचा काळ पाहिल्यास आपल्याला दिसतं की आजची स्री घरी बरीच कामं करते. ती सकाळी उठते व उठल्याबरोबर सडा सारवण करते. त्यानंतर मुलांची सकाळी शाळा असेल तर त्यांच्या शाळेची तयारी करुन देते. त्यामध्ये मुलांची अंघोळ, त्यांची केशसज्जा, त्यांना कपडे घालून देणे, त्यांना नाश्ता करवणे व सोबत आपलं मुल शाळेत उपाशी राहू नये यासाठी त्याला जेवनाचा डबा देणे. इत्यादी कामं करते. मुल शाळेत गेलं की ती दात घासते. त्यानंतर अंघोळ करुन पुन्हा ती स्वयंपाक करते. ती जेव्हा स्वयंपाकाला बसते. तेव्हा तिचा पती उठलेला असतो व त्याचं दातवन झालेलं असतं. तेव्हा ती लगेच त्याच्या पुढ्यात चहा ठेवते व पुन्हा घरात जावून स्वयंपाक तयार करते. हे करीत असतांना त्यादरम्यान ती आपल्या पतीच्या अंघोळीसाठी पाणीही चाकते व ते पाणी स्नानगृहात नेवून देते. साधी निकर आणि बनियान सुद्धा काही काही घरातील पती घेत नाहीत. तेही देते. त्यासोबत टॉवेलही. लगेच पतीची अंघोळ झाली की त्यांच्यासमोर जेवनाचा ताट देते. त्यातच ती स्वतःही जेवन घेते. त्यानंतर ती पतीचा डबा तयार करुन त्यांना बांधून देते. आपलाही डबा बांधते व कामाला जाते. सायंकाळी घरी येताच पुन्हा ती तीच कामं करते. फक्त अंघोळ आणि सडा सारवण सोडलं तर.           महिलांची कामं. केवळ सडा सारवण करणं एवढीच नाहीत तर त्यासोबत भांडे घासणे, कपडे धुणे, फरशी पुसणे, झाडांना पाणी देणे. वरुन कामाला जाणे. त्यातच मुलांच्या शाळेची तयारी करणे. त्यांचा अभ्यासही घेणे. ही कामं करीत असतांना नाकी नव येत असतं आणि अशी कामं करुन तिला आपल्या पतीची नेहमी वटवट ऐकावी लागते. कधीकधी आपली ननद, सासू सासरे, भासरे वा दिर यांचीही ग्राऱ्हाणी ऐकावी लागतात. मग विचार येतो. विचार येतो की काय हे आयुष्य! इश्वरानं स्रियांना यासाठीच जन्माला घातलं की काय? अशा किळसवाण्या वातावरणात आजची स्री जगत असते. काही काही घरातील लोकं समजदार असतात. ते आपल्या पत्नींना कामात मदत करतात. कधीकधी तेच आपल्या पत्नींची कामं करीत असतात. त्यांनाही कळतं की आपल्या पत्नीला किती त्रास होतो ते. परंतु काही काही घरचे पती हे आपल्या पत्नींचे कामाच्या बाबींतून रक्तच पिण्याचे काम करतात. जसे ते ढेकुणच लागले.           स्रियांच्या कामाबाबतीतील शहराची स्थिती थोडीशी बरी आहे. शहरात पती पत्नी दोघंही कामाला जातात व दोघंही घरची कामं करीत असतात. पत्नी जर स्वयंपाक बनवीत असेल तर पती कांदे, मिरचे वा भाजीपाला कापून देतो. पत्नी जर भाजीपाला कापत असेल तर पती स्वयंपाक बनवतो. त्याचं कारण असतं, त्यांच्याजवळ मायबाप नसणं. शहरात बऱ्याचशा घरी म्हातारी मंडळी व ननद, दिर नसतात. बऱ्याचशा घरी सासु सासरे हे वृद्धाश्रमातच असतात. त्यातच पत्नी नोकरी करीत असल्यानं, तिला कवेत छेवू की डोक्यावर ठेवू. असं शहरातील तरुणांना वाटत असतं. तसं पाहिल्यास मायबापाच्या सेवेचे संस्कार आजुबाजूला पाहून तुटलेलेच असतात. ते पती पत्नी शिकलेले असतात. औपचालीक शिक्षण अर्थात चाकोरीबद्ध शिक्षण हे उच्चप्रतीचे घेतलेले असते. परंतु संस्कारी शिक्षण त्यांना बालपणापासून मिळालेले नसते. ही स्थिती ग्रामीण भागात नसते. ग्रामीण भागातील स्रियांना कामाचा ताण जास्त असतो.           ग्रामीण भागातील स्रियांवर संस्कार असतो. सासू सासरे हे वृद्धाश्रमात नसतात. कारण तसे सासूसासरे वृद्धाश्रमात ठेवल्यास समाज त्यांना दुषणे देत असतो. कधीकधी गावातील माणसं मुलांनी असं केल्यावर त्यांना वाळीत टाकत असतात. ज्यातून गावातील मुलं आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत नाहीत. ते घरीच ठेवतात. मात्र काम करतांना त्यांच्या पत्नीची सतत तारांबळ उडत असते. कारण गावात  संस्कार असतात की पतीनं काम न करणे. पतीला गावात परमेश्वराचा दर्जा असतो. जो शहरात नसतो. त्यामुळं पतीची सेवा म्हणजे इश्वरसेवा असं मानलं जातं. विशेष म्हणजे महिला ही शहरातील असो की ग्रामीण. महिलांना दुय्यमच दर्जा असतो. तीच जास्त काम करते. घरी आणि कार्यालयातही. तरीही तिचा छळच होत असतो. तिला घरी आणि कार्यालयातही जास्तच राबवलं जातं. राबवतो कोण? तर तोच पुरातन विचारांचा पुरुषसत्ताक समाज. तेच ते पुरुषसत्ताक विचार. जे कधीच बदलणारे नाहीत. आता लोकं म्हणतील की आम्ही महिलांना कामात मदत करतो. परंतु मदत करणं वेगळं आणि कामं करणं वेगळी. आपण महिलांना अर्धांगीणी समजतो ना. मग कामंही अर्धीच करावी ना. परंतु आपण आपलं वागणं मनात एक व ओठावर एक ठेवत आपण तिची गळचेपी करतो. कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास स्वतः सुख भोगतो आणि तिला दुःख देतो. आपण ऐतभाऊ भुमिका ठेवतो व तिला कामाला जुंपतो. वरुन जगात आपल्यासारखा दयावान कोणी नाही असा कांगावा करतो. परंतु हे आपले वागणे बरोबर नाही. आपण खरं तर स्रियांची दया घेतलीच पाहिजे. आपण दयावान असलेच पाहिजे. गोष्टी सांगण्थाऐवजी घरची अर्धी कामं केलीच पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं स्री सुखी होईल व तिचाही खऱ्या अर्थानं सन्मान झाला असं मानता येईल हे तेवढंच खरं.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०