चित्रांगद नावाचा एक कोवळा तरुण कोण्या एका गावी राहत होता. त्यांचे आईवडील वारल्यानंतर त्यांच्या भावाने व वहिनीने त्याला घराबाहेर काढले.तो भटकत एका गावी येऊन राहिला.जवळ असलेल्या थोड्या पैशातून त्याने व्यापार सुरू केला.त्याची सचोटी आणि चलाखी यामुळे लवकरच तो प्रसिद्ध व्यापारी बनला.श्रीमंत झाला.त्याची जहाजे व्यापारासाठी परदेशी जाऊ लागली.लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरत होती.त्याच लग्न झाल.यथाअवकाश त्याला तीन मुलगे झाले व त्यांची लग्ने झाली. आता तो व्यापारासाठी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देऊन लागला.अनेक राजे त्यांचे मित्र झाले होते.असच एका प्रवासा दरम्यान तो एका विस्तीर्ण माळावर आला.इथ ना झाड होतं ना पेड होत.दूददूर पसरलेली मोकळी जमीन दिसत होती.त्याला ही जागा आवडली.त्याने ठरवलं इथे गाव वसवायचा.आपण त्या गावचे राजे व्हायचे.त्याने असंख्य कामगार कामाला लावले.बघता - बघता रस्ते तयार झाले.छोटी घरे बांधली गेली.एक छानदार वाडा त्याने स्वतः साठी बांधला.चौकात प्रकाशासाठी दिवे व झुंबरे बसवली.मुलांसाठी बागा व क्रीडांगणे तयार केली. नगरी आता छान दिसत होती.पण त्यांच्या लक्षात आले की गावाला पाणी पूरवठा करण्यासाठी एक मोठं तळं बांधाव लागेल. त्या तळ्याला पाट काढून पाणी सगळीकडेपोहोचवता येईल. बांधकामासाठी लागणारे पाणी त्याला बाजूच्या जंगलात असलेल्या नदीतून बैलगाड्या तून आणावं लागलं होतं. मग गावाच्या पूर्वेला एक तळं खोदायला सुरूवात झाली.लांब रूंद व दोन पुरुष उंचीच तळ तयार झालंपण तळ्याला पाणी काही लागेना.बैलगाड्यातून मोठी पिंपे भरून पाणी आणून तळ्यात ओतल पण पाणी टिकेना.ओतल्या ओतल्या ते नाहीस व्हायला लागलं.कोणी म्हणाला इथं होम करावा लागेल...कोणी म्हणालं इथं भूतबाधा आहे.मंत्र...तंत्र...कराव लागेल.बळी द्यावा लागेल.अखेर चित्रांगदाने तळ्यात एक होम केला. त्याच सार कुटुंब त्यावेळी हजर होते. होम संपतो न संपतो तोच होमकुंडातून एक पारदर्शक आकृती डोकावली.सार्यांनी हात जोडले.ती आकृती चित्रांगदाकडे पाहून म्हणाली." बोल काय म्हणणं आहे तूझे?"" आपण कोण आहात ते प्रथम सांगा."" मी तळं आहे."" पण इथं पाणी का लागत नाही व टिकतही का नाही?"ती आकृती भिषण हसत म्हणाली...." भल्या माणसा काही दिल्याशिवाय काही मिळत नाही. मला तूझ्या कुटुंबातला एक व्यक्ती दे मग तूला पाणी मिळेल.हा प्रदेश फुला फळांनी...धन धान्यांचे भरून जाईल. बोल तूझी बायको तू मला देतोस?"चित्रांगद त्वरित म्हणाला..." नको. माझा सगळा संसार तिच सांभाळते.ती नसेल तर संसार कोण सांभाळेल?"" मग मोठा मुलगा?"" नको.माझा व्यापार कोण सांभाळेल?"" तूझी मोठी सून? ती होईल का तयार?"" नको.ती स्वयंपाक करते.ती नसेल तर सर्वांना जेऊ कोण घालेल?"" असं आहे तर, मग मधला मुलगा ? तो होईल बलिदानाला तयार?" तळ्याने विचारले." तो तर सारी शेतीवाडी बघतो. तो नसेल तर शेती कोण करेल?" चित्रांगदाने नकार दिला." मग धाकटा मुलगा? आता नाही म्हणू नकोस."" सगळ्या गाई गुरांना तो सांभाळतो.चरायला नेतो. त्याला नको."आता चित्रांगदाच्या कुटुंबातील दोनच माणसं उरली होती एक तो स्वतः तर दुसरी सर्वात लहान सून. सुवर्णा नाव तिचं... सोन्यासारखी गोरीपान...सुंदर व निरागस.आता सारेच तिच्याकडे बघत होते." आता एक तर तू स्वतः बलिदान दे नाहीतर तूझ्या धाकट्या सूनेला विचार?" तळं उसासा टाकत म्हणाले." तिला काय विचारायचे? तिलाच घेऊन टाक!" सारे एक सूरात म्हणाले." हो ती देईल बलिदान .माझी संमती आहे. मला अजून राजा बनायचे आहे." चित्रांगद म्हणाला.सुवर्णा गुपचुप समोर आली. हात जोडून उभी राहिली.जमलेले कामगार व इतर लोक मनात हळूहळु लागले. बिचारी निष्पाप सुकुमार मुलगी बळी जाणार म्हणून त्यांना वाईट वाटले." मुली, तू धाडसी आहेस.पण मी तूला काही दिवस देतो.तू माहेरी जा.सर्वांना भेटून ये.तूझ्या ऐवजी जर तूझ्या माहेरचा कोणी व्यक्ती तयार झाला तरीही मला चालेल.येत्या पौर्णिमेला चंद्र माथ्यावर आला की या तळ्यात याच जागी बलिदानाला तयार असलेल्या व्यक्तीने उभे राहायचे.पाण्याने तळे भरून जाईल.पण ती व्यक्ती माझ्या उदरी नाहीशी होईल."तळं खदाखदा हसत म्हणाले.ती पारदर्शक आकृती पुन्हा होमकुंडात नाहीशी झाली. आता पौर्णिमेला अजून आठ दिवस होते. सुवर्णा माहेरच्या दिशेने निघाली तिच्या सोबत कुणीही नव्हते.तीन दिवस रस्ता तुडवत ...जंगल नद्या पार करत ती माहेरी पोचली.तिला पाहून सगळे खुष झाले.तिने सारी हकीकत माहेरी सांगितली.सर्व हळहळले. म्हणाले सासरसाठी बलिदान देतेस वाया जाणार नाही.तिने आपल्या बापाला विचारले.." आबा, तुम्ही माझ्या ऐवजी बलिदान द्याल?"" दिल असतं.पण अजून तूझ्या भावाच- बहिणीच लग्न करायचं आहे."सुवर्णाने आईला विचारले..." अगं ,नातवाच तोंड बघितल्या शिवाय मला कसा मोक्ष मिळेल?"मग तिने भावाला व बहिणीला विचारले पण दोघांनीही तशीच उत्तरे दिली.सुवर्णाला वाईट वाटले नाही.नाहितरी आपल्या देहाचा काय उपयोग आहे. माझ्या बलिदानाने एक गाव उभा राहिल. सुजलाम सुफलाम बनेल. ती दोन दिवस माहेरी राहिली.लहानपणीच्या आठवणी जागवल्या.हसून खेळून राहिली.पुन्हा तिन दिवस रस्ता तुडवत ती पौर्णिमेला रात्री तळ्याकाठी आली.सारे तिथे जमले होते.ढोल तासे वाजत होते.पुरोहित मंत्र म्हणत होते.मध्यरात्र होत आली होती.तिने एकवार आपल्या पत्नीकडे पाहिले पण त्याच लक्षच नव्हते.कुणीतरी तिच्या गळ्यात पुष्पहार घातला.तिने सर्वांना वंदन केले.व सावकाश चालत तळ्याच्या मध्यभागी गेली.सारे श्वास रोखून पाहत होते. तिने हात जोडले व डोळे मिटून गप्प उभी राहिली.अचानक तळ्यातून पाणी पाझरू लागल.सार्यानी जल्लोष केला. हळुहळु तळ्यात पाण्याचे कारंजे उसळू लागले.सुवर्णाचे पाय पाण्याने भिजले.पावल पाण्याखाली गेली.कारंजे वाढू लागले पाणी तिच्या गुडघ्यापर्यंत आले.बघता बघता पाणी तिच्या कमरेपर्यंत आले.तळ बर्यापैकी भरल.आता पाण्याचे कारंजे मोठ्या फव्वार्या सारखे उडत होते.बघता - बघता पाणी खांद्यापर्यंत पोहचले. सारे स्तब्ध उभे होते.पाणी हनुवटीवर आले.तिच तोंड पाण्याखाली गेले.नंतर काही क्षणातच सुवर्णा दिसेनाशी झाली.तळ्याकाठी असलेल्या सार्या लोकांनी आपले डोळे मिटले. काही क्षणांनी त्यांनी डोळे उघडले तेव्हा सारे तळे पाण्याने भरून गेले होते. ...बाजूच्या पाटांतून पाणी वाहत होते.गार वारा सुटला होता.सारे सुवर्णाला विसरले. धुंद होऊन नाचू- गाऊ लागले. अगदी त्याच वेळी तळ्यातून सुंदर संगीत ऐकू येवू लागले.त्यातून एक तेजःपुंज दैवी पुरुष बाहेर आला.त्याच्या हातात सुवर्णा होती." ऐका, मी या भूमीचा...तळ्याचा रक्षक यक्ष अग्निधर...या मुलीने आपल्या बलिदानाने मला प्रसन्न करून घेतले.मी तुम्हा सर्वांची परीक्षा घेत होतो.पण या परीक्षेत ही मुलगी यशस्वी झाली.यापुढे या गावाची व परीसराची ती राणी असेल तिच्या आज्ञेनुसार तुम्ही सारे वागणार आहात.चुकलात तर मी कठोर शिक्षा देईन"त्या यक्षाने सुवर्णाला भूमीवर ठेवले.आता ती अधिक सुंदर व तेजस्वी दिसत होती." मुली, तू आता राणी आहेस.सगळ्यांशी न्यायाने वाग.उतू नको..मातू नकोस.मी सदैव तूझ्या सोबत आहेस.लक्षात ठेव या जगात कुणी कुणाचं नसतं तुला ते अनुभवाने कळलेच आहे. कष्टाने व त्यागाने सुखाचा मळा फुलतो सुखी राहा."असं म्हणून तो यक्ष पुन्हा तळ्यात नाहिसा झाला.तुम्ही आम्ही सारे असेच सुखी राहूया.------***----*****-----***-----***-----समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे सावंतवाडी