That in the mind... and the Kurukshetra in the heart? in Marathi Love Stories by Jayesh Farde books and stories PDF | मनातली ती... आणि काळजातलं कुरुक्षेत्र?

Featured Books
Categories
Share

मनातली ती... आणि काळजातलं कुरुक्षेत्र?

🔅

1."पहिली उन्हाळी आठवण "

त्या वर्षी मी अकरा वर्षांचा होतो.
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या, आणि
घरात एक वेगळीच उत्सुकता पसरली होती.
आत्या आली होती घरी - तिच्या चेहऱ्यावरच्या
मायेच्या रेषांमध्ये काहीतरी खास होतं.
ती म्हणाली, "आपल्या गावाला चल, दोन-चार
दिवस मज्जा कर."
गेलो...
त्या छोट्या प्रवासात मला काहीच कल्पना नव्हती की, आयुष्यभराच्या आठवणी मागे लागणार आहेत.

गावात पाऊल टाकलं, आणि काही काळानंतर एक दृश्य मनात कोरलं गेलं.

ती... वृषाली.

तीही अकरा वर्षांचीच. 
सरळ केस, साधासा फ्रॉक, आणि नजरेत निरागसपणाचं गूढ काहितरी.
ती काही बोलली नाही, पण तिचं ते पाहिलं हास्य... ते हसणं नव्हतं, ते काहीतरी खोल होतं - जणू माझ्याशी ओळख जुनीच होती.
त्या एका क्षणात काहीतरी बदलून गेलं.

ती फक्त एक नाव नव्हती,
वृषाली - हे नाव माझ्या मनाच्या आत खोल कुठेतरी शिरलं...
आणि तिथून बाहेर आलंच नाही...

2."नावासारखं अस्तित्व"

त्या उन्हाळ्यानंतर सगळं पुन्हा सुरु झालं... 
शाळा, वही, पुस्तकं, खेळ - सगळं तसंच होत, पण काहीतरी आता बदलेलं होतं.
मनाच्या एका कोपऱ्यात ती - वृषाली - कायमची जागा घेऊन बसली होती.

त्या दिवसांनंतर ती दिसली नाही...
ना तिचा आवाज ऐकला, ना नाव घेणार कुणी भेटलं...
पण तरीही, 'प्रेम' हा शब्द जरी कुणी उच्चारला, तरी मनात मात्र पहिलं तिचंच चित्र आणि तिचंच नाव उमटल.

हे प्रेम होतं का ? की फक्त एक वेडसर ओढ ?

माहीत नाही...
कारण ती माझ्याशी काहीच बोलली नव्हती....
ती काय करते, कुठे आहे, जगतेय की हरवलीये...
काहीच माहिती नव्हतं.
फक्त तिचा तो चेहरा, आणि तिचं हसणं-जणू काळाच्या गारठलेल्या आरशावर कोरून ठेवलं होतं.

पाच वर्षे झाली...
या काळात अनेक चेहरे आले, काही हसले, काही ओळखीचे झाले...
काहींमध्ये क्षणभर आकर्षणही वाटलं - पण ते टिकत नव्हतं.
त्या आठवणीसारखं काही कुणात नव्हतं.

माझं मन त्या जुन्या उन्हाळ्यात अडकून बसलं होतं...
आणि आयुष्य मात्र पुढे चालू होतं.

कधी - कधी वाटायचं -
एक क्षण का होईना, पुन्हा तिला पाहायला मिळावं... 
फक्त तिच्या डोळ्यात पाहून स्वतः ला विचारावं-
"तू खरचं इतकी महत्वाची होतीस का, की फक्त वेळ थांबून गेलीस ?"

3."चंद्र, वारा आणि तिची चाहूल "

वय वाढत होतं... 
शब्द 'प्रेम' या वयात कदाचित अजून थोड गूढ झालं होतं, 
पण ती - ''वृषाली" - ही संकल्पना मात्र दिवसेंदिवस स्पष्ट होत चालली होती.

ती कुठे आहे, हे माहित नव्हतं, 
तिचं आयुष्य कसं चाललंय, तेही अनभिज्ञच... 
पण मनात मात्र ती प्रत्येक क्षणी जागी होती - जिवंत...
रात्रंदिवस तिचाच विचार... 
आणि काही वेळेस, स्वतःच्या श्वासालाही तिच्या अस्तित्वाचा गंध वाटावा इतकी खोलवर पोहोचली होती ती.

कधी संध्याकाळी वाऱ्याची एखादी मंद झुळूक चेहऱ्यावरून गेली, 
की वाटायचं - जणू तीच ओलावलेली नजाकत माझ्या गालांवरून फिरली.

रात्री चंद्राकडे पाहिलं की, त्याच्या प्रकाशात तिचं ते पहिल हसू आठवायचं... 
ते हसू - जे फक्त एकदाच पाहिलं होतं, पण मनावर कायमचं कोरलं गेलं होतं.

वसंत ऋतू यायचा, 
फुलं उमलायची, पाने डोलायची...
आणि मला वाटायचं जणू निसर्ग नव्हे तर माझचं मन तिच्या आठवणींनी बहरतंय.

आणि मग... 
जसं काही त्या परमेश्वरानं माझं मौन ऐकलं, कुणास ठाऊक काय घडलं - योगायोग म्हणावा की नियतीचा खेळ -
पण एक दिवस, अचानक तिचा मोबाईल नंबर माझ्याकडे आला. 

हातात मोबाईल होता, 
धडधडणारं हृदय होतं... 
पण त्या क्षणी सर्वात जास्त होती तीच्याशी बोलण्याची भीती.
कारण त्या एका मोबाईल नंबरमध्ये लपलेल होतं माझं अनेक वर्षाचं मौन...

4."29 एप्रिल 2019"

खूप दिवस झाले होते...
मोबाईलमध्ये तिचा नंबर होता, पण मनात धडधड आणि विचारांचा गोंधळ.

काय बोलू? कुठून सुरुवात करू? 
ती ओळखेल का? की तिला आठवणसुद्धा नसेल?

या सगळ्या प्रश्नांमध्ये दिवस निघून जात होते... 
पण मग... 29 एप्रिल 2019.

संध्याकाळच्या पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी मन थांबलं.
सगळं सुन्न झालं होतं... डोक, हृदय, वेळ -
सगळं जणू एकाच क्षणात थांबलं.

हात थरथरत होते, श्वास खोल-खोल जात होता. 
आणि शेवटी... 'Whatsapp' वर एक शब्द लिहिला -
"Hii"

तेवढंच.
कारण पुढे काय लिहावं, हे माहित नव्हतं. जेव्हा मनात हजारो भावना असतात, तेव्हा शब्दच हरवतात.

हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते... 
डोळे स्क्रिनकडे खिळले होते.

आणि मग अचानक रिप्लाय आला -
"kon"

त्या एका शब्दाने सगळं थंड पडलं.
जसं अंगावर पाणी शिंपडावं, किंवा एखादया स्वप्नातून जाग येते - तसं.

काही उमगलं नाही... डोकं पाटी सारख कोरंड.

त्या भावनांच्या भरात मी काय-काय मेसेज करत गेलो...
मला आजही नीट आठवत नाही.

ते अश्रुंमध्ये लिहिलेलं होतं की आत्म्याच्या विवशतेतून - माहित नाही. 
पण ते सगळं वाचून वाटलं, मी अश्वथामासारखा आहे - पित्याच्या मृत्यूनंतर सुन्न झालेला, निःशब्द...
पण ज्याचं दुःख त्यालाच स्पष्ट नाही.

कदाचीत मी मुर्खासारखा वागलो...
पण खरं सांगायचं, त्या क्षणी मी 'विषम' नव्हतो, मी फक्त 'भावना' होतो.

***

तिने रिप्लाय केला होता "kon"
माझं हृदय धडधडत होतं... पण मी त्या क्षणी भावना विसरूण शब्दांमध्ये गुरफटलो.

मी बोलत राहिलो.....
जे काही इतकी वर्ष मनात साचलं होतं, ते एकदम ओतून टाकलं -
कदाचित योग्य वेळ नव्हती... कदाचित योग्य पद्धत नव्हती...

आणि मग, काही वेळाने...
मी ब्लॉक झालो.

काही आवाज झाला नाही, 
ना काही स्पष्ट सांगितलं गेलं... 
फक्त एक शांत, थंड notification - "You Can't Send messages to this account anymore"

तेवढचं.

त्या क्षणी, काळजावर घाव बसल्यासारखं वाटलं.
ना ओरडता आलं, ना रडता आलं...
मन अस्वस्थ झालं आणि विचार सुन्न...

"First impression is a last impression"
हे पूर्वी कुणीतरी सांगितलं होतं...
पण आज ते मनावर रेषा ओढून गेलं.

मी काय करायला आलो होतो ? 
एक साधा "Hii" पाठवायला...
पण झालं काय ?
तिने मला कायमचा "Goodbye" दिला.

त्या क्षणी मी स्वतःशीच भांडत बसलो...
"काय गरज होती ? "
"थांबायचं होतं ना अजून थोडं ?"
"पाहायला हवी होती वेळ, तिची मनःस्थिती, तिचं वास्तव..."
पण काहीच करता आलं नाही.

शिल्लक उरलं ते फक्त पश्चाताप.

5."जवळ, असूनही अनंत दूर "

त्या "Hii" नंतरच मौन अजूनही मनात तसंच घुमत होतं. त्या ब्लॉकच्या प्रसंगाने आत खोलवर काहीतरी तुटलं होतं...
आणि मग एक दिवस -
अंदाजे, 18 किंवा 19 मे, 
क्षण आला, जेव्हा ती समोर होती... प्रत्यक्ष.

मी तिच्या अगदी शेजारी होतो,
फक्त काही पावलं लांब... पण मनाच्या अंतराने मात्र प्रकाशवर्ष दूर.

ती काळ्या पंजाबी ड्रेसमध्ये उभी होती -
तीच ती... वृषाली 
पण आता तिच्या चेहऱ्यावर ओळखीची माया नव्हती, होता फक्त एक अनोळखी राग... 
एक थंड, जळजळीत इर्षा -
जणू तिची नजरच माझ्या हृदयाला चिरत होती.

मी स्तब्ध होतो. 
काहिही बोलू शकलो नाही. 
ना ती बोलली... ना मी.

तिच्या डोळ्यांत राग होता का दुःख - हे आजही समजलेलं नाही. पण एक गोष्ट ठाम जाणवली -
मी तीच्या नजरेतून कोसळलो होतो... पूर्णपणे.

त्या काही क्षणांत मनात जे साचलं होतं, ते शब्द बनू शकलं नाही. ते फक्त एक गाठोडं बनून उराशी घट्ट आवळून मी तसाच तिथून निघालो.. 
पुन्हा काही बोलता न आलं, 
पुन्हा काही साधता न आलं...

आजही, डोळे मिटले की ती दिसते -
त्या काळ्या पंजाबी ड्रेसमध्ये, शब्दाशिवाय, पण हजारो प्रश्न घेऊन...

6."पुन्हा प्रयत्न, पुन्हा तोच मार्ग"

दिवस मागे जात होते... 
तसा मी तिच्या आठवणींमध्ये अजून खोल जात होतो. चुकलेल्या वाटा सुधारण्याचा प्रयत्न सुरू होता -
मनात एकच विचार..."परत बोलायला हवं, काहीतरी स्पष्ट करायला हवं"

आणि म्हणूनच... 
दुसऱ्या अकांऊटवरून पुन्हा एकदा मेसेज केला.
थोडा भीतीचा थर, थोडी आशेची पालवी... आणि मग तिचा रिप्लाय आला -
एक वाक्य, जे अजूनही हृदयाच्या कोपऱ्यात साठून आहे...

"तू ज्या व्हाट्सअँपवर मेसेज करतोस, तो घरातील सर्वच वापरतात... पण तुझा मेसेज आला, की तो मोबाईल हमखास माझ्याच हातात असतो... Lucky आहेस."

त्या एका ओळीत मला सगळं मिळालं होतं. 
तीच लक्ष, तीची कबुली, आणि निसर्गाचं ते अदृश्य धागं... 
ज्याने आपल्याला पून्हा जोडून ठेवलं होतं.

मी किती वेळा तिच्या मनातून गेला असेन, ती किती वेळा माझ्यावर रागवली असेल... 
कदाचित मी कित्येक वेळा तिच्या ब्लॉकलिस्ट मध्ये गेलो असेन...

पण दरवेळी...
मी तोंड वर केलं, आणि तिच्याच मागे धावत राहिलो.
ते प्रेम नव्हतं कदाचित...
ते काहितरी जास्त होतं - एक प्रकारचं शरणागतपण,
जिथं स्वाभिमान संपतो आणि फक्त तिची आठवण उरते.

कधी वाटायचं, का करतोय मी हे सगळं? 
पण मग तिच्या त्या एका वाक्याने सगळं उत्तर मिळायचं...
"Lucky आहेस..."
हो... खरचं होतो का मी?

7."उत्तरं हवी होती, पण शब्द काटेरी होते "

आजवरच्या आयुष्यात, जर एखादं वाक्य मनाच्या गाभ्यात रुतून बसलं असेल, तर तेच होते -
"Lucky आहेस..."

त्या एका ओळीवर जगायला तयार होतो मी... 
पण जस क्षणभर गोड स्वप्न पडतं, तसचं झालं -
क्षणभरचं स्वप्न ... आणि मग त्याचा क्रूर भंग.

त्या नंतर येणारा प्रत्येक मेसेज मनात एक भयंकर हलकल्लोळ माजवत होता...
"जास्त शहाणा आहेस काय"
"तुला समजत नाही का?"
"मला मेसेज करू नकोस"
"मी तशी मुलगी नाहीये"
"आता मेसेज केला तर घरच्यांना सांगेल"
"खुप डेंजर अहित घरचे..."
वगैरे...

प्रत्येक रिप्लाय, जणू हृदयाच्या भिंतींवर घाव करणारा शब्दबाण होता.
प्रेमाच्या नाजूक धाग्यावर आता फक्त अविश्वास, भिती आणि क्रोध लटकत होता.

काय चूक झाली होती खरचं?

ती एकच ओळ -
"Lucky आहेस..."
आणि त्यानंतरचे आलेले भयाण संदेश - 
माझ्या भावविश्वाला उलथवून टाकणारे...

प्रेम असं असतं का?
की फक्त मिच प्रेम करतोय, आणि समोरच्याच्या दृष्टिकोनात मी एक त्रासदायक आठवण बनून राहिलोय?

कधी तिच्या शब्दांत राग होता, 
कधी घरच्यांची भिती,
कधी फक्त 'माझी गरजच नाही' - असं स्पष्ट नाकारणं...

पण मी?
मी त्या एका वाक्याभोवतीच जग उभ केल होतं.
"Lucky आहेस..."
ती ओळ आजही आठवली की डोळ्यांच्या कडा
ओळावतात.

काय खरंच होतो मी "Lucky?"
की तेही नशीबच एक आशावादी वाक्य होतं.

8."तिच्या जगात सामावून जाण्याचा प्रयल "

घडलेल्या असंख्य चुका... 
कधी घाईनं, कधी अज्ञानातून...
कधी प्रेमाच्या अतिरेकातून...

पण आता त्या सगळ्यांची भरपाई करायची होती, तिच्या नजरेत स्वतःचं स्थान पुन्हा शोधायच होतं...

आणि म्हणून घेतला निर्णय -
ती ज्या कॉलेजमध्ये शिकते, तिथेच प्रवेश घ्यायचा.

हा निर्णय मनाचा नव्हता... 
तो तर जणू आत्म्याचा होता.

तिच्या विश्वात, तिच्या हवेत, तिच्या जागेत... 
कदाचित अशी जवळकीच. 
तिचं मन पुन्हा वळवेलं, असं वाटत होतं.

कॉलेजमध्ये तिचं अस्तित्व जसं हवेत मिसळलेलं होतं...
तसंच मी दररोज तीच्या सावलीमागे फिरत होतो.

कधी ती वर्गात दिसायची, 
मी फक्त दुरून पाहायचो. एक कटाक्ष जरी मिळाला, तरी दिवस समाधानात जायचा.

कधी धाडस करून परत एखादा मेसेज करायचो... 
कधी जुने क्षण आठवून काही शब्द टाकायचो...

पण प्रत्येक वेळी उत्तर मिळायचं नाही. 
कधी वाचूनही रिप्लाय नाही, कधी थेट ब्लॉक...

प्रेम काहीसं जसं हळुवार पावसात उगम पावलेलं होतं, 
तसंच आता निर्जिव वाळवंटात तग धरून होते.

माझ्या दृष्टिने कॉलेज 'शिकण्यासाठी 'नव्हतं, ते फक्त तिच्या 'संपर्कासाठी' होतं.
शिक्षण बाजूला पडलं होतं. उरला होता फक्त एक ध्यास - वृषाली.

ती मात्र... तिच्या वळयात होती - 
मी होतो तिथंच, 
पण तिच्या आयुष्यात... नव्हतोच.

9."हिरवा निसर्ग आणि जळालेला रान"

वृषाली...
ज्याच्या नजरेस ती पडेल, तो तिच्या प्रेमात न पडावा, असं होणंच शक्य नव्हतं. 
ती सुंदर होती. नजाकत होती. तिच्या बोलण्यात सुद्धा एक गित दडलं होतं.

आणि मी?

मी चेहऱ्यानं साधा होतो, कुरूपही कदाचित...
आणि आर्थिक परिस्थितीही ढासळलेली.

ती होती हिरवा निसर्ग -
जिथं प्रत्येक झाड, प्रत्येक फुलं आपल स्थान मिरवत होता.
आणि मी होतो - 
एक वणव्यात जलाळेला,
काळं- खाख झालेलं रान.

जगाच्या नजरेत आमचं काहीच जुळत नव्हतं.
पण हृदयाच्या नजरेतर मी तिला मिळवायचं स्वप्न पाहत होतो.

पण...
कधीतरी सत्याची जाणीव फार खोलवर टोचून जाते.
आणि त्या जाणीवेच्या क्षणी, मन एका अंधाऱ्या वाटेवर वळलं.

"धूम्रपान... आणि सोमरस..."
कदाचीत जगाला वाटलं मी सवयींसाठी करतोय...
पण खरं तर मी स्वतःला झाकण्यासाग करत होतो.

स्वतःचा आवाज थांबवण्यासाठी...
तिचं नाव ऐकू येऊ नये म्हणून...
ती दिसू नये म्हणून...
ती आठवू नये म्हणून...

प्रेमाचं ते निर्मळ स्वप्न, 
काळ्या धुरात विरून गेलं.

आणि त्या दिवसापासून, 
मी वृषालीला मिळविण्यासाठी नव्हे, तर स्वतःलाच हरविण्यासाठी जगू लागलो.

10."निरोपाचा दिवस आणि न संपणारा वाद"

वृषालीला दूरून पाहण्यातच माझे दिवस सरत गेले. ती माझ्या आयुष्यातील एक सुंदर स्वप्न होती. जिचं अस्तित्व फक्त नजरेत आणि मनात होतं.

निरोप समारंभाचा दिवस उजाडला, 
जो माझ्याचा प्रयत्नांनी घडवून आणला. 
काही बोललो सर्वांसमोर, पण मनातलं खूप काही अनकथित राहिलं.

वृषाली तुझ्याशी शेवटचं बोलायचं होतं -
"फक्त सॉरी म्हणायच होतं,
झालेल्या प्रत्येक चुकीसाठी,
माझ्यामुळे निर्माण झालेल्या प्रत्येक दुःखासाठी

पण घडलं मात्र अनपेक्षितचं.

तुझं फक्त नाव उच्चारलं - "वृषाली" -
आणि तुझ्या मैत्रीणीच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द माझ्या मस्तिष्कापर्यंत पोहोचला.
मी माझं पूर्ण भान विसरून गेलो. 
आणि प्रतिउत्तर देऊ लागलो त्या प्रत्येक शब्दाला, जो माझ्या विरोधात होता.

आपल्या वादादरम्यान तू एक वाक्य उच्चारलीस -
"संबंध आणि तुझ्याशी"
याच एका वाक्याची आठवण आजही काळोख्या भयान रात्री हृदय तोडून टाकते.

असं काय मिळवायच होतं मला, ज्यासाठी मी एवढा अट्टहास केला? 
काय करून बसलो मी, त्या व्यक्तिच्या बाबतीत, जिच्यावर मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम केलं?

एक चूक सुधरविण्यासाठी असंख्य चुका केल्या, ही कुठली आलीये बुद्धिमत्ता?

11."शांततेपलीकडचं वादळ "

रात्र होती... 
सगळं घर निवांत जेवायला बसल होतं. 
तसचं मीही...

पण त्याच वेळेस एक फोन आला- तिच्या घरून.

त्या क्षणाने सगळं बदललं. 
घरात शांतता पसरलि...
ती भयान शांतता...
जी श्वासही घ्यायला परवानगी देत नव्हती.

एकीकडे तिच्या प्रेमात हरल्याचं दुःख आणि दुसरीकडे घरच्यांच्या नजरेत पडल्याची घृणास्पद सल -
या दोघांत पिळवटून मी अर्धा मेलो होतो.

या पेक्षा वाईट काही असू शकत का ?

त्या कॉलनंतर घरच्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दापुढे मी निःशब्द आत्मसमर्पण केलं. 
नाहीतर पर्याय नव्हताच.

एकाच वेळेस दोन गोष्टी हरवल्या - 
प्रेम... आणि आधार...

शिल्लक काय राहिलं???
दुःख... यातना... संताप... 
श्वास चालू होता, पण जीव नव्हता.

आज, दोन वर्षांनी,
मी इथे आहे.
स्तब्ध, शांत...

पण हृदयात अनेक सत्यांची तलवार घेऊन उभा आहे.

एखाद्या योध्यासारखा...
ज्याचं कुरुक्षेत्र अजून बाकी आहे... 
आणि विजयही अजून पूर्णपणे निश्चित नाही.

12."तिच्या चुका, माझे दोष आणि अनुत्तरित प्रश्न "

तिच्या चुका :-
ती कधी समोर आलीच नाही.
जिच्यासाठी सर्वस्व बाजूला ठेवल, तिनं कधीच मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
एक संवाद... एक विश्वास... काहीच नव्हतं.

ती कायम फक्त 'मि तशी मुलगी नाही' म्हणत राहिली, पण 'मी काय आहे?' हे कधीच सांगितलं नाही.
प्रेमात समजून घेणं गरजेचं असतं, 
ती मात्र प्रत्येक वेळेस 'ब्लॉक' या शब्दाने सुटका करत गेली.

माझ्या चुका :-
मी अट्टहास केला...
प्रेमाच्या नावाखाली तीच्या आयुष्यात शिरण्याचा प्रयत्न केला.
एकदा हरल्यावर मागे फिरायला हवं होतं, पण मी सातत्याने प्रयत्न करत राहिलो. 
हे प्रेम होतं की हट्ट - हेही कळेनासं झालं.

मी स्वतःचं नुकसान केलं... 
स्वतःच्या आत्म्याला जाळत गेलो -
दुःखा मध्ये.

मी तिच्यावर प्रेम केलं, पण स्वतःवर मात्र अन्यायच केला.

आणि आजही मनात उभे राहतात काही प्रश्न :-
तिच्यावर प्रेम करणं हा गुन्हा होता काय? 
का तिनं कधीच समजून घेतलं नाही? 
की मिच कायम चुकिचा होता? 
आणि माझ्या पश्चातापाचं काहीच मोल नाही का? 
इतकी वर्षे एकतर्फि भावना वाहत राहिल्या-त्याला काहीच अर्थ नाही का?

ही फक्त गोष्ट नाही...
हा एक आत्मसंघर्ष आहे -
जिथे प्रत्येक ओळ, प्रत्येक स्मृती, एक नविन युद्ध उभारते मनात.

पण आज, लढतोय मी...
शब्दांच्या तलवारीने, आठवणींच्या ढालीनं... आणि स्वतःच्या खऱ्या स्वरुपासाठी...

13."शेवटाचा आरंभ"

केलाय शेवट... सर्व चुकिच्या वाटांचा. 
जिथे मी स्वतःच हरवून बसलो होतो, त्या अंधारातून बाहेर आलोय -
स्वतःचं सामर्थ्य ओळखून.

आज मी उभा आहे -
त्या परमेश्वराच्या साथीनं, 
त्या माझ्या ध्येयवादी वृत्तीनं, 
ज्याने मला कधीच हार मानू दिली नाही.

माझं प्रेम - एकतर्फी का असेना -पण खरं होतं.

शब्दांत न बसणारं पण मनात खोल रुतलेलं.
ते सिद्ध करणार आहे... 
कृतीतून, जिद्दीनं, आणि परिवर्तनातून.

वृषालीच्या नजरेत खटकलेल्या प्रत्येक शब्दासाठी, 
तिच्या अस्तित्वात शून्य बनून राहिलेल्या माझ्या अस्तित्वासाठी... मी जिंकेन - हे कुरुक्षेत्र, हे आयुष्य.

हे शेवटचं पान नाही... 
ही तर सुरुवात आहे -
एका नव्या मीची, 
ज्याने वेदनेतून शक्ती निर्माण केली. 
आणि आता तो जिंकणार आहे -
आपल्या अपूर्ण प्रेमासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी... 
जे आज नव्यानं उभं राहतंय.

"मी जिंकणार आहे. कारण मी हरलो नव्हतो, फक्त वाट चुकलो होतो."
🔅
||श्रीकृष्णार्पणमस्तु||
🙏