शिक्षणपद्धती सुधारायची असेल तर........
*आजच्या शिक्षकांची अवस्था कालच्या गुरु द्रोणाचार्यांफारखी करु नये. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण शिक्षक हा अतिशय सन्मानाचा घटक आहे. लोकं त्याचा सन्मान करतात. कारण असतं, त्याचं चांगलं शिकवणं व त्याची चांगली वागणूक. अलिकडील काळात त्याचा पेशा बदनाम होत चाललाय. त्याचं कारण आहे आजच्या काळात निर्माण झालेला स्वार्थ. हा स्वार्थ शिक्षकात निर्माण झालाय. काही काही अशाही शाळा आहेत की त्या शाळेत शिक्षकांचा सन्मान होतो. त्याला दरवर्षी वर्षाच्या अंती पुरस्कार देऊन गौरविले जाते. त्याच्या चांगल्या कार्याची दखल घेतली जाते. त्यातच त्याच शाळेत विद्यार्थ्यांचाही गौरव केला जातो. त्यालाही पुरस्कार देऊन गौरविले जाते. शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या सर्वच मुलांचा सन्मान अशा शाळेत होत असतो. ज्यातून पटसंख्या वाढते व ती वाढतच जाते.*
शिक्षण...... म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे. जो पिणार, तो गुरगुरणारच. परंतु असं होत नाही. आजच्या काळातील शिकणारा घटक हा शिक्षण शिकून गुरगुरत नाही. तर तो गुलाम असल्यागतच वागतो. कारण त्याच्याच निर्माण झालेला स्वार्थ. हा स्वार्थ शिक्षकात कसा निर्माण होतो? हा स्वार्थ निर्माण होतो, त्याला होत असलेल्या त्रासानं. त्याला आजच्या काळात निर्माण झालेला संस्थाचालक नावाचा बांडगुळ छळातोय. त्यामुळंच असा त्रास आपल्याला होवू नये म्हणून आजचा शिक्षक संस्थाचालकाचा गुलाम होवून कार्य करतो. कारण पोट महत्वाचं असतं. आजच्या काळात शासन जरी शिक्षकाला वेतन देत असलं तरी त्या शिक्षकावर देखरेख ठेवायचं काम हे संस्थाचालक मंडळ करीत असतं. ते देखरेख करण्याचे पैसे जबरदस्तीनं शिक्षकांकडून वसूल करीत असतं. अशावेळेस देखरेखीचा पैसा शिक्षकानं न दिल्यास त्या शिक्षकाला महाभयंकर त्रास दिला जातो व त्याला बदनामही केले जाते. म्हणूनच आजच्या काळात शिक्षक हा बदनाम झालाय.
पुर्वी आश्रम पद्धत होती. लोकं आश्रमात शिक्षण शिकायला पाठवत असत. त्या आश्रमातून वेद, विद्या, शस्र शिक्षण, राजकारण, भौगोलिकता व वास्तविकता शिकवली जायची. ही गुरुकूल पद्धती होती. या पद्धतीत गुरुला सन्मानाचं स्थान होतं. गुरुच्या आश्रमात जोही यायचा. तोही शिक्षण घ्यायचाच. मात्र त्यावर बंधन होतं. काही काही लोकांच्या मुलांना तिथं प्रवेशच नसायचा. कारण ती मुलं राजसत्तेशी जुळून नसायचे. परंतु गुरुंचा सन्मान होता. तो जेव्हा रस्त्याने जात असे. तेव्हा त्याच्यासमोर नतमस्तक होणारी माणसं भरपूर असायची. त्यातच गुरुला देवाचे स्थान होते.
गुरुला असलेले देवाचे स्थान. या स्थानालाही गालबोट लागलं. त्यालाही बदनामीचा इतिहास आहे. तो बदनामीचा इतिहास गुरु द्रोणाचार्यच्या रुपाने आजही अस्तित्वात आहे. म्हणतात की गुरु द्रोणाचार्यने गुरुपणाला गालबोट लावलाय. त्यानं एकलव्याला शिक्षण दिलं नाही. उलट त्याचा अंगठा मागितला.
गुरु द्रोणाचार्यने एकलव्याला शिक्षण शिकवलं नाही. त्याचं कारण होतं त्याचं पोट. हस्तिनापुरात गुरु म्हणून नियुक्त होण्यापुर्वी गुरु द्रोणाचार्यांवर संकट कोसळलं होतं. त्याचा गुरुबंधू असलेल्या ध्रृपद राजानंही त्यांचा अपमानच केला होता. अशा अतिशय व्यथीत झालेल्या व पोटातील भुकेनं व्याकूळ झालेल्या द्रोणाचार्यांना कोणत्याही परिस्थितीत आपली भूक मिटविण्यासाठी आपल्या पेशाशीच करार करावा लागला. जो पेशा त्यांची भूक मिटविणारा तर होताच. परंतु तो पेशा त्यांच्यावर बंधन आणणाराही होता. शिवाय हस्तिनापुरात त्यांना शिकविण्याची नोकरी मिळणार होती. परंतु एक अट होती. त्यांनी केवळ हस्तिनापुरातील राजदरबारातीलच मुलं शिकवावीत. इतर मुलं नाहीत. त्याच अटीनुसार केवळ पोटातील भुकेसाठी द्रोणाचार्यांनी तो करार स्विकृत केला. त्यामुळंच त्यांनी एकलव्याला शिकविण्याचं नाकारलं. शिवाय आपल्या हातून शिकलेल्या मुलांपेक्षा इतर मुलं जर वरचढ निघाली तर आपल्या कामगिरीवर शंका उत्पन्न होईल. असं गुरु द्रोणाचार्यला वाटलं असेलच. त्यातच आपणच माझे गुरु असल्याचे द्रोणाचार्यांना एकलव्यानं सांगताच द्रोणाचार्यांना वाटलं असेल की आता आपली नोकरी जाणारच. जर एकलव्य द्रोणाचार्यचं गुरुशिष्यपण हस्तिनापुरला माहीत झालं तर..... याच दृष्टिकोणातून त्यांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतला असेल. ज्यातून त्यांनी हस्तिनापूरशी केलेला करार पाळल्या गेला. परंतु तो करार गुरु द्रोणाचार्यांची बदनामी करणारा ठरला.
आज तसेच स्वरुप सुरु आहेत. आज हस्तिनापूररुपी संस्थाचालकाच्या राजसत्ताक पद्धतीचा वरदहस्त व हस्तक्षेप शिक्षणक्षेत्रात सुरु आहे. अशावेळेस एखादा एकलव्यासारखा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला तर त्याला आजचा गुरु कालच्या गुरु द्रोणाचार्यांसारखा शिकवायला तयार नाही. त्यातच तो मुलगा जरी शिकला तरीही त्याचा अंगठा मागणारे आजचे शिक्षक आहेत. ज्यातून शिक्षणक्षेत्र बदनाम होत आहे. ते शिक्षणक्षेत्र आपलं पोट सांभाळणाऱ्या आजच्या गुरुंना बदनाम करीत आहे. आज काही काही शिक्षक आपलं पोट सांभाळत असतांना ते संस्थाचालकाकडून राहतात. त्यांच्या मर्जीनं वागतात. त्यांचीच मर्जी सांभाळतात. ज्यातून विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही. विद्यार्थी घडत नाहीत. त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. दुसरा अन्याय होतो संस्थाचालकाची मर्जी न सांभाळणाऱ्या शिक्षकांकडून. त्यांचं म्हणणं असतं की वर्गात एकलव्यासारखे विद्यार्थीही शिकावेत. त्यांच्यावर शिक्षण शिकण्याबाबत अन्याय होवू नये. त्यांचे अंगठे कापले जावू नये. त्यांचे जवळ पैसे नसले तरी त्यांना शिक्षण मिळावे. परंतु आजच्या काळातील हस्तिनापुरसारखे संस्थाचालक विद्यार्थ्यांकडून शाळा शुल्क घेतात व एकलव्यसारख्या गरीब, पैसा देवू न शकणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांवर अन्याय करतात. यात शिक्षक व संस्थाचालकाचे वाद निर्माण होतात. ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो व एकलव्यासारखे विद्यार्थी शाळेतच येत नाहीत. तसेच जे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. तेही कालांतरानं हळूहळू शाळा सोडतात. ज्यातून शाळेला पटसंख्या गळतीची उतरती कळा लागते. त्यातच प्रचंड, भव्यदिव्य व वरवर चांगले गुण दिसणारी शाळा, अंतर्गत वादातून बुडते. कारण त्या शाळेत शिक्षणाचा व शिक्षकांचाही सन्मान नसतो.
शिक्षकांचाही सन्मान व्हायलाच हवा. कारण शिक्षकांचा सन्मान ज्या शाळेत होईल. त्याच शाळेत शिक्षणाचाही सन्मान होतो आणि ज्या ठिकाणी शिक्षणाचा सन्मान होतो. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचाही सन्मान होतो व जिथे विद्यार्थ्यांचा सन्मान होतो, तिथे विद्यार्थ्यांना शिकायला आनंद होतो. ते चांगले शिकतात. त्यातूनच ते घडतात. एकंदरीत सांगायचं झाल्यास अशा शाळा नावारुपाला येतात नव्हे तर त्या ठिकाणी विद्यार्थी पटसंख्या टिकून असते. ती वाढतही असते. त्यामुळंच आजच्या शाळेतील संस्थाचालकानं आजच्या शिक्षकांची गत कालच्या गुरु द्रोणाचार्यांसारखी करु नये. त्यांचाही सन्मान करावा. कधीकाळी त्यांनी चांगलं शिकवलं तर त्यांनाही पुरस्कार द्यावा. शिकविण्यासाठी त्यांचेवर कोणत्याही स्वरुपाचे बंधन आणू नये. स्वार्थही आणूच नये शिक्षणात. तसाच आजच्या संस्थाचालकांचा उद्देश पैसे कमविणे नसावा. जेणेकरुन त्यांनी उघडलेल्या शाळेतून एकलव्यासारखेही विद्यार्थी शिकतील. तसेच त्यांना शिकविणारे शिक्षक हे द्रोणाचार्यांसारखे वागणार नाहीत. ज्यातून शिक्षणाचाही सन्मान होईल. शाळाही नावारुपाला येतील व पटसंख्येची मारामार असणार नाही. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०