कादंबरीगालावरील तुझ्या पावडरहोऊ काय?**संजय वि. येरणे**
संजय वि. येरणे प्रभाग ७, शिवाजी चौक,मु.पो.तह. नागभीड, जिल्हा चंद्रपूर ४४१२०५मो. नं 9421783528**
(प्रस्तुत कादंबरीतील घटना, पात्र, प्रसंग हे काल्पनिक असून यातील कथानक संबंध साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)
मनोगत
“गालावरील तुझ्या पावडर होऊ काय?” ही कादंबरी वाचकांसमोर उपलब्ध करून देताना खरेतर मी आनंदीत आहे, तेवढाच सांशकही आहे. यापूर्वी “योद्धा, यमुना, रमास्त्र” ह्या तीन कादंबरी संत वाड्.मय व ऐतिहासिक स्वरुपात माझ्या हाताने पूर्णत्वास आले आहे. ‘बयरी’ ही ग्रामीण कादंबरी स्त्रीव्यथेवरील आपणांसमोर साकार झाली आहे. मात्र प्रेम या विषयावर ‘पावडर’ ही कादंबरी अगदी खूप वय व बुद्धीने वाढल्यावर लिहिणे मलाच हास्यास्पद वाटते आहे. खरंतर ‘प्रेम’ या विषयावर काही नवीन मांडता येणार नव्हतेच. “तोच मसाला आणि तोच भात” असे प्रेम विषयाच्या बाबतीत घडत असतं. एका चित्रपटाच्या कथानकदृष्टीने एका व्यक्तिमत्वाने सांगितल्यामुळे काहीतरी वेगळे कथानक देता येईल काय? याचाच विचार करत असताना या कादंबरीचे लेखन कार्य सुरू केले. मात्र तब्येतीची कुरकुर आणि कौटुंबिक कार्याचा व्याप यामुळे मी या विषयाला न्याय देताना खूप उशीर केला. प्रेम या विषयावर कादंबरी लिहिणे हा माझा पिंड नव्हताच. त्यामुळे मी केलेले लिखाण हे साहित्यमूल्याच्या दृष्टीने वरचढ असेल असेही मी मानत नाही. कादंबरीला दिलेले ‘पावडर’ हे वेगळे नाव ऐकून नावातूनही हसू येतं. प्रतिकात्मक काव्यकल्पनेतून सुचलेलं हे नाव आहे. या कादंबरीतील घटना, पात्र, प्रसंग मांडताना खरेतर इतिहास या विषयापेक्षा मला फार कस लागलेला आहे. ही कादंबरी कलश-स्मिता या पात्राची मध्यवर्ती भूमिका, त्यांच्या मनभावना आणि त्यांचं वागणं-बोलणं यावर चित्रीत झालेली आहे. फ्लॅशबॅक पद्धतीने काही मोजक्याच दिवसाचं कथानक मांडण्याचा यात प्रयत्न केला आहे. आत्मकथन व निवेदन सूत्र वापरून रचलेले कथानक आणि समिश्र भाषेचा संगम, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सिनेमाच्या गीताने केलेली सांगता, नाविन्यपूर्ण कल्पकता मांडण्याचा प्रयत्न याद्वारा झाला आहे. खरंतर यातील घटना, पात्र, प्रसंग हे काल्पनिक असून यात कुठलाही योगायोग साधर्म्य येणार नाही ही खात्री आहे. कादंबरीतील वैचारिक मांडणी सोडून प्रेममांडणीला ही तरुणाई नक्कीच आपलीशी करेल, या उद्देशाने लिहिलेले हे मनोरंजनात्मक कथानक होय. प्रबोधन किंवा सामाजिकता या बाबीकडे दुर्लक्ष करावे लागेल. काही वर्षांपूर्वी देशोन्नती ‘जल्लोष’ मध्ये तरुणांईवर वैचारिक लेख लिहिताना मनात असलेलं कादंबरीच्या रूपातील प्रगटन हे आज कित्येक वर्षांनी ‘पावडर’ रूपाने समोर आले आहे. याचमुळे हा आनंद. कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, बालवांड्.मय, संपादन अशा अनेक प्रकारातील पस्तीसहून अधिक पुस्तकाचे लेखन कार्य करताना पुन:श्च या कादंबरीरूपाने साहित्यकार्यात पडलेली भर मन सुखावणारी आहे. कादंबरीचे कथानक आपण वाचणार आहातच. त्याविषयी काय बोलावे? मात्र आपणास मनोरंजन या दृष्टीकोनातून ही कादंबरी नक्की आवडेल. या कादंबरी निर्मिती मागे काही मित्रमंडळीचे सहकार्य लाभले. त्यांच्याशी केलेल्या चर्चा आणि त्यांनी सांगीतलेल्या घटना, प्रसंग यांचाही मी आभारी आहे. अखेर आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत.
लेखक - संजय येरणे.नागभीड, जिल्हा चंद्रपूर.मो.नं. 9421783528
भाग 1
१
“चाहे सौ गर्दीशे हो, पर कोई गैर नही
हम दुनिया से लढ लेंगे, पर तेरे बगर नही.”
यासीर देसाईचे गीत मोबाईलवर सुरू होते. कलश गाण्यात तल्लीन होऊन रमला होता. अगदी पहाटेच्या समयी उठलेला कलश घराच्या बाहेर फिरायला निघालेला. तसं पाहता त्याला गाण्याची तेवढी विशेष आवड नव्हती, पण या एखाद्या महिन्यात त्याला गाणे फारच आवडू लागले होते.
कलशचं मन अधीर होतं. गाणं ऐकता-ऐकताच त्याने पुन्हा चॅटबॉक्स उघडून बघितला. त्याचं मन पुन्हा निराश झालं. “अरेच्चा! ही वेडी तर नाही. तब्बल बाहात्तर तास झालेत. तिचा मोबाईल स्विच ऑफ येतो आहे. ऑनलाइन पण ती आली नाही.” मनात विचाराचे काहूर दाटून आले होते.
तो वारंवार स्मिताचा चेहरा डोळ्यासमोर आठवीत होता. त्याचं मन बेचैन वाटत होतं. तिच्याशी सहजच बोलावं, कमीत कमी तिने मेसेज तरी द्यावा एवढीच माफक अपेक्षा. पण ती कलशला भेटून गेल्यापासून असं काय घडलं? की, तिने फोन स्विच करून ठेवला आहे. त्याच्या मनात विचाराचे थैमान पसरताच त्याने मोबाईलवरील गाणे बंद केले. पहाटेचा चंद्र आता सूर्याच्या आगमनात आभाळातून विरणार होता. कलशचं बेचैन मन सकाळचं मॉर्निंग वाक करून निराशमनाने घराकडे परतत होतं.
***
अगदी परवाला स्मिता त्याला ठरल्याप्रमाणे भेटायला आलेली. तेव्हा पण तिचा मोबाईल बंदच येत होता. त्यांनी तिला विचारलं.
“का गं स्मिता सकाळपासून तुझा मोबाईल बंद येतो आहे?” त्याने तिला विचारलं.
“होय, रिचार्ज संपलाय म्हणून... पण मी आली ना! काल ठरवल्याप्रमाणे.”
“होय, थोडा उशीरच केला तरीपण...”
“हो, झाला थोडा उशीर. कसं सांगू तुम्हाला? घरी किती खोटं बोलावं लागतं एवढ्याशा भेटीसाठी.” ती मंद स्मित करीत हसली. तिच्या गालावर पडणारी खळी, तिचं लाजरंबुजरं हास्य त्याला फुलविण्यास पुरेसं होतं. ती येताच त्याचं मन फुलारून आलेलं.
ती जवळ आली. एकटक त्याच्याकडे बघत राहिली. त्याला आलिंगन द्यावे असेच तिला वाटले. ती त्याचा हात हातात घेणार एवढ्यात कलशने थोडं सरकत हात आखडता घेतला होता. ती अगदी भाऊक झालेली. त्याला कवेत घेणार अशीच तिची स्थिती. आजूबाजूस कोणी बघत तर नाही ना! कलश खात्री करीतच थोडे बाजूला झाला.
तीही अगदी त्याला बघून आनंदली होती. तिने जवळ येताच हातातील रंग घेत त्याच्या चेहऱ्यावर माखला. ती अगदी हसून आनंदाने त्याला रंगाने भरवीत होती. रंगपंचमीचा तो दुसरा दिवस. दोघांनी एकमेकाला रंग लावायचं असंच ठरवलं होतं. स्मिता मनातून पहिल्यांदाच आपल्या कलशला रंगाने भरवित होती. कलशने हातात गुलाल घेत तिच्या चेहऱ्यावर रंग माखला होता.
कलशचा तिच्या कोमल गोऱ्या गालावर झालेला स्पर्श, हातात हातात घेत तिच्याकडे बघू लागला होता. तिचे डोळे पाणवले होते.
“खरंच! माझ्यावर एवढा जीव लावलंस होय.”
“हुं! तुम्ही सुंदर आहात. अगदी मनातून आवडलात मला. तुमच्या पहिल्या भेटीपासून ते आजतागायत मी तुमच्या गुणकौशल्यावर भाळली आहे.”
“मला सांगायला हवं होतं ना! इतके दिवस अशी....”
“खूप भीती वाटत होती. मी मनातच कुढत जगत होती. पण त्या दिवशी मला राहावलं नाही. मी मेसेज केला तुम्हाला.”
“अगं, मी किती कोड्यात पडलोय. विचारचक्रात गुंतलोय बघ. आपली वाट अगदी ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहे. आपण कधीही एकत्र येऊ शकत नाही आणि मला तर तुझी फसवणूक करायची नाही...”
“हो रे माझ्या सोनपाखरा! तुमचं प्रामाणिक मन बघूनच तर मी फसले. मी तरी काय करू सांगा ना! मला तुमच्याशिवाय काहीएक दिसत नाही. तुमच्याशिवाय आता जगणं म्हणजे...” कलशने तिच्या तोंडावर हात ठेवला होता. तिचं बोलणं थांबलं होतं.
कलशने तिला कुशीत घेत कुरवाळले होते. तिची पापणी आनंदाने भरून आली होती. ती रडू लागली. स्मिताचं प्रेम तिच्या कुशीत असल्याने तिला झालेला तो अत्यानंदच होता. बराच वेळ ती त्याच्या कुशीत विसावली होती. स्मिताने पटापट त्याच्या ओठाचं चुंबन घेतलं होतं नि कलशही तिच्या या कृतीने तिच्या ओठावर ठेऊन चुंबन घेऊ लागलेला. दोघेही एकमेकांच्या नजरेत बघत प्रेमधुंद झाली होती.
“स्मिता..”
“हुं...!”
“मी जर असा तुझ्याशी वासनेच्या पलीकडे गेलो, मोह आवरता नाही आला तर...!”
“हुं...! मी तुझीच आहे रे माझ्या राजा!”
“होय, तू माझी राणी आहेस, पपीहा, कोयल, जीवनगाणी आहेस.”
“माझे जीवन, माझी तहान, तुम्ही पाणी....” ती त्याच्या गालावर टिचकी मारत हसली.
“बोल ना!”
“काय बोलू? मला काहीच असं आठवत नाहीये. तू जवळ असलास म्हणजे झालं.”
“पण मला कसं जमणार? ते तुलाही ठाऊक आहे. माझ्या अडचणी...”
“हो रे माझ्या राजा, पण तुझ्यावर मनसोक्त प्रेम करता येईल तेवढं मी करतच राहणार. माझ्या हृदयात तू जीवनाच्या शेवटपर्यंत राहणार आहेस.”
“खरंतर तुझं इतकं जीव लावणं, वेड लावणं, वागणं, मला तर तू यामुळेच भावलीस. होय! आपलं प्रेम असं किती दिवसाचं म्हणण्यापेक्षा पुढं अगदी हयात असेपर्यंत टिकावं असंच वाटतंय. देतेस ना मला वचन!”
“हो रे माझ्या राजा! दिले तुला वचन. माझी शपथ!” दोघांनीही पुन्हा एकमेकास आलिंगन दिलं होतं. वचनाची पूर्तता करण्यास शपथ घेतली होती.
“लव यू सो मच...” स्मिता कानात पुटपुटली.
“लव यू टू मच...” कलशनेही प्रत्युत्तर दिलं.
दोघांच्याही नजरा एकमेकास भिडल्या होत्या. दोघांचीही आजची भेट काही औरच होती. तिचं सोनपावलाने येणं, संयमी बोलणं, जवळ येताच हातात हात धरून एकमेकास निरखणं
ठरवलेला तो दिवस, स्मिता व कलशच्या मनाला नेत्रपालवी फुलवणारा असाच राहिला. किती वेळापासून ती येईल लवकरच, याकडे लागलेले डोळे, तिच्या येण्याने, तिच्या स्पर्शाने त्याला मोहित करून घेत होते. तिचा स्पर्श त्याच्या मनाला उभारी आणणारा असाच, दोघेही एकमेकांसमोर बसून एकमेकांना निरखत होती.
पुढे काय नि कसं बोलावं? तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. त्याने अलगद हातात एक पुस्तक घेतलं.
“काय वाचते आहेस...?”
“ही कादंबरी...”
“मलाही आवडते वाचायला, देणार ना!”
“हो तू पण वाच. खास तुझ्यासाठीच मागवली आहे. आवडेल तुला.”
“काय आहे यात विशेष?”
“फक्त प्रेम, निस्वार्थी प्रेम...”
“खर सांगू का? यातील एक वाक्य खूप आवडलं मला. अगदी मनावर कोरून गेलं आहे.”
“कोणतं?”
“सत्ययुगात सीता मरायची, आज कलियुगात राम मरतो आहे.” कलश खिन्न आणि उदास झाला होता. ती त्याकडे एकटक बघतच राहिली. स्मिताला त्याच्या भावना कळून आल्या होत्या. त्याचे मन उमगले होते.
कलशला वाचण्याची फारच आवड, कधीमधी तर चार शब्द खरडून काढत एखादी कविता तयार करण्याचा छंद. कलशच्या सहवासामुळे खरंतर स्मितालाही वाचण्याची आवड लागली होती आणि कथा, कादंबरीवरील चर्चा त्यामुळेच स्मिता त्याच्याजवळ आलेली होती. कलशच्या गुण कौशल्याने तिला भारावून सोडलं होतं. स्मिताने कादंबरीची पाने चाळली. त्यावरील मुखपृष्ठ तर अप्रतिमच होतं. ‘बाळाला दूध पाजणारी आई’ ग्रामीण स्त्रीच्या संघर्षाचे चित्रण करणारी ती कादंबरी.
“तू वाच अगोदर, मला काय आहे यात विशेष ते सांगशील? आता तुला चांगलं समीक्षणात्मकही बोलता येतं ना! मी सांगण्यापेक्षा तुझ्या शब्दात ऐकायला आवडेल मला.” कलशने तिला सहजच हसत म्हटलं.
“हं! अगदी आवडीने वाचेन, पण काय करू? अजिबात घरच्या कामामुळे वेळच मिळत नाही. पण लवकर संपविण्याचा प्रयत्न करेन.” ती हसतच म्हणाली.
एक वर्षापासून मनात असलेले प्रेम आणि त्याची झालेली सुरुवात यामुळे तिचा चेहरा फुलला होता.
“आता पुन्हा केव्हा भेटशील?” कलशच्या बोलण्याने तिचा चेहरा पडला होता.
डोळ्यातून पाझर गळावा अशीच तिची स्थिती, ती एकटक त्याच्याकडे बघत राहिली.
“हं कळवीन. आता तुम्हाला भेटणं अशक्य होतय. कशी सांगू माझ्या राजा... इकडे आड तिकडं विहीर, मला तर वाटते हे सारंकाही सोडून तुमची व्हावे, पण...” डोळ्यातील ओलावा पुसत उसासे देऊ लागली होती.
कलश तिच्याशी आता कसं बोलावं याचाच विचार करू लागला होता.
“ऐ स्मिता बघ, आपलं काय ठरलं? अशी वेड्यासारखी वागू नकोस तू. रडायचं नाही. थांबव हे सगळं. कितीदा म्हटलं... नुसतं हसायचं. तू हसलीस ना की माझंही मन प्रफुल्लित होतं. असं नाही ना वागायचं.” कलशने तिच्याजवळ जात खिशातून हातरुमाल काढला. तिचे अश्रू पुसले होते. तिला कलशचा मिळालेला आधार... तिला फारफार मोलाचा वाटला होता.
“बरं हा रंगलेला चेहरा पुसून घे तेवढा!”
“नाही ना...! मी नाही पुसणार.”
“अगं इथून जाताना लोक बघतील तेव्हा काय समजतील. झालं ना आपलं रंग खेळून...”
“मी नाही जा... मला पुन्हा लावायचा आहे रंग तुला.”
“मग लाव ना!” ती अगदी आनंदाने हसली.
तिने हातात रंग घेऊन पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर फासला होता. कलशनेही तिच्या चेहऱ्यावर रंग फासला. बराच वेळ दोघेही रंगात न्हाऊन निघाले होते. मोहच तो, कलशची बोटे अलगद तिच्या वक्षस्थळावरून फिरू लागली. क्षणार्धात ती सावध होत बाजूला झाली होती. तिने एक कटाक्ष रागातच त्यांच्याकडे टाकला. कलशला त्याची चूक लक्षात येताच तोही स्वतःला सावरत ओशाळल्यागत बाजूला झाला होता.
तिला केलेला मोहक स्पर्श जणू ही जीवनातील प्रेमभेट आज आपल्यामुळेच कटू झाली असं त्याला वाटू लागलं होतं. त्याचं प्रामाणिक मन ओशाळळल्यागत झालं. त्याला स्वतःला अपराधीपणाची जाणीव झाली.
“सो सॉरी स्मिता, ओ आय वाझन्ट गोइंग टू अॅक्ट लाईक दॅट, बट द टेम्पटेशन टू गेट क्लोज टू यू. आय स्वीअर आय वोन्ट इवन टच यू स्वीअर.” कलशने तिला कसेबसे समजावले होते.
ती मात्र रडवेली झाली.
“काळजी घ्या. येते मी,” वेळही बराच झाल्याने ती त्याकडे एकटक बघत म्हणाली.
ती कलशजवळून परतायला निघाली होती. कलश तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला. स्मिता मात्र एकदाही मागे वळून न बघता निघून गेली होती आणि अपराधीपणाची भावना, त्याची चूक त्याच्या मनालाच खात राहिली.
***
या बाबीला तब्बल बाहात्तर तास उलटलेले. पण अद्याप स्मिताचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. ऑनलाईन तर ती आलीच नाही. तिचा विरह, तिच्याशी झालेली भेट कलशच्या मनमेंदूत भरलेली स्मिता वारंवार नजरेसमोर येत होती.
“काय बरं झालं असेल? कदाचित आपण चुकीचे वागलो म्हणून असेल का? तिनेच तर पुढाकार घेतला होता. होय, आपण तर तिला स्पर्शही करणार नव्हतो. खरं तर आपल्यातलं हे अंतर तिनेच कमी केलं. फार मोठी चूक झाली. आपण असे वाहून जायला नको होतं. हे कसले प्रेम? हे काय आता आपले प्रेम करायचे दिवस आहेत. आपण तरी कुठे तिच्यात एवढं वाहवलो होतो. पण अचानक असे आपण तिच्या प्रेमात कसे गुंतलो हेच न कळणारे आहे,”
डोक्यात अनंत विचाराचे चक्र मेंदूला झिनझिण्या आणत होते. रात्रंदिवस केलेला विचार डोकं ठणकू लागलेलं.
“रात्रौला चांदण्या मोजण्यातच आपली गच्चीवर रात्र गेली. मात्र आपली चांदणी आज आपल्याला दिसलीच नाही. कुठलं ढग आडवं आलं कुणास ठाऊक?”
या प्रभात समयी फिरताना कलश तिच्या आठवणीत, मोबाईलवर लागलेलं गाणं गुणगुणत राहिला.
“दिल से सुन पिया, ये दिल की दासता,
जो लब्जो मे नही हो बयान....”
***